Sunday, 25 November 2018

प्रवास माथेरानचा पण.... एका वेगळ्या वाटेने. (MATHERAN... FROM UNKNOWN ROUTE)

            गेले दोन रविवार दिवाळीमुळे घरी बसून घालवले पण आता ठरवलं घरी बसण्यात काही अर्थ नाही म्हणून म्हंटलं निदान कुठे फिरायला तरी जावं म्हणून अजयशी संपर्क केला. तो म्हणाला अगदीच कुठे नाहीतर निदान माथेरानला तरी जाऊ. मी म्हंटलं चालेल चल.  माथेरान तसा आत्ता दोन महिन्यांपूर्वीच केला होता पण तो ONE TREE HILLच्या रस्त्याने. आणि आता माथेरानला जायचं निमित्त होतं ते म्हणजे माथेरानला पोहोचण्याचा सगळ्यात पहिला रस्ता. जिथून माथेरानचा शोध लागला. सन १८५०मध्ये Hugh Malet ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांने ह्या वाटेने जाऊन सर्वात आधी माथेरान गाठलं म्हणूनच म्हंटलं चला आपण पण जाऊ.
माथेरानवर घेऊन जाणारी सगळ्यात पहिली वाट  
             झालं तर मग ठरलं रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे ७.२५ ची ट्रेन पकदडून सव्वाआठच्या सुमारास कर्जत स्टेशनला पोहोचलो सगळ्यात आधी नाश्ता केला आणि आमच्या ठरलेल्या हजारे काकांची काळी पिवळी टॅक्सी पकडली ती सुध्दा एकदम नवीन होती आणि त्या नवीन गाडीत आम्ही आठच्या जागी दहा जण बसलो. त्यात आमचा मित्र भरत खाली बसला होता. नंतर त्याच्यासाठी हजारे काकांनी स्टूल मागवलं. अशी सगळी धमाल करत आम्ही कर्जत स्टेशनवरून पोखरवाडीच्या रस्त्याला लागलो.
हजारे काका आणि त्यांची नवीन गाडी 
आठच्या जागी दहा आणि हाच तो भरत         
            पोखरवाडीवर जायचं म्हणजे उजव्या बाजूला माथेरानचा डोंगर डाव्या बाजूला इर्शाळगड आणि मधोमध मोरबे धरण. मोरबे धारणापाशी पोहोचल्यावर आम्ही गाडी थांबवली कारण समोरचं दृश्य अप्रतिम होतं ते कॅमेरात टिपून पुढे आम्ही थेट पोखरवाडी गाठलं.
इर्शाळगड ,मोरबे धरण आणि माथेरान
ग्रुप फोटो  
              पोखरवाडीच्या पुलावरून वर गेलं की धनवाडी येते. आमच्या ट्रेकचा रस्ता म्हणाल तर धनवाडी पासून रामबाग. रामबाग म्हणजे माथेरानचं शेवटचं टोक. पोखरवाडी ते रामबागच्या वाटेवर ४ पठार लागतात. तसं म्हणलं तर ही छोटी छोटी गावचं. कौलारू घरं, घरासमोर अंगण आणि सोबत दुधदुभती जनावरं. तिथल्या गावकऱ्यांशी माहिती घेऊन आम्ही पुढे लागलो.  एव्हाना ऊन यायला सुरुवात झाली होती.

धनवाडी मधली धमाल
             आमचं ध्येय आमच्या समोरच होतं गारवा होता तो पर्यंत आम्ही पटापट चालत होतो. थोडं पुढे गेल्यावर बुरुजवाडी आली तिथून एक काका नांगर डोक्यावर घेऊन चालले होते. त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन आम्ही त्यांच्याच बरोबर चालण्याचा प्रयत्न केला पण त्यांची चाल आणि आमची चाल ह्यात खूप फरक होता. शेवटी आम्ही त्यांना बोललो तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो.


रणरणतं ऊन आणि पायपीट
भर उन्हात झाडाखालचा आसरा  
              आता बऱ्यापैकी चढावाला सुरुवात झाली होती म्हणून आमचा ही वेग मंदावला होता पण हळू चालताना का ना होईना आजूबाजूचा परिसर अत्यंत आनंद देत होता. डाव्या बाजूला इर्शाळगड होडीच्या आकारात होताच जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त वर आल्याने आता मोरबे धरण पण पूर्ण दृष्टीक्षेपात येत होतं. तोच उजव्या बाजूला एक झेंडा दिसला तो कुठला किल्ला असेल ह्यावर चर्चा करता करता उमगलं की तो म्हणजे किल्ले सोंडाई.
किल्ले इर्शाळगड
मोरबे धरण
माथेरानची डोंगररांग आणि उजव्या बाजूला किल्ले सोंडाई
            जो आम्ही मागच्या वर्षी केला होता. त्या ट्रेक च्या आठवणी जागवत आता आम्ही तिसऱ्या पठारावर येऊन पोहोचलो ते म्हणजे रामबाग जंगल. काही का होईना जंगलात गेल्यावर असं वाटलं हा रस्ता संपूच नये कारण ह्या रणरणत्या उन्हातून अचानक मिळालेली सवली म्हणजे स्वर्गसुखच होतं. मागे वळून पाहिल्यावर आम्हाला कळत होतं आम्ही कुठून आलो आणि कुठपर्यंत पोहोचलो. त्याच गप्पा मारत जंगलाचा आनंद घेत आमची चाल सुरू ठेवली
रामबागच्या जंगलातील प्रवेश
                    उन्हामुळे तहान खूप लागत होती. वाटेत कुठे पाणी मिळेल का ते पाहत होतो तेवढ्यात एक ठिकाणी डोंगरातून थेंब थेंब पाणी पाझरताना दिसलं पण ते बाटलीत भरण्याइतपत नव्हतं.  मग तिथे तहान न भागवता फक्त डोकं भिजवल. आणि पुढे जाऊन बघतो तर अशाच दगडातून येणाऱ्या पाण्याने गावकरी पाणी भरत होते. त्यांनी त्यासाठी नामी शक्कल लढवली होती. पाण्याच्या प्रवाहापाशी त्यांनी एक बाटली लावलेली खऱ्या अर्थाने त्या जागेवरचा तो नळच होता. तिथे मनसोक्त पाणी पिऊन आणि पाणी भरून पुढच्या वाटेला लागलो

भर उन्हात लाभलेला अमृताचा झरा
            एव्हाना रामबाग पॉईंटची हद्द दिसायला लागली होती.  तेव्हा आम्हाला समजलं की आता आम्ही पोहोचलो आहोत. त्यामुळे रामबाग पॉईंटच्या हद्दीवर सगळ्यांचा एक फोटो काढला.  एव्हाना एक वाजला होता भूक अशीही लागली होती. पुढे जाऊन खायचं म्हंटलं तर माथेरानच्या माकडांची भीती म्हणून तिथेच बसून जेवणाचा आनंद घेतला आणि माथेरान च्या हद्दीत प्रवेश केला.
रामबाग पॉईंट 
माथेरानमधील प्रवेश          
                पुढे आमचा एक मित्र म्हणाला "मी आजपर्यंत बऱ्याच वेळा माथेरानला आलो पण मला Panther's Cave आजपर्यंत नाही दिसली" मग आम्ही ठरवलं चला आलो आहोत तर ती शोधू म्हणून मग सगळ्यात आधी माथेरानचा नकाशा बघितला. आम्ही असलेल्या ठिकाणचा अंदाज घेतला तेव्हा कळलं की ती Cave रेसकोर्सच्या मागच्या बाजूस आहे म्हणून आधी रेसकोर्सजवळ पोहोचलो. तिकडे एक झाड पाहिल्यावर जवळपास  सगळे  विसरूनच गेले की आपण काही शोधत आहोत असं. 
माथेरानचा नकाशा
रेसकोर्स
माथेरानमध्ये माकडं कमी होती का??
               रेसकोर्स इतका मोठा त्यात ती Cave इतकी छोटी म्हणून आम्ही तिथल्या एका स्थानिक व्यक्तीस विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं कि पुढे GOLD CROFT नावाचा बंगला आहे त्या बंगल्यात ती गुहा आहे म्हणून मग आम्ही त्यादिशेने निघालो. ही Cave खाजगी बंगल्याच्या आवारात असल्यामुळे आधी आम्ही तिथल्या लोकांची परवानगी घेतली आणि आत मध्ये प्रवेश केला.सुमारे दहा फुटाच्या आवारात पसरलेली ही गुहा सध्या ह्या गुहेत देवाच्या काही मुर्ती आहेत त्यांची दृश्य टिपले आणि  पुन्हा माथेरानच्या मार्केटच्या दिशेने निघालो
GOLD CROFT
AND.... FINALLY PANTHER'S CAVE
               ज्या एका आशेवर आम्हाला FRANSIS ने आम्हाला खालपासून वरपर्यंत आणलं त्याठिकाणी येऊन पोहोचलो ते म्हणजे माथेरानच्या मार्केटमधला Milkmaid गोळा. तिथे गेल्यावर प्रत्येकाने आपापल्या आवडीचा गोळा खाल्ला. तिथे बाजूलाच असलेली माथेरानची प्रसिद्ध चिक्की आणि मध घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.
MILKMAID GOLAA  
                    एव्हाना ६ वाजले होते त्यामुळे शेवटची बससुद्धा गेली होती म्हणून  शेवटी टॅक्सी करून नेरळ स्टेशन गाठलं आणि लोकल पकडून साडेसातच्या सुमारास घरी पोचलो.
माथेरानची डोंगररांग
"सुभाष सर" धन्यवाद ....

7 comments:

  1. सिम्पली ग्रेट , if some one realy read fully he mey not have words to say this is missing , bye reading this उ might fill you did this trek with अजिंक्य , and such wonderfull pic with area information , if some one go first time also he might not required to take गाईड , , Brevo Ajinkya,

    ReplyDelete
  2. अजिंक्य, ब्लॉग छान
    आठवतय, आपण मलंग गड च्या शेजारचा पाच पीर गड एका दिवसात सर केला
    आपण टेम्प ट्रॅव्हललेर ने पुण्याहून आलो होतो
    तुमच्या मार्गदर्शन खाली
    उत्तम

    ReplyDelete
  3. हो सर तुम्हाला कसं विसरू शकेन
    धन्यवाद सर

    ReplyDelete