Sunday, 25 November 2018

प्रवास माथेरानचा पण.... एका वेगळ्या वाटेने. (MATHERAN... FROM UNKNOWN ROUTE)

            गेले दोन रविवार दिवाळीमुळे घरी बसून घालवले पण आता ठरवलं घरी बसण्यात काही अर्थ नाही म्हणून म्हंटलं निदान कुठे फिरायला तरी जावं म्हणून अजयशी संपर्क केला. तो म्हणाला अगदीच कुठे नाहीतर निदान माथेरानला तरी जाऊ. मी म्हंटलं चालेल चल.  माथेरान तसा आत्ता दोन महिन्यांपूर्वीच केला होता पण तो ONE TREE HILLच्या रस्त्याने. आणि आता माथेरानला जायचं निमित्त होतं ते म्हणजे माथेरानला पोहोचण्याचा सगळ्यात पहिला रस्ता. जिथून माथेरानचा शोध लागला. सन १८५०मध्ये Hugh Malet ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांने ह्या वाटेने जाऊन सर्वात आधी माथेरान गाठलं म्हणूनच म्हंटलं चला आपण पण जाऊ.
माथेरानवर घेऊन जाणारी सगळ्यात पहिली वाट  
             झालं तर मग ठरलं रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे ७.२५ ची ट्रेन पकदडून सव्वाआठच्या सुमारास कर्जत स्टेशनला पोहोचलो सगळ्यात आधी नाश्ता केला आणि आमच्या ठरलेल्या हजारे काकांची काळी पिवळी टॅक्सी पकडली ती सुध्दा एकदम नवीन होती आणि त्या नवीन गाडीत आम्ही आठच्या जागी दहा जण बसलो. त्यात आमचा मित्र भरत खाली बसला होता. नंतर त्याच्यासाठी हजारे काकांनी स्टूल मागवलं. अशी सगळी धमाल करत आम्ही कर्जत स्टेशनवरून पोखरवाडीच्या रस्त्याला लागलो.
हजारे काका आणि त्यांची नवीन गाडी 
आठच्या जागी दहा आणि हाच तो भरत         
            पोखरवाडीवर जायचं म्हणजे उजव्या बाजूला माथेरानचा डोंगर डाव्या बाजूला इर्शाळगड आणि मधोमध मोरबे धरण. मोरबे धारणापाशी पोहोचल्यावर आम्ही गाडी थांबवली कारण समोरचं दृश्य अप्रतिम होतं ते कॅमेरात टिपून पुढे आम्ही थेट पोखरवाडी गाठलं.
इर्शाळगड ,मोरबे धरण आणि माथेरान
ग्रुप फोटो  
              पोखरवाडीच्या पुलावरून वर गेलं की धनवाडी येते. आमच्या ट्रेकचा रस्ता म्हणाल तर धनवाडी पासून रामबाग. रामबाग म्हणजे माथेरानचं शेवटचं टोक. पोखरवाडी ते रामबागच्या वाटेवर ४ पठार लागतात. तसं म्हणलं तर ही छोटी छोटी गावचं. कौलारू घरं, घरासमोर अंगण आणि सोबत दुधदुभती जनावरं. तिथल्या गावकऱ्यांशी माहिती घेऊन आम्ही पुढे लागलो.  एव्हाना ऊन यायला सुरुवात झाली होती.

धनवाडी मधली धमाल
             आमचं ध्येय आमच्या समोरच होतं गारवा होता तो पर्यंत आम्ही पटापट चालत होतो. थोडं पुढे गेल्यावर बुरुजवाडी आली तिथून एक काका नांगर डोक्यावर घेऊन चालले होते. त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन आम्ही त्यांच्याच बरोबर चालण्याचा प्रयत्न केला पण त्यांची चाल आणि आमची चाल ह्यात खूप फरक होता. शेवटी आम्ही त्यांना बोललो तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो.


