Thursday, 21 June 2018

पुनःश्च गोरखगड (GORAKHGAD FORT)

            कितने भी तू कर ले सितम, हँस हँस के सहेंगे हम, ये प्यार ना होगा कम.... हे गाणं मला आवर्जून एका ट्रेक साठी वापरावस वाटतं ते म्हणजे "गोरखगड". कारण हा ट्रेक कितीही वेळा करा हा ट्रेक जितका थकवतो, जितका घाम काढतो, जितकी परीक्षा बघतो तितकाच तो आनंद ही देतो. त्यामुळे कितीही वेळा केला तरी ह्या ट्रेक ला नाही म्हणावसं वाटत नाही. हा ट्रेक करायची माझी चौथी वेळ. परंतु प्रत्येकवेळी नवीन कोणालातरी घेऊन जायची संधी मिळते. ह्यावेळी निमित्त होतं कॉलेजच्या मित्रांना घेऊन जायचं नुकतीच गोवा ट्रिप झालेली त्यातून बाहेर येतो ना येतो तोच ऊर्मिलाला रविवारी सुट्टी चालून आलेली. मग आधीच रविवारी सुट्टी त्यात पावसाळा मग काय उठा नि पळत सुटा. बिचाऱ्या सागरला आजारातून सावरू पण देत नाही तोच आम्ही आमचा प्लॅन तयार केला त्याचं म्हणणं होतं लांबचा ट्रेक नको जवळचाच हवा. मग म्हंटल ठीक आहे "गोरखगड" जवळच आहे. "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास". तिकडून आमचा फिटनेस मॅन सुमितसुद्धा म्हणाला मी पण तयार आहे अजून माझे तीन मित्र पण आहे म्हणजे ह्यावेळी ग्रुप मोठाच झाला.

         रविवारी सकाळी ७ ला भेटायचं ठरलं भेटेपर्यंत ८ वाजले तो भाग वेगळा पण काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण घरापासून जवळ असल्यामुळे पोहोचायची काळजी नव्हती. काहीजण नवीन असल्याने तोंडओळख करायच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे "हॉटेल गुरुप्रसाद" मध्ये चहा नाश्त्याचा बेत केला. हेल्मेटमधून तोंड बाहेर निघाल्यावर सगळ्यांचे खरे चेहरे दिसले. मी उर्मिला, सागर, सुमित आधीपासून ओळखत होतो त्यात अजून भर पडलेली आदित्य, राहुल आणि शुभमची. पहिल्या भेटीमध्येच कळलं होतं ह्यांच्याशी एकरूप व्हायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी तसेच झाले. हॉटेल पासून गडाच्या पायथ्यापर्यंत पोहचेपर्यंत आम्ही जवळपास मित्र झालोच होतो. सुमारे साडेदहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी होतो. गाडीला हेल्मेट टांगले आणि सरळ गडाची वाट धरली हॉटेलमध्येच गडाचा विडिओ दाखवल्याने थोडीशी भीती होती पण डर आगे जित है ना??? अश्या विचाराने सगळ्यांनी चालावयास सुरवात केली.


 गोरखगड 
        गडाच्या पायथ्याशी एक बस २-३ चारचाकी गाड्या पाहिल्या होत्या त्यामुळे वरच्या गर्दीचा थोडासा अंदाज आला होता पण आम्ही आमची चाल संथच ठेवली कारण जेवढं आरामात जाऊ तितकी गर्दी कमी असेल आणि आम्हाला परतण्याची काही घाई पण नव्हती. गप्पांच्या साथीने आमचा प्रवास चालू होता. पाऊस येण्याची आम्ही वाट बघत होतो कारण दीड तास गाडीवर बसून असं अचानक चालायला सुरुवात केल्यावर घाम येणं साहजिकच होतं. सुमारे १५-२० मिनिटे चालल्यावर गोरखगड समोर उभा ठाकला तेव्हा खरच कोणाला वाटत नव्हतं की आपल्याला त्याच्यावर जायचंय पण मनाशी चंग बांधला होता की जिथपर्यंत पोहचू तिथपर्यंत तर जायचंच पण इतिहास साक्षीदार आहे आजपर्यंत कोणताही ट्रेक अर्ध्यात सोडला नाहीये. गडाला पाठीशी घेऊन २ ४ फोटो काढले व मागून काही लोकांच्या चालीचा अंदाज घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. थोडं वर गेल्यावर गार वारा लागल्यावर उत्साह अजून वाढला.


वेडात मराठे वीर दौडले...... 
अचानक आलेला चालण्यातला वेग हा हवेमार्फत घेऊन आलेल्या शक्तीचा स्रोतच होता. तेवढ्यातच थोडासा पावसाचा शिडकावा झाला. त्याने आम्ही जरी भिजलो नसलो तरी त्याने आम्हाला धावपळ करायला नक्कीच भाग पाडलं. आता आमच्या डाव्या बाजूला गोरखगड आणि उजव्या बाजूला सिद्धगड होता. समोर एक पठार नजरेस पडलं सगळ्यांनी मिळून तिथे थोडावेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं. त्याच वेळी सगळ्यांनी सामान बागेत टाकलं पण काही काहींच लक्ष फक्त फोटोग्राफी कडे होतं. कारण समोर इतका लाखमोलाचा निसर्ग आणि त्यासमोर आपली दौलत ती काय??? सगळ्यांनी ग्रुपला सोबत घेऊन फोटो काढले. त्याच डोंगरदाऱ्यांमधून धुक्याची झालर फिरत होती.        
         नेत्रदीपक क्षण 
            नुकताच पाऊस झाल्याने बऱ्यापैकी हिरवळीला सुरुवात झालेली. सुमित, उर्मिला, सागर ह्यांनी मन भरून फोटो काढले त्यांचे मॉडेल फक्त बदलत होते कधी राहुल कधी शुभम तर कधी आदित्य. खरंतर समोर इतका हिरवागार निसर्ग. मनसोक्त हवा तिथून उठावस वाटत नव्हतं पण काय करणार "कही पे पहुचने के लिये कही से निकलना बहुत जरुरी होता है" असं म्हणून आम्ही सगळे तिथून निघालो. आता येणारा फक्त 5 मिनिटाचा रस्ताच फक्त समाधानकारक होता. पुढची वाटचाल कठीणच होती. पण अज्ञानात शहाणपण आहे म्हणतात ना तेच खरं त्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात. पुढच्या शिकस्तीचा कोणालाही अंदाज नव्हता म्हणून सगळे आरामात होते.
           त्या ५ मिनिटाच्या चालीनंतर आधी गोरक्षनाथ महाराजांची समाधी आली आणि डाव्याबाजूने सरळ ८० अंशाच्या कोनात वर जाणारी वाट. गडावर जाण्यासाठीचे २ च खडतर टप्पे आणि त्यात मी हा ट्रेक आधी केला असल्याने मलाच ह्याबद्दलची सत्यता माहिती होती पण ह्यांना सगळ्यांना काही सांगू की नको ह्याच विचारात मी होतो. पण न सांगता खूप काही साध्य करता येत होतं म्हणून पहिला टप्पा मोकळा होईपर्यंत आम्ही मध्यावरूनच वरच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. न येऊ शकलेल्या मित्राला म्हणजे ऋषीला विडिओ कॉल चालू झाले. त्यालासुद्धा घरीबसून गडाचं दर्शन दिलं.
 धुक्यात लपलेला सिद्धगड 
          रस्ता मोकळा झाल्यावर आम्ही शेवटी म्यान केलेल्या तलवारी बाहेर काढल्या व चढाईला सुरुवात केली. एकाला पुढे ठेऊन त्यामागे ऊर्मिलाला ठेवलं सुरक्षितरीत्या चढणं सध्या एवढच एक ध्येय होतं. खरं सांगायचं झालं तर काळजी उर्मिलाचीच होती. पण सागर आणि उर्मिलाच्या एकमेकांना चिडवण्यामुळे उर्मिलाने स्वतासाठीची ही लढत प्रतिष्ठेची करून घेतली होती. त्यामुळे घाबरत का ना होईना ती चढली. मी नाही मी नाही म्हणत शुभम सगळ्यात आधी वर जाऊन पोचला होता. त्याच्यामागे मी पोचलो मागून दबक्या पावलाने सुमित आला आणि त्यामागून राहुल आणि आदित्यने आपली बाजी मारली. आणि वरून खाली पाहिल्यावर सगळ्याच्या मनात एकाच प्रश्न होता तो म्हणजे खाली इथूनच उतरायचे आहे का??? आता काय बोलणार??? मी म्हणलं "हो" पण आधी वर जाऊ उतरायचं नंतर बघू.
 गडाच्या प्रवेशद्वाराकडे जाणारी खडतर वाट 
 चढतानाचा उत्साह 
         इतक्या वर गेल्यावर गडाचे अवशेष नजरेस पडले त्याचा आढावा घेतला गोरखगडावर एकूण ४ ते ५ पाण्याची टाके आहेत. त्यातील पिण्याजोगे फक्त एकच ते म्हणजे गुहेच्या बाजूचे जिथे राहायची सोय होऊ शकते आशा ठिकाणचे. 
        एव्हाना आम्ही गुहेपाशी पोचलो होतो मी खालीच सगळ्यांना म्हणलेलं की ज्याना वर पर्यंत यायला जमणार नाही त्यांनी गुहेजवळ थांबलं तरी चालेल पण हिम्मत  हारतील ती आपली गॅंग कसली??? उलट गुहेजवळ पोचल्यावर सगळे एकसुरात म्हणाले "आधी वर जाऊन येऊ मग खाली बसुत!!". मानलं राव गड्यांना. हेच खरे राज्यांचे मावळे!!!. त्यामुळे गुहेजवळून 2 मिनिटातच आम्ही वर जायच्या वाटेवर गेलो आणि समोरच दृश्य बघून सगळेच हडबडले. हाच तो दुसरा आणि शेवटचा टप्पा. सगळ्यांना प्रश्न पडला चढू शकूत का आपण??? कारण वरून येणारी गर्दी आमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करत होती.

        एक मुलगी तर उतरताना मम्मी मम्मी करत रडत उतरली. आम्ही आधी तिच्याकडे पाहिलं आणि मग उर्मिलाकडे पाहिलं म्हंटल उरम्या तुझं असं होता कामा नये!!! तरीही ती संकोचिंत दिसली मग एकच पर्याय होता ते म्हणजे Tattoo च आमिष. तिला म्हंटल तू वर पोच तुला Tattoo देतो. Tattooसाठी उरम्या एव्हरेस्ट पण चढेल तो गोरखगड काय?? त्यावरून पण सागराची चिडवचिडवी चालू झाली .  गडाकडे हात दाखवून सागर म्हणाला "ते बघा उरम्या तुझं Tattoo तिकडे आहे!!!" मग काय झाली ना तयारी.
 चढतानाची सागरची मेहनत आणि मागून फोटोसाठी आतुर झालेली उर्मिला 
          गर्दी कमी झाल्यावर आम्ही पुन्हा त्याच पद्धतीने चढायला सुरुवात केली. शुभम पुढे मी मागे मग उर्मिला, सागर आणि सुमित. मागून हळू हळू वाट काढत आणि स्वतःची वाट लागू न देता आदित्य आणि राहुल वरपर्यंत चढले. सरळ ८० अंशाच्या कोनात असलेली सगळ्यांसाठीची ही अनभिज्ञ चढाई खरच रोमांचकारी ठरली. वर पोहचेपर्यंत दीड वाजले होते.

मोहीम फत्ते  
 गोरखगडावरून दिसणारा मच्छिंद्रगड 
       आम्ही सगळ्यात आधी बॅगा रिकाम्या करायचे ठरवले. सगळ्यांनी सगळे खायचे पदार्थ बाहेर काढले हवे तसे खाल्ले. पोट भरले त्यानंतर चालू झाला फोटोग्राफीचा तास. सगळ्यांनी ह्या सर्वोच शिखरावर मनसोक्त फोटो काढले. भरपूर गप्पा, किस्से झाले. निघावस वाटत नव्हतं पण तरीही चढलोय म्हंटल्यावर उतरावं तर लागणारच ह्या विचारानेच उतरायला सुरुवात केली.
 उतरताना होणारी कसरत 
        एव्हाना पूर्ण गडावर फक्त आम्ही ७ जणच होतो त्यामुळे घाई कसलीच नव्हती. फक्त लक्षपूर्वक उतरण्याची गरज होती तसंच आम्ही एकमेकांना व्यवस्थित सांभाळत खाली उतरलो एव्हाना 3 वाजले होते त्यामुळे आम्ही गुहेत थोडा वेळ विश्रांती आणि शांतता अनुभवण्यासाठी थांबायचं विचार केला आणि आमच्याकडे वेळ ही खूप होता म्हणून आम्ही थांबलो. तिथेच सुमित ने स्वतःचा एक नृत्याविष्कार सादर केला. त्याचे फोटो काढून आता थेट खालच्या वाटेला लागलो.
 ग्रुप फोटो 
         आता मात्र सगळ्यांची चाल संथ झाली होती पण त्याने काही फरक ही पडणार नव्हता कारण वेळ भरपूर, गर्दी अजिबात नाही आणि स्वतःच्या गाड्या त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नव्हती. ५ वाजताच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो.
परतीच्या प्रवासाचे थकलेले चेहरे 
घनदाट जंगलात वसलेले गाव 
        एव्हाना सगळ्यांना कडाडून भूक लागली होती. मग काय आपल्या सगळ्यां मित्रांना बदलापूरच्या प्रसिद्ध मुळगावच्या वडापावची चव चाखायला दिली. मग काय सगळेच खुश. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड.
 मुळगाव चा प्रसिद्ध वडापाव 
       अगदी काहीही माहिती नसताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याबद्दल उर्मिला ,सागर, सुमित, शुभम, राहुल आणि आदित्य तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद... परत लवकरच भेटुत नवीन ठिकाणी त्याच जोशात आणि त्याच उत्साहात.... Good bye.....  
 PICTURE OF THE DAY.....

Friday, 15 June 2018

निसर्गतःच लाभलेला स्वर्ग - कामणदुर्ग (Kamandurg Fort)

        ह्या वर्षातला पहिला पावसाळी ट्रेक पण फक्त नावालाच. थोडासा पाऊस झाला म्हणून आम्ही ठरवलं की चला पावसाळी ट्रेक करूया. कुठे जायचे ते अजयवर सोडलं ह्यावेळी अजय ने वापरलेली भन्नाट ट्रिक खरंच भन्नाट ठरली. त्याने बोट ठेवेल त्या ठिकाणी जायचं असं ठरवलं आणि त्याच बोट चुकून की मुद्दाम देव जाणे पण ते ठेवलं गेलं ठाणे जिल्ह्यातील उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गडावर ते म्हणजे "कामणदुर्ग". मग काय आम्ही म्हणजे सलमान खान ना "मैं जो बोलता हू वो मै करता हू" ठरलं तर मग हा रविवार "कामणदुर्ग".
कामणदुर्ग
        सगळी तयारी झाली. मी एकटाच सेन्ट्रलचा असल्याने मलाच माहिती लवकर उठण्याचे दुःख काय असते ते??? पण असो सकाळी ४ ला उठून ४.४५ ला निघायला तयार. ट्रेक म्हणलं की उठायची काही चिंताच नसते खरंतर झोप लागण्यापासूनच सुरुवात असते जाग तर आपोआपच येते. कामणदुर्गला पोहचायचे म्हणजे प्रवास लांबच नसला तरी गाड्यांची अदलाबदल होती आणि मुळात ट्रेनची कमी म्हणून लवकर उठावं लागलं ४.५५ ची ट्रेन पकडून प्रथम कोपर गाठलं कारण कोपरला वेळेत पोहचणे महत्वाचे होते कोपर वरून कामन रोड स्टेशन ला जायला सकाळी एकच गाडी म्हणून तिथे बरोबर वेळेत पोहोचलो. सूर्योदयाची वेळ होती पाऊस फक्त हुलच देत होता. वाटलं चांगला पाऊस येईल पण पूर्ण निराशा त्यानेच केली पण असो आपण चांगलं काय ते बघावं.
         कोपर रेल्वे स्टेशन 
 कामणरोड रेल्वे स्टेशन 
           सकाळी ६.३० च्या सुमारास कामण रोड स्टेशन वर मी एकटाच उतरलो. स्टेशनवर भयाण शांतता माझे मित्र वसई वरून साडेसात पर्यंत येणार होते म्हणून मी हायवेला जाऊन रिक्षा शोधायचं ठरवलं तिथे गेलो पाहिले अर्धातास तर रिक्षा सोडा माणसं पण दिसत नव्हती. नंतर एक टमटम आली. त्यांच्याशी बोलून रिक्षा बुक केली मागून माझे मित्र आले. आम्ही सगळे रिक्षात बसून थेट गडाच्या पायथ्याचे गाव गाठले. गावचे नाव "देवकुंडी". मोजकीच लोकवस्ती असलेले हे गाव. गावात पोहोचेपर्यंत पावसाची पूर्ण आशा मावळली होती. तिथेच थोडासा अंदाज आला होता की आजची हालत काय होणार ते. वाट खडतर असल्यामुळे गावातच गाईड घेतला त्याच नाव महेंद्र. 

