Sunday, 14 July 2019

त्रिंगलवाडी (TRINGALWADI)

          पावसाळा सुरू झाल्यावर रविवारच्या दिवशी घरी राहणं हे म्हणजे नुसतं पाप नसून हा एक गुन्हा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून माणिकगड नंतर काय करायचं ह्याचा शोध सुरू झाला आणि छोटं-मोठं, छोटं-मोठं करता करता गाडी "त्रिंगलवाडी "जवळ येऊन थांबली. बऱ्याच दिवसापासून नाशिकच्या बाजूची भ्रमंती झाली नसल्याने मुद्दाम नाशिकला जायचं ठरवलं.
त्रिंगलवाडी
           कल्याण वरून सकाळी आठ वाजताची ट्रेन पकडून साडेनऊच्या सुमारास कसाऱ्याला पोहोचलो. नाश्ता वगैरे करून साडेदहाच्या सुमारास कसाऱ्याहुन त्रिंगलवाडीच्या दिशेने प्रवास सुरु केला. पाऊस सुरु असल्यामुळे कसारा घाटातच बरेच धबधबे दिसले. त्रिंगलवाडी म्हणजे इगतपुरीहुन सुमारे आठ किलोमीटरवर असणारं छोटंसं गाव. ट्रेक जरी त्रिंगलवाडी असला तरी त्याचं पायथ्याचे गाव म्हणजे "तळ्याची वाडी". भर पावसात ११.३० च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर गावचं निसर्ग डोळ्यात भरणारं होतं, पावसाळा असल्याने शेतातली कामे जोरात चालू होती. वाटेत काही गुराखी गुरांना घेऊन बाहेर पडले होते.
कसारा घाट

गावातली हिरवळ
गुराखी
                इकडे यायच्या आगोदर ऐकलं होतं धबधब्याच्या दिशेने जायचं आहे पण इकडे पोहोचल्यावर पाहिलं तर जिथे बघावं तिथे धबधबेच आहेत. त्यात त्रिंगलवाडी कुठे आहे तेच दिसत नव्हतं म्हणून गावातून गाईड घायचं ठरवलं.
कुठे जायचं नक्की???
                   मग मोठ्या माणसाला कोणाला तरी घेण्यापेक्षा गावातली लहान मुलं बरी पडतात म्हणून मग एका लहान मुलाला विचारलं येतो का?? तर तो खुश होऊन हो म्हणाला.  सोबत त्याची बहीण पण आली. पण त्यांच्या कडे ना छत्री होती ना रेनकोट. पण फक्त पैसे मिळणार म्हणून ह्या तुफान पावसात यायला तयार झाले त्या मुलाचं नाव देविदास आणि ताईचं नाव कल्पना. देविदासकडे पाहिलं तर तो बिचारा कुडकुडत होता पण त्याने पूर्ण प्रवासात एकदाही माघार नाही घेतली त्यांच्याकडे बघून एक गोष्ट नक्की लक्षात आलं की "आपल्याकडे आधीपासूनच अच्छे दिन आहेत ह्यांच्यापर्यंत ते पोहचण्याची गरज आहे". त्या दोघांकडे बघून मन भावुक झालं.
कल्पना आणि देविदास
              गडावर जाणाऱ्या वाटेची सुरुवातच ओढ्यातून झाली आमचा पूर्ण ग्रुप तो ओढा ओलांडून शेतातल्या वाटेला लागला. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य म्हणायचं झाला तर चहूबाजूंनी डोंगर आणि त्यावरून बेफामपणे कोसळणारे धबधबे. सगळं सौंदर्य कॅमेरात टिपून पुढे निघालो.


किल्ल्याकडे जाणारी पायवाट
                  किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून लक्षात येते की  किल्ल्याची निर्मिती हि १० व्या शतकात झालेली असावी. पायथ्याशी असलेल्या ह्या लेणीमध्ये जैन धर्मगुरू पाहिले हे आसनस्थ असलेली एक गुहा आहे. आत किर्र काळोख असल्याने आतील वास्तू नजरेस पडत नाही पण गुहेच्या बाहेरील बाजूस असणारे कोरीवकाम आजही आपले लक्ष वेधून घेते. ह्या लेणीच्या बाहेर बरीच मोडकळीस आलेली शिल्पे दिसतात. काही काळ विसाव्यासाठी ही गुहा उत्तम आहे.
जैन लेणी
प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरील शिल्प
आतील बाजूस असलेले खांब


बाहेरील शिल्प
               तिथून डाव्या बाजूस पडणाऱ्या दिसणाऱ्या धबधब्याच्या दिशेने वर गेल्यास आपण गडाच्या दिशेने मार्गस्थ होतो. चालता चालता मध्येच मागे वळून पाहिल्यास गावचा सुंदर नजारा पहावयास मिळतो. पुढे थोडंस चालत गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो तिथे पोहोचल्यावर समोर त्रिंगलवाडी व डाव्याबाजूस तळ्याची वाडी. इथे तुफान वारा असल्याकारणाने ५ मिनिटं थांबून पुढे निघालो.




 तळ्याची वाडी 
            पुढे जात असता दोन दगडाच्या मध्यभागी एक विंचू दृष्टीक्षेपात आला इतक्या वर्षात साप खेकडे हे येता जाता दिसायचे पण विंचू हा पहिल्यांदाच दिसला होता त्याचं परफेक्ट फोटो सेशन करून पुन्हा आपला प्रवास सुरु ठेवला.



            आता पुढे धुकं असल्याकारणाने आम्ही देविदास आणि कल्पनाच्या सोबत चालायचं  ठरवलं. गावकरी असल्याचा एकमेव फायदा म्हणजे त्यांना सोपे रस्ते चांगले माहिती असतात म्हणूनच गडावर जाण्यासाठी असलेल्या दोन रस्त्यांपैकी त्यातल्या त्यात चढण्यासाठी सोप्प्या असलेल्या वाटेवरून ते आम्हाला घेऊन गेले. वाटेत त्रिंगलवाडीच्या महाकाय खडकाच्या खाली बसण्यासाठी एक जागा दिसली तिथं २ मिनिटं शांत बसलो व पुढे निघालो.
 ऐसी आझादी और कहा??
धुक्यातला  त्रिंगलवाडी
ध्यानमंदिर  
            आता आली ती गडावर थेट वर जाण्याची असलेली वाट ती म्हणजे खडकात खोदून तयार केलेल्या पायऱ्या. सुरवातीला खडतर असणाऱ्या ह्या पायऱ्यांची नंतर आपल्याला सवय होते. धुकं असल्याकारणाने सुरवातीला पायऱ्याचं वरचं स्वरूप काहीच दिसत नव्हतं म्हणजे खऱ्या अर्थाने ते सगळ्यासाठी चकित करणारं होतं. त्या पायऱ्यांची उंची म्हणजे चालताना गुडघे छातीपर्यंत पोहोचतात. पायऱ्या संपल्यावर हनुमानाची एक भव्य कलाकृती डोळ्यासमोर उभी ठाकली. गडद भगव्या रंगात रंगवलेल्या ह्या हनुमानाच्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरतं.
जाण्यासाठी असणारी पायऱ्यांची वाट

जय हनुमान      
 गडाचं मुख्य प्रवेशद्वार 
              शेजारीच गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातून प्रवेश केल्यावर आपण थेट गडाच्या आवारात प्रवेश करतो. त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्‍या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. ह्यावाटेवरून गेल्यावर सर्वात वरती एक शंकराचे मंदिर लागते. त्या मंदिराचे दर्शन घेतले. एव्हाना एक वाजल्याकारणाने भोजनाची वेळ झाली होती म्हणून आम्ही सगळे व कल्पना आणि देविदास ह्यांना सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसवले.
सर्वोच्च माथा

महादेवाचं मंदिर
हर हर महादेव
               देविदासच्या थंडीमुळे कुडकुडणाऱ्या शरीराकडे बघून पडणाऱ्या पावसाकडे बघून सुद्धा राग येत होता. त्यांना पोटभर जेवायला देऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो येताना आमच्याकडे बराच वेळ असल्याने आरामात खाली उतरण्याचा निर्णय घेतला  परतीचा प्रवास  वेगळ्या वाटेने असल्याने उतरताना  एका बाजूस एक धान्याचे कोठार दिसले व पुढील बाजूस उतरण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या. ह्या पायऱ्यांच्या बाजूसच एक धबधबा होता तिथे तोडा वेळ घालवून  व निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेऊन सुमारे तीन वाजताच्या सुमारास आम्ही पुन्हा तळ्याच्या वाडीत उतरलो.
धान्याचं कोठार


छोटेखानी गुहा
धमाल , मजा आणि मस्ती
           देविदास व कल्पना ला त्यांचं मानधन देऊन आम्ही पुन्हा कसऱ्याच्या दिशेने रवाना झालो कसाऱ्याला येऊन कडक कॉफी घेतली आणि पुन्हा संध्याकाळचा नाष्टा करून साडेसहाची लोकल पकडली. गप्पा मारत मारत साडेसात वाजता पुन्हा घरी परतलो.
अजय साडेसात बरं का!!!😜😜

PIC OF THE DAY 

Saturday, 6 July 2019

माणिकगड : सह्याद्रीचं माणिकरत्न (MANIKGAD FORT)

               पावसाळ्यातील पहिल्या ट्रेकच्या नंतर पावसाने जी दडी मारली ती परत येण्याची चिन्ह दिवसेंदिवस काही दिसत नव्हती शेवटी वैतागून गुरुवारी कुठेतरी दूरचा दौरा करण्याचा विचार करत असतानाच शुक्रवारी दुपारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. तेव्हा पुन्हा एकदा उत्साह जागृत झाला आणि परत आपल्या सह्याद्रीच्या दिशेने पावलं वळवली. कुठे जायचं हा प्रश्न असला तरी इर्शाळगडच्या वेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला माणिकगडचं खुळ डोक्यात घातलं होतं म्हणून जास्त विचार न करता एकमताने ठरलं कि जायचं कुठे तर "माणिकगड".
  माणिकगड
         माणिकगडला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे अंबरनाथहून ८ वाजताची लोकल पकडून ९ वाजता कर्जतला जाऊन आपली ठरलेली गाडी पकडली आणि माणिकगडच्या पायथ्याचे गाव गाठलं ते म्हणजे "वडगांव". कर्जत ते वडगाव हे अंतर सुमारे १८ किमी आहे.  वडगाव वरून माणिकगड जरी समोर दिसत असला तरी तिथपर्यंत पोहोचण्याची वाट अजिबात साधी नाही.  गडावर चढण्यास सुमारे ७ किलोमीटरची लांबसडक पायवाट व ती पण विंचू काट्यासारखी.
गावातून दिसणारा माणिकगड 
माणिकगडाकडे वाटचाल करणारे मावळे.
            वडगाव मध्ये पोहोचल्यावर गावकऱ्यांशी चौकशी करून प्रथम वाटेचा अंदाज घेतला व प्रवासाला सुरुवात केली एव्हाना साडेदहा वाजले होते.  प्रथमदर्शनी पाहिल्यास द्विधा मनस्थिती होत होती की गाईड घ्यावा की नाही?? पण नंतर विचार आला की नकोच. तसं आत्ताची परिस्थिती पहिली तर गडावर जाण्यास गाईडची गरज नाही. गावातल्या शेतातून चालल्यावर पाहिले एक चढाव पार केल्यावर  मागे वळून पाहिलं तेव्हा वडगावचा पूर्ण नजारा एक नजरेत भरला.
वडगाव
            पुढे काही गावकरी गुरं चरायला घेऊन आले होते.  त्यांच्याकडूनही वाटेची खातरजमा केली एव्हाना चालून अर्धा तास झाला होता इतका वेळ ढगात लपलेल्या माणिकगडने प्रथम आम्हाला दर्शन दिले त्यासोबत एक फोटो काढून पुढे निघालो नुकताच पाऊस पडल्याने जागोजागी मशरूम दिसत होते
 गुराखी 

            पावसाची ये जा चालू होती पण समोरच्या गडाचा अंदाज लक्षात घेता एक गोष्ट स्पष्ट झाली होती की वर पर्यंतची चाल काही साधी नाहीये त्यामुळे न थांबता आम्ही आमची चाल सुरूच ठेवले थोडं वर गेल्यावर एक भलंमोठ पठार लागलं ते म्हणचे "दिवाणमाची"
 दिवाणमाची 
              दिवाणमाचीवर पोहोचल्यावर समोर दोन रस्ते दिसले म्हणून तिथेच थांबून व्यवस्थित खातरजमा करून उजव्या हाताचा रस्ता पकडून गडाकडे वाटचाल सुरू केली. गडावर जाण्यासाठी जागोजागी फलक व संपूर्ण वाटेवर झाडावर लाल रिबीन बांधून ठेवल्या आहेत जेणेकरून आपल्याला आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री होते. आधी म्हणल्याप्रमाणे विचुकाट्यासारखीची हीच ती चाल, जी उजवीकडे जाऊन पुढे डाव्याबाजूने आपल्याला गडावर घेऊन जाते.


