Saturday, 22 June 2019

इर्शाळगडचे नेढे : एक स्वप्नवत प्रवास (IRSHALGAD FORT)

             २०१९ च्या पावसाळी ट्रेक ची ही पहिलीच वेळ. मुळात पाऊस सुरू झाला आहे की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न म्हणून एखादा छोटासा ट्रेक करायचा विचार होता. त्यात भारत-पाकिस्तान सामना असल्याने कोणी सोबत असेल की नाही हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न. म्हणून छोटा कोणतातरी ट्रेक करण्यापेक्षा केलेलाच पण पूर्ण न झालेला घेणं योग्य वाटलं व म्हणून "इर्शाळगड" करायचं ठरवलं. कारण होतं ते म्हणजे नेहमी खुणावणारं नेढं  "नेढं म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेलं छिद्र"
 किल्ले इर्शाळगड
             अखेर येण्यासाठी ४ जण तयार झाले.खरंतर इर्शाळगड ह्याआधी दोन वेळा केला आहे पण काही न काही कारणामुळे नेढ्यापर्यंत पोहोचण्याची संधी हुकली म्हणून ह्यावेळी मुद्दाम इर्शाळगड करायचं ठरवलं. वातावरण ऊन पावसाचं होतं ट्रेन मध्ये होतो तेव्हा तर फक्त ऊनच दिसत होतं. द्विधा मनस्थिती होत होती पण ह्यावेळी मनाशी ठरवलं होतं की नेढ्यापर्यंत जायचं म्हणजे जायचंच.
ह्याच नेढ्यात जायचंय !!!
              सकाळी ८ वाजताची कर्जत लोकल पकडून ९ ला कर्जतला पोहोचलो. तिथून रिक्षा घेऊन थेट "नंबराची वाडी" गाठलं. बरोबर ९.५० ला ट्रेकला सुरूवात केली. मागच्यावर्षी पेक्षा ह्यावर्षी एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे जागोजागी दिशादर्शक लावण्यात आले आहेत. दिशादर्शकाच्या साहाय्याने गडावर पोहोचण्यास सोपं आहे गाईडची गरज नाही

