Thursday, 6 July 2017

आली लहर, केला सर इर्षाळगड... (IRSHALGAD)


        प्रत्येक वेळी ठरवलेले प्लॅन यशस्वी होतातच असं नाही असेच काहीसं ह्यावेळी माझ्यासोबत झालं पहाटे ४.३० वाजता गोरखगडचा प्लॅन रद्द झाला रविवार असल्यामुळे पहाटे जास्त विचार न करता गप्प झोपलो आरामात ९ वाजता उठलो सगळी कामं वगैरे करून १०.३० वाजले. आता खरा प्रश्न पडला पुढचा पूर्ण दिवस करायचं काय??? रविवारी सुट्टी असून सुद्धा घरी बसायची सवय नसल्यामुळे सुचत नव्हतं. मग शेवट एक दोन मित्रांना विचारलं कुठे जायचे का? काही काही चे पहिल्यापासून प्लॅन असल्यामुळे ते काहीसं शक्य नव्हतं पण मग आपल्या हक्काच्या  एका मित्राला फोन केला तो म्हणजे पप्पू.
(आमच्या दोघांमधील हा संवाद)
मी - काय करतोयस?
पप्पू- काही नाही
मी - चल
पप्पू - कुठे? (खरंतर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नव्हतं पण मागच्या आठवड्यात सोंडाईवरून इर्षाळगड पहिल्यापासून डोळ्यासमोर एकच दृश्य होतं) 
मी - चल पनवेल ला....
पप्पू - पनवेल ला कुठे?
मी - इर्षाळगड!!!
क्षणाचाही विचार न करता मला तो म्हणाला तू तयार हो मी आलोच.
शेवटी काय म्हणतात ना हाकेला धावून येतो तोच खरा मित्र.
       हे सगळं ठरेपर्यंत ११.०० वाजले होते तो पटापट आवरून बदलापूरवरून ट्रेन पकडून ११.५० ला अंबरनाथ ला हजर झाला मी माझी गाडी घेऊन तयारच होतो आम्ही भेटलो आणि आमचा सफर चालू झाला.
                             इर्षाळगड
           इर्षाळगड कडे जायला पनवेल आणि कर्जत दोन्हीकडून वाट आहे म्हणून जाताना पनवेल वरून जायचं ठरवलं google map चा आधार घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो अर्थानं google map ने किती मदत केली हे आमचं आम्हालाच माहीत. रस्ता सांगायचा झालं तर पनवेल कर्जत मार्गावर मोरबे धरणाकडे जायला एक रस्ता डाव्या हाताला जातो तिथून पुढे गेलं की दोन रस्ते लागतात त्यातला उजव्या बाजूचा रस्ता प्रबळगड आणि डाव्या बाजूच्या रास्ता इर्षाळगड कडे जातो तसा दिशादर्शकही आहे वाटेत. त्या वाटेने आम्ही २ वाजता गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि  गड चढण्यास सुरवात केली
                      गडाकडे जाणारे दिशादर्शक 
          पायथ्याचे गाव नमराची वाडी असं होतं खर तर तिथे पोहचेपर्यंत आम्हाला त्या गावचं नाव पण माहीत नव्हतं उतरल्यावर आम्ही विचारलं. गडाच्या पायथ्यापासूनच गडाच्या चढाईला सुरवात होते समोर दिसणारा इर्षाळगड आम्हाला खुणावत होता १५-२० मिनिटं वर चढल्यावर समोर धुक्यात हरवलेला इर्षाळगड आणि मागे मोरबे धरण असं अप्रतिम दृश्य नजरेस पडलं ते कॅमेरात कैद करून पुढे चालत होतो. 
                  गडावरून दिसणारे मोरबे धरण
         थोडंस चाललो असु आणि अचानक पावसाला सुरवात झाली थोडसं भिजलो पण तिकडून थोडं पुढे गेल्यावर अचानक वस्ती दिसायला लागली आम्ही म्हंटलं कुठलं तरी गाव असावं तिकडे विचारल्यावर कळलं की ह्या गावचं नाव "इर्शालवाडी". सुमारे १५-२० घराचं असलेलं गाव. आत्ता ट्रेकचा मौसम असल्याकरण्याने गावाकर्यांनी इर्शाळवाडी मध्ये एक छोटीशी टपरी सुद्धा सुरू केली आहे. तिकडे जेवणाची सोय जरी नाही झाली तरी चहा नाश्त्याची सोय चांगल्याप्रकारे होऊ शकते सकाळपासून पोटात काही नसल्यामुळे आणि मस्त भिजल्यामुळे आधी तिकडे चहा नाश्ता करायचं ठरवलं.

       वाटेवरील चहा नाश्त्याची सोय व मागे धुक्याआडचा इर्षाळगड
           माझ्या सोबत असलेला माझा मित्र बिचारा भुकेने व्याकुळ झालेला खायला भेटल्यावर जरा जीवात जीव आला. आम्ही तिकडे मस्त चहा आणि पोहे खाऊन आल्यावर आम्हाला धुक्यातून बाहेर आलेला इर्षाळगड आणि त्यामधलं नेढ नजरेस पडलं. आता आमच्या चालण्याचा वेग वाढला होता कारण गावात पोहचेपर्यंतच ३ वाजले होते अजून अर्धी चढाई बाकी होती आम्ही पटापट चालवण्यास सुरवात केली आता चढाई अजून कठीण होती


                       गडाकडे जाणारी वाट
           थोडं पुढे गेल्यावर एक देऊळ लागतं त्या देवळाच्या डाव्या बाजूने गेलं की ती वाट थेट इर्शाळगडावर जाते आम्ही चालत होतो पावसामुळे वाट खूप खराब झाली होती. त्याच वाटेने भन्नाट वारा आणि मुसळधार पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा मारा गालावर सहन करत आम्ही गडावर पोहोचलो. गडावर इतकं धुकं होतं की एक क्षण असा होता की आम्ही दोघे जण एकमेकांना पाहू शकत नव्हतो पावसाळा सोडून इतर वेळी गेलं तर इर्शाळगडावरून प्रबळगड चंदेरी, कर्नाळा व माथेरानचे डोंगर सहज नजरेस पडतात

                                                                   इर्षाळगडाच्या वाटेवरील मंदिर
         गडाविषयी माहिती घ्यायची झाली तर इर्षाळगड हा कर्जत आणि माथेरान च्या मध्यभागी वसलेला एक गड आहे. गडाचा विस्तार मोठा नसला तरी गडावरील इर्शालगडाच्या सुळक्यांमुळे हा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. सुळक्यावर जाण्यासाठी rock climbing शिवाय जाता येत नाही त्यामुळे वर पर्यंत नुसतं जाणं अशक्य आहे त्यामुळे इर्शाळगडाचा सुळका आणि नेढ पहिलं. गडावरून दिसणारं निसर्गाचं अद्भुत रूप कॅमेरात कैद केलं खरं तर कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हतं पण मग ते दृश्य आठवणींच्या कॅमेरात कैद करून परतीची वाट धरली.
                                                             इर्षाळगडावरील सुळका
       तोपर्यंत ४.४५ झाले होते आणि गडावर फक्त आम्ही दोघेच होतो पण स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला कसलीही भीती नव्हती. आम्ही आरामात गप्पा मारत संध्याकाळी ६.०० वाजता पुन्हा गडाचा पायथा गाठला. गावातील छोट्या मुलांना बॅगेतील खाऊ देऊन आम्ही परत घरच्या वाटेला लागलो. बऱ्याच वेळा नंतर गाडीवर बसल्यावर बरं वाटलं पनवेल च्या ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी आम्ही येताना कर्जतचा मार्ग धरला ह्या मार्गावर ट्रॅफिक नाही लागलं पण माथेरानच्या पायथ्याशी आम्हाला पावसाने गाठलं पण अंधार झाल्यामुळे कुठेही न थांबण्याचा निर्णय घेतला आणि चिंब भिजून ८.३० ला घर गाठलं.
अशाप्रकारे हा रविवार अर्धा का ना होईना सत्कारणी लागला...
      काही काम नसताना रविवारी घरी बसणं हा खरंच एक गुन्हा आहे......
काही मस्तीभरे फोटो......


धन्यवाद पप्पू माझ्या हाकेला ओ दिल्याबद्दल.....
पुन्हा भेटूत...........


1 comment: