Thursday, 3 December 2020

अपरिचित विहीरींची सफर

         काही दिवसांपासून आपल्या जवळपासच्या पट्ट्यातल्या स्टेपवेल म्हणजेच उतरत्या पायर्‍यांच्या प्राचीन विहिरी शोधायचा विचार मनात आला आणि त्यानुसार सुरुवातही केली त्या त्या गावात जाऊन माहिती घेऊन बऱ्याच विहिरी शोधण्यात यश आलं विहिरी खूप जुन्या आहेत त्यांची बांधणीची पद्धतही अनोखी आहे आणि त्याहीपेक्षा त्या आजही तश्याच भक्कमपणे उभ्या आहेत हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. माझ्या प्रयत्नानुसार भेट दिलेल्या सगळ्या विहिरींची माहिती गावांच्या नावासोबत व GPS लोकेशनसोबत पाठवत आहे माहितीवरून कोणाला विहीर पाहण्याची इच्छा झाली तर तेच माझं छोटंसं योगदान असेल असे मी मानतो

बदलापूरची प्राचीन विहीर
स्थळ - बदलापूर
गावं - देवळाली
GPS Location

नवगाव
स्थळ - मुरबाड कडे जाताना गोवेली च्या पुढील गाव
गावं - नवगाव
GPS Location

 बापसाई
स्थळ - मुरबाड कडे जाताना नवगावच्या समोरील गाव 
गावं - बापसाई
GPS Location

केळणी
स्थळ - मुरबाड कडे जाताना उजव्या हाती असलेले अळणी गाव
गावं - केळणी
GPS Location

कुडावे

स्थळ - पनवेल वरुन कर्नाळ्याकडे जाताना उजव्या बाजूस
गावं - पळसपे
GPS Location

भाटण
स्थळ - पनवेल वरुन कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - भामण
GPS Location

भोकरपाडा
स्थळ - पनवेल वरुन कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - भोकारपाडा
GPS Location

तुपगाव
स्थळ - पनवेल वरुण कर्जतला जाताना उजव्या हातास
गावं - तुपगाव
GPS Location
               
                  वरील सर्व विहिरी पाहिल्यावर आपल्या मनात एक विचार नक्की येईल की ह्या विहिरी त्याकाळी तेथे का बांधल्या गेल्या त्यामागे काही प्रमुख उद्देश होता का? आज ज्या ठिकाणी ह्या विहिरी आहेत ते तेव्हाचे प्रामुख्याने व्यापारी मार्ग होते का?? असे अनेक प्रश्न मनात घुटमळू शकतात तो एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो, पण त्याआधीस्थळी भेट दिल्यास चित्र अधिक प्रखरतेने स्पष्ट होऊ शकेल. त्यासोबतच ह्या विहिरी शोधण्यात ज्यांनी माझी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. व अजून ही कोणाच्या आसपास किंवा कोणाला अश्या विहीरींची माहिती असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की सांगावे म्हणजे भेट देण्यास सोपे होईल.

ह्या सोबतच काही वर्षापूर्वी भेट दिलेल्या विहीरींची लिंक जोडत आहे.

धन्यवाद.

