Saturday, 13 April 2019

गुजरात दौरा भाग-१ अदालज नि वाव (ADALAJ STEPWELL)

           जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही महाराष्ट्रच आणि त्यातही भटकंतीची आवड असल्याने जवळपास बराचसा महाराष्ट्र नजरेखालून गेला आहे म्हणून ह्यावेळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने चालून आलेल्या २ दिवस सुट्टीचा फायदा घेऊन पावलं राज्याबाहेरच्या दिशेने वळविण्याचा निर्णय घेतला. जवळपास कुठे जायचे झालं तर कर्नाटक, गोवा किंवा गुजरात. कर्नाटक ३ महिन्यापूर्वीच झालं गोव्याला जाणं-येणं होतच असतं म्हणून ह्यावेळी निवडलं गुजरात.
          सगळ्यात आधी व्यवस्थित नियोजन केलं. कोणती गाडी पकडायची, आधी काय करायचं? कुठे रहायचं? हे सगळं गुगल मॅपवर नोट करून ठेवलं. बरं आता सोबत कोण येणार ह्याची काही खात्री नव्हती कारण गुढीपाडवा म्हणजे हिंदू वर्षातला पहिला दिवस आणि सणावाराला कोण घराबाहेर पडणार? म्हणून वेळ आली तर एकट जावं लागेल ह्याची ही तयारी केली आणि झालंही तसंच कोणीच यायला तयार नव्हतं त्यामुळं पुन्हा एकदा ही माझी "SOLO TRIP" झाली. सगळ्यात महत्त्वाचं होतं काय तर गुजरात मध्ये जाऊन बघायचं काय?? गुजरात हा राजे राजवाड्यांच्या काळी पाहायला गेलं तर पाण्याच्या दृष्टीने दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून गुजरातकडे पाहिलं जायचं मग गुजरातमध्ये प्रसिद्ध काय असेल तर राज्यांच्या काळातल्या विहिरी. मग पूर्ण अभ्यास करून सर्वात पहिले भेट देण्याचं ठिकाण ठरवलं ते म्हणजे गुजरातपासून जवळ असणारी "अदालज नी वाव"
अदालज नि वाव
            प्रवासाला सुरुवात झाली ती शुक्रवारी रात्री मुंबई-राजकोट दुरांतो एक्स्प्रेसने. रात्री सडेअकराची गाडी पकडली. जाताना व्यवस्थित बुकिंग केल्याचा फायदा होता व्यवस्थित झोप काढून जायचं होतं कारण पुढचा पूर्ण दिवस प्रवासात जाणार होता.

प्रवासाची सुरुवात
        झोपताना पहाटे ५ चा अलार्म लावून निवांत झोपलो आणि सकाळी साडेपाचला अहमदाबादला उतरलो. सर्व काही नवीनच होतं म्हणून थोडीशी चैकशी केली एव्हाना उजाडलं सुद्धा नव्हतं 

         गुजरातची सकाळ 
              तिथून खऱ्या अर्थाने गुजरात दौऱ्याला सुरुवात झाली. ठरवल्याप्रमाणे सर्वात पहिले भेट देण्याचं ठिकाण होतं "अदालज नी वाव" इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर ADALAJ STEPWELL. STEPWELL ची फोड करायची झाली तर "WELL म्हणजे विहीर" आणि "तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या म्हणजेच STEPS" म्हणून "STEPWELL". अश्या स्टेपवेल पाचव्या ते एकोणीसाव्या शतकात भरपूर बांधल्या गेल्या. तसं पाहायचं झाल्यास गुजरात हा पाणी टंचाईचा प्रदेश म्हणून केवळ गुजरात प्रदेशातच १२० हून अधिक विहिरी आढळतात, त्यापैकी अदालज येथील विहिरी सर्वत्र लोकप्रिय आहे.
        अदालज हे अहमदाबाद पासून सुमारे १८ किमी दूर असलेलं एक गाव. अदालज ला जायचं झाल्यास अहमदाबाद वरून सिटीबस मिळतात पण मी लवकर पोहोचल्यामुळे थेट रिक्षा केली व सात वाजण्याच्या सुमारास अदालज जवळ पोहोचलो.
                 अदालज विहीर पहायची झाल्यास त्याची वेळ सकाळी ८ ते ६ आहे. त्यामुळे मी थोडावेळ तिथेच थांबायचं ठरवलं त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की विहिरीत सगळ्यात पाहिले प्रवेश करायचा मान मला मिळाला व जशी हवी तशी फोटोग्राफी करू शकलो.

