मागचा ट्रेक जीवधन झाला त्याआधीचा गुमतारा झाला पण हे सगळे ट्रेक ज्या ट्रेकच्या भीतीला धरून केलेले तो ट्रेक अजून बाकीच होता तो म्हणजे "सोनगिरी". सोनगिरीला वाघ असतात म्हणून सोनगिरी नंतर करू असं ठरवलं होतं अगदीच काही मिळालं नाही मग म्हंटल आता हाच करू. म्हणून रविवारी सोनगिरी करण्याचा निर्णय घेतला सकाळी आरामात साडेआठची गाडी पकडून साडेनऊला पळसधरी स्टेशनला उतरलो. काहींची गाडी चुकल्यामुळे त्यांची वाट पाहत स्टेशन वरच थांबलो. सोनगिरी किल्ला म्हणजे पळसधरी स्टेशनवर उभं राहिल्यावर समोर दिसतो तो किल्ला म्हणजे सोनगिरी.
बरेच जण नवीन होते त्यांच्यासाठी हा एक थरारक अनुभव होता पण थरार नाही तर मजा काय??? म्हणून तो एक पट्टा पार केला आणि गडाच्या वरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर जाऊन पोहोचलो. संपूर्ण गडावरची खडतर वाट कोणती म्हणावं तर हीच. सुमारे ८० अंशाच्या कोनातली ही वाट थेट गडावर घेऊन जाते. सावकाश पण खंबीरपणे ही वाट पार करून आम्ही गडावर पोहोचलो. समोरच एक पाण्याचं टाकं नजरेस पडलं आजमितीस तेच एक पाण्याचं टाकं शिल्लक आहे
ट्रेक चुकीच्या वाटेने जरी झाला तरी तो बरोबर झाला त्यामुळे त्यात आलेली मजा काही औरच होती...
किल्ले सोनगिरी
एक तास वाट पाहून सगळ्यांसोबत सुमारे ११ वाजता ट्रेकला सुरवात केली. सुरुवातीला रेल्वे रुळावरून जाणारी ही वाट थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूने डोंगराच्या दिशेने वळते ती थेट गडावर जाते पण त्याआधी एक ओढा लागतो तो ओलांडून रेल्वे रुळावर पोहचावे लागते तो पार करून आम्ही वरच्या वाटेला लागलो. त्यानंतर वाटेत एक रस्ता सरळ आणि एक डाव्या बाजूला वळतो तिथून डाव्या बाजूला जावे आणि आम्ही तीच चूक केली आणि चुकीच्या वाटेला लागलो.
वाटेवरील ओढा
त्यामुळे साधा ट्रेक सुद्धा आम्ही कठीण केला. सुरुवातीची सोपी वाटणारी वाट बऱ्याच वेळाने अचानक जंगलात रूपांतरित झाली आणि वाट संपली तेव्हा आम्हाला कळलं की आपण वाट चुकलो पण आता मागे वळणं पण तितकं सोयीचं नव्हतं म्हणून मग वाट काढत काढत सुरुवातीला सगळ्यांना एक ठराविक उंचीवर आणून ठेवलं समोर पळसधरी स्टेशन दिसतच होतं
पळसधरी रेल्वे स्टेशन
चुकलेल्या वाटेचे वाटसरू
मग मी आणि माझा मित्र भरत वाट शोधायला पुढे गेलो एव्हाना इतकं कळलं होतं की काही झालंतरी आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे त्यामुळे मोठमोठाली झुडपं वाकवत वाट काढत आम्ही जात होतो. पण एक गोष्ट चांगली होती कि जंगलात प्रवेश केल्याने वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं नजरेस पडत होती
ग्लोरी लिली
इतकं फिरूनसुद्धा योग्य वाटेचा काही मागमूस लागत नव्हता. मग अचानक गडावरून "जय भवानी जय शिवाजी"चे नारे आले. मग खात्रीलायक दिशा समजली आणि मग जोमाने पावलं टाकण्यास सुरुवात केली आणि मग एक मोठं पठार नजरेस पडलं तिथून फक्त एकच पाऊलवाट दिसली ती वरच्या दिशेने चालली होती तेव्हा अंदाज आला की हीच बरोबर वाट असावी पण पुन्हा चुकायला नको म्हणून थोडं पुढे जाऊन पाहिलं आणि खात्री करून घेतली
