बऱ्याच दिवसांपूर्वी मोबाईलवर एक फोटो आला ज्यामध्ये श्रीकृष्णाचा एक चेहरा व पाच शरीर आणि कुठूनही बघा कोणत्याही शरीरास ते शीर तंतोतंत जुळते अशा कुशल कामगिरीबाबत उत्कंठा म्हणून त्या ठिकाणाचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बराच शोध घेतल्यावर लक्षात आलं कि हे शिल्प महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील "कुडल" नामक एका गावी भीमा व सीना नदीच्या संगमावर असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात आहे.
श्री विश्वरूप शिवदर्शन :-
ह्या ठिकाणी असलेलं हे जगातील एकमेव शिवलिंग असून ह्यावर ३६० शिवप्रतिमा आहेत. शिवलिंगाची उंची साधारण ४ फूट एवढी असून ह्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते अशी ह्यामागील धारणा आहे
अद्भुत शिल्प
ज्याक्षणी ह्या ठिकाणची माहिती मिळाली त्याक्षणी ताबडतोब ट्रेनच बुकिंग केलं आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री मुंबई बिदर एक्सप्रेस पकडून सकाळी ५.३० ला सोलापूरला उतरलो. तिथून स्टेशनच्या बाहेरच विजापूरला जाणारी बस होती. ती पकडून साधारण सव्वासहाच्या सुमारास टाकळी ह्या मध्यवर्ती ठिकाणावर उतरलो व तिथून पुढे जाताना काही वाहन मिळतंय का? त्याची वाट पहिली पण काही मिळालं नाही. शेवटी एका दुचाकीवर बसून कुडल ह्या गावापर्यंत पोहोचलो वाटेत खूप सुंदर सूर्योदय व गावची शेती पाहायला मिळाली.
कुडल गावापर्यंत पोहोचेपर्यंतचा सूर्योदय
सदर ठिकाणचं महत्व म्हणजे येथे भीमा आणि सीना ह्या नद्यांचा येथे संगम इथे असलेल्या मंदिरास "संगमेश्वर मंदिर" म्हणून ओळखले जाते. भीमा आणि सीना ह्या नद्या ह्याच ठिकाणी एकमेकांना काटकोनात मिळतात.
भीमा सीना नदी संगम
इथून पुढे सुरु झाला तो मंदिरसमूहाचा प्रवास. कुडल गावात मिळणाऱ्या ज्याकाही मूर्ती, जी काही शिल्प आपणास पाहावयास मिळतात ती सर्व उत्खननात सापडलेली आहेत त्यातलंच एक दुर्मिळ व जगातील एकमेव असं बहुमुखी शिवलिंग आहेश्री विश्वरूप शिवदर्शन :-
ह्या ठिकाणी असलेलं हे जगातील एकमेव शिवलिंग असून ह्यावर ३६० शिवप्रतिमा आहेत. शिवलिंगाची उंची साधारण ४ फूट एवढी असून ह्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते अशी ह्यामागील धारणा आहे
बहुरूपी शिवलिंग
श्रीकृष्ण मूर्ती :-
आधीच सांगितल्याप्रमाणे कुडल गावात मिळालेल्या सर्व मूर्ती ह्या उत्खननात सापडलेल्या आहेत. त्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या दिवशी जमिनीतून मिळालेली हि अखंडित श्रीकृष्ण मूर्ती. श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा आठवा अवतार. ह्या मूर्तीत श्रीकृष्णाला गोपाळांच्या स्वरूपात दाखवलं आहे ह्यात श्रीकृष्णाच्या हातात बासरी असून डोक्यावर टोप व पायाशी गाय व वासरू आहे.
संगमेश्वर मंदिर :-
हत्तरसंग मधील कूडल ह्या गावातील मध्यवर्ती असलेल्या मंदिर समूहातील महादेवाचे सर्वात जुने व सर्वात मोठे मंदिर म्हणून संगमेश्वर ह्या मंदिराचा उल्लेख केला जातो. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्य पूर्व दिशेच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असताना साधारणपणे फाल्गुन व भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेला सूर्याची किरणे हि सात दरवाजे ओलांडून बरोबर संगमेश्वराच्या शिवलिंगावर पडतात.
हरिहरेश्वर मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कलापूर्ण अशा शिल्पांनी परिपूर्ण नटलेले असे हे मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, स्वर्गमंडप अंतराळव गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात एकाच दगडात एका बाजूस लक्ष्मी व दुसऱ्या बाजूस भैरवीची उत्कृष्ट कलाकृती आहे.
कुडल मंदिरसमूहाचे प्रवेशद्वार
संगमेश्वर मंदिर
ओम नमः शिवाय
संगमेश्वर मंदिराच्या प्राचीनत्वाचे अस्तित्व दाखविणारा महत्वपूर्ण पुरावा म्हणजे मंदिरात येथील शिलालेख. येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख आहे ज्यावर "वाचितो विजयी होईता" अशा प्रकारचा संदेश लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
मराठी शिलालेख
अन्नपूर्णा माता :-
संगमेश्वर मंदिराच्या आवारात मंदिराच्या नैऋत्य दिशेस अन्नपूर्णा मातेचं एक छोटेखानी मंदिर आहे चतुर्भुज व अलंकाराने परिपूर्ण असणाऱ्या ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट जाणवतात.
