पावसाने अचानक घेतलेल्या सुट्टीमुळे ह्यावेळी जरा उशिराने हजेरी लावत आहे. मागील रविवार हा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गेला त्यामुळे तितकं काही जाणवलं नाही पण शेवटी आपली भटकंती ती भटकंतीच. पावसाची वाट पाहत पाहत ह्यावेळी शनिवार उजाडला. त्यात इतकं ऊन असताना सुद्धा शासनाची बंधनं, त्यामुळे नक्की जायचं कुठे हा नेहमीचा प्रश्न समोर होता. कर्जतच्या पट्ट्यातलं जास्त काही उरलं नाहीये म्हणून परत एकदा मोर्चा नाशिकच्या दिशेने वळवला पण तिथे सुद्धा बाकी काय राहिलंय हे शोधत होतो "काय नाई, काय नाई" करता करता शेवटी ज्यावर शिक्का मोर्तब झालं ते म्हणजे "किल्ले कावनई".
किल्ले कावनई
रविवारी सकाळी कल्याणहून ठरलेली ७.५५ ची कसारा ट्रेन पकडून साडे नऊ वाजता कसाऱ्याला पोहोचलो. पावसाचा एक थेंबसुद्धा दूर दूर पर्यंत दिसत नव्हता. म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन झटपट नाश्ता करून कावनईच्या दिशेने रवाना झालो. कसाऱ्याहून कावनई म्हणजे जवळपास एक तासाचे अंतर. कडक उन्हामुळे आजूबाजूची डोंगररांगसुद्धा स्पष्ट दिसत होती. बरोबर ११ च्या सुमारास कावनईच्या पायथ्याशी पोचलो व अजिबात वेळ न घालवता प्रवासाला सुरुवात केली.
कसारा ते कावनई प्रवास
गावातून प्रवासाची सुरवात झाली तीच बजरंगबलीच्या मंदिरापासून. हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आम्ही कावनईच्या दिशेने पाहिलं पाऊल टाकलं. कावनई हा किल्ला छोटेखानी असल्याने वर चढाईस एक तास पुरेसा आहे. पावसाळ्यात उन्हाळा असल्याकारणाने आम्हाला जवळपास २ तास लागतील ह्याच अंदाजाने आम्ही निघालो होतो. तसं पाहिलं तर हा किल्ला ३ टप्प्यात मोडतो. पहिला टप्पा दर्गा , दुसरा टप्पा प्रवेशद्वार आणि तिसरा थेट बालेकिल्ला.
हनुमानाचे मंदिर
गावातून सुरुवात करून आम्ही पुढच्या १० मिनिटातच वर पठारावर असलेल्या दर्ग्यापाशी पोहोचलो तिथे काही मुलं गोट्या खेळत होतो किल्ल्यावर असलेल्या ह्या दर्ग्यामुळे ह्या किल्ल्याला दर्ग्याचा किल्ला म्हणून पण ओळखलं जातं तिथे ५ मिनिटं बसलो मुलांशी संवाद साधला आणि पुढच्या वाटेला लागलो.
दर्ग्याचा किल्ला
इतनी सी हसी, इतनी सी ख़ुशी...
छोटी असणारी ही चढण पण वरच्या उन्हात मोठी वाटत होती. पण किल्ला छोटा असल्याने आम्ही सुद्धा आरामात चालत होतो फायदा फक्त एकच होता की पाऊस नसल्याकारणाने फोटोग्राफीचा मनमुराद आनंद घेता येत होता. उजव्या बाजूला कावनई गावचा सुंदर नजर दिसतच होता. ते म्हणतात ना "परिस्थिती कशीही असो त्यातल्या त्यात पण जो आपला आनंद शोधतो ना तो सुखी माणूस"
कावनई गाव
ध्यानयोग
हवे तसे फोटो काढत आता आम्ही जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलो. चढाईस सोपा असलेल्या ह्या किल्याच्या वाटेतही पायऱ्या तयार केल्या आहेत. संथ चालीतही आम्हाला बालेकिल्ला समोर दिसत होता त्याच चालीने आता आम्ही आमच्या दुसऱ्या टप्प्यापाशी आलो तो म्हणजे किल्ल्याचं प्रवेशद्वार.
पायऱ्यांची वाट
कावनईचा बालेकिल्ला
ह्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास किमान एक २० फुटी शिडी लावली आहे ती शिडी म्हणजे खऱ्या अर्थाने किल्ल्याचं आधार कार्ड आहे. कारण त्या शिडीविना किल्ल्यावर प्रवेश करणं खूप जिकरीचे काम आहे. त्या शिडीच्या साहाय्याने वर गेल्यावर आपण थेट किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक छोटेखानी गुहा आहे.
प्रवेशद्वार
प्रवेशद्वाराशेजारील गुहा
इथून पुढे किल्ल्याचं भलं मोठं पठार एक तळं व तळ्याच्या समोर एक कामाक्षी मातेचं देऊळ नजरेस पडलं आणि समजलं की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो आहे. गडावर आजमितीस जास्त अवशेष शिल्लक नाही. गडावर प्रवेश करताच समोर येतं ते म्हणजे पडझड झालेलं एक धान्याचं कोठार आणि गडावर असलेलं एक बारमाही पाण्याचं टाकं.
शिवपिंड
धान्याचे कोठार
पाण्याचं टाके
इतक्या प्रवासात एक थेंब सुद्धा पाऊस लागला नाही म्हणून मंदिरापाशी थोडावेळ विश्रांती करायचं ठरवलं. पण डोंगरावरच हवामान म्हणजे क्षणार्धात ऊन आणि क्षणात पाऊस. येणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेता गडावर आधी फेरफटका मारायचं ठरवलं आणि मग जेवून घेऊ म्हणून तिथून पटकन काढता पाय घेतला गडाच्या चौफेर फेरफटका मारायला निघालो. गडाच्या डाव्या बाजूस गेल्यावर आजपण दिसून येते ती म्हणजे गडाची तटबंदी व आजूबाजूची डोंगरराग. त्यावरूनच लक्षात येत की ह्या किल्ल्याचा उपयोग हा टेहळणीसाठी केला गेला असावा.
तटबंदी
ऊन पावसाचा खेळ
गोगलगाय
मोती
इच्छा तिथे मार्ग
एक थेंब
कावनईच्या प्रवेशद्वारातून दिसणारा गावाचा विस्तार
अखेर म्हणतात ना ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड आम्ही सुमारे साडेतीनच्या सुमारास पुन्हा पायथ्याशी आलो. गावात अजूनही त्या दर्ग्यापाशी मुलं आमची वाट बघत होती त्यांना खाऊ दिला आणि आम्ही पुन्हा कसऱ्याच्या दिशेने रवाना झालो.
BYE BYE BACHHA PARTY
इतक्या वर्षातल्या नाशिकच्या प्रवासात प्रथमच कसाऱ्याहून ५.१७ ची लोकल मिळाली त्यामुळे ती पकडून लवकरच घर गाठलं
अजय ह्यावेळी ६.४० बरं का!!!😉
EXPLORE KAVANAI