Sunday, 1 September 2019

किल्ले अंजनेरी (ANJANERI FORT)

         पावसाच्या भीतीमुळे गेले काही दिवस नाशिक पट्टा निषिद्ध ठेवला होता पण आता मुसळधार पाऊस संपला आणि श्रावणसरी सुरू झाल्या होत्या म्हणून गेले काही दिवस दुर्लक्षित झालेल्या नाशिककडे पुन्हा लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि ज्या पावसामुळे इतके दिवस ठरवून पण राहिलेल्या ठिकाणी जायचं ठरवलं ते म्हणजे किल्ले अंजनेरी. किल्ले अंजनेरी म्हणजे हनुमानाचे जन्मस्थान. जे नाशिक जवळील त्रंबकजवळ स्थित  आहे.
किल्ले अंजनेरी
              अंजनेरी नेहमीच्या प्रवासापेक्षा दूर असल्याकारणाने लवकरची लोकल पकडायचे ठरवले. त्याप्रमाणे कल्याणहुन सकाळची ६.२८ ची लोकल पकडून प्रथम कसारा गाठलं. उतरून प्रथम नाश्ता करून मग अंजनेरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. कसारा अंजनेरी अंतर ६० किमी. त्यात ह्या पावसाळ्यात कसारा घाटाची झालेली दुर्दशा पाहता किमान २ तास लागणार हे नक्की होतं. अगदी त्याचप्रमाणे आम्ही बरोबर साडेदहाच्या सुमारास अंजनेरीच्या पायथ्याशी जाऊन पोहोचलो.
            दोन तासाच्या प्रवासानंतर गाडीतून उतरून सर्वप्रथम पाय मोकळे केले. उतरल्यावर समोरच डोंगराचा आडवा पट्टा दिसत होता आधी विचार केला की ह्यातला अंजनेरी कुठला आणि आपल्याला जायचं कुठे आहे म्हणून तिथल्याच एका गावकऱ्यांला विचारलं दादा ह्यातला अंजनेरी कुठला तर त्याने सांगितलं हा समोर दिसतोय ना तो अंजनेरी. सदर किल्ला हा वनविभागाच्या अख्यारीत येत असल्याने किल्ल्याला भेट देताना खाली पावती फाडावी लागते. तिथे पावती फाडली आणि ट्रेकला सुरुवात केली.
अंजनेरीची पर्वतरांग 
गावचं सौंदर्य
              सुरुवातीची वाट ही गाड्या जाण्यासाठी असल्याने तेव्हा चालताना काही वाटलं नाही पण इथून पुढे वन अधिकार्यांनी तपासणीसाठी एक तपासणी कक्ष नेमला आहे तिथे पर्यटकांची नोंद होते व बॅग्ससुद्धा तपासल्या जातात. वनाधिकारी सगळ्यांना सूचना देतात माकडांना काही खायला घालू नका कचरा करू नका प्लास्टिक असेल तर आपल्यासोबत परत आणा पण गडावर चालू असलेले खाद्यपदार्थाची दुकानं मात्र जोमात चालू आहेत, असो त्यांनी पदार्थ विकले नाही तर कचरा कसा होईल आणि कचरा झाला नाही तर सरकार दंड कोणाकडून वसूल करेल. हे सगळे विचार ते आपल्या डोक्यात. ह्या तपासणी कक्षाजवळ जंगलात आढळून येणारे पक्षी फुलं ह्यांचे फलक लावले आहेत त्यांचा एक फोटो काढून आम्ही सुद्धा आमची शोध मोहीम सुरू केली कसा आणि प्रवासाला लागलो.
                गडाची चढाई म्हणायचं झालं तर ती दोन टप्प्यात पहिला टप्पा हा अंजनी मातेच्या मंदिरापर्यंतचा आणि दुसरा थेट हनुमान मंदिरात. ८०% वाट ही पायऱ्यांची आहे त्यामुळे म्हणायचं झालं तर त्रास नव्हता पण दुसरा त्रास म्हणजे माकडांचा. गडाच्या उंचीचा आकार पहिला तर कसरतीचा अंदाज येतच होता म्हणून सुरुवातीला थकायच्या आत एक एक टप्पा पार करायचं ठरवलं. चढताना डाव्या बाजूला अंजनेरीचा कडा उजव्या समोर कोसळणारा धबधबा उजव्या बाजूला खोल दरी आणि त्याच्या कडेवर दबा धरून बसलेली माकडं. म्हणजे समोर निसर्गसौंदर्य आणि बाजूला भीती.

नयनरम्य दृश्य
               हा आनंददायी टप्पा पार केल्यावर आम्ही एका घळीत येऊन पोहोचलो. हा खरा वरती पोहोचण्यासाठी असलेला पहिला टप्पा. डाव्या बाजूला एक जैन धर्मियांची असलेली गुहा आजूबाजूला होणारी माकडांची वर्दळ आणि पायऱ्यांवरून ओसंडून वाहणारं पाणी ओलांडून आम्ही आता एका पठारावर येऊन पोहोचलो.




जैन लेणी
                  समोर अंजनीमातेचे मंदिर दृष्टीक्षेपात पडलं. आधी वाटलं कि प्रवास संपला पण वरच्या बाजूस असणार धुकं पाहिलं आणि गैरसमज दूर झाला. धुक्यात सुद्धा माणसं चालताना दिसत होती तेव्हा समजलं खरा पल्ल्या तर अजून खूप दूर आहे. वेळ न घालवता पुन्हा वाटेला लागणार तोच समोरून भल्या उंचावरून कोसळणारा धबधबा दिसला त्यास दुरून का ना होईना पाहायला जायचा मोह आवरू शकलो नाही.
अंजनी पठार
अंजनी मातेचे देऊळ
धुक्यातला अंजनेरी
निसर्गसौंदर्य
             समोरच डाव्या बाजूला एक मोठं तळं लागलं ते म्हणजे हनुमान तळं. ह्या तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा आकार हा हनुमानाच्या पायासारखा आहे. तिथे पाच मिनिटं विश्रांती घेऊन पुन्हा वाटेला लागलो.

हनुमान तळं 
                सदरचा असलेला पट्टा हा वन विभागाच्या अख्यारीत येत असल्याकारणाने इथली जैवविविधता येथील कीटक आवर्जून लक्ष वेधून घेत होती. आजूबाजूची असणारी फुलं पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली कि दरवर्षी कासच्या पठारावर जायच्या आधी अंजनेरी ला एक भेट दिली तर अर्ध्याहून अधिक फुलं तर इथेच मिळतील. विविध फुलांचे फोटो कॅमेऱ्यात टिपून आता आम्ही जवळपास वर पोहोचलो होतो.



















अंजनेरीचं झ"कास" जंगल 
               जवळपास ह्यासाठी म्हणतोय कारण धुकं इतकं होतं की कुठे जायचंय ते सुद्धा समजत नव्हतं म्हणून एका ठिकाणी थांबून सगळ्यांच्या येण्याची वाट पाहिली. थोड्याच वेळात सगळे एकत्र आले आणि आता आम्ही सोबत चालायला सुरुवात केली. एव्हाना दीड वाजला असल्याकारणाने भूक सगळ्यांनाच लागली होती मंदिर समोर असून ही दिसत नव्हते.
 FOGGGG...............
            शेवटी एक वाऱ्याची झुळूक आली धुकं बाजूला झालं आणि आपण म्हणतो तसं पवनपुत्र हनुमानाचे दर्शन झाले. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मंदिरात आधीपासूनच गर्दी असल्याने सगळ्यांनी "आधी पोटोबा, नंतर विठोबा" करण्याचा निर्णय घेतला.



अंजनेरी पर्वतावरील हनुमान जन्मस्थान
                  तिथे पोटभर जेवलो आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाहेर पाऊस कोसळतच होता. खरंतर पाऊस कमी होण्याची वाट पहात होतो पण घड्याळात पाहिलं तर तीन वाजले होते आणि इतक्या उंचीवर पोहोचल्यावर पाऊस कमी होण्याची शक्यता कमीच, म्हणून होतो त्या परिस्थितीत परतीचा निर्णय घेतला चढायला तीन तास लागले म्हणजे उतरायला दोन तास तर कुठेच नाही. हळू हळू गप्पा गोष्टी करत चढतानाच्या आठवणी जाग्या करत आम्ही साडेपाचच्या सुमारास पुन्हा पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथून पुन्हा २ तास प्रवास म्हणजे सव्वाआठ च्या लोकल ची अपेक्षा ठेवली होती पण खचलेल्या कसारा घाटाने त्यावरही पाणी फेरलं वाटेत लागलेल्या ट्रॅफिकमुळे थेट सव्वा नऊच्या लोकलनेच प्रवास करायची वेळ आली
           अंजनेरीबाबत एक वाक्यात सांगायचं झालं तर अंजनेरी हा खऱ्या अर्थाने परीक्षा पाहणारा ट्रेक आहे. आणि विशेष म्हणजे ह्याचं निसर्गसौंदर्य. ते अनुभवण्यासाठी तरी त्याला एकदा भेट द्यायलाच हवी.

ANJNERI PANORAMA 
EXPLORE ANJANERI

2 comments:

  1. अप्रतिम लिखाण आणि फोटो

    ReplyDelete
  2. Nice one bro. I liked that jh'kaas' jungle ;) and photos of the flowers are really good.

    ReplyDelete