मध्यवर्ती पठार
सोनगिरीचा दिशादर्शक
मग पुन्हा खाली उतरलो आणि मागच्या मित्रांना शोधायला म्हणून पुन्हा त्यादिशेने निघालो. आम्ही आवाज देतच होतो तेवढ्यात शिटीचा आवाज यायला लागला. तेव्हाच मी समजलो हा आमचाच ट्रेकिंगच्या दुनियेतील Mr. Perfectionist म्हणजे "अजय प्रधान". बॉलीवूडमध्ये अमीर खानला आणि ट्रेकिंगमध्ये अजय प्रधानला तोड नाही. त्याला आवाज दिला त्याने ओ दिली आणि आम्ही पुन्हा एकत्र भेटलो आणि पुन्हा ट्रेक ला सुरुवात केली काही जण थकल्यामुळे पाणी वगैरे पिऊन पुन्हा त्याच उत्साहात चढाईला सुरुवात केली. आता मात्र त्या रुळलेल्या वाटेने पटापट निघालो एव्हाना एक वाजला होता गडाचा झेंडा दिसायला लागला होता त्यामुळे आम्ही अर्ध्या तासात पोहोचणारच होतो. पण पुन्हा उतरायची पण काळजी होती म्हणून वेग वाढवला आणि वाट जशी नेते तशी जायचं ठरवलं. थोडावेळ पठारावरून जाणारी वाट ही अचानक निमुळती झाली आणि इतकी निमुळती की एकावेळी एकाच व्यक्ती चालू शकते इतकी म्हणून व्यवस्थित अंतर ठेवून चालायला सुरुवात केली.बरेच जण नवीन होते त्यांच्यासाठी हा एक थरारक अनुभव होता पण थरार नाही तर मजा काय??? म्हणून तो एक पट्टा पार केला आणि गडाच्या वरच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर जाऊन पोहोचलो. संपूर्ण गडावरची खडतर वाट कोणती म्हणावं तर हीच. सुमारे ८० अंशाच्या कोनातली ही वाट थेट गडावर घेऊन जाते. सावकाश पण खंबीरपणे ही वाट पार करून आम्ही गडावर पोहोचलो. समोरच एक पाण्याचं टाकं नजरेस पडलं आजमितीस तेच एक पाण्याचं टाकं शिल्लक आहे
गडावरील पाण्याचे टाके
गडावरून पळसधरीचा संपूर्ण नजरा दिसत होता तिथूनच आम्ही विचार करत होतो की नक्की आपण चुकलो कुठे??? आणि आलो कुठून?? वाट चुकल्यामुळे सगळे थकले होते पण बरोबर पोहचल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर थकल्याचा मागमूसही नव्हता. तिथे पोटभर जेवलो. १० मिनिट अराम केला तेवढ्यात पावसाची चिन्हे डोळ्यांसमोर आली समोर पाऊस पडतोय हे स्पष्ट दिसत होतं तो भन्नाट नजारा कॅमेरात कैद करून पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.
पोटपुजा
निसर्गाची किमया
चढताना जो एक पट्टा खडतर वाटत होता तो उतरतांना अजून खडतर वाटायला लागला पण एकमेकांना हात देत तो ही पार केला आणि ठरलेल्या वेळेत खाली उतरायचं ठरवलं म्हणून पटापट वाटेला लागलो मध्येच पठारावर ५-१० मिनिटं विश्रांती घेतली. त्यात काही थकलेले जीव स्पष्ट दिसत होते पण त्यांना पुन्हा घरचं आमिष दाखवत पुन्हा वाटेला लागलो.
उतरताना होणारी कसरत
थकलेले जीव
वाटेत कुठे चुकलो ते लक्षात घेतलं त्यावर थोडी चर्चा केली आणि चुकीचा पश्चाताप करत सुमारे साडेपाचच्या सुमारास पुन्हा पळसधरीच्या रेल्वे रुळावर पोहोचलो एक शेवटचा फोटो काढला आणि सोनगिरी ट्रेकचा शेवट केला.ट्रेक चुकीच्या वाटेने जरी झाला तरी तो बरोबर झाला त्यामुळे त्यात आलेली मजा काही औरच होती...