Friday, 1 December 2017

शिवजन्मस्थान : किल्ले शिवनेरी (SHIVNERI FORT)

   

          दसरा, रविवार आणि गांधीजयंती म्हणजेच शनिवार, रविवार, सोमवार असा "LONG WEEKEND" आणि अश्या दुर्मिळ योगाचा फायदा नाही उचलला तर कसले आम्ही भटके???  खूप दिवसांपासून हे दिवस डोक्यात होते आणि काहीतरी करायचं हे सुद्धा ठरलेलं होतं पण जावं कुठे हा प्रश्न होता. ऊन जास्त असल्याने उगाच थकवा जाणवेल अश्या ठिकाणी जायचं नव्हतं. बऱ्याच विचारानंतर सर्वांच्या अनुमते शिवनेरी समोर आलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या माझ्या जीवश्च कंठश्च मित्राचं म्हणजेच श्रीधर गोपाळे उर्फ आमचा लाडका "गोपू" ह्याचं घर शिवनेरीच्या जवळच होतं असं त्याचं म्हणणं होतं पण ते किती जवळ होत ते प्रवासानंतरच समोर आलं. पण असो त्या आमिषाने आमचं शिवनेरी आणि त्यासोबत चा NIGHTOUT चा बेत पण सफल झाला. मग आम्ही सगळेच म्हणजे मी उर्मिला, सागर, ऋषी, सुमित आणि गोपू  तयारीला लागलो.


           रविवार सकाळी ७ वाजता  प्रत्येक जण आपापल्या गाड्यांवर स्वार झाले प्रवासाला सुरुवात झाली. मुळातच सकाळी निघायला उशीर झाल्यामुळे लगेचच नाश्ता करायचा ठरवलं म्हणजे नंतर कुठे थांबायची वेळ आली नाही पाहिजे असं म्हणून बदलापूर मुरबाड रोडवरील प्रसिद्ध मुळगाव चा वडापाव खायला मुळगावत आठ वाजता थांबलो. तिकडेच पोटभर नाश्ता करून व गाडीत इंधन भरून आता आम्ही माळशेज च्या मार्गी लागलो.  सुमारे ९.३० च्या सुमारास आम्ही माळशेज घाटात होतो तिथे एक निसर्गरम्य ठिकाणी थांबून फ्रेश झालो व काहीसे फोटो काढले. ऊन वाढायच्या आत निघायचा निर्णय घेतला. बाईक वर Ride करत आम्ही सुमारे 12.30 ला शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलो.
माळशेजमधील विसावा 
              जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. 
         खाली गाड्या लावून आम्ही ६ जण गड चढण्यास सुरुवात केली तसं गड चढण्यासारखं काहीच नाहीये. सर्व ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे दमछाक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रमत गमत आम्ही १० मिनिटातच महादरवाज्यापाशी पोचलो पुढे गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा असे एका पाठोपाठ एक तीन दरवाजे लागले.  त्यातून प्रवेश करत आता आम्ही गडावर पोचलो होतो वरून निसर्गाचा आस्वाद घेत घेत प्रवास चालू होता
थोडं पुढे गेल्यावर हत्ती दरवाजा नजरेस पडला तिथे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
 हत्ती दरवाजा 
    पुढे मेणा दरवाजा आणि  कुलूप दरवाजा लागला.  कोणत्याही गडावर प्रवेश करताना इतके दरवाजे लागणारी हि पहिलीच वेळ असेल आमच्यासाठी. हेच दरवाजे शिवनेरीच्या भक्कमतेची साक्ष देतात. सुमारे १ वाजण्याची वेळ असल्याकारणाने वरून सूर्यदेव आमच्यावर जास्तच प्रसन्नता दाखवत होता म्हणून आम्ही आमचा वेग वाढवला आणि पुढे झालो समोर अंबरखाना नजरेस पडला. अंबरखाना म्हणजे तेव्हाच धान्याचं  कोठार. शिवनेरीवरील अंबरखाना म्हणजे "धान्यकोठी" प्रेक्षणीय आहे. अंबरखाण्यावरूनच ह्या अभेद्य  गडाचा अंदाज येतो.
अंबरखाना 
अंबरखान्यातील आतील भाग 
       अंबरखान्यापासून थोडंसं पुढे गेल्यावर उजव्या बाजूस गंगा जमुना टाके दिसतात हि बारमाही पाण्याची टाके असून सध्या पर्यटकांमुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. इथून थोडं पुढे गेल्यास  डाव्याबाजूस "शिवकुंज" म्हणजेच बालशिवाजी व जिजामाता पुतळा आहे व समोर ज्या पवित्र वास्तूची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे शिवजन्मस्थान हे आता आमच्या डोळ्यासमोर होते. म्हणजेच थोडक्यात गड सर झाला होता.
शिवजन्मभूमी 
      दुमजली असणाऱ्या ह्या वास्तूत तळ  मजल्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती व पाळणा आहे ह्या स्मृतीस आम्ही नतमस्तक होऊन वरच्या मजल्यावर निघालो अरुंद पण पवित्र असणारी हि वाट मनात अभिमान जागवत होती.  रविवार असल्याने गर्दी होती पण वरच्या बाजूस एक सुंदर ग्रुप बसला होता त्यातील "हरीश अंचन" नामक एक व्यक्ती खूप सुंदर बासरी वाजवत होती त्याच्या आवाजाने पावलं आपोआपच त्या दिशेने वळली त्याला एक दोन गाण्याची फार्महीशी केली आजूबाजूचा परिसर वरील खिडकीतून न्याहाळला व आम्ही खाली आलो.

           शिवजन्मस्थानाहून  पूढे जाताना समोरच "बदामी टाके" नजरेस पडले अतिभव्य असलेले हे बारमाही टाके आहे त्याला बदामी टाके हे नाव का आणि कसे पडले देव जाणे???
बदामी टाके 
       पुढे उजव्याबाजूने खाली उतरल्यास जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग दिसतो तो म्हणजे "कडेलोट". महाराजांच्या काळात गुन्हेगारांना इथून खाली टाकले जाई. ह्या जागेची उंची पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. हि वास्तू बघून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.
कडेलोट 
        एव्हाना २ वाजले होते गप्पा मारत मारत आम्ही कमानी टक्क्यापर्यंत पोचलो. वर कमान व खाली टाके ह्यामुळे ह्या टाकल्यास कमानी टाके म्हणत असावे ह्या टाक्यांमध्ये भरपूर पाणी व गुहेसारखा आकार असल्यामुळे ह्या टाक्यांमध्ये शेकडो वटवाघूळ गडबड करत होती. ती पहिली आणि आम्ही पुढे झालो पुढे कमानदार दारातून उजवीकडे गेलो समोर "शिवाई देवी" चे  मंदिर दृष्टिक्षेपास आलं. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो
शिवाई देवीचे देऊळ 
         उतरताना मनात विचार आला इतकं भव्यदिव्य धान्यकोठार, विपुल पाणीसाठा, इतका बुलंद नि बेलाग किल्ला व जीवाला जीव देणारे सहकारी लाभले तर शिवनेरी केवळ "अजिंक्य" आहे 
धन्य ते शिवराय व धन्य ते मावळे!!!
      शिवजन्मस्थानाला भेट देऊन आमचं जीवन कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.  ह्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही जवळच असणाऱ्या आमच्या मित्राच्या घरी जावयास निघालो त्याच घर इतकं जवळ होतं कि मला असं वाटलं अजून थोडावेळ गाडी चालवली असती तर आम्ही अफगाणिस्तानात प्रवेश केला असता. इतकी गाडी चालवल्यावर एक वेळ अशी आली की रस्ता संपला धरणासाठी अडवलेल्या पाण्यात पूल हि पाण्याखाली होता तेव्हा आम्ही आमच्या गाड्या बोटीमध्ये चढवल्या आणि तो ओढा ओलांडला. आमच्यासाठी पूर्ण दिवसातलं हेच खऱ्या अर्थाने थ्रिल होतं
बोटीमध्ये गाड्या चढवतानाचा प्रसंग 
       पेमगिरी गावाच्या जवळच असलेल्या "निमगाव पागा" ह्या गावात आम्ही वस्तीस थांबलो पण असो त्याच्यामुळेच आमची राहायची व्यवस्था झाली त्यामुळे गोपू तुझे खूप खूप आभार आणि उर्मिला  तू बनवलेलं जेवण अप्रतिम. सागर ,सुमित तुम्ही सोबत होतात तेच खूप होतं. आणि ऋषी तुझ्याबद्दल काय बोलू मित्रा??? तुझं नाव ऋषी कोणी ठेवलं हाच मोठा प्रश्न आहे.  इतकं थकून सुद्धा सगळ्यांनी दाखवलेल्या उत्साहाला सलाम आहे 
आपले पूर्वज माकडचं होते 
       पुन्हा  दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने सकाळी "पेमगिरी " येथील  कित्येक एकरवर पसरलेल्या वडाच्या झाडास भेट दिली तिथे प्रत्येकाने आपले पूर्वज माकडच होते ह्याचे उत्तम पुरावे देखील दिले. तिथे धमाल मस्ती करून परत गाडीवर बसून सोमवारी संध्याकाळी स्वगृही परतलो. 
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे"