Sunday, 29 September 2019

रतनगड : स्वराज्याचं सुवर्णरत्न (RATANGAD FORT)

            छोटे मोठे ट्रेक खूप झाले आता असा कोणतातरी ट्रेक घ्यायला हवा ज्याने खरंच ट्रेक केल्याचं समाधान वाटेल. काही दिवसांपूर्वी अंजनेरी केल्याने तिथल्या फुलांचा मोह अजूनही आवरला नव्हता म्हणून त्याच धाटणीचा कोणतातरी ट्रेक घ्यावा ह्या उद्देशाने रतनगड घ्यायचं ठरवलं. रतनगड म्हणजे रात्रभरचा प्रवास नक्की. पण असो काहीतरी मोठं करायचं म्हंटलं की छोट्यामोठया तडजोडी ह्या आल्याच. ठरलं तर मग शनिवार रविवार "किल्ले रतनगड".
किल्ले रतनगड
            शनिवारी रात्री कसाऱ्याला जाणारी शेवटची लोकल पकडायचं ठरलं शेवटची म्हणजे थोडक्यात कल्याणवरून रविवारी पहाटे पावणे दोनची लोकल पकडून पहाटे साडेतीनच्या सुमारास कासाऱ्याला पोहोचलो ठरल्याप्रमाणे आंनददादा आमची वाट पाहत उभेच होते. गाडीत बसलो आणि थेट रतनवाडीच्या दिशेने प्रवास सुरु केला. रात्रीच्या काळोखात कुठून चाललो आहे ह्याचा मागमूसही लागत नव्हता.


रात्रीचा प्रवास
                सकाळी जसं उजाडलं आणि आजूबाजूची डोंगररांग नजरेस पडली तसे आम्ही खडबडून जागे झालो आणि गाडी थांबवून बाहेर आलो आणि पाहतो तर काय?? एक बाजूला सह्याद्रीची डोंगररांग आणि दुसऱ्या बाजूस भंडारदरा. तिथे पाच मिनिटं थांबून पाय मोकळे केले आणि पुन्हा गाडीत बसून रातनवाडीच्या दिशेने निघालो. सुमारे सव्वासातच्या सुमारास आम्ही रतनवाडीत जाऊन पोहोचलो रतनवाडीचा नजारा काही औरच होता.
 सूर्योदय 
भंडारदऱ्यातील सकाळ
             गाडीतून उतरून प्रथम फ्रेश झालो आणि थेट भेट दिली ती रतनवाडीतील प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराला. मागे निळंभोर आकाश आणि समोर अमृतेश्वर मंदिर हे सौंदर्यच बघण्यासारखं होत. मंदिरात पाणी भरल्यामुळे आत जाता आलं नाही म्हणून बाहेरूनच मंदिराचे दर्शन घेऊन रतनवाडीतून रतनगड कडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली.

अमृतेश्वर मंदिर





मंदिरावरील कलाकुसर
शिवकालीन स्नानगृह  
             सकाळचं निसर्गरम्य वातावरण चहूबाजूस भातशेती, एकबाजूस पाणी अडवण्यासाठी घातलेला बंधारा त्यामागे ढगात लपलेला किल्ला रतनगड. हे सर्व सौंदर्य डोळयांत साठवून आम्ही गावातून पायवाटेने पुढे जाण्यास सुरुवात केली.
रतनवाडीत निसर्गरम्य दृश्य
           रतनगडाची वाट मोडते ती तीन टप्प्यात ते म्हणजे वाटेत लागणारी दोन पठार आणि तिसरा टप्पा आपल्याला थेट शिडीपाशी घेऊन जाते. तर सुरुवातीचा आमचा सुरू झालेला प्रवास हा पाऊलवाटेने ह्या वाटेने जरी चढ नसला तरी वळणावळणाची वाट बरीच होती त्यात वरून पावसाची जराही आशंका नव्हती पण हवेत गारवा असल्याने मोठी चाल जाणवत नव्हती त्यात आजूबाजूला असणारी सोनकीची फुलं जणूकाही आमचं स्वागतच करत होती. त्यांच्या स्वागताला उभं राहून आम्ही आता पहिल्या पठाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली










पर्यावरणाचा अविष्कार
             इथून खऱ्या अर्थाने चढाईला सुरुवात झाली पण जंगल असल्याने उन्हाचा तडाखा कमी झाला होता म्हणून त्या सवलीतून आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवला आजूबाजूच्या भल्यामोठ्या वनस्पती लक्षवेधून घेत होत्या काही महिन्यापूर्वी झालेल्या पावसात पडझड झालेली भलीमोठी वृक्ष वाट अडवण्याचा प्रयत्न करत होती. तरीही त्यावरून उड्या मारून आम्ही आता पहिल्या पठारावर जाऊन पोहोचलो.



जंगलवाट
              तिथे समोर एक छोटा धबधबा दिसत होता पण पाण्याचा आवाज बऱ्याच मोठ्या प्रमाणात येत होता म्हणून थोडं पुढे जाऊन पाहिलं तर खालच्या बाजूस त्याचा विस्तार बराच मोठ्या प्रमाणात होता मागे वळून पाहिलं तर पोहोचलेल्या उंचीचा अंदाज येत होता. तिथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या पठारावर जाण्यास सुरुवात केली.
             पाहिलं पठार ते दुसरं पठार हे अंतर म्हणजे किमान २५ मिनिट.  पण ह्यावाटेत तळपत्या उन्हावर फुंकर घालणारं एकमेव साधन होतं ते म्हणजे वाटेत लागणारे धबधबे. मी विचार न करता सरळ एका धबधब्याखाली बसलो आणि जीव शांत केला. एव्हाना दुसरं पठार आलं होतं.
विश्रांतीसाठीचा आडोसा
           इथून गडावर जाण्यास अर्धा तास बाकी होता एव्हाना १२ वाजले होते म्हणून वेळ वाया न घालवता वेग वाढवला शेवटी एका अश्या टप्प्यावर येऊन पोहोचलो जिथे दोन रस्ते जात होत्ते त्यातील वर जाणारी वाट हि रतनगडावर आणि समोर सरळ जाणारी वाट थेट पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड. तिथे बाजूलाच एक लिंबू सरबतचा स्टॉल होता तिथे लिंबू सरबत प्यायलो त्या काकांशी गप्पा मारल्या तर त्यांनी सांगितलं  गडावर महाराजांच्या काळात बंदुकीने सराव केला जायचा आजही तिथे पावसाळ्यात बंदुकीच्या गोळ्या सापडतात. 
हरिश्चंद्रगड रतनगड ला जोडणारी वाट 
शिवकालीन बंदुकीतील गोळ्या
            त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती घेऊन आम्ही आमच्या वाटेला लागलो. वाटेतच सर्पदर्शनाचा लाभ घेतला त्यावर चर्चा करता करता आता आम्ही थेट शेवटच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलो ते म्हणजे शिडी. तिथे जाऊन पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली की विकास इथपर्यंत पोहोचला होता. कारण मी दहा वर्षांपूर्वी जेव्हा रतनगडला भेट दिली होती तेव्हा तिथे फक्त एक शिडी होती ती सुद्धा पूर्ण मोडकळीस आली होती पण आत्ता ह्यावेळी पाहिलं तर गडावर पोहोचण्यास तब्बल तीन मजबूत शिड्या बसवल्या आहेत. शिडीजवळ पोहोचलो म्हणजे आम्ही आता जवळपास वर होतोच त्यामुळे मागे वळून पाहिल्यावर आम्हाला त्याचा प्रत्यय आला. वर पांढरेशुभ्र ढग खालच्या जंगलावर पडणारी त्यांची सावली आणि मधूनच वाहणारं प्रवरा नदीचं पात्र.
सर्पदर्शन
शिडीमार्ग
प्रवरेचं पात्र 
                    आलेल्या शिड्यांचा आधार घेऊन आम्ही सर्वप्रथम रखवालदार दरवाज्यातून गडावर प्रवेश केला  इथून उजव्या हाताला गेल्यास प्रथम रत्नाई मातेचं देऊळ लागलं त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो.  पुढे दुसरा दरवाजा लागला तो म्हणजे गणेश दरवाजा  गणेश दरवाज्यातून प्रवेश करून गडावर प्रवेश केला गडाचे संपूर्ण सौंदर्य हे पिवळ्या धम्मक फुलांनी मोहरून निघाले होते.
 रखवालदार दरवाजा 
  रत्नाईमाता मंदिर
गणेश दरवाजा

 






गणेश दरवाज्यावरील शिल्प
              गणेश दरवाज्यातून प्रवेश करून खालच्या बाजूस जाऊन आजूबाजूचा प्रवेश न्याहाळण्यास सुरुवात केली  गडावर चहूबाजूस सोनकीची पिवळी धम्मक फुलं पसरली होती खाली असणाऱ्या दरीतून ढगांची ये जा चालू होती  मागच्या बाजूस दिसणारा बुरुज हा ढगांसोबत लपाछपीचा खेळ खेळत होता हे सगळं निसर्गाचं रूप बघता आम्हाला इथे वेळ काढण्याचा मोह आवरला नाही म्हणून इथेच जेवायला बसण्याचा निर्णय घेतला


ढगांशी लपंडाव खेळणारा बुरुज
 श्रीखंड पोळी 
सह्याद्रीची डोंगररांग

ऐसी जिंदगी और कहा ?
गणेश दरवाज्याचे आतून टिपलेले दृश्य
               पोटभर जेऊन सर्वात आधी आम्ही समोर दिसणाऱ्या बुरुजात प्रवेश केला आज कित्येक वर्षे होऊनही हा बुरुज आपल्या भक्कमपणाची साक्ष देतो तिथून पुढे आम्ही आमची वाट धरली ती म्हणजे नेढ्याच्या दिशेने. वाटेत एक पाण्याचं टाकं लागलं ते म्हणजे प्रवरा नदीचं उगमस्थान. भंडारदरा परिसरात वाहणाऱ्या प्रवरा नदीचा उगम हा ह्याच ठिकाणाहून होतो म्हणून बरीच लोकांचं हे श्रद्धास्थान आहे. तिथे नतमस्तक होऊन आम्ही पुन्हा नेढ्याच्या दिशेने निघालो.
बुरुजातुन टिपलेले दृश्य
प्रवरेचे उगमस्थान
              कोणत्याही गडावरचे माझं आवडतं ठिकाण जर कोणतं असेल तर ते म्हणजे नेढे. नेढे म्हणजे डोंगराला नैसर्गिकरित्या पडलेले छिद्र. त्यात येणारा वारा अनुभवला तर घरच्या एसीची हवासुद्धा त्यासमोर काहीच नाही. धुकं नसताना नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो.
नेढं 
 नेढ्यातून  २००९ साली टिपलेलं  दृश्य ... 
... आणि हे २०१९ सालच
                 सुमारे १५ मिनिटे नेढ्यात बसून आता आम्ही त्रम्बक दरवाज्याकडे कूच केली त्र्यंबक दरवाजा आणि कोकण दरवाजा हे दोन्ही दरवाजे बाजूबाजूलाच आहेत त्र्यंबक दरवाजातून प्रवेश करताच उजव्या हातास गेल्यास कोकण दरवाजा आहे कोकण दरवाज्यातून गडावरून खाली उतरण्यास वाट आहे पण ही वाट मोडकळीस आल्यामुळे ह्यावाटेने जाण्यास कोणी साहस करत नाही.
 त्र्यंबक दरवाजा
कोकण दरवाजा
 कोकण दरवाज्यातून खाली जाणारी वाट 
                 गडावरील ही सर्व ठिकाण बघून आम्ही आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत दिसणाऱ्या सोनकीच्या फुलांमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही म्हणून तिथे एक फोटो काढला आणि आपल्या वाटेल लागलो.
                  एव्हाना तीन वाजले होते खाली उतरेपर्यंत पाच वाजणार हे ध्यानात ठेवलं होतं कारण उतरताना पावसाचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे त्याच्याही आस्वाद घेत खाली उतरायचं ठरवलं. गणेश दरवाज्यापाशी येऊन पाहिलं तर माश्याच्या आकारात सगळे ढग एकवटले होते त्याच दृश्य टिपून आम्ही तिथून खाली उतरलो

परतीच्या प्रवासातील वातावरण
                  पाच वाजतील असं ठरवलं असलं तरी त्याचे साडेपाच झालेच खाली गाडी आमची वाट बघत होती कारण कसाऱ्याहून साडेआठ ची गाडी पकडण्याचा विचार होता पण ते काही शक्य होऊ शकलं नाही अखेर साडेनऊची गाडी पकडून साडेअकराच्या सुमारास घर गाठलं. 
EXPLORE RATANGAD