मागील भागात आपण पाहिलं मोढेराचं प्रसिद्ध सूर्यमंदिर. आता पुढचं ध्येय होतं ते म्हणजे "रानी की वाव" सूर्यमंदिरावरून २ वाजता पाटणला जाणारी बस पकडली आणि थेट हॉटेल गाठलं. उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती म्हणून सर्वात पहिले फ्रेश होऊन खालीच हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि परत रूममध्ये येऊन विश्रांती घेण्याचा विचार केला कारण खरंतर रानी की वाव ला जाण्याचं नियोजन दुसऱ्या दिवशीच म्हणजे रविवारचं होतं म्हणून निवांत झोपलो पण पाचच्या सुमारास डोळे उघडले मग विचार केला इकडे बसून काय करायचंय?? त्यापेक्षा आत्ताच जाऊ "रानी की वाव" पाहायला.
विहिरीचा इतिहास :-
अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी "अन्हीलवाड" या नांवाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोलंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली.
रानी कि वाव
रानी कि वाव पाहायला जावंसं वाटत होतं पण तिकडच्या वेळेचा अंदाज नव्हता म्हणून सगळ्यात आधी नेटवर पाहिलं तर लक्षात आलं रानी की वाव ७ वाजता बंद होते. ते वाचलं आणि तडक उठलो हॉटेलच्या खालून रिक्षा केली आणि थेट "रानी की वाव" गाठलं. वाटेत एका गावची तटबंदी लागली खरंतर जुन्या काळातील खरं पाटण म्हणतात ते हेच ते. तिथूनच एक किमी अंतरावर ही वाव आहे.
पाटण गावाची तटबंदी
सव्वापाचच्या सुमारास मी रानी की वाव जवळ जाऊन पोहोचलो आणि आणि आजूबाजूचा परिसर बघितला आणि खरंच माझे डोळे भिरभिरले कारण विहिरीच्या चारपट परिसर आजूबाजूला हिरवळीने न्हाऊन निघाला आहे. म्हणजे बाहेर इतकं उन्ह आणि आतमध्ये हिरवळ हे पाहून मन प्रसन्न झालं.
'रानी कि वाव'चा परिसर
मी सर्वात पहिले विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचलो आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरल्याची अनुभूती झाली म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत विहीर विहीर आणि फक्त विहीर. एका नजरेत बसणं शक्य नव्हतं त्याहून समोर दिसणारी ती कलाकुसर. प्रथमतः पाहिल्यावर प्रश्न पडतो कि ह्या सगळ्यात विहीर आहे कुठे?विहिरीचा इतिहास :-
अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी "अन्हीलवाड" या नांवाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोलंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली.
रानी कि वाव चे समोरून टिपलेले दृश्य
पाटण गावाजवळून पुरातन अशा सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्या सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशझोतात आणली.
सर्वात आधी पाटण हे पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे गाव आता 'रानी कि वाव' (राणीची विहीर) साठी पण प्रसिद्ध आहे.
वास्तू विशेष
६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी हि वाव साधारण २७ मीटर खोल आहे. सात मजले असणाऱ्या या विहिरीत प्रत्येक मजल्यावर रेखीव शिल्पकाम केले आहे, आजूबाजूच्या भिंतीवरसुद्धा अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. जी पाहताच क्षणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. विहिरीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस वामन अवताराचे एक शिल्प दिसते ते अतिशय दुर्मिळ असून ते महाराष्ट्रात पाहावयास मिळत नाही.
मागील बाजूने टिपलेले दृश्य
वामन अवतार
विहिरीत असलेल्या बहुतांश कलाकृतीत जास्त मूर्ती ह्या भगवान विष्णूशी संबंधित आहेत. भगवान विष्णूच्या दशावतार रुपामध्येच ह्या विहिरींची निर्मिती झाली ज्यामध्ये कल्की, नरसिंह, वामन, वाराही आणि दुसरे अवतार सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त विहिरीत नागकन्या आणि योगिनी सारख्या अप्सरांच्या कलाकृतीही पहायला मिळतात. विहिरीतील कलाकृती अद्भुत व आकर्षक स्वरूपात बनवल्या गेल्या आहेत.
अप्सरेच्या कलाकृती
२००४ सालापर्यंत विहिरीच्या तळापर्यंत जाण्याची परवानगी होती परंतु २००४ झाली आलेल्या भूकंपानंतर सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा खाली जाता येत नाही. चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले असता एक शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते.प्रेक्षक आणि विष्णू मूर्ती यांच्या मध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून ही मूर्ती बघावी लागते.
शेषशाही विष्णूची मूर्ती दिसते ती हि जागा
गुजरात मधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार या बांधकामात होता.विहिरीच्या आतील बाजूस दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती , मातृका, सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती रानी कि वाव येथे पाहायला मिळतात.
विष्णूची विविध रूपे
विहिरीवर असलेले प्रत्येक मजले हे विस्तृत खांबांवर उभे आहेत. विहिरीत उपलब्ध असलेल्या प्रत्येक मजल्यावर ४ खांब असून खांबांवरही आकर्षक कलाकृती निदर्शनास येतात. विहिरीतील प्रत्येक खांबांवर महाभारतातील पवित्र मानलं जाणाऱ्या किचकाच्या मूर्ती दृष्टीस पडतात. किचक महाभारतातील मत्स्यराजाचा शक्तिशाली सेनापती होता ज्याचा मृत्यू भीमाच्या हातून झाला होता.
विस्तृत खांब
खांबावरील कीचकाची मूर्ती
भिंतीवरील सुबक नक्षीकाम
रानी कि वाव मधील प्रशस्त मजले
ह्या ऐतिहासिक वास्तुस यूनस्को ने २२ जून २०१४ ला जागतिक ऐतिहासिक वास्तूमध्ये सामील करून घेतलं व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व विहिरींची राणी
म्हणून ह्याचा सन्मान केला व सध्या चलनात असलेल्या १०० रु च्या नोटेमागे
"रानी की वाव"च छायाचित्र देऊन ह्यास देशभरात प्रसिध्द केलं.
रानी कि वाव चे १०० रुपयाच्या चलनावरील छायाचित्र
गुजरात दौऱ्यातील एकमेव फोटो
सरतेशेवटी एवढंच सांगेन उभ्या आयुष्यात ह्या ऐतिहासिक वास्तूस एकदातरी नक्की भेट द्या. बाकी पुन्हा लवकरच भेटूत गुजरातच्या दुसऱ्यादिवशीच्या भागात तोपर्यंत Good Bye.... Google location Of "RANI KI VAV"