Sunday, 20 May 2018

किल्ले तळगड व कुडा लेणी (TALGAD FORT)

       उन्हाळ्यामुळे बरेच दिवस कुठेही जायचा काही प्लॅन केला नव्हता  पण मग होळी धूलिवंदन शनिवार आणि  रविवार असा LONG WEEKEND येताना दिसला मग म्हंटल काहीतरी प्लॅन करायला हवा.  माझा भाऊ अजय दादा बऱ्याचदिवसापासून म्हणत होता आपण वाहिनीच्या घरी जाऊ. म्हंटलं हि योग्य वेळ आहे. कारण मी आजपर्यंत कोकणातली होळी कधी पहिलीच नव्हती सोबतच "तळगड" पण बघायचा होता आणि राहायला नेहा वहिनींचे घर होते त्यामुळे काहीच त्रास  नव्हता. गाडी घेऊन जायचे ठरल्याने वेळेचं बंधन नव्हतं

 किल्ले तळगड 
        होळीला सुट्टी नसल्याकारणाने मी ऑफिसमधून लवकर निघालो थेट बदलापूर ला आलो. एव्हाना साडेतीन वाजले होते. खरंतर पहिले आमचा विचार पनवेलला भेटायचा होता. पण बरं झालं दादाच्या घरी आलो. त्यामुळे मला पुरणपोळीचा आस्वाद घेता आला. हे पाहिलं वर्ष असेल कि मला पुरणपोळी मिळण्यासाठी इतका त्रास झाला असेल पण ते म्हणतात "ना दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम" तसेच काहीसे झाले. त्या पुरणपोळीसाठी नेहा वहिनी आणि कीर्ती वाहिनी तुमचे खूप खूप आभार. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
       सुमारे ४ वाजता आम्ही घरून निघालो आणि कर्जत वाकण मार्गे आम्ही सुमारे ७.३० वाजता तळं ह्या गावी पोहोचलो. दुर्ग वाटेच्या भाषेत सांगायचं झालं तर चंदेरी, नाखिंड  माथेरान,  इर्शाळगड ह्यांना मागे टाकत आम्ही घरी पोचलो.  इतर वेळी ट्रेन ने जायचं असल्यास कोकण रेल्वे पकडून इंदापूर ला उतरून इंदापूर वरून टाळ्याला जायला बस मिळते किंवा SHARE AUTO मिळते

       घरी पोहोचल्यावर थोडासा चहा नाश्ता करून गावची होळी बघायला बाहेर पडलो. आपल्या मुंबईत म्हणायला गेलं तर ४ लाकडं गोळा केली पेटवली कि ती होळी होते. पण गावाला मोजक्याच आणि भव्य होळ्या असतात त्याचा प्रत्यय तिकडे गेल्यावरच आला. ती होळी पाहून मी खरंच आश्चर्यचकित झालो मला असं वाटलं  आमच्या मुंबईत वर्गणी गोळा करण्यासाठीच होळ्या करत असतील. गावची एकत्र जमलेली लोक पाहून खरचं  सार्वजनिक सणांचं महत्व कळलं. ते सगळं पाहून घरी आलो पोटभर जेवलो.

 गावची होळी 
      दुसऱ्यादिवशी लवकर उठलो चहा नास्ता केला आणि मी अजयदादा तन्मय दादा आणि छोटी रिया तळगडावर जायला निघालो घरापासून ५ मिनिट अंतरावर तळगडाचे प्रवेशद्वार असल्यामुळे चालतच जायला निघालो. सुरवातीची १० मिनिटाची असलेली वाट फक्त रानावनांची होती. पुढे व्यवस्थित पाऊलवाट होती.  तिथेच किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागला तो म्हणजे हनुमान दरवाजा.
 हनुमान दरवाजा 
        या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात मारुतीची सुंदर कोरलेली मूर्ती व खाली पाण्याचे विस्तृत टाके नजरेस पडले . मी तर थेट त्या टाक्यांमध्ये जाऊन पहिले कि काय त्या वेळची योजना होती
  
      पाण्याचे टाके  
      सुमारे २० मिनिट चालल्यावर गडाच्या बरोबर मध्यभागी पोहोचलो तिथे ३ तोफा शत्रुसैन्याच्या येणाच्या दिशेने तोंड करून ठेवल्या होत्या. तिथून  पूर्ण गावाचा नजारा दृष्टीस पडला.
   
   
         धूलिवंदन असल्याने गावाच्या रस्त्यावर जागोजागी गुलाल दिसत होता तिथे संपूर्ण गाव एका दृष्टीक्षेपात भरून आम्ही पुढील चढाईस सुरुवात केली. पुढे बालेकिल्ला स्पष्ट दिसत होता व तिथे पोहोचण्यास असणारी पायवाट.

        गडाची तटबंदी 
         त्या पायवाटेने जाऊन सुमारे १० मिनिटातच आम्ही बालेकिल्याबर पोहोचलो चढण्यास सोपा असला तरी ह्याचा विस्तार बराच मोठा आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी अजूनही शाबूत आहे. अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितित आढळतात.  वर पोचल्यावर नेहमीप्रमाणे समोर एक शंकराचे देऊळ दिसलं
       शंकराचे देऊळ 
       कोणत्याही गडावर शंकर, हनुमान नाहीतर गणपतीचे मंदिर असतेच.  त्याचे दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा भाग न्याहाळण्यास सुरुवात केली. थोड्याच अंतरावर पाण्याची खोदलेली सात टाकी दिसली.

    सात टाके  
     पुढे दक्षिणेकडे चालत गेल्यावर बुरुज आहे गडाचा वापर हा मुख्यत्वेकरून टेहळणीसाठीच केला जात असावा त्यामुळॆ आम्ही सुद्धा तेच केलं . आमच्या सोबत आलेल्या  रियाची आम्ही लोकांनी शाळा घेतली तिच्याकडून काही श्लोक म्हणून घेतले.
 गडाचा संपूर्ण परिसर 360 DEGREE VIEW

      सुमारे १५-२० मिनिट त्या बुरुजावर गप्पा टप्पा मारल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळला व पुन्हा परतीचा वाटेने निघालो. एव्हाना धूलिवंदनसाठी गावची मुले जमा झाली होती त्यामुळे आम्ही सुद्धा मजा मस्ती केली.

       दुपारी वहिनींच्या आईच्या हातच स्वादिष्ट जेवण जेवलो सोबतच एक पिढी मागे म्हणजे वहिनींच्या आजीशी गप्पा मारल्या मला आजपर्यंत आवडलेल्या आजींमध्ये त्या सगळ्यात प्रेमळ आजी. आपल्या शब्दात सांगायचं झालं तर "लई भारी" त्यामुळे बऱ्याच वर्षाने का ना होईना आजीच्या प्रेमाचा आनंद घेतला. त्या आठवणी मनात नेहमी घर राहतील.

            पुढे दुपारी थोडा आराम केला व ऊन कमी झाल्यावर तळं ह्या गावापासून सुमारे १३ किमी असणाऱ्या कुडा लेणी ला भेट द्यायला निघालो. ४ वाजताच्या सुमारास गाड्या घेऊन आम्ही कुडा लेणीच्या दिशने निघालो आडवाटेला असणारी हि लेणी भव्य आणि विस्तृत आहे. 

 कुडा लेणी 
     २००० वर्षांपूर्वी बांधलेल्या ह्या लेणीमध्ये सुमारे १५०० वर्षापूर्वीचे कोरीवकाम आहे. एकूण २२ गुहा असलेल्या ह्या लेणी मध्ये एका लेणीच्या बाहेरील बाजूस एक हत्ती व आत बुद्धांच्या मूर्ती आहेत व डाव्या बाजूस काही मजकूर कोरलेला आहे. त्यात आतील वास्तूंचे वर्णन केलेले आहे.

ब्राम्ही भाषेतील बाहेरील मजकूर 
         डाव्या कोपर्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीच्या जीवनातील आकृत्या आणि स्त्रिया आल्या आहेत. हा मनुष्य एक जड पगडी वापरतो. आणि त्याचा डावा हात धारण करतो त्याने कंबरपर्यत कोणतीही आच्छादने वापरली नाही परंतु त्याच्या हातात लांब, जड, नळीच्या आकाराचा ब्रेसलेट आहे;  बाजूला उभ्या असणाऱ्या स्त्रीने बटूच्या डोक्यावर एक हात ठेवला आहे, जो तिच्या डाव्या बाजूने गुडघे टेकून जड पादुकोण समायोजित करत आहे.
      उजव्या बाजूस कमळावर बसलेले काही बुद्ध, पाय खाली ठेवलेले आहेत  त्यांच्या पत्नींबरोबर आणि त्यांच्यापाठोपाठ अनेक महिला उपासक आहेत. हि सर्व दिलेले माहिती म्हणजेच ब्राम्ही लिपीतून मराठीत केलेलं भाषांतर हे माझा मित्र डॉ अजय प्रधान ह्यांच्याकडून प्राप्त झाली आहे त्यामुळे मलाही ह्या लेणीचा इतिहास जाण्यात मजा आली त्यामुळे त्याचे आभार.


            फोटोग्राफी करून परतलो रात्री  दादाच्या मदतीने गावची स्पेशल पोफ़टी बनवली.मी प्रथमच त्याचा आस्वाद घेतलेला अप्रतिम चव. पुन्हा कधी कोणी काय करायचं असं विचारल्यास माझा सगळ्यात आधी उत्तर असेल पोफ़टी. बस आता पोटपूजा झाली होती त्यामुळे त्या शांत वातावरणात झोपी गेलो
 घरी परतत असतानाचा सूर्यास्त 
          दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालो. असा हा २ दिवसाचा धमाल प्रवास, गावची आठवण आणि मायेची साठवण नेहमी स्मरणात राहील. बाकी सर्वांचे आभार ज्यामुळे माझा हा प्रवास मस्त झाला अजयदादा,  नेहा वाहिनी,  आई, आजी आणि  दादा , पुन्हा कधी आलो तरी हक्कानेच येईन आता तळसुद्धा आपलच आहे.
वाचकांनी सुद्धा कधी ह्या भागात गेल्यास तळगड आणि सोबतच कुडा लेणी ला नक्की भेट द्या मन नक्कीच प्रसन्न होईल. धन्यवाद.....
तळ्यातलं तळ

Sunday, 6 May 2018

किल्ले पेमगिरी व जवळील काही आकर्षक स्थळे (PEMGIRI FORT)

              मे महिन्याचे रणरणते ऊन त्यात जिवलग मित्राचं लग्न त्यामुळे जाणं भाग होतं म्हणून मी आणि माझा मित्र श्रीधर दोघे जण प्रवासाला लागलो.  शनिवारी पहाटे ५ वाजताच आपली 56 नंबर काढली आणि गावच्या दिशेने रवाना झालो. सूर्योदयाच्या आत बऱ्यापैकी अंतर कापायचे असं उद्धिष्ट डोक्यात होत व त्यादृष्टीने वाटचाल चालू होती. बारवी डॅममार्गे गेल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग खुणावत होता थोडं पुढे गेल्यावर वाटेत धुक्यात लपलेल्या नाणेघाटाच दर्शन झालं.
 धुक्यात लपलेला नाणेघाट 
            थोडावेळ तिकडे वेळ घालवून पुढे गेलो. माळशेज घाटात पोहचे पर्यंत साडेसहाच वाजले होते त्यामुळे बऱ्यापैकी गारवा होता सगळीकडे धुकं होतं. त्या गारव्याची मजा घेतली कारण इतक्या गर्मीच्या हवामानात वाजणारी थंडी अनपेक्षित होती त्यामुळे गाडी एका बाजूला लावून १० मिनिट विश्रांती घेतली पण उन्हाचा तडाखा लागायच्या आत निघायचा निर्णय घेतला 
माळशेज घाट आणि  आपली ५६ नंबर 
            मित्राचं लग्न होतं म्हणून इतका प्रवास पण फक्त जाऊन लग्न लावून येणं स्वतःलाच नामंजूर. त्यामुळे तिथे जवळच असलेल्या मित्राच्या घरी राहून आजूबाजूची ठिकाणे पाहायचा निर्णय घेतला. उन्हाचा तडाखा असल्याने जे काही करायचे ते दुपारनंतर आणि सकाळी लवकर. पण ह्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा गावातील सौंदर्य कधीच कात टाकत नाही पुढील दृश्यं त्याचाच एक नमुना.  
 गावचा साज 
            पेमगिरी हे गाव जरी छोटे असले तरी तिथली आकर्षण खरंच खूप दर्शनीय आहेत. त्यातील पाहिलं म्हणजे किल्ले "पेमगिरी उर्फ शहागड". दुसरं आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष, तिसरं अहिल्याबाई होळकरांच्या काळातील म्हणजेच १६४२ च्या काळातील बारव म्हणजेच "विहीर" आणि शेवटचं म्हणजे स्वतंत्र पूर्व काळातील हनुमान मंदिर.
 किल्ले पेमगिरी    
            उन्हापासून वाचण्यासाठी म्हणून पाहिल्याच दिवशी संध्याकाळी पेमगिरी किल्यावर प्रस्थान केले. आता पेमगिरी किल्ल्यावर वरपर्यंत जाण्यास पक्का डांबरी रस्ता झाल्याने गाडी थेट गडावर जाते. त्यामुळे आम्ही थेट गाडीने वरपर्यंत गेलो. गाडी असल्याने गडावर जास्त वेळ मिळाला. पेमगिरी उर्फ शहागड छोटेखानी असला तरी ह्याचा इतिहास अतिशय रोमांचक आहे. इ स १६३२ चा दिल्लीचा मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा ह्या दोन्ही सत्तांनी मिळून निजामशाही संपवली. त्यावेळी मूर्तजा ह्या अल्पवयीन असलेला निजामशाहीच्या वरसदाराला गादीवर बसवून मराठी सुभेदार शहाजी राजे भोसले ह्यांनी शहागडावरून ३ वर्ष राज्यकारभार चालवला. आत्ता ह्या गडावर यादवकालीन पाण्याची टाकी आणि पेमादेवीचे मंदिर अस्तित्वात आहे.

पेमादेवीचे देऊळ
बाळंतिणीचे टाके
             पुरातत्व खात्याने जसं वरपर्यंत पोहोचण्यास रस्ता केला आहे तसेच येणाऱ्या पर्यटकांना बसण्याची योग्य ती व्यवस्था केली आहे. असेही एव्हाना साडेसहा वाजलेच होते म्हणून सूर्यास्त बघूनच खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
 पर्यटकांसाठी केलेली व्यवस्था 
 पेमगिरीवरील सूर्यास्त 
  360 DEGREE VIEW
           सूर्यास्ताचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. पण पुन्हा एकदा दुसऱ्यादिवशी सकाळी येण्याच्या विचाराने खाली उतरलो.
           खाली उतरल्यावर दुसरं आकर्षण नजरेस पडलं ते म्हणजे १९४२ सालचे "हनुमान मंदिर". हे मंदिर पूर्ण सागाच्या लाकडाचे असुन मागील वर्षी ह्या मंदिरास रंगाचा मुलामा देऊन ह्या मंदिरास नावसंजीवनी प्राप्त झाली आहे.अनायसे शनिवार असल्यामुळे अनपेक्षितपणे मिळालेले हे हनुमानाचे दर्शन संस्मरणीय ठरले. गावातच आमच्या ओळखीचे "जगदीशदादा डुबे" राहतात त्यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम झाला व त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं काही दिवसात ह्या मंदिरात 22 फूट उंच गदेची प्रतिष्ठापना होणार आहे. ती बघायला परत एकदा पेमगिरी गावात भेट द्यायला मी नक्की जाईन आणि आपणसुद्धा कधी पेमगिरी गावात गेलात तर न विसरता ह्या मंदिरास भेट द्यावी. मंदिरात पेमगिरी गावच्या आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो आहेत ते पाहिल्यावर कळलं की इकडे एक १६व्या शतकातील बारव (विहीर) आहे. तेव्हा ठरवलं उद्या सकाळी लवकर उठून प्रथम गडावर जायचं आणि नंतर ही बारव बघायची.

 १९४२ सालचे हनुमान मंदिर
 
 जय हनुमान
               एव्हाना साडेसात वाजल्यामुळे आम्ही थेट घरच्या वाटेला लागलो संध्याकाळ असल्याने हवेत गारवा होता. रात्री आम्ही चार मित्र मी , श्रीधर, आमचा मित्र "राहुल बोरसे उर्फ गणू" आणि आमच्या ग्रुप चे जेष्ठ प्रवचनकर्ते  "विजय राऊत" ह्यांच्या साथीने आमच्या गप्पांचा फड रंगला. विजय बाबांचे मोलाचे सल्ले ऐकून रात्री आम्ही उशिरा झोपलो व दुसऱ्यादिवशी सकाळी साडेपाचच्या सुमारास उठून पुन्हा गडाच्या दिशेने निघालो सूर्योदयाची वेळ होती.
गडावरील सूर्योदय
              गाडी थेट गडावर नेऊन सूर्योदय कॅमेरात टिपला व थोड्या वेळ त्या शांततेचा आनंद घेतला आणि आमच्या पूर्वनियोजित ठिकाणाकडे वाटचाल सुरू केली. पूढील ठिकाण हे अतिशय लोकप्रिय होत ते म्हणजे "आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष".
अब तक ५६ . . .
             ह्या वटवृक्षाला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. सुमारे अडीच ते तीन एकरात पसरलेला हा वटवृक्ष एका नजरेत भरणे  तसे कठीणच. पण पेमगिरी गावापासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा अविष्कार असलेला हा महाकाय वटवृक्ष सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.
 महाकाय वटवृक्ष
            वडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी एक मूर्ती बसवलेली आहे. त्यामागे एक कथा आहे त्यामुर्ती मध्ये एक राजा त्याची बहीण एक वाघ व एक कुत्रा आहे.  गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलं तर असं कळत की "एकदा एक बाबा होता तो शेळ्या चरायला न्यायचा तेव्हा त्याची शेळी वाघाने पकडली म्हणून त्या बाबाने त्या वाघाला लालकरलं त्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला तेव्हा त्या बाबाने आपल्या हातातली कुऱ्हाड वाघाच्या डोक्यात घातली अशी त्यांची झटापट गडावरून खालपर्यंत येऊन थांबली तेव्हा सोबत असलेला कुत्रा त्या वाघाचे लचके तोडत होता संध्याकाळची वेळ असल्याने त्या बाबाची बहीण त्याला शोधत निघाली असता रक्ताच्या डागावरून ती वडापर्यंत येऊन पोचली व तिला दिसलं की भाऊ मृत्यमुखी पडला आहे तिला दुःख अनावर झालं आणि तिने हातातला पाण्याचा गढवा डोक्यात मारून स्वतः स्वतः प्राण सोडला" अशी कहाणी ह्या मूर्तीची. म्हणून आजही ह्या वडाखाली असलेल्या ह्या मूर्तीची लोक मनोभावे पूजा करतात. 
वटवृक्षाजवळील मूर्ती
             पुढील ऐतिहासिक आकर्षण म्हणजे १६४२ सालची अहिल्याबाई होळकरांच्या काळातील ऐतिहासिक बारव. आजच्या काळात ही विहीर खूप दुर्लक्षित झाली असली तरी आजही त्याचं अस्तित्व टिकून आहे. आज सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही ह्या विहिरींची अजिबात पडझड झालेली नाही काही प्रमाणात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे व कदाचित उन्हाळ्यामुळे पाणी आटलेलं असावं. पण खरंच पाहण्याजोगी हि विहीर आहे. 
 सन १६४२ सालची बारव 
            त्या विहिरीचे काही फोटो काढून आम्ही आता घरच्या दिशेला निघालो. एव्हाना ९ वाजले होते त्यामुळे सूर्यदेव आपल्या कामाला लागले होते. घरी जाऊन फ्रेश झालो माझ्या मित्राचा भाऊ "गणेशदादा गोपाळे" ह्याने आम्हाला नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं.  तिथे नाश्ता केला आणि त्यांच्या शेतात एक चक्कर मारली थोड्या गप्पा टप्पा झाल्या ताज्या टोमॅटोचा आस्वाद घेतला. शेतातील काही फोटो काढले व निघायच्या तयारीला लागलो .


 इतके ताजे खायची सवय नाही !!!
 कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही???
                सुमारे ४ च्या सुमारास उन्हाचा पारा कमी झाल्यावर आम्ही आपली बाईक घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालो मध्येच माळशेज घाटात उत्तम सूर्यास्ताचे दृश्य टिपलं. सुमारे ९ च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. 
 माळशेजवरून टिपलेले सूर्यास्ताचे दृश्य
             ब्लॉग वाचून कसं वाटलं ते कळवावे व कधीही पेमगिरी ह्या गावात गेल्यास वरील सर्व वास्तूंना नक्की भेट द्यावी, नवीन काहीतरी पहिल्याचे समाधान मिळेल एवढं नक्की.