Sunday, 5 April 2020

श्री क्षेत्र संगमेश्वर :- अद्भुत शिल्पाच्या शोधात केलेला प्रवास

           बऱ्याच दिवसांपूर्वी मोबाईलवर एक फोटो आला ज्यामध्ये श्रीकृष्णाचा एक चेहरा व पाच शरीर आणि कुठूनही बघा कोणत्याही शरीरास ते शीर तंतोतंत जुळते अशा कुशल कामगिरीबाबत उत्कंठा म्हणून त्या ठिकाणाचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बराच शोध घेतल्यावर लक्षात आलं कि हे शिल्प महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील "कुडल" नामक एका गावी भीमा व सीना नदीच्या संगमावर असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात आहे.
 अद्भुत शिल्प
           ज्याक्षणी ह्या ठिकाणची माहिती मिळाली त्याक्षणी ताबडतोब ट्रेनच बुकिंग केलं आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री मुंबई बिदर एक्सप्रेस पकडून सकाळी ५.३० ला सोलापूरला उतरलो. तिथून स्टेशनच्या बाहेरच विजापूरला जाणारी बस होती. ती पकडून साधारण सव्वासहाच्या सुमारास टाकळी ह्या मध्यवर्ती ठिकाणावर उतरलो व तिथून पुढे जाताना काही वाहन मिळतंय का? त्याची वाट पहिली पण काही मिळालं नाही. शेवटी एका दुचाकीवर बसून कुडल ह्या गावापर्यंत पोहोचलो वाटेत खूप सुंदर सूर्योदय व गावची शेती पाहायला मिळाली.
कुडल गावापर्यंत पोहोचेपर्यंतचा सूर्योदय
              सदर ठिकाणचं महत्व म्हणजे येथे भीमा आणि सीना ह्या नद्यांचा येथे संगम इथे असलेल्या मंदिरास "संगमेश्वर मंदिर" म्हणून ओळखले जाते. भीमा आणि सीना ह्या नद्या ह्याच ठिकाणी एकमेकांना काटकोनात मिळतात.
भीमा सीना नदी संगम
           इथून पुढे सुरु झाला तो मंदिरसमूहाचा प्रवास. कुडल गावात मिळणाऱ्या ज्याकाही मूर्ती, जी काही शिल्प आपणास पाहावयास मिळतात ती सर्व उत्खननात सापडलेली आहेत त्यातलंच एक दुर्मिळ व जगातील एकमेव असं बहुमुखी शिवलिंग आहे
श्री विश्वरूप शिवदर्शन :-
             ह्या ठिकाणी असलेलं हे जगातील एकमेव शिवलिंग असून ह्यावर ३६० शिवप्रतिमा आहेत. शिवलिंगाची उंची साधारण ४ फूट एवढी असून ह्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते अशी ह्यामागील धारणा आहे

बहुरूपी शिवलिंग

श्रीकृष्ण मूर्ती :-
           आधीच सांगितल्याप्रमाणे कुडल गावात मिळालेल्या सर्व मूर्ती ह्या उत्खननात सापडलेल्या आहेत. त्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या दिवशी जमिनीतून मिळालेली हि अखंडित श्रीकृष्ण मूर्ती. श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा आठवा अवतार. ह्या मूर्तीत श्रीकृष्णाला गोपाळांच्या स्वरूपात दाखवलं आहे ह्यात श्रीकृष्णाच्या हातात बासरी असून डोक्यावर टोप व पायाशी गाय व वासरू आहे.
संगमेश्वर मंदिर :-
              हत्तरसंग मधील कूडल ह्या गावातील मध्यवर्ती असलेल्या मंदिर समूहातील महादेवाचे सर्वात जुने व सर्वात मोठे मंदिर म्हणून संगमेश्वर ह्या मंदिराचा उल्लेख केला जातो. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्य पूर्व दिशेच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असताना साधारणपणे फाल्गुन व भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेला सूर्याची किरणे हि सात दरवाजे ओलांडून बरोबर संगमेश्वराच्या शिवलिंगावर पडतात.
 कुडल मंदिरसमूहाचे प्रवेशद्वार 
संगमेश्वर मंदिर



ओम नमः शिवाय
          संगमेश्वर मंदिराच्या प्राचीनत्वाचे अस्तित्व दाखविणारा महत्वपूर्ण पुरावा म्हणजे मंदिरात येथील शिलालेख. येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख आहे ज्यावर "वाचितो विजयी होईता" अशा प्रकारचा संदेश लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
मराठी शिलालेख
अन्नपूर्णा माता  :- 
           संगमेश्वर मंदिराच्या आवारात मंदिराच्या नैऋत्य दिशेस अन्नपूर्णा मातेचं एक छोटेखानी मंदिर आहे चतुर्भुज व अलंकाराने परिपूर्ण असणाऱ्या ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट जाणवतात.
अन्नपूर्णा माता
पंचलिंग परमेश्वर :- 
           संगमेश्वर मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात एक देव कोष्टकात पाच लिंग एकत्रित असलेलं एक शिवलिंग आहे ह्यास पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. 
पंचलिंग परमेश्वर
श्री हरिहरेश्वर मंदिर :-
              हरिहरेश्वर मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कलापूर्ण अशा शिल्पांनी परिपूर्ण नटलेले असे हे मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, स्वर्गमंडप अंतराळव गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात एकाच दगडात एका बाजूस लक्ष्मी व दुसऱ्या बाजूस भैरवीची उत्कृष्ट कलाकृती आहे.

