ह्या वर्षातला पहिला पावसाळी ट्रेक पण फक्त नावालाच. थोडासा पाऊस झाला म्हणून आम्ही ठरवलं की चला पावसाळी ट्रेक करूया. कुठे जायचे ते अजयवर सोडलं ह्यावेळी अजय ने वापरलेली भन्नाट ट्रिक खरंच भन्नाट ठरली. त्याने बोट ठेवेल त्या ठिकाणी जायचं असं ठरवलं आणि त्याच बोट चुकून की मुद्दाम देव जाणे पण ते ठेवलं गेलं ठाणे जिल्ह्यातील उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गडावर ते म्हणजे "कामणदुर्ग". मग काय आम्ही म्हणजे सलमान खान ना "मैं जो बोलता हू वो मै करता हू" ठरलं तर मग हा रविवार "कामणदुर्ग".
कामणदुर्ग
सगळी तयारी झाली. मी एकटाच सेन्ट्रलचा असल्याने मलाच माहिती लवकर उठण्याचे दुःख काय असते ते??? पण असो सकाळी ४ ला उठून ४.४५ ला निघायला तयार. ट्रेक म्हणलं की उठायची काही चिंताच नसते खरंतर झोप लागण्यापासूनच सुरुवात असते जाग तर आपोआपच येते. कामणदुर्गला पोहचायचे म्हणजे प्रवास लांबच नसला तरी गाड्यांची अदलाबदल होती आणि मुळात ट्रेनची कमी म्हणून लवकर उठावं लागलं ४.५५ ची ट्रेन पकडून प्रथम कोपर गाठलं कारण कोपरला वेळेत पोहचणे महत्वाचे होते कोपर वरून कामन रोड स्टेशन ला जायला सकाळी एकच गाडी म्हणून तिथे बरोबर वेळेत पोहोचलो. सूर्योदयाची वेळ होती पाऊस फक्त हुलच देत होता. वाटलं चांगला पाऊस येईल पण पूर्ण निराशा त्यानेच केली पण असो आपण चांगलं काय ते बघावं.
कोपर रेल्वे स्टेशन
कामणरोड रेल्वे स्टेशन
सकाळी ६.३० च्या सुमारास कामण रोड स्टेशन वर मी एकटाच उतरलो. स्टेशनवर भयाण शांतता माझे मित्र वसई वरून साडेसात पर्यंत येणार होते म्हणून मी हायवेला जाऊन रिक्षा शोधायचं ठरवलं तिथे गेलो पाहिले अर्धातास तर रिक्षा सोडा माणसं पण दिसत नव्हती. नंतर एक टमटम आली. त्यांच्याशी बोलून रिक्षा बुक केली मागून माझे मित्र आले. आम्ही सगळे रिक्षात बसून थेट गडाच्या पायथ्याचे गाव गाठले. गावचे नाव "देवकुंडी". मोजकीच लोकवस्ती असलेले हे गाव. गावात पोहोचेपर्यंत पावसाची पूर्ण आशा मावळली होती. तिथेच थोडासा अंदाज आला होता की आजची हालत काय होणार ते. वाट खडतर असल्यामुळे गावातच गाईड घेतला त्याच नाव महेंद्र. त्याच्या पाठोपाठ आमचा प्रवास सुरु झाला सुमारे साडेआठ झाले होते. संपूर्ण जंगलवाटच होती आणि नुकताच पाऊस झाल्यामुळे बरंच काही पाहायला मिळेल असा अंदाज होता झालं तसंच सुरवातच सापाने झाली. त्याचा फोटो नाही काढता आला कारण 2 सेकंदाच्या आमच्या कटाक्षाच्या आतच तो कुठच्या कुठे निघून गेला त्याचा अंदाजसुद्धा बांधता नाही आला आम्हाला. पण पुढे जाण्यासाठीचा तेवढा उत्साह आमच्यासाठी पुरेसा होता. पुढे अनेक ठिकाणी झाडांना फुटलेले पालवी लक्ष वेधून घेत होती तर खालून बिनधास्त फिरणारे खेकडे लक्षपूर्वक चालण्याचा इशारा देत होते. सुरवातीची चढाई थोडी सोपी असल्याने आम्ही आजूबाजूच्या परिस्थिचा वेध घेत होतो पण पाऊस नसल्याने चालण्याचा वेग मंदावलेलाच होता. सुमारे एक तासाने आम्ही एका कातळावर येऊन थांबलो थोड्याश्या उंचीवर आल्याने तिथे येणारी एक क्षणाची झुळूकसुद्धा AC ची मजा देत होती म्हणून पाणी प्यायच्या निमित्ताने खाली बसलो प्रत्येक जण पाणी पिणार म्हणजे १० मिनिट तिकडेच गेले परत पुढचा प्रवास चालू केला
रानहळद
पुढचा प्रवास अजून घनदाट झाडीतून होता त्यामुळे अजून काहीतरी दिसेल ह्याची पूर्ण खात्री होती फक्त डोळे उघडे ठेवायचा अवकाश होता. समोरच केळीच्या पानावर दिलेली फुलपाखरांची अंडी दिसली. उजव्या बाजूला गोगलगाय शांततेत बसलेली दिसली. खाली पायाखाली लाल रंगाचे velvet mug नावाचे कीटक ये जा करताना दिसले. ह्या सगळ्यांच्या आडून आमची चढाई चालूच होती. फक्त इतकं काही पाहायला मिळतंय म्हणून थकवा तेवढा जाणवत नव्हता.
फुलपाखराची अंडी
VELVET MUG
एव्हाना २ तास झाले होते एका कातळावर शेवट आम्ही १० मिनिट विश्रांती घ्यायचं ठरवलं. समोर वसई नायगाव चा पट्टा डोळ्यासमोर दिसत होता म्हणजे आम्हाला कळून चुकलेल की आम्ही बऱ्यापैकी वर आलोय पण किती ते माहीत नव्हतं कारण गड अजूनही डोळ्यासमोर दिसत नव्हता. म्हणून आम्ही महेंद्र ला विचारलं की मित्रा अजून किती बाकी आहे तर तो बोलला अजून ४०% बाकी आहे. आणि ते उरलेले ४०% च १००% होते. कारण खरी चढाई पुढेच होती. मनाची तयारी दाखवून आम्ही पुन्हा जोमाने तयारी केली. सुमारे अर्धातास वर गेल्यावर गडाचे दर्शन झाले. ते झाल्यावर पण आम्ही त्याला विचारलं नक्की तिथेच जायचंय का??? कारण आम्ही जिथे होतो तिथून कामनदुर्ग आमच्या छातीच्या समोर उभा ठाकला होता.
वसई नायगाव पट्टा
गडाचा इतिहास पाहता उल्हास नदीच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. १६८३ मध्ये संभाजीराजांनी पोर्तुगिजांकडून हा किल्ला जिंकला आणि नंतर १२ सप्टेंबर १६८५ रोजी ते पुन्हा जिंकले. किल्ल्यावरील पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे पोर्तुगीजांना किल्ल्याचा त्याग करावा लागला. १७३७ च्या पेशवे-पोर्तुगीज युद्ध दरम्यान, शंकरजी केशव यांनी किल्ले पुनर्वसित करण्यासाठी पेशवे यांना एक पत्र लिहिले कारण त्यांचे स्थान पोर्तुगीज भूमी जवळ अगदीच अचूक आहे आणि त्याचा उपयोग कल्याण-भिवंडी मार्गावर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. नंतर, दोन पाण्याची टाकी बांधण्यात आली आणि जुन्या सुव्यवस्थेची दुरुस्ती केली गेली ज्यामुळे पुनर्वसनसाठी हा किल्ला योग्य ठरला.
पाण्याचे टाके
पुढची चढाई भयंकर होती छोटीशी पाऊलवाट त्यात आम्ही ९ जण. एकापाठोपाठ एक असे आम्ही सातत्याने चालत होतो थोडं पुढे गेल्यावर एक रॉकपॅच आला तो चढताना सगळ्यांची कसरत झाली पण सगळ्यांनी शिताफीने तो पार केला व थेट गडावर पोहोचलो ह्या संपूर्ण ट्रेक मध्ये आमच्या सोबत एक कुत्रा पण होता त्याला मात्र मानलं कारण तो जाऊन येऊन पूर्ण वेळ आमच्या सोबत होता. त्याच नावसुद्धा आम्ही "शेरु" ठेवलं होतं.
सच्चा साथीदार - शेरू
गडावर पोहोचल्यावर भन्नाट वारा त्यातच आम्ही आमचे थकलेले जीव एका जागेवर बसून पोटपूजेची तयारी केली. सगळ्यांनी आपापले डबे काढले पोटभर जेवलो व पाऊस येण्याची आशंका होती म्हणून आधी सगळे रॉकपॅच उतरून पाण्याच्या टाक्यांजवळ आराम करायचा निर्णय घेतला. रॉकपॅच चढण्यापेक्षा उतरणं केव्हाही कठीण. त्यामुळे तेव्हाही कसरत झाली पण पाण्याचे टाके समोर आल्यावर आम्ही सगळे बॅग्स सोडून पाण्याच्या टाक्यात पाय सोडून बसलो कारण असेही ती टाके पिण्याजोगे नव्हती. गरमीमध्ये भिजवलेले ते पाय म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असेच होते.
उतरताना करायला लागलेली कसरत
बराच वेळ तिथे घालवून पुन्हा परतीला लागलो. उतरताना सुद्धा काळजी घ्यायची गरज होतीच बराच वेळ उतरल्यावर मागे बघितल्यावर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की आम्ही खरंच इतके वर होतो ह्यावर. ते यश डोक्यात ठेऊनच खाली उतरत होतो एव्हाना साडेतीनच वाजले होते त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता सगळे थकलेले असल्याने आम्ही पुन्हा त्याच कातळावर आराम करायचे ठरवले. सुमारे १५ मिनिटं शांत चित्ताने आम्ही पडून राहिलो. व पुन्हा आरामात खाली उतरायला सुरुवात केली एव्हाना पुढच्या रविवारची चर्चा सुरु झाली होती.
पावसाने दिला धोका मग काय बिनधास्त झोपा ...
पावणेपाचच्या सुमारास आम्ही पायथ्याशी होतो. घसा सुकल्यामुळे आम्ही महेंद्रला आधीच म्हणालो होतो की आधी पाणी आणि मग चहाची व्यवस्था कर मित्रा आणि तशीच त्याने केली सुद्धा. त्या ताईंने केलेला कोरा चहा हा कोणत्याही पंचतारांकित हॉटेल मधल्या चहापेक्षा भारी होता. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमचा रिक्षावाला खाली उभाच होता त्यामुळे आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. थकलेले शरीर पण सुखद क्षण आणि अप्रतिम आठवणी घेऊन सुमारे साडेसातच्या सुमारास मी घरी पोचलो.
काही महत्त्वाचे मुद्दे
१) गडावर जाण्यासाठी गाईड गरजेचाच आहे
२) किमान 2 लिटर तरी पाणी सोबत ठेवावे कारण गडाची चाल खूप मोठी आहे.
३) गडावर जायला एकच रस्ता आहे. दिवा वसई मार्गावरील कामण रोड रेल्वे स्टेशन. स्वतःची गाडी असेल तर थेट कामण गाव गाठावे.
3) आम्ही शोधल्यावर आम्हाला ह्या गडाच्या आजूबाजूस कोणाचाही नंबर मिळाला नव्हता म्हणून 2 नंबर देत आहे
i ) टमटम - मुरलीधर पाटील - ९६७३७६६३४६
ii) गाईड - महेंद्र - ७०८३८६७९९५
२) किमान 2 लिटर तरी पाणी सोबत ठेवावे कारण गडाची चाल खूप मोठी आहे.
३) गडावर जायला एकच रस्ता आहे. दिवा वसई मार्गावरील कामण रोड रेल्वे स्टेशन. स्वतःची गाडी असेल तर थेट कामण गाव गाठावे.
3) आम्ही शोधल्यावर आम्हाला ह्या गडाच्या आजूबाजूस कोणाचाही नंबर मिळाला नव्हता म्हणून 2 नंबर देत आहे
i ) टमटम - मुरलीधर पाटील - ९६७३७६६३४६
ii) गाईड - महेंद्र - ७०८३८६७९९५
निवांत क्षण
MAP LOCATION OF KAMANDURG
No comments:
Post a Comment