अदालज नि वाव चं प्रवेशद्वार
            "अदालज की वाव"चा इतिहास पाहता  १५ व्या शतकातील पौराणिक कथेनुसार, एक हिंदू शासक वाघेला राजवंशचा राजा "राणा वीरसिंह" याने त्याकाळी दंडई देश म्हणून ओळखल्या जाणार्या क्षेत्रावर राज्य केले. त्याचे राज्य एक लहान होते. हे पाणी कमतरतेच्या अधीन होते आणि पावसावर अवलंबून होते. आपल्या लोकांच्या दु: खाचे उच्चाटन करण्यासाठी राणा यांनी मोठ्या आणि खोल पायऱ्या असणारी विहीर बांधण्याचे काम सुरू केले.हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी, त्याच्या साम्राज्यावर शेजारच्या राज्याच्या मुस्लिम शासक मोहम्मद बेदडाने हल्ला केला. लढाईत राणा राजाचा मृत्यू झाला आणि त्याचा प्रदेश आक्रमणकर्त्याने ताब्यात घेतला. राणा वीर सिंगची विधवा, राणी रुदाबाई हिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला रुदाबाईने ठराविक काळात विहीर पूर्ण करून नंतर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला त्याने प्रस्ताव मान्य केला आणि ठराविक वेळी विहिरी तयार केली. एकदा विहिरी पूर्ण झाल्यानंतर बेगडा यांनी तिला विवाह करण्याची वचनपूर्तीची आठवण करून दिली. त्याऐवजी राणीने तिच्या पतीने सुरू केलेली विहीर पूर्ण करण्याच्या हेतूने आपली जीवनशैली पूर्ण केली होती, म्हणून तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला व  त्याच विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
 अंतर्गत कलाकुसर  
अदालजच्या विहिरीचा अंतर्भाग
          विहिरीच्या बांधकामाची सुरुवात झाली ती १४ व्या शतकात नंतर चंपानेरहून आलेल्या "मेहमूद बेगडा" ह्यांनी ही विहीर पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा संकल्प केला. सोलंकी वास्तुशास्त्रीय शैलीतील बलुआ दगडांमध्ये बांधलेली, अदालज स्टेपवेल पाच मजली खोल आहे. प्रत्येक मजला इतका विशाल आहे की लोकांना एकत्र येण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध आहे.
 पर्यटकांसाठी असलेली प्रशस्त जागा
           वर्षभर पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी उतार-चढ़ाव होणार त्यानुसार तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खोल खोदले गेले.  राजा मेहमूद बेगडा ह्यांनी ही विहीर पूर्ण केल्यामुळे ही विहीर इन्डो-इस्लामिक स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहे.  त्यामुळे विहिरीवरील शिल्पसुद्धा तशीच आढळतात.
अदालज च्या विहिरीतील शिल्पकला
                   सन १४९८ मध्ये ह्या विहिरीचं काम पूर्ण झालं. पाचशेहुन अधिक वर्षे पूर्ण होऊनसुद्धा आजही ह्या विहिरीवरील कोरीवकाम पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतं. निघता निघता विहिरीच्या बाहेरून विहिरीचं एक दृश्य टिपलं ज्यावरून आपल्याला विहीरच्या लांबीचा अंदाज येईल.
 "अदालज नि वाव "चं  बाहेरून टिपलेले दृश्य 
           GOOGLE MAP OF ADALAJ STEPWELL
            खरंतर अदालजच्या विहिरीसाठी कितीही वेळ असला तरी तो कमीच वाटेल पण एकदा गर्दी वाढली की मग  थांबण्यात मजा नाही हे समजून पावणे दहाच्या सुमारास अदालजच्या विहिरीपासून काढता पाय घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
लवकरच भेट होईल गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या भागात.
क्योंकी ये तो बस झाँकी  है पुरी Picture अभी बाकी है...

Wednesday, 23 January 2019

दरवाज्यांचं शहर - औरंगाबाद (CITY OF GATES)

            महाराष्ट्रातील माझं सर्वात आवडतं शहर कोणतं असेल तर ते म्हणजे "औरंगाबाद". किल्ले, लेण्या आणि मंदिर ह्याचा त्रिवेणी संगम असणारं एकमेव शहर म्हणजे "औरंगाबाद". माझ्या वहिनी सागरिका वहिनी त्यांचं माहेर औरंगाबाद. एक दिवस त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्याकडून माहिती मिळाली की औरंगाबादला "CITY OF GATES" म्हणतात. पुरेशी माहिती त्यांच्याकडून घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी ट्रेनचं बुकिंग केलं. 
         औरंगजेबाने जेव्हा औरंगाबाद ही आपली राजधानी म्हणून निवडली तेव्हा शहर सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्याने शहरामध्ये सर्वप्रथम ठिकाणी दरवाजे बांधण्यास सुरवात केली. परकीयांनी कितीही हल्ले केले तरी त्यापासून शहराला काही धोका पोहचू नये हा त्यामागचा हेतू. औरंगजेबने त्यावेळी असे ५२ दरवाजे बांधले आजमितीस त्यातील काहीच दरवाजे सुस्थितीत आहेत.
             मी अजय आणि प्राजक्ता आमचा प्रवास औरंगाबादच्या दिशेने सुरु झाला तो म्हणजे शनिवारी रात्री देवगिरी एक्सप्रेसने. पहाटे ४ वाजता आम्ही औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरलो. सकाळी फ्रेश होऊन सुमारे साडेपाचच्या सुमारास चालायला सुरुवात केली. घरून निघतानाच जायची ठिकाणं Map वर मार्क केली होती त्यामुळे जाताना आम्ही जरी ३ जण असलो तरी आमचा चौथा मित्र होता तो म्हणजे GOOGLE MAP.
   
 त्या दिवसात आम्ही सुमारे १५ दरवाजे पाहणार होतो. त्यांचे फोटो व माहिती खालीलप्रमाणे.
 १) बारापुल्ला गेट
              बारापुल्ला गेट मधून बाहेर पडताना लागणाऱ्या पुलाला पाणी येण्या जाण्यासाठी १२ कमानी होत्या म्हणून ह्या दरवाज्याचे नाव बारापुल्ला गेट.

२) मेहमूद दरवाजा

३) भडकल दरवाजा
             भडकल दरवाजा हा विजयाचे प्रतीक म्हणून बांधलेला दरवाजा म्हणून ओळखला जातो. भडकल दरवाजा हा शहरातील सर्वात पहिला व दख्खन मधील सगळ्यात मोठा दरवाजा होय. हा दरवाजा त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे.
४) छोटी भडकल दरवाजा
               भडकल दरवाजासमोरील असलेली एक कमान भडकल दरवाज्यापेक्षा काही अंशी छोटी असल्याने ह्याला छोटी भडकल म्हणून ओळखले जाते.

५) मकाई गेट 
               मक्केच्या दिशेने जाणाऱ्या ह्या दरवाज्याला मकाई दरवाजा म्हणून ओळखले जाते

६)नौबत दरवाजा

७)काला दरवाजा 
            काला दरवाजा हा त्याच्या भक्कम बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. ह्या दरवाजाच्या बांधकामासाठी सगळ्यात जास्त काळ्या दगडाचा वापर करण्यात आला असल्याने ह्यास "काला दरवाजा" म्हणून ओळखले जाते. काला दरवाज्याची भिंत हि सर्वात मोठी आहे एका दरवाज्यावरून दुसऱ्या दरवाज्यावर जाण्यासाठी ह्या भिंतीचा वापर केला जायचा.

८) रंगीन दरवाजा
             रंगीन दरवाजासमोर आधी रंगीबेरंगी प्रकाशात नृत्याविष्कार सादर होत म्हणून ह्यास रंगीन दरवाजा ह्या नावाने संबोधले जाते.
९) दिल्ली गेट
                 दिल्ली दरवाजा हा दिल्ली शहराकडे तोंड करून उभा असल्याने ह्यास दिल्ली दरवाजा म्हणून ओळखले जाते. दिल्ली दरवाजा हा त्याच्या भक्कमपणाची निशाणी आहे ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. दरवाज्यावर आजही टोकेरी खिळे आहेत त्यामुळे ह्यास हत्तीसुद्धा धडक देऊ शकत नाही.

१०) नूर गेट
             औरंगाबादच्या भरवस्तीत असणारा हा एक जुना दरवाजा. इतका उत्कृष्ट असणारा हा दरवाजा पण आज ह्या ठिकाणी प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य उभे ठाकले आहे

११) रोशन गेट
            शहाजहानची बहीण रोशनाराच्या नावाने हा दरवाजा ओळखला जातो. पूर्वेला सूर्योदयाच्या दिशेने असणारा हा दरवाजा सकाळच्या सूर्यप्रकाशाने रोशन होणारा हा दरवाजा म्हणून हा रोशन दरवाजा.

१२)कट कट गेट
                 पूर्वीच्या काळी सकाळ संध्याकाळ दरवाजे चालू बंद केले जायचे त्यावेळी ह्या दरवाज्यातून कट कट असा आवाज यायचा म्हणून हा कटकट दरवाजा.

१३) खास गेट
आत्ताच्या काळी हा दरवाजा पूर्णपणे पाडण्यात आला आहे.
 
१४) जफर गेट
              जफर दरवाज्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी आजही हा दरवाजा सुस्थितीत आहे. आज ह्या जागेवर आठवडी बाजार भरला जातो
 १५) पैठण गेट
           पैठण शहराच्या  दिशेने जाणाऱ्या ह्या दरवाजास पैठण दरवाजा म्हणून ओळखले जाते हा दरवाजा शहरातील सगळ्यात छोटा दरवाजा आहे.
              ठरल्याप्रमाणे इथे आमचा दरवाज्यांचा प्रवास संपला होता एव्हाना सकाळी साडेपाचच्या सुमारास सूरु केलेली चाल बरोबर १२ वाजता संपली. एव्हाना १७ किमी चालणं झालं होतं. वेळ असल्याने आम्ही वेरूळच्या लेणीला भेट द्यायचं ठरवलं म्हणून बस डेपो पर्यंत रिक्षा करून वेरूळच्या दिशेने जाणारी बस पकडली. वेरूळची गर्दी पाहून आधी जेवण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच तिथे १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरची पाटी वाचली म्हणून आधी देवळात जाऊन दर्शन घेतलं मग वेरूळच्या लेणीत प्रवेश केला.
             गर्दी असल्याने हवा तसा आनंद घेऊ शकलो नाही म्हणून थोडेफार फोटो घेऊन चारच्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागलो.
            आमचे स्नेही रावकाका औरंगाबाद शहरात असल्याने संध्याकाळी त्यांच्याकडे येतो असा त्यांना शब्द दिल्याने संध्याकाळी त्यांच्याकडे भेट देण्यास गेलो. रात्रीच्या जेवणाचा आस्वाद त्यांच्याकडेच घेतला. दिवसभराच्या उन्हात फिरल्यानंतर मिळालेलं केळीच्या पानावरचं जेवण म्हणजे अमृततुल्यच होतं.
 रात्रीचे भोजन 
              परतीची गाडी साडेनऊची असल्याने आम्ही साडेआठच्या सुमारास त्यांचा निरोप घेऊन थेट स्टेशन गाठलं. कधी एकदा ट्रेन पकडून झोपतो असं झालेलं. बरोबर साडेनऊची ट्रेन पकडून सकाळी साडेचार वाजता घरी पोचलो. एक दिवसात अचानक ठरलेला हा औरंगाबाद दौरा सदैव स्मरणात राहील आणि ह्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे सागरिका वहिनींना.

Finally THANK YOU SAGARIKA VAHINI🙏🙏🙏.