श्री हरिहरेश्वर मंदिर
लक्ष्मी व भैरवीची एका दगडातील मूर्ती
            ह्या मंदिराच्या सभामंडपाचे तीन भाग केलेले असून डाव्या बाजूस असलेल्या शिल्पामध्ये श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना दाखवलं आहे. मधले शिल्प हे अद्भुत असून ह्यात श्रीकृष्णाचा एक चेहरा व त्यास पाच शरीर परंतु ह्या शिल्पाची निर्मिती अश्या पद्धतीने केली आहे कि कोणत्याही अवस्थेतील शरीराला शिर हे तंतोतंत जोडलेले दिसते. डाव्या बाजूस असलेल्या शिल्पात श्रीकृष्ण सवंगड्यासोबत खेळताना दाखविले आहे.
सवंगड्यांसोबत श्रीकृष्ण
बहुरूपी श्रीकृष्ण
गोपिकांबरोबर श्रीकृष्ण
          पुढे गेल्यास आपला प्रवेश होतो तो स्वर्गमंडपात स्वर्ग मंडपाच्या शिल्पांची रचना हि सर्वात खालच्या बाजूस हत्ती वर भारवाहक त्यावर मिरवणुकीचा आवेश आहे त्यामध्ये एक मूर्ती वाद्य वाजवत असलेलं काही स्त्रिया फुगडी खेळत असलेलं असा सभोवतालचा पट्टा आहे आणि त्यावर सुरसुंदरी दाखवल्या आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात बलवान म्हणून हत्ती हे खालच्या बाजूस दाखवलं आहे मनुष्य प्राण्यांमध्ये भारवाहक हा बलवान म्हणून तो हत्तीच्या वरच्या बाजूस दाखवलं गेलं आहे.
स्वर्गमंडप

स्वर्गमंडपावरील शिल्प
कालभैरव :-
           स्वर्ग मंडपात दोन प्रवेशद्वाराच्या मध्यभागी देंवकोष्टकात कालभैरवाची उत्कृष्ट अशी मूर्ती आहे ज्याच्या दोन्ही बाजूस सप्तफणा काढलेले नाग आहेत. कालभैरवाच्या हातात त्रिशूल व डमरु असून कालभैरवाचे वाहन कुत्रा असल्यामुळे तो खालच्या बाजूस दाखविला आहे भैरव हे शिवाचेच एक प्रतिरूप मानले जाते म्ह्णून त्याचा चेहरा उग्र दाखविण्यात आला आहे.
  सप्तमुखी नाग व कालभैरव
            इथून पुढे आपण प्रवेश करतो ते अंतराळात. अंतराळात २ गर्भगृह असून ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शैव व वैष्णव ह्या दोन्हींचे प्रतिनिधित्व करते म्हणून डाव्या बाजूच्या गर्भगृहात शिवलिंग दिसते व उजव्या बाजूस कृष्णरुपात विष्णूची मूर्ती दिसते व मध्यभागी गणपतीची मूर्ती दिसते.
 शैव मंदिर 
 अंतराळातील गणपती 
  वैष्णव मंदिर विष्णुरूपी मुरलीधर 
            मंदिराच्या आवारात एक भग्न झालेली कृष्णाची मूर्ती आहे व्हरांड्यात उजव्या हाती एक गणपतीची मूर्ती ठेवली आहे. मंदिराच्या आजूबाजूने भग्न झालेली व उत्खननात अढळलेली बरीच शिल्पे, छतावरची झुंबरं आढळतात.
उत्खननात अढळलेल्या मूर्ती :-



उत्खननात सापडलेल्या मुर्त्या व शिल्पे
            सुमारे ३ तास मंदिराच्या आवारात मनसोक्त फिरल्यानंतर आता वेळ आलेली ती निघायची, मंदिरातून बाहेर पडताच आवारात श्री स्वामी समर्थ व हनुमान हि २ मंदिरे आहेत मंदिरातील मूर्ती ह्या पुरातन नसून त्या नवीन आहेत.
           ह्या मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना दहा वाजून गेल्याने १० ची सिटी बस थोडक्यात चुकली होती म्हणून बाहेर असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये बसून गावकऱ्यांशी गप्पा मारत बसलो ११ च्या बस ची वाट बघत होतो. तेवढ्यात एका सद्गृहस्थांशी भेट झाली त्यांचं नाव "मधुकर बिराजदार". मधुकर बिराजदार हे ह्या मंदिर समूहाचे माहितगार. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ह्या मंदिराचा हळू हळू इतिहास उलगडत गेला. त्यांच्याशी गप्पा मारून मंदिराला भेट दिल्याचे सार्थक झाले. एव्हाना ११ ची बस आली आणि मी कुडल गाव व ग्रामस्थांना निरोप देऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