रणरणतं ऊन आणि पायपीट
भर उन्हात झाडाखालचा आसरा  
              आता बऱ्यापैकी चढावाला सुरुवात झाली होती म्हणून आमचा ही वेग मंदावला होता पण हळू चालताना का ना होईना आजूबाजूचा परिसर अत्यंत आनंद देत होता. डाव्या बाजूला इर्शाळगड होडीच्या आकारात होताच जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त वर आल्याने आता मोरबे धरण पण पूर्ण दृष्टीक्षेपात येत होतं. तोच उजव्या बाजूला एक झेंडा दिसला तो कुठला किल्ला असेल ह्यावर चर्चा करता करता उमगलं की तो म्हणजे किल्ले सोंडाई.
किल्ले इर्शाळगड
मोरबे धरण
माथेरानची डोंगररांग आणि उजव्या बाजूला किल्ले सोंडाई
            जो आम्ही मागच्या वर्षी केला होता. त्या ट्रेक च्या आठवणी जागवत आता आम्ही तिसऱ्या पठारावर येऊन पोहोचलो ते म्हणजे रामबाग जंगल. काही का होईना जंगलात गेल्यावर असं वाटलं हा रस्ता संपूच नये कारण ह्या रणरणत्या उन्हातून अचानक मिळालेली सवली म्हणजे स्वर्गसुखच होतं. मागे वळून पाहिल्यावर आम्हाला कळत होतं आम्ही कुठून आलो आणि कुठपर्यंत पोहोचलो. त्याच गप्पा मारत जंगलाचा आनंद घेत आमची चाल सुरू ठेवली
रामबागच्या जंगलातील प्रवेश
                    उन्हामुळे तहान खूप लागत होती. वाटेत कुठे पाणी मिळेल का ते पाहत होतो तेवढ्यात एक ठिकाणी डोंगरातून थेंब थेंब पाणी पाझरताना दिसलं पण ते बाटलीत भरण्याइतपत नव्हतं.  मग तिथे तहान न भागवता फक्त डोकं भिजवल. आणि पुढे जाऊन बघतो तर अशाच दगडातून येणाऱ्या पाण्याने गावकरी पाणी भरत होते. त्यांनी त्यासाठी नामी शक्कल लढवली होती. पाण्याच्या प्रवाहापाशी त्यांनी एक बाटली लावलेली खऱ्या अर्थाने त्या जागेवरचा तो नळच होता. तिथे मनसोक्त पाणी पिऊन आणि पाणी भरून पुढच्या वाटेला लागलो

भर उन्हात लाभलेला अमृताचा झरा
            एव्हाना रामबाग पॉईंटची हद्द दिसायला लागली होती.  तेव्हा आम्हाला समजलं की आता आम्ही पोहोचलो आहोत. त्यामुळे रामबाग पॉईंटच्या हद्दीवर सगळ्यांचा एक फोटो काढला.  एव्हाना एक वाजला होता भूक अशीही लागली होती. पुढे जाऊन खायचं म्हंटलं तर माथेरानच्या माकडांची भीती म्हणून तिथेच बसून जेवणाचा आनंद घेतला आणि माथेरान च्या हद्दीत प्रवेश केला.
रामबाग पॉईंट 
माथेरानमधील प्रवेश          
                पुढे आमचा एक मित्र म्हणाला "मी आजपर्यंत बऱ्याच वेळा माथेरानला आलो पण मला Panther's Cave आजपर्यंत नाही दिसली" मग आम्ही ठरवलं चला आलो आहोत तर ती शोधू म्हणून मग सगळ्यात आधी माथेरानचा नकाशा बघितला. आम्ही असलेल्या ठिकाणचा अंदाज घेतला तेव्हा कळलं की ती Cave रेसकोर्सच्या मागच्या बाजूस आहे म्हणून आधी रेसकोर्सजवळ पोहोचलो. तिकडे एक झाड पाहिल्यावर जवळपास  सगळे  विसरूनच गेले की आपण काही शोधत आहोत असं. 
माथेरानचा नकाशा
रेसकोर्स
माथेरानमध्ये माकडं कमी होती का??
               रेसकोर्स इतका मोठा त्यात ती Cave इतकी छोटी म्हणून आम्ही तिथल्या एका स्थानिक व्यक्तीस विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं कि पुढे GOLD CROFT नावाचा बंगला आहे त्या बंगल्यात ती गुहा आहे म्हणून मग आम्ही त्यादिशेने निघालो. ही Cave खाजगी बंगल्याच्या आवारात असल्यामुळे आधी आम्ही तिथल्या लोकांची परवानगी घेतली आणि आत मध्ये प्रवेश केला.सुमारे दहा फुटाच्या आवारात पसरलेली ही गुहा सध्या ह्या गुहेत देवाच्या काही मुर्ती आहेत त्यांची दृश्य टिपले आणि  पुन्हा माथेरानच्या मार्केटच्या दिशेने निघालो
GOLD CROFT
AND.... FINALLY PANTHER'S CAVE
               ज्या एका आशेवर आम्हाला FRANSIS ने आम्हाला खालपासून वरपर्यंत आणलं त्याठिकाणी येऊन पोहोचलो ते म्हणजे माथेरानच्या मार्केटमधला Milkmaid गोळा. तिथे गेल्यावर प्रत्येकाने आपापल्या आवडीचा गोळा खाल्ला. तिथे बाजूलाच असलेली माथेरानची प्रसिद्ध चिक्की आणि मध घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.
MILKMAID GOLAA  
                    एव्हाना ६ वाजले होते त्यामुळे शेवटची बससुद्धा गेली होती म्हणून  शेवटी टॅक्सी करून नेरळ स्टेशन गाठलं आणि लोकल पकडून साडेसातच्या सुमारास घरी पोचलो.
माथेरानची डोंगररांग
"सुभाष सर" धन्यवाद ....

