Tuesday, 27 June 2017

निसर्गाची पुण्याई , किल्ले सोंडाई (SONDAI)


       एक रविवार घरी बसून झाल्यावर येणाऱ्या रविवार सोमवारची लागून सुट्टी पाहिली आणि बऱ्याच योजना मनात आल्या अगदी राजगड ठरवलेला पण शेवटी विचार सोंडाई वर येऊन थांबला
       माझं आणि अजय च जवळजवळ बुधवारी ठरलं की सोंडाई ला जायचं शनिवार पर्यंत पावसाचा एक थेंब नव्हता पण शनिवार रात्री अचानक आभाळ फटल्यासारखा पाऊस पडला रात्रभर गडगडाट सुरू होता म्हणून सकाळी उठून सगळ्यात प्रथम TV लावून पाहिलं गाड्यांची काय परिस्थिती आहे. गाड्या उशिराने चालत होत्या पण होत्या ते बघून जरा बरं वाटलं. पटापट सगळी तयारी केली आणि बॅग खांद्याला लावून स्टेशन गाठलं ८.०२ ची कर्जत लोकल पकडून ९. च्या सुमारास कर्जत गाठलं सगळ्यात आधी नाश्ता केला आणि टमटम पकडायला गेलो तेव्हा कळलं की वाटेत एक झाड पडलय त्यामुळे त्यापुढे गाडी जाऊ शकत नाही. बराच वेळ चर्चा केल्यावर एक गोष्टीवर एकमत झालं की जिथपर्यंत गाडी जाऊ शकते तिथपर्यंत जावं पुढचं पुढे बघू माझ्या मते तरी ट्रेकर ने असच असावं तेव्हाच त्याची निर्णयक्षमता ओळखता येते. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि गप्पा मारत असताना अचानक समोरून बऱ्याच गाड्या यायला सुरुवात झाली तेव्हा आमचा ड्राइवर आम्हाला म्हणाला रस्ता चालू झाला वाटतं. आम्ही एकच जल्लोष केला. तेव्हा ओम शांती ओम चा Dialogue आठवला “अगर किसी  चीज़  को  दिल  से  चाहो  तो  सारी  कायनात  उसे  तुम  से  मिलाने  में  लग  जाती  है"


                 सोंडेवाडीतून दिसणारा सोंडाई

      मग गाडी थेट पायथ्याशी म्हणजे सोंडेवाडी पर्यंत पोहचली सुमारे १०.३० च्या सुमारास आम्ही पायथ्यापासून म्हणजेच सोंडेवाडीपासून प्रवासाला सुरुवात केली. गप्पा मारत मारत आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो जिथे रस्ता चारी बाजूला जात होता. तेव्हा आम्ही सगळेच विचारात पडलो की नक्की गडाची वाट कोणती तेव्हा तिकडे एक अप्रतिम निशाण दिसलं. दगडांनी बनवलेलं एक बाणाचे निशाण होतं ते पाहून आमचा कोणाचाच मोह आवरला नाही म्हणून आम्ही फोटो काढले आणि तेव्हा आमची दोन मिनिटं अशी चर्चा पण झाली की ज्यांनी हा दिशादर्शक बनवला असेल तो स्वतः नक्कीच चुकला असणार वाट पण त्या व्यक्तीचे खूप खूप आभार ज्याच्या मनात हा पण विचार आला की आपण चुकलो आहोत पण ह्यापुढे कोणी चुकू नये. अशी चर्चा करत च आम्ही पुढची वाटचाल चालू ठेवली.

                               दिशादर्शक
      सुमारे अर्ध्यावर पोहचल्यावर खाली सोंडेवाडी गाव, वर सोंडाई व आजूबाजूला चारी बाजूला हिरवळ. गेले चार महिने उन्हाचे चटके सोसत पहिल्याच पावसात ह्या पर्वत राजाने हिरवा शालू पांघरला होता. हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद करून आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दोन शिड्या नजरेस पडल्या तेव्हा आम्हाला कळलं की जवळपास आम्ही पोचलो आहोत शिड्यांवर गर्दी असल्यामुळे आम्ही थोडावेळ तिथेच थांबायचं ठरवलं आजूबाजूला सगळीकडे ढग होते म्हणून आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता पण थोड्याच वेळात पाऊस थांबून ढगांची हालचाल झाली आणि अचानक लोकमान्य टिळकांच्या टोपीसारखं काहीतरी नजरेस पडलं अजून थोडे ढग बाजूला झाल्यावर समजलं जे दिसत होतं ते दुसरं तिसरं काही नसून तो होता "इर्षाळगड" खरंतर ते पाहून मन भरत नव्हतं दोन दिवस सुट्टी असल्याने एकदा मनात विचार ला सुद्धा की दुसऱ्यादिवशी लागूनच इर्षाळगड केला तर!!! पण मग मनाला आवर घालून आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायचं ठरवलं.



         सोंडाई वरून दिसणारा "इर्षाळगड"
        १० मिनिटं वेळ घालवून शिडीपर्यंत पोचलो शिडी सुस्थितीत असल्याकारणाने घाबरण्याचं कोणतही कारण नाही ५ मिनिटात शिडी चालून आम्ही गडावर पोचलो शिडी चढल्यावर उजव्या बाजूला बारमाही पाण्याचं टाकं आणि  त्याला लागूनच बाजूला एक गुहा आहे पावसाळा सोडला तर इतर वेळी त्या गुहेचा वापर राहण्यासाठी करता येऊ शकतो

                     बारमाही पाण्याचे टाके
      सुमारे १२.३० च्या सुमारास आम्ही गडावर होतो वरून दिसणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होतं सोंडाई च्या उजव्या बाजूस माथेरान, समोर इर्षाळगड, त्यामागे प्रबळगड स्पष्ट दिसतो. किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामूळे अल्हाददायक आहे. गडावर सोंडाई मातेचं देऊळ आहे बंदीस्त नसलं तरी बरेच पाषाण गडावर आजही सुस्थितीत दिसतात
                      गडावरील देवाच्या मूर्ती      

           गडावर पोचलो तेव्हा पाऊस नसल्याकारणाने लगेच जेवायचं ठरवलं प्रत्येकाच्या बॅग हळू हळू रिकाम्या होत होत्या पोटभर अन्नग्रहण केल्यावर सुमारे १.३० च्या सुमारास आम्ही परतीच्या वाटेला लागलो. ३ वाजता गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर कोणतीही गाडी मिळेपर्यंत चालत जायचं ठरवलं पण नशीबाची साथ असल्याने आम्हाला येताना गावातलीच एक गाडी कर्जत स्टेशनपर्यंत मिळाली ४.१५ ला कर्जत स्टेशनवर पोहोचलो मग चहा वगैरे घेऊन ४.४३ ची गाडी पकडून घरच्या वाटेला लागलो,
असंच एक दिवसात न थकता छोटा पण मस्त ट्रेक झाला
पुन्हा लवकरच भेटूत......


सोंडाई

Sunday, 18 June 2017

खूप कसोट्या पार करून गाठलेला "पारगड" (PARGAD)

      ह्या वेळच्या कोंकण दौऱ्यात मी आणि माझी ट्रेकिंग पार्टनर अश्विनीने कोकणातले ट्रेक किंवा जंगल फिरण्याच ठरवलं होतं त्याप्रमाणे भेकुर्ली नावाच्या गावात गेल्यावर समोर एक गड दिसला तिकडच्या लोकांना विचारल्यावर कळलं की त्या गडाचं नाव "पारगड"

मोरले गावातून दिसणारा पारगड

          मग तिकडे जायची तळमळ चालू झाली इकडून तिकडून माहिती काढून पायथ्याचे गाव वगैरे चौकशी करूननिघायची योजना आखली पण कोणी माहितगार नसल्यामुळे आधी थोडी भीती होती कारण मुंबईतली जंगले आणि कोकणातली ह्यात बराच फरक आहे पण तरीही हिंमत एकवटून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचा धाडसी निर्णय घेतला.
         सकाळी ७.५० च्या सुमारास घरातून निघालो वाटेत मोराचं सुंदर दर्शन झालं तिकडेच कळलं दिवस भारीच असणार. तसाच प्रवास चालू ठेऊन दोडामार्ग बेडशी मार्गे मोरले ह्या गावात पोचलो गावकऱ्यांशी थोडी चर्चा करून वाटेचा अंदाज घेतला आणि सुमारे ९.१५ च्या सुमारास चालायला सुरुवात केली
मोरले गावातील देऊळ


राष्ट्रीय पक्षी मोर
       गावातल्या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट थेट पारगडावर जाते सुरुवातीला सोपी वाटणारी ही वाट लगेचच ६०-७० अंशाच्या कोनात चढाई ला सुरवात करायला लावते. पाऊस असेल तर चढताना काही वाटणार नाही पण पाऊस नसल्याकारणाने आम्ही जवळपास घामाने भिजलो होतो आत्ता येईल आत्ता येईल म्हणता म्हणता २ तास झाले तरी ना गड दिसत होता ना कोणी माणूस. पूर्ण जंगलात फक्त पक्षांचे आवाज आणि आजूबाजूला फिरणारी फुलपाखरे ह्या सगळ्यांचे फोटो काढत काढत आमची चढाई सुरू होती 



         मध्येच एक छोटीशी नदी लागली मग तिकडेच थोडा वेळ विसावा घ्यायचं ठरवलं थोडेसे फ्रेश झालो आणि परत पुढच्या वाटचाली ला सुरुवात केली. एव्हाना आम्ही आमच्या अंदाजानुसार बऱ्यापैकी वर पोचलो होतो तेव्हा आम्हाला त्या जंगलात एक माणूस दिसला तो लाकडं तोडायला आला होता. आम्हाला बरं वाटलं मग त्यांना आम्ही विचारलं की काका अजून पारगड किती लांब आहे तर त्यांचं उत्तर ऐकून आम्ही हैराण होतो ते म्हणाले "हे काय आलाच की पारगड इथून पुढे थोडी पाऊलवाट आहे, ती चाललात की पुढे एक डांबरी रस्ता लागेल, ती पार केली की मग पायऱ्या लागतील, त्या पायऱ्यांनी तुम्ही गडावर पोहोचाल म्हणजे खरा ट्रेक हा तेव्हाच असतो जेव्हा आपल्याला वाटत असतं आपण पोचलो पण तेव्हा आपल्याला कळतं की अर्ध चढायचं बाकी आहे. 

          तेव्हाच माझ्या मनात विचार आला की,पारगड पर्यंत पोचण्यासाठी मातीचा रस्ता, जंगलवाट, नदी, डांबरी रस्ता इतकं सगळं "पार" करून जावं लागतं कदाचित म्हणून च त्याला "पारगड" म्हणत असावे

      त्या काकांशी गप्पा मारत मारत आम्ही डांबरी रस्त्यापर्यंत पोचलो मग सुमारे अर्धा तास त्या डांबरी रस्त्यावरून चालून आम्ही परगडाच्या पायऱ्यापक्षी पोचलो पारगड हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात येतो म्हणजे तसं पाहायला गेलं तर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला होता हे आम्हाला तिकडे गेल्यावरच कळलं. वाटेवर असणारे ऐतिहासिक फलक वाचत आम्ही गडावर पोचलो वाटेत एक हनुमानाचे मंदिर आहे व त्याच बाजूला त्याकाळच्या काही तोफांचे अवशेष आहेत . 
        हनुमान मंदिर व १६ व्या शतकातील तोफांचे अवशेष
       भरपूर भूक लागल्याने आधी जेवणाची ऑर्डर द्यायचं ठरवलं जेवणाची ऑर्डर दिली आणि पुढे चालत असता डाव्या बाजूला शिवाजी महाराजांची एक अप्रतिम उभी च्या उभी मूर्ती आहे आजपर्यंत महाराजांचे अश्वारूढ पुतळे बरेच पाहिलेले पण ह्या पुतळ्याला तोड नाही तिथेच महाराजांना मुजरा करून पुढे वाटचाल चालू ठेवली. 
     शिवाजी महाराजांचा अप्रतिम पुतळा
     तिथून १०० पाऊले पुढे जाताच पुढे भवानी मातेचं एक भव्य असं मंदिर आहे आणि माझ्या मते ह्या मंदिराची हीच योग्य जागा आहे कारण आजपर्यंत मी देवळात फक्त देवाच्या मुर्त्या पहिल्या आहेत पण हे मी असं पाहिलं देऊळ पाहिलंय जिथे जिजाऊंपासून ते त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांपर्यंत सगळ्यांच्या मुर्त्या आहेत म्हणजे ते पाहून आपण खरच १६ व्या शतकात प्रवेश केल्यासारखं वाटतं.  देवळात दर्शन घेत असताच बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली थोडा वेळ मंदिरात पाऊस कमी व्हायची वाट बघून नंतर आम्ही बाहेर पडलो हवेत मस्त गारवा आला होता 
      भवानी मातेच आकर्षक मंदिर

        तेव्हाच आम्हाला उंचीचा अंदाज आला आता वेळ होती आजूबाजूचा गड फिरायची. चारही बाजूनी गड फिरलो निसर्गाची शांतता अनुभवली गडाबद्दल चे ऐतिहासिक फलक वाचल्यावर कळलं की पारगड, गंधर्वगड, कलनिधींगड, महिपालगड,वल्लभगड, सामानगड असे बरेच गड स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारले होते 
       पारगड तसा छोटा असल्याकारणाने आजूबाजूचा निसर्ग अनुभवून आम्ही  जेवायच्या ठिकाणी आलो तोपर्यंत सुमारे अडीच वाजले होते आम्ही पोटभर जेऊन सुमारे साडेतीन च्या सुमारास खाली उतरायला सुरुवात केली आणि जी वाट चढायला आम्हाला सकाळी ३ तास लागलेले तीच वाट उतरायला आम्हाला फक्त १ तास लागला. आम्ही बरोबर ४.४५ ला पुन्हा गडाच्या पायथ्याजवळील देवळाकडे होतो खरंतर आम्ही इतक्या लवकर खाली आलो ह्या गोष्टीवर आमचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. खाली येऊन आम्ही एकमेकांना दाखवत होतो की एक तासापूर्वी आपण तिकडे होतो



परगडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य

पुन्हा कधी ह्या परिसरात फिरायची वेळ आली तर नवीन गडांची माहिती मिळालीच आहे तेव्हा त्यांना नक्की भेट देऊ तो पर्यंत Good bye.....
लवकरच भेटूत........
परतीचा प्रवास