टीप :-
१)  मंदिरापर्यंत पोहोचायचे असल्यास एकतर स्वतःची गाडी हवी अथवा सर्वप्रथम सोलापूर गाठावे तिथून विजापूर ला जाणारी बस पकडून टाकळीला उतरावे व टाकळीवरून मिळेल ते वाहन पकडून कुडल गावापर्यंत जावे.
२) मंदिराची विस्तृत माहिती हवी असल्यास गावात जाऊन "मधुकर बिराजदार" ह्यांच्याशी संपर्क साधावा

ह्या अद्भुत कलेच्या कलाकारास शत शत नमन . . . 

Sunday, 1 March 2020

कर्नाटक भाग ४:- हंपीची दुसरी बाजू

         मागच्या भागात आपण पहिली ती हंपीची एक बाजू आजच्या भागात आपण पाहू ती हंपी ची दुसरी बाजू. थोडक्यात MONKEY HILL म्हणजेच अंजनेया पर्वत, पण तिथे भेट देण्यापूर्वी प्रथम बाजूला असलेल्या विरुपाक्ष मंदिरास प्रथम भेट दिली. विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील केंद्रस्थानी असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हि विरुपाक्ष मंदिराच्या दर्शनाने करून नंतर गाडी भाड्याने घेऊन अंजनेय पर्वताचा प्रवास सुरु केला.
विरुपाक्ष मंदिर
            हंपीमध्ये स्थित विरुपाक्ष मंदिर हे भगवान शिव आणि त्यांची संगीतमय देवी पंपा यांना समर्पित करून ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विरुपाक्ष मंदिर हे नऊ मजले व ५० मीटर उंच गोपुरम असलेले हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील हेमकुट टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीची आठवण करून देते. हे वीट आणि चुनखडीने बनलेले आहे. ह्या मंदिरास "पंपपती मंदिर" म्हणून देखील ओळखले जाते.  विरुपक्ष मंदिर हे ७व्या शतकाचे असून त्यावर कोरलेली कोरीव काम ९व्या व  ११व्या शतकातील आहे. सुरुवातीला या मंदिरात केवळ काही पुतळ्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता पण कालांतराने हे मंदिर एक विशाल इमारतीत रूपांतर झाले. १०व्या शतकात कृष्णादेवरायांनी रंग मंडप बांधला होता जो विजयनगरच्या स्थापत्यशैलीचे नेतृत्व करतो. आजही मंदिरात एक मानाचा हत्ती आहे ज्याची भक्त मनोभावे पूजा करतात.







मंदिरावरील कोरीवकाम
पुष्करणी


मानाचा हत्ती
अंजनेया पर्वत
              अंजनेया पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात किष्किंदा नगरीत पोहोचले, जिथे हा अंजनेया पर्वत आहे जेव्हा हनुमानाला कळले कि दोन राजकुमार आपल्या नगरीत आले आहेत तेव्हा हनुमानजी स्वतः श्रीराम व लक्ष्मणास भेटावयास आले. पौराणिक कथांनुसार श्रीराम व लक्ष्मण ह्यांची बजरंगबली सोबत झालेली पहिली भेट हि इथेच होय. अंजनी पर्वताकडे खालच्या बाजूने पाहिल्यास माकडाच्या चेहऱ्याची एक प्रतिकृती आपल्या नजरेस पडते म्हणून ह्यास "MONKEY HILL" म्हणून ओळखले जाते.
अंजनेया पर्वत

MONKEY HILL


हनुमानाचे जन्मस्थान


 
अंजनेया पर्वतावरून दिसणारे हंपीचे विलोभनीय दृश्य
निले गगन के तले 
सानापूर तलाव
          अंजनेया पर्वताच्या आजूबाजूला बघण्यास काय आहे? असं विचारल्यावर लक्षात आलं कि सानापूर तलाव हे जलसाठ्याचे एकमेव ठिकाण आहे म्हणून तिकडे जायचे ठरवले. अंजनेया पर्वताच्या सुमारे १० किमी पुढे स्थित "सोनापूर तलाव" हे ठिकाण आहे. तुंगभद्रा नदीतील पाण्याच्या साठ्यासाठी म्हणून ह्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. वाटेवरची काही गावे ओलांडून गेल्यावर एका चढावाच्या दिशेने गेल्यास अचानक हा तलाव समोर येतो. जोपर्यंत आपण जवळ पोहोचत नाही तोपर्यंत सोनापूर तलावाचा थांगपत्ता हि लागत नाही वर निळेभोर आकाश आणि त्याच आकाशात मोहून गेलेला निळाशार हा तलाव बघण्याची मजा हि काही औरच आहे.

सानापुर तलाव
पंपा सरोवर उर्फ मातंग तलाव
           रामायणात पंपा सरोवर म्हणजे आपण लहानपणी ऐकलेली शबरीची बोरे हि कथा ज्या ठिकाणी घडली तेच हे ठिकाण म्हणजे "पंपा सरोवर". राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात जेव्हा आले तेव्हा त्यांची भेट शबरीशी झाली व तिने प्रभू श्रीरामास सांगितले कि तुम्हाला सीतेचा शोध घ्यायचा असल्यास तुम्ही हनुमानाची मदत घ्या. किष्किंदा स्थित पंपा सरोवर हे अंजनेया पर्वताच्या बरोबर समोर आहे.

पंपा सरोवर 
             तुंगभद्रा नदीची दक्षिण बाजू बघून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना २ वाजल्याकारणाने भर उन्हात तुंगभद्रेचा पूल ओलांडताना एक निसर्गरम्य दृश्य नजरेस पडलं. चारही बाजूला दगडांचा खच, वरती निळेभोर आकाश, खाली नितळ तुंगभद्रेचे पात्र व मधोमध आपण. हंपीची हि एक आठवण नजरेत व कॅमेरात कैद करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो.
 तुंगभद्रा नदीवरील पूल 


निसर्गरम्य
             खरंतर तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने यायचा तर प्रवास १० मिनिटाचा आहे. पण नदीला पूर आल्याकारणाने गाडी घेऊन हे अंतर तब्बल २३ किमी होतं. पण आलो आहे तर सगळं करावं म्हणून गाडी घेतली पण आलो ते बरंच झालं, निदान रामायणाच्या वास्तूंचे एका अर्थाने साक्षीदारच झालो.
               हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडावेळ आराम करून विरुपाक्ष मंदिराच्या बाजूसच असणाऱ्या हेमकूट पर्वतावरून दिसणारा सूर्यास्त अनुभवण्यास गेलो.
 हेमकूट पर्वत
              विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस पर्वतावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो ते म्हणजे "हेमकूट पर्वत". हेमकूट पर्वत हंपीमधून सूर्यास्त बघण्यासाठीच उत्तम ठिकाण.हंपीमधील जवळपास सर्व पर्यटक हे सूर्यास्त बघण्यासाठी ह्याच ठिकाणी जमतात.   




  हेमकूट पर्वतावरील सूर्यास्त 
           सूर्यास्त बघून झाल्यावर वेळ आली होती ती दुसऱ्या दिवशी हंपीला निरोप द्यायची परत केव्हातरी नक्की येईन ह्या आशेने व मागील ४ निवासाची अविस्मरणीय यात्रा आठवत त्या रात्री झोपी गेलो व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागलो.
 
दिवसाचा खर्च
नाश्ता :- ४०/-
बाईक :- ५००/-
प्रसाद :- ११०/-
नारळपाणी : - ३०/-
चहा :- १०/-
जेवण :- ८०/-
----------------
एकूण :- ७७०/-
 
"दिन का साथी "
टीप : -  तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने जाण्याचा पर्याय कधीही उत्तम आहे कारण त्यामुळे वेळ हि वाचतो व पैसेही. पण काहीही झालं तरी तुंगभनद्रेची दक्षिण बाजू हि आवर्जून बघावी.

धन्यवाद,

SOLO TRIP SUCCESFULLY COMPLETED,
GOOD BYE TILL NEXT BLOG....