पुण्यात गणपतीच्या मंदिरांची काही कमतरता नाही पण त्यातल्या त्यात सगळ्यात जुन्या अशा गणपती मंदिरास भेट देण्याचा प्रसंग आला तो म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर.
त्रिशुंड गणपती मंदिर हे सोमवर पेठेत वसलेलं १७ व्या शतकातील एक मंदिर आहे. हठयोगी आणि गोसावी पंथीयांचे श्रध्दास्थळ असलेल्या त्रिशुंड मंदिराची उभारणी इंदूरजवळच्या धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी ह्यांनी १७५४ ते १७५७ या काळात केली. त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्णपणे काळ्या पाषाणात कोरलेलं आहे.
त्रिशुंड गणपती मंदिर
पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर तळघर असल्या कारणाने वर उचलले गेले आहे समोर एक दगडी अंगण आहे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पध्दतीचे स्तंभ आहेत. स्तंभांवर किर्तीमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. स्तंभांच्या वरच्या भागात कीचक किंवा भारवाहक यक्ष कोरलेले असून यक्षांनी छताचा भाग आपल्या पाठीवर व हातांनी तोलून धरला आहे. यक्षांनी हातात साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा पकडलेल्या आहेत.
किर्तीमुख स्तंभ व साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर ब्रिटीश सैनिक कोरलेले असून त्यांनी एकशिंगी गेंड्याला साखळदंडानी बांधलेले आहे. ह्या शिल्पाच्या खाली एकमेकांशी झुंजणारे हत्ती दाखवले आहेत. द्वारशाखेच्या खालती अधिष्ठानावर (जोत्यावर) दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे (लक्ष्मीवर दोन्ही बाजूंनी दोन हत्ती सोंडेत धरलेल्या कलशाने अभिषेक करणारे) शिल्प कोरले आहे. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती कोरली आहे. मूर्तीच्या खालच्या भागात गणेशयंत्र कोरले आहे.
द्वारपाल
ब्रिटीश सैनिक व झुंजणारे हत्ती
मंदिराचा उंबरठा
द्वारशाखेच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. ह्या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मकरमुखातून निघालेली महिरप आहे. ह्या महिरपीच्या वर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला एकमेकांचे हात धरून उभी असलेली वानर आहेत. सर्वात वरच्या पट्टीवर विष्णूचे विविध अवतार दाखवले आहेत. ह्याच पट्टीवर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एका साधूने स्वतःच्या हाताने दुसऱ्या साधूला खाली डोके आणि वरती अश्या स्थितीत पकडले आहे असे आगळेवेगळे शिल्प आहे. दर्शनी भागात दोन्ही बाजूंना राजस्थानी शैलीची रिकामी गवाक्षे आहेत. ह्या गवाक्षांच्यावरती पक्षी बसलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सर्वात वरती शेषशायी विष्णूची मूर्ती कोरली आहे.
महिरप
शेषशाही विष्णू
सभामंडपातून अंतराळात आल्यानंतर गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान दरवाजे आहेत. गर्भगृहात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याने बाहेर पडल्यानंतर गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर दक्षिणेला असलेल्या देवकोष्ठामध्ये नटराजाची सुबक मूर्ती आहे. पश्चिमेच्या देवकोष्ठामध्ये लिंगोद्भव शिव शिल्प आहे. लिंगोद्भवाची कथा पुराणामध्ये येते. कथेनुसार एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चाललेला असतो. हा वाद चालू असताना भगवान शंकर तिथे प्रकट होतात व म्हणतात जो कोणी आदीलिंगाचा उगम आणि अंत शोधेल तोच श्रेष्ठ. त्याप्रमाणे ब्रह्मा हंसाचे रुप आकाशात जातो आणि विष्णू वराहाचे रुप घेऊन पाताळात जातो. परंतु दोघांनाही उगम आणि अंत शोधण्यात यश येत नाही. शेवटी ब्रह्मा आणि विष्णू शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करतात. येथील शिल्पात ब्रह्म हंसरुपात व विष्णू वराहरुपात कोरलेले आहेत. शिवलिंगावर नागाचा फणा दाखवलेला आहे. अनेक शैवलेण्यांमध्ये आणि शिवमंदिरामध्ये लिंगोद्भव गोष्ट दाखवलेली असते. पण त्रिशुंडी मंदिरातील लिंगोद्भव शिव वेगळे आहे. उत्तरेच्या देवकोष्ठामध्ये कोणत्या देवतेची मूर्ती आहे हे ओळखता येत नाही. उत्तरेकडील देवकोष्ठ बघून उजव्या बाजूच्या दरवाज्याने आपण पुन्हा अंतराळात येतो.
नटराज
लिंगोद्भव शिव
गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून
हातामध्ये साखळी पकडलेले जटाधारी साधू आहेत. दरवाज्याच्या वरती शिव आणि
त्याच्या एका मांडीवर पार्वती बसलेली असून दुसऱ्या मांडीवर बसलेली स्त्री
कोण आहे हे सांगता येत नाही. मूर्तीच्या एका बाजूला शंकराचे वाहन नंदी व
दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहे. दरवाज्यावर सुबक महिरप
कोरलेली आहे. दरवाज्याच्या वरती दोन देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत आणि एक
फारशी शिलालेख कोरलेला आहे.गर्भगृहात तीन सोंडा असलेली मयुरारूढ
गणेशमूर्ती आहे. ह्याच गणेश मूर्तीच्या बरोबर मागील बाजूस शेषशाही विसनूची एक मूर्ती भिंतीत
कोरलेली पाहावयास मिळते वास्तविक महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी हि मूर्ती
पाहावयास मिळते.
द्वारपाल
गर्भगृहातील महिरप
शिलालेख
त्रिशुंड गणपती
शेषशाही विष्णू
मंदिराच्या चहू बाजूस पाहायचे झाल्यास बरीच शिल्प आढळतातत्याची इतिहासाची सांगड घालायची झाल्यास बऱ्याच गोष्टी उलगडू शकतात वरील सर्व माहिती ही पंकज समेळ ह्यांच्या मार्गदर्शनातून उपलब्ध झाली आहे त्याबद्दल त्यांचे आभार🙏पुण्यात कधी जाण्याचा प्रसंग आला तर ह्या प्राचीन मंदिरास नक्की भेट द्या.
Location of Temple :