Saturday, 22 July 2017

अंधारबन - एक जंगलवाट (Andharban Jungle Trek)

       गेल्या महिन्याभरात एकही रविवार घरी बसलो नव्हतो आणि आराम करायचा विचार मनाला स्पर्श सुद्धा करत नाही. कारण आजूबाजूला असणारा सह्याद्रीचा परिसर. सृष्टीसौंदर्य इतक्या जवळ असतानासुद्धा घरी बसणं हे वेडेपणाचं लक्षण आहे म्हणून पुढचं लक्ष्य घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास चालू केला ध्येय होतं अंधारबन.
           दिवस शनिवारचा होता. पुण्याला जायचं हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही म्हणून ऑफिसवरूनच थेट जायचं ठरवलं आणि ४.२५ ची प्रगती पकडली. मुक्काम होता संदीपा आणि चेतन च्या घरी. खरंतर त्यासाठीच जास्त उत्सुक होतो कारण माझ्यामते मी संदीपा चेतन ह्यांना कधी पाहिलं नव्हतं पण अचानक ग्रुपवर फोटो टाकल्यावर संदीपाचा मेसेज आला मी अजिंक्य ला ओळखते. आपण एकत्र ट्रेक केलेला. तेव्हा मी त्या ट्रेक चे फोटो पाहिल्यावर लक्षात आलं हो आपण भेटलो आहोत. विसरण्यासारखी ही व्यक्तिमत्व नाहीयेत पण तरीही बरेच वर्ष झाल्यामुळे नावानुसार लक्षात नाही राहिली पण चेहऱ्याने नक्कीच ओळखलं असतं. संदीपा चेतन ह्याचा कमी शब्दात परिचय करायचा झाला तर "दुनियादारी सोडून दुनियेच्या दारी जोडीने निघालेली स्वारी". थोडक्यात सांगायचे तर जग फिरायचं स्वप्न उराशी बाळगून निघालेले प्रवासी जोडपं.
                    शनिवारी रात्री सुमारे ९ वाजता आम्ही एकत्र भेटलो रात्र गप्पा मारण्यात आणि दुसऱ्या  दिवशीच्या तयारीत गेली सकाळी ५ वाजता उठायचं होतं म्हणून शेवटी रात्री साडेबारा वाजता झोपलो सकाळी उठलो. ६ वाजता गाडी बरोबर दारात उभी होती. आम्ही सुद्धा सकाळी  तयारीतच होतो त्या गाडीतून च आमचा सहावा हिरो आला. तो म्हणजे विवेक. पुणेकरांकडे विनोदाची खाण असते हे आम्हाला ह्याला भेटल्यावर च कळलं. जास्त वेळ वाया न घालवता आम्ही ६ जण पटकन गाडीच्या दिशेने गेलो एव्हाना ६.३० झाले होते. प्रवास सुमारे २ तसाचा होता म्हणून वाटेतच नाश्ता करून घेतला. सकाळी ट्रॅफिक नसल्याकारणाने आम्ही वेळेतच होतो. ताम्हिणी घाट लागल्यावर उजव्या बाजूस मुळशी धरण त्यावर गर्द झाडीमध्ये लपलेली डोंगराई पहायला मिळाली. गाडीतूनच ती न्याहाळून आम्ही ९ च्या सुमारास अंधारबनाच्या पायथ्याशी पोचलो.
पायथ्याचे गाव पिंप्री
     अंधारबनचं पायथ्याचे गाव पिंप्री. जेवणाची नाश्त्याची आणि गाईडची सोय आगोदरच केल्यामुळे काळजी करण्याची काही गरज नव्हती. गावात गेल्यावर गाईड आमची वाट पाहतच होता. गाईडच नाव तुकाराम त्याच्याकडे जेवणाची सोय असल्याने त्यांनी स्वयंपाक सगळा तयार करून ठेवलेला. आम्ही खाली बऱ्यापैकी फ्रेश झालो आणि ९.३० च्या सुमारास ट्रेक ला सुरवात केली

          अंधारबनची ओळख करून द्यायची झाली तर दिवसाढवळ्यासुद्धा ज्या वनात अंधार असतो तेच हे अंधारबन. घनदाट अशा या जंगलाने पावसाळ्यात हिरवागार गालिचा पांघरला होता व साथीला धबधबे तर होतेच. वाट चांगलीच मळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच होती पण आजकाल वाढत्या पर्यटकांमुळे बरेच रस्ते तयार झाले आहेत आम्हाला तर सुरवातीलाच एक ग्रुप चुकलेल्या वाटेने प्रवास करताना दिसला म्हणूनच आशा जंगलात हरवण्यापेक्षा वेळीच गाईड केलेला केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकची वाट सांगायची झाली तर आपण पुण्यातील पिंप्री गावातून चालायला सुरुवात करतो आणि अंधारबन च्या जंगलातून भिरामार्गे थेट कोकणात उतरतो. रविवारचा दिवस आल्याने गर्दीतर होतीच त्यामुळे आम्ही शांतता शोधत आमचा प्रवास चालू ठेवला होता. वाटेत बरेच सारे धबधबे लागले एक धबधब्यावर बरीच गर्दी होती कारण जवळपास तो वाटेतला त्यातल्या त्यात मोठा धबधबा होता. पण तिथे धमाल करणाऱ्या बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की त्याच धबधब्यावर तिथल्या ग्रामदेवतेच म्हणजेच वाघजाई देवीचं छोटंसं देऊळ होतं. तुकाराम दादांची ग्रामदेवता असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं की वर देवीचं देऊळ आहे पाहायला येणार का?? आमच्या सगळ्यांची पावलं मग देवळाच्या दिशेने वळली. देवीचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला.

      वाघजाई मातेचं छोटेखानी देऊळ 
         वाटेत ३ झरे लागणार हे आम्हाला माहीत होतं आणि हेच ३ कठीण पट्टे आहेत ह्या वाटेतले. तसा पहिला झरा पूर्ण आत्मविश्वसने ओलांडला आणि आता आम्ही खऱ्या अर्थाने अंधारबनाच्या घनदाट जंगलात प्रवेश केला सकाळी ११ वाजता सुद्धा त्या अंधारात चालल्यावर कळलं की ह्याला अंधारबन का म्हणतात. त्या जंगलातली ती शांतता आणि आजूबाजूच्या वाहत्या पाण्याचा सांगीतिक आनंद घेत आम्ही चालत होतो. चेतन आपल्या GO pro ने व्हिडीओ घेत होता
प्रवेश अंधारबनातल्या जंगलाचा

 
      
जंगलमय प्रवास 
        तुकाराम दादांशी गप्पा मारत मारत आम्ही असेच दुसऱ्या झऱ्यापाशी येऊन पोहोचलो आणि हा आमच्या वाटेतला सगळ्यात काठीण पट्टा होता. बरेच ग्रुपचे लोक त्याठिकाणी रोप लावून प्रवाह ओलांडत होते.  आम्ही सुद्धा रोप घेऊन गेलो होतो पण पाऊस जास्त नसल्यामुळे त्याची काही गरज पडली नाही.  पण तो प्रवाह ओलांडताना भीती तेवढीच वाटत होती कारण समोरून वाहत येणाऱ्या पाण्याला कापून वाट ओलांडायची त्यात पाय ठेवण्याच्या दगडांवर तयार झालेले  शेवाळे आणि त्यावरून सरकणारे पाय ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून पाउल पुढे टाकणं त्यामानाने कठीणच होतं.  पण आमच्या गाईडने ह्यात खरचं उत्तम मार्गदर्शकाची भूमिका बजावली त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना प्रवाह ओलांडून दिला आणि इतर लोकांनासुद्धा व्यवस्थित मदत केली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला की नदी ओलांडताना कधीच पाण्याकडे बघायचं नाही. समोर बघायचं कारण वाहतं पाणी आपल्या मनात अजून भीती निर्माण करतं. ह्या मदतीसाठी आणि ह्या बहुमूल्य सल्ल्यासाठी मी खरंच त्यांचा आभारी आहे. आणि त्यांची ओळख आम्हाला जिच्यामुळे झाली ती म्हणजे माझी भाची दिशा. तिचे पण ह्यानिमित्तने मी आभार मानतो. कारण दिशामुळेच आम्हाला तुकाराम दादांसारखा योग्य दिशादर्शक लाभला. आपल्यापैकी कोणाला गाईड चा नंबर हवा असल्यास कंमेंटबॉक्स मध्ये मेसेज करावा. मदत नक्की मिळेल
 अंधारबनातला एकमेव अवघड पट्टा 

               हा झरा ओलांडल्यावर आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली पण वेळेचं बंधन असल्याकारणाने परत पुढची वाट धरली. एव्हाना १२ वाजत आले होते खरंतर सरळ वाट असल्यामुळे दम लागण्याचा काही प्रश्न नव्हता. पण पोटपूजेची ओढ लागल्याकारणाने आता मी सुद्धा दादांना विचारलं की अजून जेवायचं ठिकाण यायला किती वेळ लागेल ते म्हणाले एक तासात आपण पोहचू  तसं ऐकून आमची पावलं वेगाने पडायला सुरुवात झाली थोडावेळ चालल्यावर आम्ही जंगलातून बाहेर आलो आणि प्रवेश केला तो म्हणजे रायगडमध्ये.
रायगड जिल्ह्यात प्रवेश करतानाचा तो क्षण   
विस्तीर्ण पठार 
        समोरच एक विस्तीर्ण पठार नजरेस पडलं तिथे बरेच जण जेवणाचा आस्वाद घेत होते. आम्ही सुद्धा तिथेच जेवायचं विचार केला पण तुकाराम दादा म्हणाले थोडं पुढे चला माझं घर आहे. आपण तिकडे जेवायला जाऊ. त्याच ऐकून आम्ही आमची पायपीट चालू ठेवली व त्यानंतर ह्या संपूर्ण वाटेत लागणाऱ्या एकमेव गावात म्हणजेच हिरडे गावात प्रवेश केला. आणि तिथे तुकाराम दादांच सुंदर घर होत. इतक्या उंचीवर अशा भारी ठिकाणी जेवायला मिळेल असा विचार आम्ही स्वप्नातसुद्धा केला नव्हता .
तुकाराम दादांचे टुमदार घर विश्रांतीचे  एकमेव ठिकाण

                  बऱ्याच वेळेनंतर आम्ही तिकडे खऱ्या अर्थाने विश्रांती घेतली आणि झुणका भाकरी डब्यातून बाहेर काढली आणि बरोबर त्याच वेळी बाहेर मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि आमच्या सगळ्यांच्या मनात एकच विचार आला की तुकाराम दादांचा घरी जेवायला आणायचा निर्णय योग्य होता. इतक्या वेळेनंतर काहीही मिळालं असतं तरी ते छान वाटलं असतं आणि त्यात आमच्याकडे झुणका भाकरी आणि श्रीखंड होते. असं सगळं अन्नग्रहण करून परतीची वाट धरली

झुणका भाकर आणि श्रीखंड  
         आता सगळा उतार होता पण खरी परीक्षा आताच होती कारण पावसामुळे सगळी वाट निसरडी झाली होती. तरीही पावलं जपून टाकत आजूबाजूच्या जंगलातल्या फुलं फळं वनस्पती न्याहाळत व समोरील  निसर्गाचा आनंद घेत एकमेकांना मदतीचा हात देत हळू हळू उतरत होतो.

    

   
        विवेक हि आमच्यातली एकमेव अशी व्यक्ती होती जिने काही गोष्टी गंभीरपणे जरी सांगितल्या तरीही आम्हाला त्यात विनोदच दिसायचा पण ह्यात आमची काहीच चूक नव्हती कारण तसं वातावरण आमच्यात त्यानेच जागृत करून ठेवलं होतं.  विवेकच्या मते कुठून ही खाली उतरायला अजून एक दीड तासच लागणार होता. खरंतर आम्हाला माहिती होतं किती वेळ लागू शकतो ते, पण इतर लोक जे विवेकच्या तोंडून हे ऐकायचे ते कदाचित आपली मानसिक तयारी करून ठेवत असतील असं आम्ही गृहीत धरून चालत होतो. अशीच हसवेफसवेगिरी करत आम्ही दुपारी  ४.३० च्या सुमारास भिरा गावात पोचलो.

