Friday, 16 August 2019

किल्ले मृगगड (MRUGAGAD FORT)

                गेले काही दिवस महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसामुळे दोन रविवार घरी बसून गेले कारण ह्या दोन्ही रविवारी नाशिकची भ्रमंती ठरलेली होती पण दोन्ही रविवारी गोदावरी नदीचं रौद्ररूप पाहिलं आणि घरीच रहाणं योग्य वाटलं. नाशिक सोडलं तर पुणे,पण पुण्याच्या गाड्या बंद. सांगली, सातारा आणि कोल्हापूरला तर महापुराने घातलेला वेढा पहिला आणि मन स्तब्ध झालं. डोळे भरून आले. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आपल्या हातून काहीतरी चांगलं होईल ह्या उद्देशाने पूरग्रस्तांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून हवी तशी सढळ हस्ते मदत करावी.
           नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर हे सगळं सोडलं आणि जवळच्या जवळ म्हणून कर्जत पासून ५० किमी अंतरावर असलेला पालीच्या अलीकडचा "मृगगड" सर करायचा ठरवलं. मृगगड म्हणजे उंबरखिंड वर नजर ठेवण्यासाठी केला गेलेला छोटेखानी किल्ला.
किल्ले मृगगड
          मृगगडला जाण्यासाठी म्हणून सकाळी अंबरनाथहुन साडेसातची लोकल पकडायची होती पण आपली मध्य रेल्वे नेहमी प्रमाणे उशिराने धावत होती. साडेसातची लोकल साडेआठला अंबरनाथला आली म्हणजे आधीच एक तास उशीर. साडेनऊच्या सुमारास कर्जतला उतरून वेळ वाया न घालवता मृगगडच्या दिशेने प्रवास सुरु केला. मृगगडच्या पायथ्याचे गाव म्हणजे भेलीव. भेलीवपर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणजे कर्जत-खोपोली-जांभुळपाडा-भेलीव. रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पायथ्याशी पोहोचण्यासच बारा वाजले. कारकिर्दीतला हा पहिला ट्रेक असेल ज्याची सुरुवात बारा वाजता केली. समोर गेल्यावर लगेचच किल्ल्याचे स्वरूप लक्षात आले आधीच म्हटल्याप्रमाणे किल्ला छोटा होता.
भेलीव गावातून जाणारी पायवाट
         अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच चढाईस सुरुवात केली. कारण पोहचायला जितका वेळ लागला होता तितकंच परतीच्या वाटतही लागणार होता. भेलीव गावं म्हंटलं तर गावात किमान आठ दहाच घर असतील. मृगगड किल्ला जरी छोटा असला तरी त्याच्या आजूबाजूची डोंगररांग जास्त आकर्षक वाटत होती भल्या उंचीवरून कोसळणारे हे धबधबे याहून लक्ष वेधून घेत होते. पण ह्याबद्दल माहिती विचारणार कोणाला कारण वाटेत कोणीच नाही अखेर एक गुराखी काका भेटले ते गावकरी असल्याने त्यांना विचारलं तर त्यांच्या कडून समजलं की ह्या लक्षवेधी डोंगरारांगेला म्हणतात "गीतकडा"
गीतकडा
        त्या गीतकड्याला उजव्या हाताला ठेवून आम्ही मृगगडाकडे आमची वाटचाल सुरू केली. जागोजागी फलक लावल्याकरणाने चुकण्याची सुतराम ही शक्यता नव्हती. सुरवातीचा पहिला फलक सोडूनच आम्ही थेट जंगलात प्रवेश केला. जंगलसुद्धा साधं नाही तर घनदाट. आमच्याशिवाय कोणीच नसल्याने जंगल एकदम शांत. शांततेचा आवाज ऐकणं म्हणजे काय ते हेच.












घनदाट जंगलातील काही पैलू
              छोट्या मोठ्या चढाया पार करून आता आम्ही येऊन ठेपलो ते म्हणजे ह्या वाटेतल्या खडतर टप्प्याजवळ. ह्या टप्प्याचे वर्णन करायचं झालं तर दोन्ही बाजूला कातळ आणि दोघांच्या मध्ये फक्त एक फूट जागा, त्यातून फक्त चालायचं नाही तर वर चढायचं. सुरुवातीला बघूनच कळलं किल्ला आहे छोटेखानी पण कसरत करायला लावणार एवढं नक्की. एकमेकांना मदत करत हा टप्पा सुद्धा पार केला आणि थेट गडावर जाऊन पोहोचलो

एकमेव खडतर टप्पा
          वर पोहोचल्यावर  समोरचा निसर्ग अजून भन्नाट. समोर दिसत असणारी दरी म्हणजे वाघदरी   व कोसळणारे धबधबे पाहिले आणि मन भरून पावलं ते पाहिल्यावर दोन आठवड्यांचा थकवा एका सेकंदात नाहीसा झाला. इथून डाव्या हाताला गेल्यावर लागतो तो गडाचा सर्वोच्च माथा. वरती पोहोचण्यासाठी कातळात गोलाकार पायऱ्या खोदलेल्या आहेत आजही त्या भक्कम स्थितीत आहे चढताना उजव्या बाजूला असलेल्या खोल दरीमुळे डाव्याबाजूला दगडात खाचे मारून पकडण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे.
मृगगडचा नकाशा
 वाघदरी व समोर कोसळणारे धबधबे 


 चढण्यासाठी कातळात केलेल्या जागा 
         हा टप्पा पार केल्यावर आम्ही थेट गडाच्या माथ्यावर पोहोचलो. वर पोहोचल्यावर समोरच एक देवाची मूर्ती दृष्टीक्षेपात आली त्यास नतमस्तक होऊन डाव्या बाजूने पुढची वाटचाल सुरू ठेवली. समोरच काही पडक्या वाड्याचे अवशेष निदर्शनास आले. पुढे गडाच्या शेवटच्या कोपऱ्यात २ पाण्याची टाकी दिसली. एव्हाना आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर असल्याकारणाने चहूबाजूचे नयनरम्य दृश्य डोळ्यासमोर होते.
गडावरील एकमेव देवीची मूर्ती
पडके वाडे

गडावरील पाण्याची टाकी
              उंचीवर असल्याकारणाने तुफान वारा होता उजवीकडे भेलीव गाव, मागे गीतकडा, डाव्याबाजूस पाताळगंगा नदी असं अप्रतिम दृश्य नजरेसमोर होते ह्याचं औचित्य साधून आम्ही आठवत पेटपूजा करण्याचा निर्णय घेतला.
पाताळगंगा नदी व भेलीव गाव 
360 DEGREE VIEW
            भरपेट खाऊन झाल्यानंतर आम्ही इथून काढता पाय घ्यायचं ठरवलं एव्हाना ३ वाजले होते अजून उतरताना एक कठीण टप्पा उतरायचा होता म्हणून पाऊस सुरू व्हायच्या आत निघायचा निर्णय घेतला. रमत गमत उतरूनसुद्धा आम्ही साडेचार च्या सुमारास पुन्हा पायथ्याशी येऊन पोहोचलो व पुन्हा कर्जतच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागलो. ६.४२ च्या लोकल चा पाठलाग करता करता आम्ही बरोबर साडेसहाच्या सुमारास स्टेशन गाठलं व ठरलेली लोकल पकडून साडेसात ला घरी पोहोचलो.
 SIGNATURE POSE: -

EXPLORE