          त्याच्या पाठोपाठ आमचा प्रवास सुरु झाला सुमारे साडेआठ झाले होते. संपूर्ण जंगलवाटच होती आणि नुकताच पाऊस झाल्यामुळे बरंच काही पाहायला मिळेल असा अंदाज होता झालं तसंच सुरवातच सापाने झाली. त्याचा फोटो नाही काढता आला कारण 2 सेकंदाच्या आमच्या कटाक्षाच्या आतच तो कुठच्या कुठे निघून गेला त्याचा अंदाजसुद्धा बांधता नाही आला आम्हाला. पण पुढे जाण्यासाठीचा तेवढा उत्साह आमच्यासाठी पुरेसा होता. पुढे अनेक ठिकाणी झाडांना फुटलेले पालवी लक्ष वेधून घेत होती तर खालून बिनधास्त फिरणारे खेकडे लक्षपूर्वक चालण्याचा इशारा देत होते. सुरवातीची चढाई थोडी सोपी असल्याने आम्ही आजूबाजूच्या परिस्थिचा वेध घेत होतो पण पाऊस नसल्याने चालण्याचा वेग मंदावलेलाच होता. सुमारे एक तासाने आम्ही एका कातळावर येऊन थांबलो थोड्याश्या उंचीवर आल्याने तिथे येणारी एक क्षणाची झुळूकसुद्धा AC ची मजा देत होती म्हणून पाणी प्यायच्या निमित्ताने खाली बसलो प्रत्येक जण पाणी पिणार म्हणजे १० मिनिट तिकडेच गेले परत पुढचा प्रवास चालू केला

रानहळद
                 पुढचा प्रवास अजून घनदाट झाडीतून होता त्यामुळे अजून काहीतरी दिसेल ह्याची पूर्ण खात्री होती फक्त डोळे उघडे ठेवायचा अवकाश होता. समोरच केळीच्या पानावर दिलेली फुलपाखरांची अंडी दिसली. उजव्या बाजूला गोगलगाय शांततेत बसलेली दिसली. खाली पायाखाली लाल रंगाचे velvet mug नावाचे कीटक ये जा करताना दिसले. ह्या सगळ्यांच्या आडून आमची चढाई चालूच होती. फक्त इतकं काही पाहायला मिळतंय म्हणून थकवा तेवढा जाणवत नव्हता.

फुलपाखराची अंडी
  VELVET MUG
            एव्हाना २ तास झाले होते एका कातळावर शेवट आम्ही १० मिनिट विश्रांती घ्यायचं ठरवलं. समोर वसई नायगाव चा पट्टा डोळ्यासमोर दिसत होता म्हणजे आम्हाला कळून चुकलेल की आम्ही बऱ्यापैकी वर आलोय पण किती ते माहीत नव्हतं कारण गड अजूनही डोळ्यासमोर दिसत नव्हता. म्हणून आम्ही महेंद्र ला विचारलं की मित्रा अजून किती बाकी आहे तर तो बोलला अजून ४०% बाकी आहे. आणि ते उरलेले ४०% च १००% होते. कारण खरी चढाई पुढेच होती. मनाची तयारी दाखवून आम्ही पुन्हा जोमाने तयारी केली. सुमारे अर्धातास वर गेल्यावर गडाचे दर्शन झाले. ते झाल्यावर पण आम्ही त्याला विचारलं नक्की तिथेच जायचंय का??? कारण आम्ही जिथे होतो तिथून कामनदुर्ग आमच्या छातीच्या समोर उभा ठाकला होता.
 वसई नायगाव पट्टा 
         गडाचा इतिहास पाहता उल्हास नदीच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. १६८३ मध्ये संभाजीराजांनी पोर्तुगिजांकडून हा किल्ला जिंकला आणि नंतर १२ सप्टेंबर १६८५ रोजी ते पुन्हा जिंकले. किल्ल्यावरील पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे पोर्तुगीजांना किल्ल्याचा त्याग करावा लागला. १७३७ च्या पेशवे-पोर्तुगीज युद्ध दरम्यान, शंकरजी केशव यांनी किल्ले पुनर्वसित करण्यासाठी पेशवे यांना एक पत्र लिहिले कारण त्यांचे स्थान पोर्तुगीज भूमी जवळ अगदीच अचूक आहे आणि त्याचा उपयोग कल्याण-भिवंडी मार्गावर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. नंतर, दोन पाण्याची टाकी बांधण्यात आली आणि जुन्या सुव्यवस्थेची दुरुस्ती केली गेली ज्यामुळे पुनर्वसनसाठी हा किल्ला योग्य ठरला.
      पाण्याचे टाके
            पुढची चढाई भयंकर होती छोटीशी पाऊलवाट त्यात आम्ही ९ जण. एकापाठोपाठ एक असे आम्ही सातत्याने चालत होतो थोडं पुढे गेल्यावर एक रॉकपॅच आला तो चढताना सगळ्यांची कसरत झाली पण सगळ्यांनी शिताफीने तो पार केला व थेट गडावर पोहोचलो ह्या संपूर्ण ट्रेक मध्ये आमच्या सोबत एक कुत्रा पण होता त्याला मात्र मानलं कारण तो जाऊन येऊन पूर्ण वेळ आमच्या सोबत होता. त्याच नावसुद्धा आम्ही "शेरु" ठेवलं होतं.

सच्चा साथीदार - शेरू 
           गडावर पोहोचल्यावर भन्नाट वारा त्यातच आम्ही आमचे थकलेले जीव एका जागेवर बसून पोटपूजेची तयारी केली. सगळ्यांनी आपापले डबे काढले पोटभर जेवलो व पाऊस येण्याची आशंका होती म्हणून आधी सगळे रॉकपॅच उतरून पाण्याच्या टाक्यांजवळ आराम करायचा निर्णय घेतला. रॉकपॅच चढण्यापेक्षा उतरणं केव्हाही कठीण. त्यामुळे तेव्हाही कसरत झाली पण पाण्याचे टाके समोर आल्यावर आम्ही सगळे बॅग्स सोडून पाण्याच्या टाक्यात पाय सोडून बसलो कारण असेही ती टाके पिण्याजोगे नव्हती. गरमीमध्ये भिजवलेले ते पाय म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असेच होते.
  उतरताना करायला लागलेली कसरत
           बराच वेळ तिथे घालवून पुन्हा परतीला लागलो. उतरताना सुद्धा काळजी घ्यायची गरज होतीच बराच वेळ उतरल्यावर मागे बघितल्यावर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की आम्ही खरंच इतके वर होतो ह्यावर. ते यश डोक्यात ठेऊनच खाली उतरत होतो एव्हाना साडेतीनच वाजले होते त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता सगळे थकलेले असल्याने आम्ही पुन्हा त्याच कातळावर आराम करायचे ठरवले. सुमारे १५ मिनिटं शांत चित्ताने आम्ही पडून राहिलो. व पुन्हा आरामात खाली उतरायला सुरुवात केली एव्हाना  पुढच्या रविवारची चर्चा सुरु झाली होती.
      पावसाने दिला धोका मग काय बिनधास्त झोपा ... 
         पावणेपाचच्या सुमारास आम्ही पायथ्याशी होतो. घसा सुकल्यामुळे आम्ही महेंद्रला आधीच म्हणालो होतो की आधी पाणी आणि मग चहाची व्यवस्था कर मित्रा आणि तशीच त्याने केली सुद्धा. त्या ताईंने केलेला कोरा चहा हा कोणत्याही पंचतारांकित हॉटेल मधल्या चहापेक्षा भारी होता. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमचा रिक्षावाला खाली उभाच होता त्यामुळे आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. थकलेले शरीर पण सुखद क्षण आणि अप्रतिम आठवणी घेऊन सुमारे साडेसातच्या सुमारास मी घरी पोचलो.

काही महत्त्वाचे मुद्दे
१) गडावर जाण्यासाठी गाईड गरजेचाच आहे
२) किमान 2 लिटर तरी पाणी सोबत ठेवावे कारण गडाची चाल खूप  मोठी आहे.
३) गडावर जायला एकच रस्ता आहे. दिवा वसई मार्गावरील कामण रोड रेल्वे स्टेशन. स्वतःची गाडी असेल तर थेट कामण गाव गाठावे.
3) आम्ही शोधल्यावर आम्हाला ह्या गडाच्या आजूबाजूस कोणाचाही नंबर मिळाला नव्हता म्हणून 2 नंबर देत आहे
i ) टमटम - मुरलीधर पाटील - ९६७३७६६३४६
ii) गाईड - महेंद्र - ७०८३८६७९९५
निवांत  क्षण           
           
MAP LOCATION OF KAMANDURG