Friday, 19 October 2018

एक अपरिचित बेट - पाणजू बेट (PANJU ISLAND)

          एक रविवारच्या आरामानंतर पुन्हा आपल्या सफरीला सुरुवात झाली. उन्हामुळे जवळपास दुर्गभ्रमंतीला अल्पविराम मिळाला आहे म्हणून आता जवळपासच्या काही ठिकाणांना भेट देण्याची ही वेळ आहे असं म्हणून ह्यावेळी नायगाव जवळील पाणजू बेटाला भेट द्यायचं ठरवलं.  पणजू बेटांचे वैशिष्ट्य म्हणजे वसई नायगाव जवळच असणारं हे बेट पण आजही रस्त्याच्या सुखसोयीपासून वंचित असणारे हे बेट. आजही पाणजू गावात जायचं झाल्यास बोटीचा वापर करावा लागतो. 
        रविवारी सकाळी लवकर निघून कोपर वरून सकाळी साडेपाच वाजताची बोईसर ट्रेन पकडून आधी वसई गाठलं. वसईला पोहचेपर्यंत सकाळी साडेसहा वाजले. वसई स्टेशनवरूनच सकाळचा सूर्योदय टिपला. तिथून नायगवसाठीची लोकल पकडून नायगावला पोहोचलो.
 वसई स्टेशन सूर्योदय
            नायगाव स्टेशनच्या बाहेर अप्रतिम असं साईबाबांचे देऊळ आहे ती मूर्ती पाहूनच मनात भरते. त्याचे दर्शन घेतले व बाकी मित्रांची वाट बघत बसलो. बाजूलाच एक मावशी नाश्ता विकत होत्या त्यांच्याकडे नाश्ता करू म्हंटलं. म्हणून शिरा घेतला व त्यांना पाणजू गावाबद्दल विचारण्यास सुरुवात केली त्यांनी मला जवळपास सगळी माहिती सांगितली. एव्हाना माझे मित्र आले मग आम्ही बोटीपर्यंतचा प्रवास पायीच करण्याचा निर्णय घेतला. पंधरा मिनिटांतच आम्ही बोटीपाशी पोचलो.
साईमंदिर
               नायगाव स्टेशन पासून १०-१५ मिनिट चालत गेल्यावर पाणजू बेटावर जायला बोट मिळते. दर अर्ध्या तासाने बेटावर जायला बोट असते. तसं  ८ च्या सुमारास आम्ही बोटीत प्रवेश केला पाणजू बेट समोरच दिसत असल्याने आम्ही बोटीने पाच मिनिटातच पाणजू बेटावर पोचलो
  पाणजू बेट
            पाणजू बेटाच्या प्रवेशद्वारातच त्या बेटावरील स्वातंत्र्यसेनांनीच्या नावाचे स्मृतीचिन्ह लावण्यात आले आहे. तिथूनच गावची सुरुवात होती गावात आजही जुन्या काळापासून चालत आलेली घरं आहेत. ह्या गावात पोहोचण्यासाठी पूल नसल्याकारणाने आजही ह्या गावात एकही गाडी नाहीये पण त्याचमुळे की काय आज हे गाव प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करून आहे.
हुतात्मा  स्मारक
       गावात बऱ्याच जणांनी आता नवीन घरे बांधली आहेत त्यातले एक घर आम्ही पाहिलं त्या घरात समोरच्या खोलीतच प्राण्यांची लक्षवेधक चित्र काढलेली होती. आम्ही ती बाहेरूनच बघत होतो नंतर त्या घरातल्या मावशींनी आम्हाला आत बोलावलं तेव्हा आम्हाला कळलं की त्या घरातल्या लहान मुलाच्या हट्टापायी त्यांनी ती चित्रे काढली होती.
घरातील अंतर्गत सजावट
              हे झालं मोठं घर पण गावातील छोटी छोटी घरं देखील त्यांचा डौल सांभाळून आहेत. काही घरे जुनी असली तरी त्यांना व्यवस्थित रंगरंगोटी करून त्यांना अजून आकर्षक बनवलं आहे. तेच जुन्या घराचे दरवाजे त्याच जुन्या भिंती छोटेसे का ना होईना पण घराला असलेलं अंगण हे विशेष लक्ष वेधून घेतात. गावात एक एकविरा मातेचे देऊळ दिसले आधी आम्हाला वाटले ते गावचे देऊळ आहे नंतर कळलं ते एका गावकर्यांचं आहे.
एकविरा मातेचे देऊळ



गावातील काही घरे
     कोळी बांधवांचा वारसा 
              त्यांनाच आम्ही गावातली काही ठिकाणे विचारून घेतली आणि पुढे निघालो वाटेतच गावकऱ्यांच्या अंगणातल्या बागेचे बरेच फोटो काढले. ह्या गावातील लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावातील लोक कोणावरही अवलंबून नाही म्हणून प्रत्येकाच्या दारात स्वतःचे अंगण स्वतःची बाग. बागेत वेगवेगळ्या प्रकारची फुले रोजच्या वापरात येणाऱ्या मुबलक भाज्या ह्या सर्वांनी त्यांचे अंगण भरलेले होते.

झेंडू
भेंडी
घोसाळी
शेवग्याची फुले
अंगणातले केळीचे घड

कोंबडा
सुरवंट आणि फुलपाखरू  
             नवरात्र असल्याने गावात देवीची प्रतिष्ठापना झाली होती त्याचे दर्शन घेतले आणि विसाव्यासाठी म्हणून दहा मिनिटे तिथेच बसलो. तेवढ्यात तिकडून आम्हाला गावात सोडलेल्या बोटीचा चालक घरच्या दिशेने चालला होता त्यांचे नाव दिलीप भोईर. आम्हाला बघून तो पण क्षणभर थांबला आणि आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला विचारलं कसं वाटलं आमचं गाव??? आम्ही बोललो मस्तच.
गावातील देवीची प्रतिष्ठापना 
             त्यावर त्यांनी गावची सगळी माहिती सांगितली जिथे बसलेलो तिथेच गावचे ग्रामदैवत हनुमानाचे अप्रतिम मंदिर होते ते त्यांनी दाखवले हनुमान जयंतीला तिथे मोठा कार्यक्रम असतो. त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढचा प्रवास आम्ही दिलीप दादांसोबतच केला ते म्हणाले चला तुम्हाला गावातले तलाव दाखवतो
गावातील हनुमान मंदिर
.          त्यांच्या घराजवळच असणारा हा गोड्या पाण्याचा तलाव त्यात मासे सोडून नंतर मोठे झाल्यावर विकायचा हा ह्यांचा खरा व्यवसाय. पुढे त्यांच्या घराजवळ आम्ही विसावा घेण्यास थांबलो तेव्हा त्यांनी आम्हाला गावची सगळी माहिती देण्यास सुरुवात गेली गावात सुमारे १२० वर्ष जुनी शाळा आहे.
गावातील गोड्या पाण्याचा तलाव 
१८९८ सालची शाळा
          मागच्या बाजूस मिठागरे आहे. पुढे इंग्रजांच्या काळातील रेल्वेचा जुना पूल आहे. ही सगळी माहिती देत असताना त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला वेळ आहे का??  असेल तर मी तुम्हाला मिठागरे दाखवायला येतो. आम्ही म्हणालो चला!!! म्हणून दिलीप दादा जसे होते त्याच स्थितीत आमच्या सोबत निघाले मी म्हंटल दादा चप्पल नाही का घालत तर त्यावर ते म्हणाले मला सवय आहे पण पूर्ण काट्यातला असलेला हा प्रवास त्यांनी आमच्यासाठी अनवाणी पायांनी केला.
मिठागरे
            मिठागरापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी आम्हाला मिठाची पूर्ण प्रक्रिया सांगितलं त्यातून येणारे उत्पन्न ह्यावर त्यांनी माहिती दिली आता रेल्वेचा नवीन पूल समोरच दिसत होता तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आधी इथे सुरुवातीला मातीचा पूल होता नंतर रेल्वेसाठी लोखंडी पूल झाला आजमितीस तो तिथे अस्तित्वात आहे. तुम्ही बघणार का??? आम्ही बोललो हो पण खरं सांगायचं तर पुढचा रस्ता बाभळीच्या झुडपांनी भरलेला होता. मला आमची काही काळजी वाटत नव्हती पण मला त्यांच्यावर दया येत होती दिलीपदादा बिचारे आमच्यासाठी उघड्या अंगावर झुडपं बाजूला करून आमच्यासाठी वाट काढून चालत होते त्यात अनवाणी पाय. शेवटी आम्हाला त्यांनी वाटेत लागलेला सुरुवातीला मातीतला पूल दाखवला आणि खाडीपर्यंत घेऊन गेले

वसईची खाडी  त्यावरील पूल
           पुढे रेल्वेचा जुना पूल नजरेस पडला. त्यावर ते म्हणाले चला तिकडे जाऊ आमच्यासाठी तो दिवस म्हणजे सोन्याहुन पिवळा होता त्यांच्याबरोबर आम्ही जुन्या पुलावर गेलो बाजूलाच असणाऱ्या नवीन पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू होती. त्याचे काही फोटो काढून आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.
इंग्रजांच्या काळातील जुना रेल्वे पूल
            तेव्हा वाटेत दोन रस्ते लागले तेव्हा स्वतः दिलीपदादांनी आम्हाला विचारलं घराकडे जायचं की खाऱ्या पाण्याच्या तलावाकडे जायचं त्यावर आम्ही बोललो तलावाकडे. मग ते आम्हाला खाऱ्या पाण्याच्या तलावाकडे घेऊन गेले वाटेत गावातलं मैदान दाखवलं. तिथून पुढे गावातील  जुने ग्राम दैवत म्हणजे ब्राह्मणदेवाचे देऊळ लागले तिथले दर्शन घेऊन आम्ही दादांच्या घरी गेलो
 खाऱ्या पाण्याचा तलाव
गावातील मैदान 
           ते पाहून आम्ही जेवायला म्हणून दिलीपदादांच्या घरासमोर गेलो. स्वतःचा वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला त्यांचं गाव दाखवलं म्हणून आम्ही त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून द्यायचं ठरवलं त्यावर त्यांनी नम्रपणे म्हंटलं आमच्या गावाची चार ठिकाणी माहिती होईल ह्यातच मला आनंद आहे. मला पैसे वगैरे काही नको.मित्रांनो ही माणुसकी फक्त गावाकडेच मिळू शकते एका ब्लॉगमध्ये आम्ही वाचलं होतं की पाणजू गावातील लोक अतिथींच स्वागत करत नाही पण त्या गावकऱ्यांनी आमचं केलेलं आदरातिथ्य पाहून आम्हीच थक्क होतो म्हणून आम्ही दिलीप दादांची छोटीशी मुलाखत घेतली
    दादांची मुलाखत नक्की ऐका         
               त्यांची यशोगाथा ऐकून माझ्या डोळ्यातून खरंच पाणी आलं. अश्रूंनी भिजलेले डोळे घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला एव्हाना दुपार झाली असल्याने गावातली मुलं तलावावर पोहायला आली होती त्यांची मजा कॅमेरात कैद करून पुन्हा बोटीच्या ठिकाणी गेलो तिथून बोट करून पुन्हा नायगाव स्टेशन गाठलं आणि साडेपाचच्या सुमारास पुन्हा थेट घरात प्रवेश केला
परतीचा प्रवास