Sunday, 12 May 2019

पळसनाथाचा अद्भुत कळस (PALASNATH TEMPLE)

               कधी कधी बऱ्याच गोष्टी मनात असतात पण त्या पूर्ण करण्यासाठी नशिबाची सुद्धा साथ हवी असते. असंच एक ठिकाण बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होतं ते म्हणजे भिगवण जवळचं पळसनाथाचं मंदिर. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने उजनी धरणाच्या पोटी लुप्त झालेलं हे मंदिर. मंदिर जरी पाण्याखाली असलं तरी खूपच तीव्र दुष्काळ असला आणि त्यातच उन्हाळा तापू लागला तरच हे मंदिर पाण्याबाहेर येतं.म्हणुनच या मंदिराचं दर्शन होणं हि भाग्याची आणि योगायोगाची गोष्ट आहे.  १९७५ साली जेव्हा उजनी धरण बांधून पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी आजूबाजूची गावं पुनर्वसित करण्यात आली पण मंदिर कसं हलवणार?? म्हणून हे मंदिर तिथेच ठेवून आजूबाजूची गावं स्थलांतरित झाली.  ११ व्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून थाटात उभं आहे ते म्हणजे भिगवणचं "पळसनाथचं शिवमंदिर"
 पळसनाथचं शिवमंदिर
             गेल्या ३ वर्षांपासून ठरवलं होतं जेव्हा कधी हे मंदिर पूर्ण बाहेर येईल तेव्हा बघायला जायचं. एकदा फेब्रुवारी महिन्यात बारामतीला जाऊन आलेलो तेव्हा मित्राला सांगितलं होतं मंदिर बाहेर आलं की सांग. तसंच अचानक माझा मित्र मुकेशचा मला फोन आला की "अरे मंदिर बाहेर आलंय" पण नुसतं मंदिर बाहेर येऊन उपयोग नाही तर मंदिरात प्रवेश करता यायला हवं  हे उद्दिष्ट होतं म्हणून सोशल मीडियावरून तिथल्या स्थानिक मित्राचा नंबर घेतला व त्याला फोन करून विचारलं त्याचं नाव "विशाल काळे". तो मला म्हणाला मी तुला उद्या सकाळी बघून सांगतो. मी म्हंटलं ठीक. कारण इतक्या दूर जाऊन मला फक्त मंदिर बघण्यात अजिबात रस नव्हता. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप आला की थोडा गाळ आहे पण ३-४ दिवसात मोकळं होईल. पुढच्या रविवारी आलात तर उत्तम. पण माझे पाय काही घरात टिकत नव्हते आणि त्यात अजून १० दिवस वाट बघायची म्हणजे अजून जड. १० दिवसात ही बातमी सगळीकडे पसरली तर त्यात गर्दीची अजून भर म्हणजे ते शक्यच नव्हतं म्हणून मिळेल तसं शनिवारी रात्री निघायचं ठरवलं.
             रात्रीची पंढरपूर पॅसेंजर पकडून सकाळी बरोबर ८ वाजता भिगवण स्टेशनला उतरून रिक्षा पकडली व सर्वात आधी Highway गाठला कारण पळसनाथला जायला तिकडून गाड्या मिळतात असं कळलं. जास्त वाट न पाहता पहिली जी गाडी आली त्यात चढलो तो होता एक टेम्पो जो शेळ्यांना घेऊन चालला होता त्यातच गावकऱ्यांशी गप्पा मारता मारता पळसनाथ आलं.
 शेळ्यांसोबतचा प्रवास 
             सुमारे २० किमी असलेलं हे अंतर अर्ध्या तासात कापून ९ च्या सुमारास गावापाशी पोहोचलो. पळसनाथ मंदिर तिथून २ किमी दूर. हे अंतर मात्र चालतच जावं लागतं.  इथे जाण्यास कोणतेही वाहन नाही. सकाळची वेळ असल्याकारणाने ही चाल सुद्धा मजेशीर वाटली नुकतेच पडलेलं ऊन गावात असलेली मंदिर, त्यात गुलमोहराच्या झाडांनी सजवलेला साज हे पाहून नेमकं गावात आल्याचा प्रत्यय येत होता.

पळसदेव गावातला प्रवेश
              चालत चालत अर्ध्या तासात धरणाजवळ जाऊन पोहोचलो अर्धा किमी अगोदरच मंदिर दिसायला लागलं तेव्हा इतकं मस्त वाटलं त्याचं शब्दात रूपांतर नाही करू शकत.  ज्या क्षणाची इतके वर्ष वाट पाहिली ते डोळ्यासमोर दिसत होतं. थोड्याच वेळात पाण्यापाशी जाऊन पोहोचलो बोट तयारच होती. जास्त कोणाला माहिती नसल्याने मी एकटाच होतो. ते सगळ्यात मोठं सुख होतं. बोटवाल्यासोबत गप्पा मारून तिथल्या भागाची माहिती घेऊन थेट मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो.
दुष्काळसदृश्य परिस्थिती

पळसदेव मंदिरापर्यंतचा उजनीतून केलेला प्रवास
             मंदिरात जाण्यापूर्वी इतिहासाची पाने चाळली तर मंदिराला भेट देताना अजून मजा येते. अभ्यासकांच्या मते जुन्या काळात पळसदेव हे गाव "रत्नपूर" म्ह्णून ओळखले जायचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या ह्या गावात एकूण ५ मंदिर होती. भीमा नदी जिथे उत्तरवाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन मिळतो त्या संगमावर शके १०७९ म्हणजे ई. स. ११५७ मध्ये चांगदेव ह्या दंडनायकाने येथे एका विष्णू मंदिराची उभारणी केली ह्या माहितीचा शिलालेख मंदिरातील एका खांबावर दिसून येतो. विष्णुमंदिर पश्चिमाभिमुख असून दोन्ही मंदिराची वास्तुरचना साधारणपणे सारखीच आहे सदर मंदिराचा कळस नष्ट झाला असून मंदिराच्या तिन्ही बाजूस विस्तृत प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजू ७ दगड आहेत ज्यावर दगड पटल्यास सप्तसुरांचा प्रत्यय येतो.
 काशीविश्वेश्वर मंदिर
 मंदिराच्या आतील बाजूस असलेले खांब 
 मंदिरातील शिलालेख 
            बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८ फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू शकतो.  मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा.  ह्या कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर सर्पाकृती शिल्प आहेत.
 पळसनाथचा कळस व त्याचे प्रवेशद्वार 
कळसावरील शिल्प 

 पळसनाथ च्या कळसातील प्रवेश
            शिखराकडे डोळे भरून पाहिलं कि मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला तिन्ही बाजूस प्रवेशद्वार आहे. मंदिरातील खांबांवरील नक्षीकामही देखणं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसे शाबूत आहे इतके वर्ष पाण्यात राहूनसुद्धा बांधकाम असं राहू शकत ह्याचंच आपल्याला नवल वाटतं. नंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आधी शिवपिंड होती पण गाव पुनर्वसित होताना गावकऱ्यांनी ती शिवपिंड पुनर्वसित झालेल्या गावातील मंदिरात स्थापन केली आहे. सभामंडपावरील असलेले एक शिल्प आजही लक्षवेधून घेतं ज्याच्या चहूबाजूस हनुमानाची प्रतिकृती आहे.
 
खांबावरील नक्षीकाम
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील शिल्पकौशल्य
प्रवेशद्वारावरील खांब

मंदिराबाहेरील शिल्प
 सभामंडपावरील शिल्प
            मंदिराच्या सभोवताली सुंदर तट असून आजूबाजूच्या परिसरात अनेक वीरगळी नंदी शिल्पपट पडलेले आहेत. तसेच अनेक कलाकुसर असलेले दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधलेली प्रशस्त धर्मशाळा आहे. ह्या धर्मशाळेची प्रवेशद्वार ही हिंदू-मुस्लिम पद्धतीची आहे त्याचा आकार पाहिल्यावर आपल्या ते लक्षात येते.


मंदिराबाहेरील विरगळ

 आवारातील मंदिराचे अवशेष 
 मंदिराबाहेरील धर्मशाळा 
 धर्मशाळेच्या कमानी

 पळसनाथ मंदिर व धर्मशाळा 
             मंदिराच्या मागील बाजूसच एक राम मंदिर आहे. ह्या मंदिरावरील अवशेष खूप दर्शनीय आहेत. ह्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पात्रातून बाहेर यावं लागतं. बाहेरून किनाऱ्यावरून चालत गेलं तरी आपण सुमारे १५ मिनिटात देवळापाशी पोहोचतो. हेही मंदिर प्रचिन असून मंदिरावरील अप्रतिम शिल्प आपलं  लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस रामायणातील बरेचशे प्रसंग आपल्या समोरून जातात सेतू बांधताना वनरसेनेचे योगदान, राम लक्ष्मणाची धनुर्धारी कला. असे बरेचसे प्रसंग ह्या मंदिरात आपल्याला शिल्परुपी आढळतात.
 राम मंदिर 




मंदिरावरील शिल्प



मंदिराबाहेर पडलेले काही अवशेष
            आधी पळसनाथ मग काशी विश्वेश्वर आणि नंतर हे राममंदिर बघून खरंच स्वतः नशीबवान असल्यासारखं वाटलं. इतके वर्ष पाण्यातून तावून-सुलाखून निघालेलं हे मंदिर पाण्यात असूनही शाबूत राहतंच कसं आणि पाण्याच्या होणाऱ्या आघातांपासून वाचतच कसं ?? हा साधा प्रश्न कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या ह्या वारशाला सुरक्षित राहण्यासाठी मनोमन प्रार्थना करून उजनीतून मी काढता पाय घेतला. 
जलसमाधी मिळालेलं पळसनाथ मंदिर
            आभार मानायचे झाल्यास त्या सर्वांची मानेन ज्यांच्यामुळे मला ह्या मंदिराची माहिती मिळाली आणि ज्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकलो त्यात माझा मित्र मुकेश आणि विशाल काळे ह्यांचं नाव मी प्रामुख्याने घेईन. मुकेशमुळे माझ्या डोक्यात पळसदेवला जायची प्रथमदर्शनी तयारी झाली आणि पळसदेवचा स्थानिक मित्र विशाल काळे ह्यामुळे मला मंदिराचे DAILY UPDATE मिळत गेलं त्यामुळे मला मंदिराचे जे रूप पाहायचे होते ते पाहण्यास मला मदत झाली त्याबद्दल विशाल मित्रा मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. 
धन्यवाद.
 

 Google Location of Palasdev Temple.
 टीप :
 १) मंदिराला भेट देण्यास जाण्यापूर्वी आधी चौकशी करून जाणं गरजेचं आहे नाहीतर फेरी फुकट जाऊ शकते. 
आणि 
२) गावातून परतताना 'तुषार कोल्ड्रिंक "मधून लिंबू सरबताचा आस्वाद नक्की घ्या कारण ते अमृत आहे तशी चव तुम्हाला घरी बनवलेल्या लिंबू सरबतातही मिळणार नाही. 
पुन्हा भेटूत ...  

Wednesday, 1 May 2019

गुजरात दौरा भाग - ४ दादा हरी नि वाव (DADA HARI NI VAV)

              गुजरात दौऱ्याच्या मागील तिन्ही भागात आपण अनुक्रमे पाहिलं अदालज नि वाव, मोढेरा चे सूर्यमंदिर आणि पाटण ची सुप्रसिद्ध रानी कि वाव. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पहिल्या दिवशी सगळं झाल्यामुळे आता बाकी राहिलेलं ते  म्हणजे फक्त "दादा हरी नि वाव" त्यामुळे माझ्याकडे बराच वेळ शिल्लक होता. शनिवारी दिवसभर धावपळीत गेल्याने रात्री निवांत झोपून सकाळी आरामात उठायचा विचार केला पण रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ६.३० लाच जाग आली मग उठलो आवराआवर केली आणि ऊन वाढायच्या आत निघायचं ठरवलं. ७.३० ला हॉटेलमधून बाहेर पडून बस स्टॅन्डकडे वाटचाल चालू केली. हॉटेल पासून बस स्टॅन्ड जवळच असल्याने तिथेही वेळ लागला नाही बस स्टॅन्डवर पोहोचताच समोर अहमदाबादला जाणारी बस दिसली आणि "दादा हरि नी वाव"च्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.
दादा हरी नी वाव
पाटण अहमदाबाद  बस  
                  ८ वाजता पाटणवरून अहमदाबादसाठी बस पकडली. जाताना सगळी ठिकाणं करत करत गेल्याने अहमदाबाद ते पाटण किती अंतर आहे ह्याचा अंदाज आला नाही परंतु थेट बस पकडल्यावर लक्षात आलं २ तास झाले तरी अहमदाबाद येण्याचा काही नाव घेत नव्हतं शेवटी कंटाळून गुगल मॅप सुरु करून आजूबाजूला जवळपास काय आहे ह्याचा अंदाज घेतला. वाटेवर साबरमती आश्रम लागत होता म्हणून शेवटी अहमदाबाद पर्यंत न जाता साबरमती आश्रमजवळ उतरण्याचा निर्णय घेतला.
 साबरमती आश्रम
दांडी यात्रा
                   सुमारे १०.३० च्या सुमारास साबरमती आश्रमात प्रवेश केला. तेथील गांधीजींच्या व्यक्तिचरित्रावर एक कटाक्ष टाकला. बाजूने जाणाऱ्या साबरमती नदीचं पात्र पाहिलं सोबतच खादी विक्री केंद्र, वाचनालय, विनोबा भावेंची राहण्याची जागा ह्या सगळ्याना भेट देऊन सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साबरमती आश्रमातून बाहेर पडलो.
मिठाचा सत्याग्रह 
साबरमती नदीचे पात्र
              परत एकदा गूगल मॅप उघडून पाहिलं तेव्हा तिथे प्रसिद्ध अशी एक मस्जिद पहिली ज्याचं नाव सिद्दी सय्यद मस्जिद. ह्या मस्जिदीवरील भिंतीत एका जाळीवर काढलेलं एका झाडाचं शिल्प प्रसिद्ध आहे. ते पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्या कारीगिरीचं नवल वाटतं. अंदाजे १५-२० मिनिट मस्जिद मध्ये घालवून आता खऱ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास केला ते म्हणजे "दादा हरी नि वाव".
सिद्दी सय्यद मस्जिद
समोर जाळीमध्ये दिसत असलेलं प्रसिद्ध शिल्प
             बरोबर एक वाजता मी दादा हरी नी वाव जवळ पोहोचलो. सगळ्या वाव सारखीच हि सुद्धा लांबलचक व प्रशस्त जागा असणारी विहीर. १४ व्या शतकात मोहम्मद बेगडाच्या अधिपत्याखाली ह्या विहिरीचं बांधकाम झालं अडालजच्या विहिरीपेक्षा सुद्धा हि वाव मोठी आहे.
एकंदरीत असलेला विहिरीचा आवाका

विहिरीचे प्रवेशद्वार      
             सुमारे ५०० वर्ष जुन्या बांधलेल्या दादा हरी नि वावचे बांधकाम हे सोलंकी वास्तुशास्त्रीय शैलीतील लाल दगडात बांधलेले आहे . विहिरीच्या प्रत्येक मजल्यावर अष्टकोनी (8-बाजूचे बहुभुज) आहे, हे संपूर्ण बांधकाम जबरदस्त कोरलेल्या मोठ्या खांबांवर उभे आहे. प्रत्येक मजल्यावर लोकांसाठी एकत्रित करण्यासाठी पुरेशी जागा आहे. 
अष्टकोनी बांधकाम
विहिरीचा आतील भाग 
             वर्षभर होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी चढउतारांची नोंद घेण्यासाठी त्या पातळीवर भूगर्भात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जागा आहे. शेवटच्या मजल्यापर्यंत खेळती हवा राहण्यासाठी म्हणून उघडे छत बांधण्यात आले आहे. विहिरीच्या दोन्ही बाजूस खालून वर अथवा वरून खाली जाण्यासाठी गोलाकार जिन्यांची बांधणी केली आहे प्रत्येक मजल्यावर प्रकारचे शिल्प नजरेस पडतात.
हवा खेळती राहण्यासाठी असलेले छत
ये-जा करण्यासाठी असलेले गोलाकार जिने 






विहिरीतील आतील बाजूस असलेली कलाकुसर
              मी फिरलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विहिरीमध्ये हि एकाच अशी विहीर आहे ज्या विहिरीमध्ये तळमजल्यापर्यंत प्रवेश करू शकतो. सुमारे २ तास विहिरीमध्ये घालवल्यानंतर तिथून बाहेर पडलो व मागेच असलेल्या मशिदीस भेट दिली दुपार झाल्यामुळे तिथे प्रवेश बंद होता पण बाजूला असलेल्या दर्ग्यास भेट दिली. तो दर्गा म्हणजे धर्मगुरू दाई हलीम हयांचा दर्गा. तिथल्या लोकांच्या माहितीनुसार दादा हरि असं काही नाहीच आहे दाई हलीमा वरून विहिरीचे नाव हे दादा हरि असं पडलं.
दाई हलीम मस्जिद 
 दाई हलीम दर्गा  
दर्ग्याचे प्रवेशद्वार
             तिकडच्या लोकांकडून जागेच महत्व ऐकून सुमारे ४.३० च्या सुमारास अहमदाबाद रेल्वे स्टेशनकडे निघण्यास सुरवात केली. परतीची ट्रेन ८.३० ची होती हाताशी बराच वेळसुद्धा होता पण उन्हामुळे कुठेच जाण्याची इच्छा नव्हती म्हणून गप्प रेल्वे स्टेशन वर बसून ४ तास काढले व ८.३० ची ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने रवाना झालो.
अशा तऱ्हेने एकट्याने केलेला गुजरात दौरा यशस्वी झाला.
शेवटी एकच म्हणेन अमिताभ बच्चन बरोबर म्हणत होते कुछ दिन तो गुजारो गुजरात में...
असो अखेर ...બાય બાય ગુજરત

GOOGLE LOCATION OF DADA HARI NI VAV