अन्नपूर्णा माता
पंचलिंग परमेश्वर :-
संगमेश्वर मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात एक देव कोष्टकात पाच लिंग एकत्रित असलेलं एक शिवलिंग आहे ह्यास पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते.
पंचलिंग परमेश्वर
श्री हरिहरेश्वर मंदिर :-हरिहरेश्वर मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कलापूर्ण अशा शिल्पांनी परिपूर्ण नटलेले असे हे मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, स्वर्गमंडप अंतराळव गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात एकाच दगडात एका बाजूस लक्ष्मी व दुसऱ्या बाजूस भैरवीची उत्कृष्ट कलाकृती आहे.
श्री हरिहरेश्वर मंदिर
लक्ष्मी व भैरवीची एका दगडातील मूर्ती
ह्या मंदिराच्या सभामंडपाचे तीन भाग केलेले असून डाव्या बाजूस असलेल्या शिल्पामध्ये श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना दाखवलं आहे. मधले शिल्प हे अद्भुत असून ह्यात श्रीकृष्णाचा एक चेहरा व त्यास पाच शरीर परंतु ह्या शिल्पाची निर्मिती अश्या पद्धतीने केली आहे कि कोणत्याही अवस्थेतील शरीराला शिर हे तंतोतंत जोडलेले दिसते. डाव्या बाजूस असलेल्या शिल्पात श्रीकृष्ण सवंगड्यासोबत खेळताना दाखविले आहे.
सवंगड्यांसोबत श्रीकृष्ण
बहुरूपी श्रीकृष्ण
गोपिकांबरोबर श्रीकृष्ण
पुढे गेल्यास आपला प्रवेश होतो तो स्वर्गमंडपात स्वर्ग मंडपाच्या शिल्पांची रचना हि सर्वात खालच्या बाजूस हत्ती वर भारवाहक त्यावर मिरवणुकीचा आवेश आहे त्यामध्ये एक मूर्ती वाद्य वाजवत असलेलं काही स्त्रिया फुगडी खेळत असलेलं असा सभोवतालचा पट्टा आहे आणि त्यावर सुरसुंदरी दाखवल्या आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात बलवान म्हणून हत्ती हे खालच्या बाजूस दाखवलं आहे मनुष्य प्राण्यांमध्ये भारवाहक हा बलवान म्हणून तो हत्तीच्या वरच्या बाजूस दाखवलं गेलं आहे.
स्वर्गमंडप
स्वर्गमंडपावरील शिल्प
कालभैरव :-
स्वर्ग मंडपात दोन प्रवेशद्वाराच्या मध्यभागी देंवकोष्टकात कालभैरवाची उत्कृष्ट अशी मूर्ती आहे ज्याच्या दोन्ही बाजूस सप्तफणा काढलेले नाग आहेत. कालभैरवाच्या हातात त्रिशूल व डमरु असून कालभैरवाचे वाहन कुत्रा असल्यामुळे तो खालच्या बाजूस दाखविला आहे भैरव हे शिवाचेच एक प्रतिरूप मानले जाते म्ह्णून त्याचा चेहरा उग्र दाखविण्यात आला आहे.
सप्तमुखी नाग व कालभैरव
इथून पुढे आपण प्रवेश करतो ते अंतराळात. अंतराळात २ गर्भगृह असून ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शैव व वैष्णव ह्या दोन्हींचे प्रतिनिधित्व करते म्हणून डाव्या बाजूच्या गर्भगृहात शिवलिंग दिसते व उजव्या बाजूस कृष्णरुपात विष्णूची मूर्ती दिसते व मध्यभागी गणपतीची मूर्ती दिसते.
शैव मंदिर
अंतराळातील गणपती
वैष्णव मंदिर विष्णुरूपी मुरलीधर
उत्खननात अढळलेल्या मूर्ती :-
उत्खननात सापडलेल्या मुर्त्या व शिल्पे
सुमारे ३ तास मंदिराच्या आवारात मनसोक्त फिरल्यानंतर आता वेळ आलेली ती निघायची, मंदिरातून बाहेर पडताच आवारात श्री स्वामी समर्थ व हनुमान हि २ मंदिरे आहेत मंदिरातील मूर्ती ह्या पुरातन नसून त्या नवीन आहेत.ह्या मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना दहा वाजून गेल्याने १० ची सिटी बस थोडक्यात चुकली होती म्हणून बाहेर असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये बसून गावकऱ्यांशी गप्पा मारत बसलो ११ च्या बस ची वाट बघत होतो. तेवढ्यात एका सद्गृहस्थांशी भेट झाली त्यांचं नाव "मधुकर बिराजदार". मधुकर बिराजदार हे ह्या मंदिर समूहाचे माहितगार. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ह्या मंदिराचा हळू हळू इतिहास उलगडत गेला. त्यांच्याशी गप्पा मारून मंदिराला भेट दिल्याचे सार्थक झाले. एव्हाना ११ ची बस आली आणि मी कुडल गाव व ग्रामस्थांना निरोप देऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप :-
१) मंदिरापर्यंत पोहोचायचे असल्यास एकतर स्वतःची गाडी हवी अथवा सर्वप्रथम सोलापूर गाठावे तिथून विजापूर ला जाणारी बस पकडून टाकळीला उतरावे व टाकळीवरून मिळेल ते वाहन पकडून कुडल गावापर्यंत जावे.
२) मंदिराची विस्तृत माहिती हवी असल्यास गावात जाऊन "मधुकर बिराजदार" ह्यांच्याशी संपर्क साधावा