गडावर जाण्यासाठी असलेले दिशादर्शक व फलक
            उजव्याबाजूची ही वाट म्हणजे पूर्ण जंगलवाट. नुकताच पाऊस सुरू झाल्याने बरेचसे प्राणी कीटक बाहेर पडलेले दिसत होते.  जागोजागी पाणी आपली वाट काढत त्याच रूपांतर धबधब्यात करण्याच्या तयारीत होते आजूबाजूचा हिरवागार गालिचा आणि शांतता हा आजच्या काळात खऱ्या अर्थाने दुर्मिळ योगायोग आहे. निसर्गाच्या सानिध्यातील हा आनंद लुटत व वाटेतील निदर्शनास येत असलेल्या ननैसर्गिक किमयेचे काही फोटो काढत आम्ही पुढे जात होतो. तोच वरील धुकं बाजूला होऊन माणिकगड चं खरं रूप नजरेस पडलं.
निसर्गाची किमया :














माणिकगडाचं खरं रूप
            काही काळ इथे थांबून पुढे निघालो. पुढे एक हनुमानाचं छोटेखानी मंदिर दिसलं. त्यातली मूर्ती पण काही दुर्मिळच होती. त्या हनुमानाच्या पायाखाली कोणाची तरी प्रतिमा होती. ते सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं. हे मंदिर म्हणजे गडाच्या वाटेवरील मध्यवर्ती ठिकाण.  आतापर्यंत पठारावरून चालत आलेला प्रवास आता वरच्या दिशेने सुरु होणार होता व आताची वाट म्हणजे घनदाट जंगलातली वाट.
 
वाटेवरील हनुमान मंदिर
               इथून पुढे १० मिनिटं चालत गेल्यास डाव्याबाजूने जाणारी वाट ही थेट गडावर घेऊन जाते ही वाट म्हणजे घनदाट जंगल आणि पाऊस असल्याने कोसळणाऱ्या धबधब्यांची वाट. ह्या सगळ्याची मजा घेत आम्ही आता माणिकपासून फक्त २० मिनिटं दूर होतो.  एक चढण पार केली आणि थेट धुक्याच्या साहाय्याने आम्ही गडावर प्रवेश केला



गडावर पोहोचण्यासाठी जंगलवाट          
               गडावर प्रवेश करताच प्रथम एक पाण्याचं टाकं आणि तटबंदी नजरेस पडली.  तेव्हा खात्री पटली की आपण गडावर प्रवेश केला. गडावर एकूण पाण्याची ४ टाकं आहेत. ह्या तटबंदीला डाव्या हाताला ठेवून उजव्या हाताने वर केल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

 गडाची तटबंदी
             गडावर प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधून आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरुवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.
चुन्याचा घाणा
प्रवेशद्वार
धान्याचं कोठार व दुसरं प्रवेशद्वार
 गडावरील पाण्याचं टाकं 
जिंकलस गड्या!!!
              उन्हाळ्यात आल्यास किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. गडाच्या मागच्या बाजूस जाऊन गावचा परिसर न्याहाळला धुक्यांनी भरलेल्या ह्या दरीत पाऊस वर आणि ढग ह्या तिघांचा खेळ बघण्यात वेगळीच मजा येत होती

स्वर्गसुख 
            पावसाचा अंदाज घेऊन आता आम्ही जेवायला सुरुवात केली. पण शेवटी पाऊस आलाच. मग काय पावसातच जेवलो व पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. एव्हाना अडीच वाजले होते. उतरताना वेळेचा अंदाज घेतला व चालीचा वेग वाढवला तरीही खाली पोहोचण्यास साडेपाच वाजले.
         दिसायला छोटेखानी वाटणारा हा गड पण त्यास पोहोचण्यासाठी असलेली वाट ही दमछाक करणारी आहे. म्हणून माणिकगड करावयाचा झाल्यास तो पावसाळ्यातच करावा. येताना गाडीच्या खिडकीतून आम्हाला पुन्हा माणिकगडचं झालं तेव्हा आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो ह्या गोष्टीवर आम्हालाच विश्वास बसत नव्हता. अखेर सगळ्या आठवणींची पुंजी घेऊन कर्जत स्टेशनवरून परतीची ट्रेन पकडून घर गाठलं.
पुन्हा भेटुत.... लवकरचं .