दिशादर्शक
इर्शाळगडावर जाणारी पाऊलवाट
                गावातून निघणारी एकमेव वाट हि आपल्याला थेट इर्शाळवाडीत घेऊन जाते. डाव्या बाजूला मोरबे धरण व उजव्या बाजूला माणिकगड आणि कर्नाळा ह्यांना पाहत पाहत इर्शाळगडाच्या मध्यवर्ती वाडीवर जाऊन पोहोचलो ते म्हणजे इर्शाळवाडी. जेमतेम १५-२०  घरांची असणारी हि वाडी बऱ्यापैकी उंचावर असल्याने ह्या ठिकाणी ना वाऱ्याची कमी ना शांततेची म्हणजे थोडक्यात काय तर "स्वर्गसुख".
मोरबे धरण
इर्शाळवाडी
           इथून सुमारे दहा मिनिटांचा रस्ता हा पाऊलवाटेचा आणि त्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता थेट इर्शाळगडावर घेऊन जातो. उन्हाळा नुकताच संपत असल्याकारणारे रानमेवा खाण्याची संधी मिळाली वाटेच्या दोन्ही बाजूस करवंदाची प्रचंड झाडं. त्यामुळे हि संधी आम्ही अजिबात सोडली नाही
रानमेवा
          आम्ही पहिल्याच रविवारी गेल्या कारणारे गावकरी आपल्या रोजगारासाठी खाद्यपदार्थ विकण्यासाठी म्हणून कुडाच्या काठ्यांची दुकानं उभारत होती.  त्यांनासुद्धा रोजगाराची ऐन संधी चालून येत होती त्याची ते तयारी करत होते. कारण इतक्या टोकावर आल्यावर कोणालाही निदान लिंबू सरबत पिण्याची इच्छा होणं तर साहजिकच आहे. मग अश्या पर्यटकांसाठी हे देवदूतच ठरतात.
रोजगारासाठी सुरु असलेली धडपड          
               मागे वळून पाहिलं तर समोर एक ढगातून तुफान पाऊस पडताना दिसला आणि त्यावरून एक अंदाज बांधला की हा ढग काहीच वेळात आपल्या डोक्यावर नक्की येणार म्हणून चालीचा वेग वाढवला. एव्हाना आम्ही इर्शाळच्या सुळक्याजवळ होतो.
इर्शाळगडचा सुळका
             तो सुळका मागच्या वर्षी पाहिल्याने ह्यावेळी जास्त वेळ तिथे न घालवता पुढे निघालो कारण ह्यावेळी  माझं लक्ष फक्त नेढ्यात पोहचण्याकडे होतं म्हणून सुळक्याला बगल देत पुन्हा डाव्या हातचा रस्ता धरला तेवढ्यात थोड्यावेळी पाहिलेला ढग आता आमच्या डोक्यावर होता. पाऊस आला म्हणून एका दगडाखाली आम्ही सगळे विसावलो. काही क्षणांपुरताच असणारा हा वरुणराजा पुन्हा मार्गी लागला व त्याबरोबर आम्हीही मार्गस्थ झालो.
ढगफुटी काय म्हणतात ती हीच का?
           आता असणारी पाऊलवाट ही थेट नेढ्याकडे जाणारी होती. गेले २ वर्ष नेढ्याचा पाठलाग करताना तो पाठलाग संपला नाही पण ह्यावर्षी मात्र तो मुहूर्त नक्की होता. बरं २ वर्ष नेढ्यापर्यंत का पोहचू शकलो नाही तर २०१७ साली नेढ्याच्या वाटेवर असताना सुद्धा पावसामुळे नेढं दिसलं नाही आणि २०१८ साली इर्शाळगडावरून दरड कोसळल्याने नेढ्यापर्यंतचा रस्ता बंद होता तर सांगायचा मुद्दा हा की नेढ्यापर्यंत जाण्यासाठी ह्यावर्षी त्या कोसळलेल्या दगडातून फक्त एकावेळी एक माणूस जाऊ शकतो इतकीच वाट तयार केली आहे.
दरड कोसळल्यानंतर तयार केलेली वाट
            ही वाट पार केली आता बरोबर आमच्या उजव्या हाताला डोक्यावर नेढं होतं. ही वाट मात्र खडतर आहे पण ठरवलं तर चढू शकतो माझ्यासाठी तर ही ३ वर्षाच्या स्वप्नाची वाट होती. त्यामुळे इथे येऊन माघार घेणं शक्यचं नव्हतं म्हणून अर्धा पल्ला पार केला पुढे पाहिलं तर तिथून वर जाण्यासाठी एक ४ पायऱ्यांची शिडी बांधलेली आहे. तेव्हा उजव्या बाजूस एक पाण्याचं टाकं व डाव्या बाजूस एक देवीची मूर्ती दिसली तिला नतमस्तक होऊन अखेर शिडीवरून नेढ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
ध्येयाकडची वाटचाल
वाटेवरील देवीची मूर्ती
               शिडीवर चढून अखेर मला माझं लक्ष्य डोळ्यासमोर दिसलं सगळ्यात पाहिले नेढ्यात जाऊन तिथल्या तुफान हवेचा मनसोक्त आनंद घेतला. बऱ्याच वर्षांची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना मनात होती. कारण जवळपास पोहचूनही ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही ह्याचं दुःख काय असतं ते मला ह्या ट्रेक ने दाखवून दिलं होतं. एव्हाना साडेबारा वाजले होते म्हणून आरामात शांतपणे १० मिनिटं तिथेच विसावा घेतला.
नेढ्यातून टिपलेले दृश्य
हुश्श... अखेर पोहोचलो
          नेढ्यातून  मागे वळून पाहिलं तर अजून वर जाण्यास एक वाट होती तिथून वर गेलो हवेचा तुफान मारा सुरु होता पण शेवटपर्यंत  जायचं हे मनाशी ठरवून आलेलो म्हणून तिथपर्यंत गेलो तिथे सुद्धा एक पाण्याचं टाकं होत म्हणजे ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली की गडावर पाण्याचे मुबलक स्त्रोत उपलब्ध आहेत. समोर इर्शाळचे सर्वोच्च टोक दिसत होते.
सर्वात उंचावरील पाण्याचे टाके      
इर्शाळचे अखेरचे टोक  
             पुन्हा एकदा आकाशाकडे पाहिलं तर पुन्हा पावसाची चिन्ह दिसत होती म्हणून पटकन खाली उतरण्यास सुरुवात केली पण तो खडतर टप्पा ओलांडला आणि पुन्हा पाऊस आला म्हणून मग त्या देवीच्या मूर्तिपाशी विसावा घेण्यास थांबलो तोच मगाशी पाहिलेल्या दृश्याच्या बरोबर विरुद्ध दृश्य नजरेस पडलं म्हणजे आम्ही उभे होतो तिथे पाऊस आणि समोर ऊन.
ऊन पावसाचा खेळ 
             ते दृश्य कॅमेरात टिपून पुन्हा सुळक्यापाशी येऊन जेवणासाठी म्हणून थांबलो. सुमारे १ तास विश्रांती घेऊन बरोबर दीड च्या सुमारास परतीच्या प्रवासाला सुरुवात केली उतरतानाचा वेग अगदी मंद होता पावसाची ये-जा चालूच होती त्याची पूर्ण मजा घेत बरोबर ३ वाजता पुन्हा गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. गावातली मूलं क्रिकेट खेळात होती त्याच्याशी गप्पा मारून अखेर त्यांचा निरोप घेतला.
क्रिकेट खेळणारी मुलं
               आयुष्यभर हा एक ट्रेक त्या नेढ्यासाठी म्हणून लक्षात राहील. परत कधी इर्शाळगडावर यायची संधी मिळाली तर पुन्हा नक्की येऊ खरंतर माझ्यामते हा ट्रेक प्रसिद्ध व्हावा तो म्हणजे इथल्या तुफान वाऱ्यासाठी आणि हा तुफान वारा अनुभवायचा असेल तर एकदा ह्या नेढ्यात येऊन बघा घरातला AC सुद्धा काहीच वाटणार नाही इथल्या वाऱ्यासमोर. 
                शेवटी निसर्गासमोर श्रेष्ठ असं काहीच नाही आणि म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
सध्या इतकंच , पुन्हा भेटूत....

विजयी जल्लोष