ध्येय गाठल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 
                 गावात गाडी आमची वाटच पाहत होती.  मी विचार केलेला ८ च्या ट्रेन ने परत येईन पण ताम्हिणी घाटातलं ट्रॅफिक बघितलं आणि ऑफिस मध्ये फोन करून सांगितलं की मी उद्या नाही येऊ शकत पण हा कॉल जरा जास्तच विनोदी झाला.  त्याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही मला तर आत्तापण फक्त चेतनचं हसणच आठवतंय. पण एक गोष्ट नक्की सुट्टी टाकल्यानंतर मी खुश होतो कारण मला संदीपा चेतन सोबत अजून एक दिवस मिळणार होता. त्यामुळेच कि काय घरी पोचण्याची जास्त ओढ लागलेली पण पुण्याचं ट्रॅफिक अक्षरशः अंत पाहत होतं .
     अखेर रात्री १०- १०. ३० च्या सुमारास आम्ही संदीपा चेतन च्या घरी पोचलो. पुण्यातला एक भन्नाट ट्रेक संदीपा चेतन सारख्या व्यक्तीबरोबर करायला मिळाल्यामुळे त्याचा आनंद काही औरच होता. ह्या सगळ्या आठवणी घेऊन दुसऱ्यादिवशी पुन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.
      हा प्रवास इथेच संपला पण आपण पुन्हा लवकरच भेटूत नव्या ठिकाणासोबत...
 कारण घरी बसणं आपल्या रक्तात नाही!!! 
 ते म्हणतात ना... 
"अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व आणि प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत."

29 comments:

  1. मस्त एकदम. मज्या आली वाचून.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. Mastach Ajinky keep it up your writing ..

    ReplyDelete
  4. U rock on trek with great company n with wonderful blog just made journey come alive
    Next time one more

    Will again get you call office for leave

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान अनुभव आणि लिखाण, लेख वाचताना असं वाटत होत कि मी सुद्धा तुमच्या सोबत निसर्गाचा आनंद लुटत होतो.. शब्दात ताकत आहें तुमच्या 🙏😊

      Delete
  5. अजिंक्य तुझ्या बरोबर ट्रेक करायला खुप मजा अाली. तुझ्या बरोबर पुन्हा-पुन्हा ट्रेक करायला अावडेल. तुझी लिखाण असच चालु ठेव. मस्त लिहतोस.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद चेतन. ब्लॉग लिहण्यासाठी तू केलेलं मार्गदर्शन नेहमीच लक्षात राहील आणि परत पुण्यात कधीही ट्रेक करायचं झालं तर आधी तुम्हाला फोन असेल.
      Thanks a lot.....

      Delete
  6. Can you please provide Tukaram dada n cha number? Thanks ;)

    ReplyDelete
  7. भिरा गावातील गाईड चा नंबर मिळेल का?मला हा ट्रेक भिरा ते पिंप्री असा करायचा आहे.

    ReplyDelete
  8. मस्त ! मला तुकाराम दादाचा काॕन्टॕक्ट न. कृपया पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. EK NUMBER BLOG /KHOOP AWADALA/KRUPAYA TUKARAM DADA CHA NUMBER SHARE KARAVA..DHANYAWAD DR SUNIL 9822042332

      Delete
  9. खुप मस्त लेख व अनुभव
    कृपया तुकाराम दादा चा नंबर द्याल का??

    ReplyDelete
  10. Blog छान लिहला आहे

    फक्त शक्य झाल्यास पोहचायचे कसे हे लिहल्यास आमच्या सारख्या नवीन माणसांना plan करयला मदत होईल.

    ReplyDelete
  11. Contact number tukaram dadancha ....

    ReplyDelete
  12. Nice trip Andharban..EXCELLENT

    ReplyDelete
  13. Guid contact?

    ReplyDelete
  14. अजिंक्य साहेब, खूप छान लिहले आहे. वाचून ठरवले आहे की अंधारबन ला जायचेच... जरा तुकाराम दादा चा नंबर द्या प्लीज.

    ReplyDelete
  15. Tukaram dada cha number please

    ReplyDelete
  16. तुकाराम दादांचा नंबर भेटेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Tukaram dadancha number milela ka?

      Delete
  17. तुकाराम दादांचा नंबर भेटेल का ?

    ReplyDelete
  18. Thank You dada! Mast lihl ahes sundar!

    ReplyDelete
  19. Very nicely written....can u pls share tukaram dada mob no
    Dr.vivek 9970108711

    ReplyDelete
  20. Mast lihitos Mitra
    Tukaram dada yancha number msg kara
    9767322222

    ReplyDelete
  21. सुंदर . . . नुकताच मी काल 25 ऑगस्ट अंधारबन 20%पूर्ण करून आलो . . खूप मजा

    ReplyDelete