Wednesday, 17 April 2019

गुजरात दौरा भाग - २ मोढेरा सुर्यमंदिर (Modhera Suntemple)

            मागील  भागात आपण अदालजच्या विहिरीबद्दल माहिती घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे अदालजची विहीर झाल्यावर थेट "राणी की वाव" करायचा प्लॅन होता पण अदालजमधून बाहेर पडल्यावर कळलं की अदालजवरून मेहेसाना आणि मेहेसाना वरून मोढेराला जाण्यासाठी बसची संख्या जास्त आहे म्हणून ऐनवेळी प्लॅन बदलून आधी मोढेराच्या सूर्यमंदिराला भेट द्यायचा निर्णय घेतला व १० ची बस पकडून थेट मोढेरा गाठलं. मोढेराचं सूर्यमंदिर हे बस स्टॉप पासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. बरोबर १२ वाजता मोढेराला उतरून भर उन्हात सुर्यमंदिरात प्रवेश केला. सूर्यमंदिर व सुर्यकुंड बघून खरंच डोळ्यांचं पारणं फिटलं. इतकं भव्य मंदिर व सभोवतालचा असलेला परिसर पाहून डोळे थक्क झाले. दुपारची वेळ असल्याने गर्दीही कमी होती ते पाहून एक गोष्ट लक्षात आली की घेतलेला निर्णय हा अगदी योग्य होता.
सूर्यमंदिराचे समोरून टिपलेले दृश्य  
            मंदिराचा इतिहास पाहता कोणार्कच्या सुर्यमंदिरानंतर सर्वाधिक प्रसिद्ध असलेलं कोणतं मंदिर असेल ते "मोढेराचे सुर्यमंदिर".  ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराच्या बांधणीच्या वेळी कुठेही चुन्याचा उपयोग केला गेलेला नाही. हे मंदिर राजा सोलंकीने सन १०२६ मध्ये २ भागात बनवलं आहे त्याचा पहिला भाग गर्भगृह व दुसरा सभामंडप असा आहे मंदिराच्या सभामंडपात एकूण ५२ स्तंभ आहेत ज्यावर विविध देवी देवतांचे शिल्प आहेत त्याशिवाय रामायण महाभारतच्या प्रसंगांना दाखविण्यात आले आहेत
गर्भगृह व  सभामंडप 
सभामंडपातील खांब 





खांबांवर असलेले बारीक नक्षीकाम 
            मंदिर अश्या पद्धतीत बनवले आहे की जेणेकरून सकाळी होणाऱ्या सूर्योदयाच्या वेळी पहिलं सूर्यकिरण हे गर्भगृहावर पडलं पाहिजे. सभामंडपाच्या समोर असलेलं कुंड हे "सुर्यकुंड किंवा रामकुंड" म्हणून प्रसिद्ध आहे सोलंकी राजा सूर्यवंशी होते ते सूर्याला कुलदैवत म्हणून पूजत असे म्हणून त्यांनी आपल्या आद्यदेवताच्या पूजेसाठी म्हणून ह्या मंदिराची स्थापना केली. अल्लाउद्दीन खिलजी ने केलेल्या परकीय आक्रमणात ह्या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले त्याने ह्या मंदिरातील काही मूर्त्यांची तोडफोड केली म्हणून आजमितीस ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे.
गर्भगृह व सभामंडप 
             मोढेराच्या ह्या मंदिराचा उल्लेख पुराण काळात सुद्धा झालेला आहे जसं की स्कंद पुराण व ब्रह्मपुराणात हा  परिसर "धर्मरण्य" म्हणून ओळखला जात असे. पुराणानुसार असंही म्हंटलं जातं प्रभु श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर आपल्या गुरू श्री वशिष्ठना एक असं ठिकाण सुचविण्यास सांगितले जिथे ते आत्मशुद्धी करू शकतील व ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळवू शकतील तेव्हा विशिष्ट ऋषिंनी त्यांना ह्याच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला.
            सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते "रामकुंड", हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर "सभामंडप "आणि शेवटी "गूढमंडप अथवा गर्भगृह.
गर्भगृह सभामंडप  व सभामंडपासमोरील सूर्यकुंड 
 तिन्ही संकुलांची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे
१ ) रामकुंड उर्फ सूर्यकुंड 
       प्रवेश करताच दिसणारे रामकुंड हे उत्तर दक्षिण १७६ फुट लांब आहे तर पूर्व पश्चिम लांबी १२० फुट आहे. रामकुंडाची रचना ' वाव ' किंवा पायऱ्यानी बनलेल्या विहीरीप्रमाणे असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते. या पायऱ्यावर विविध देवतांची १०८ छोटी मंदिरे आहेत. आजमितीला त्यातली खूप कमी शिल्लक आहेत
सूर्यकुंड 
   कुंडानजीक असलेली विविध देवतांची छोटी मंदिरे


२) सभामंडप
            सभामंडपात प्रवेश करताना आधी "किर्ती तोरण" लागते. काळाच्या ओघात तोरण नष्ट झाले असले तरी त्याचे दोन खांब अजूनही वैभवाची साक्ष देतात. सभामंडपाला चारही बाजूनी प्रवेशद्वारे आहेत. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. बाहेरील बाजूस असणारे छोटे खांब आणि जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब.
किर्ती  तोरण  
सभामंडप 
चहूबाजूस असणारे प्रवेशद्वार 

सभामंडपाच्या आतील खांब व तोरण 






सभामंडपातील बारीक कलाकुसर 
३) गूढ मंडप
             गूढ मंडपाच्या बाहेरील भिंती सूर्याच्या १२ प्रतिमांनी तसेच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती, अष्ट दिक्पाल यांच्या मूर्तींनी सजवलेल्या आहेत. गूढ मंडपास तीन बाजूनी प्रत्येकी एक खिडकी आहे. विशिष्ट दिवशी या खिडक्यातून सूर्यकिरण प्रवेश करत आणि मध्यभागी असणाऱ्या सूर्य मूर्तीवर पडत. गूढमंडपातील काही मूर्तीवर इराणी पद्धतीचा संस्कार दिसतो. गूढ मंडपात काही मिथुन शिल्पेही आढळतात.
गूढ मंडप
गुढमंडपाचे प्रवेशद्वार 


प्रवेशद्वारावरील देवतांची  दृश्ये 






 










मंदिराच्या चहूबाजूस असलेली कलाकुसर               
               सूर्यमंदिरात प्रवेश केल्यावर बाहेर निघायचा विचारसुद्धा मनात येत नाही तुम्हीच पाहिलं असेल कि वरील ब्लॉगमध्ये माहिती मोजकी असली तरी फोटो काही संपत नाही कारण मंदिरच तेवढं देखणं आहे खरंतर  अजून बरेच फोटो आहेत पण सगळे प्रदर्शित करणं शक्य नाही तरी जितके जमतील तितके प्रदर्शित केले आहेत बाकी Social Media वर पाहायला मिळतीलच.
                सूर्यमंदिराचा  संपूर्ण परिसर न्याहाळून आता पुढच्या प्रवासाला निघायचा विचार केला. एव्हाना २ वाजले होते म्हणजे सुर्यमंदिर बघायला पण मी बरोबर २ तास घेतले. २ वाजता मी पुन्हा बस स्टँडच्या दिशेने निघालो. बस स्टँडवर पोहोचतो न पोहोचतो तोच समोर पाटणला जाणारी बस लागलेली होती.  त्यात बसलो आणि पाटणच्या दिशेने रवाना झालो.
पुन्हा भेटूत गुजरातच्या पुढच्या भागात ज्या ठिकाणची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे
"राणी कि वाव".
Google Location Of Modhera Sun Temple :-

3 comments: