Sunday, 9 December 2018

लोहापे परिक्रमा (LOHAPE LAKE)

               नर्मदा परिक्रमा,गोवर्धन परिक्रमा किंवा राजगड प्रदक्षिणा हे सगळ्यांनीच ऐकलं असेल पण "लोहापे परिक्रमा" हे आपण प्रथमच ऐकत असाल. लोहापे म्हणजे नक्की काय आहे हाच प्रश्न खूप जणांना पडला असेल तर ह्या सगळ्यांचाच उलगडा कारण्यासाठी घातलेला हा सर्व घाट.
लोहापे तलाव
             मागच्या रविवारी माथेरान झाल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं ह्या उद्देशाने घेतलेले हे ठिकाण म्हणजे लोहापे तलाव. लोहापे तलाव म्हणजे भिवंडीपासून २१ किमी अंतरावर अंबाडी फाटा आणि तिथून पुढे ७ किमी अंतरावर लोहापे गाव त्या गावात असणारा हा महाकाय तलाव. ह्या तलावाची माहिती मिळताच आम्ही तिथे जायचं ठरवलं. रविवारी सकाळी लवकर निघून लवकर पोहोचायच्या उद्देशाने सकाळी सव्वा सहाच्या सुमारास निघालो होतो वाटेत सूर्योदय होईपर्यंत मी दुर्गाडी जवळ पोहोचलो होतो तिथलं दृश्य बघून राहवलं नाही म्हणून गाडी बाजूला लावली आणि एक फोटो काढला
दुर्गाडी 
            मी वेळेत पोहोचलो खरं पण माझ्या काही मित्रांना उशीर होणार हे अंबाडी फाट्यापाशी जाऊन कळलं. पण तरीही वेळ वाया घालवायचा नाही म्हणून जवळच असणाऱ्या वज्रेश्वरी मातेच्या देवळाला भेट द्यायचं ठरवलं आणि गाडी वज्रेश्वरीच्या दिशेने वळवली. पावणे आठच्या सुमारास मी वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
वज्रेश्वरी माता मंदिर
              पुन्हा अंबाडी फाट्याच्या दिशेने निघालो लवकर पोहोचल्यामुळे तलावाकडे जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. जेणेकरून पुन्हा नंतर वेळ वाया जाणार नाही. मागून आमचे मित्र आले. सुरवातीला चहानाश्ता करून सगळे तलावाच्या दिशेने निघालो आठ किमी म्हणजे आम्ही अर्ध्या तासातच तलावापाशी पोहोचलो.
 लोहापे गाव 
लोहापे तलाव
             सुरुवातीला तलावाला भेट द्यायच्या दृष्टीनेच आम्ही गेलो होतो पण तलावाच्या बाजूने पुढे जाणारी वाट दिसली आणि म्हंटलं पुढे जाऊन बघू तरी नक्की आहे काय? म्हणून पुढे जात गेलो जसं जसं पुढे जात गेलो तसतशी वाट भेटत गेली. समोरून एक मेंढपाळ सोबत बकऱ्यांना घेऊन येत होता त्यांना फक्त विचारलं दादा पुढे रस्ता आहे ना??? तेव्हा तो म्हणाला हो पुढं झोपड्या पण आहेत. ठरलं तर मग आज परिक्रमा करायचीच. एक नवीन ध्येयाच्या उत्साहाने आम्ही चालत होतो. बाजूला गावकरी मासेमारी करत होते. 
गावकऱ्यांची मासेमारी    
            वाटेत बरीच जंगली झुडपं फुलं नजरेस पडत होती. तेवढ्यात  वाटेच्या उजव्या बाजूस एक झोपडी दिसली म्हणून ती बघायला गेलो छत नसलेली ही झोपडी पण आसरा घेण्यासाठी पुरेशी होती एव्हाना बारा वाजले होते त्यामुळे तिथेच सगळ्यांनी जेवायचं ठरवलं. सगळ्यांचं जेवण होईपर्यंत मी आणि अजय दोघांनी तलावाच्या जवळ जायचं ठरवलं तिथेच गवताच्या पेंढी ठेवल्या होत्या त्यावर दोन चार उड्या मारून पुढच्या प्रवासाला लागलो
LUNCH POINT
              आता मोठंमोठाली झाडं सुकल्याने उन्हाचा तडाखा खूप जाणवत होता. तेवढ्यात समोर एका गावकऱ्याची झोपडी दिसली झोपडी कसली हो राजमहाल च होता तो!!! त्यांना आम्ही विचारलं दादा आतून बघू का घर?? तर त्यांनी एका सेकंदात उत्तर दिलं "बघा की घर माणसासाठीच असतं." असं मुंबईत कोणी म्हणतं का हो??? असो त्यांनी नंतर त्यांची शेती दाखवली समोर भात लावला होता आणि अंगणात घेवडा अंबाडी तूरडाळ आणि मिरच्या. सगळी चौकशी केली आणि पुढे निघणारच होतो तेवढ्यात ते म्हणाले "तुम्ही रस्ता चुकू शकता त्यामुळे तुम्ही 2 मिनिटं थांबा मी चुलीवर भात ठेवलाय तो झाला की मी तुम्हाला वाट दाखवायला येतो."
सुकलेली झाडं
हाच तो राजमहाल ...
 ...आणि हेच ते राजे 
 मिरचीची रोपं 
 तूरडाळ 
 अंबाडीची भाजी 
कांद्याची शेती
          आम्ही खरंच धन्य पावलो कारण आम्ही जर त्या जागेवर रस्ता चुकलो तर तिथे रस्ता सांगायला कोणी चिटपाखरूही नव्हतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला वाट दाखवायला आले त्यांना धन्यवाद म्हणून आम्ही आता तलावाच्या दुसऱ्या टोकाच्या दिशेने प्रवास सुरु केला. वाटेत एक विहीर लागली तिथे सगळ्यांनी पाणी भरून घेतलं आणि रस्ता विचारला गावातल्या मावशींनी सांगितलं इथून पुढे जा वाटेत एक देऊळ लागेल तिथून पुढे जा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाटेत एक गणपतीचं देऊळ लागलं त्याचं दर्शन घेतलं
गावातील गणपतीचं देऊळ
            मी आणि अजय पुन्हा तलावपाशी येतच होतो तोच माझ्या पायाशी मला एक हिरव्या रंगाचा सरडा दिसला आम्ही आमच्या नादात गप्पा मारत चाललो होतो आणि तो ज्या स्थितीत दिसला मी जोरात ओरडलो तसा तो स्तब्ध झाला मी पहिल्यांदाच हा सरडा पहिला होता त्याच नाव शमेलिऑन सरडा सगळ्यात मोठी जीभ असणारा हा सरडा. त्याचे मनसोक्त फोटो घेतले त्याला पाहून खरंच ह्या अचानक भयानक ठरलेल्या लोहापेभेटीचं लोहापेप्रदक्षिणेत ज्या प्रकारे रूपांतर झालं त्याचं सार्थक झालं असं वाटलं.
शॅमेलिअन सरडा
             ह्या सगळ्या आठवणींची पोतडी बांधून पुन्हा मी माझ्या बाईक पाशी येऊन पोहोचलो गाडी घेतली आणि आपल्या परतीच्या दिशेने रवाना झालो.
अब तक.....56