Sunday, 9 February 2020

कर्नाटक दौरा भाग १ - (महाकूट मंदिर, पट्टडकल, ऐहोले)

            बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून हंपीला जाण्याचा फक्त विचारच चालला होता पण ह्यावेळी दिवाळीच्या निमित्ताने हा दौरा सत्यात उतरवण्याची संधी होती. म्हणून फ़क्त आठ दिवस अगोदर सर्व नियोजन केलं. फक्त एक आठवडाच होता म्हणजे Reservation confirm मिळणं अशक्यच होतं म्हणून जसे मिळतील तशी तिकीट काढली बाकी सगळं तेव्हाचं तेव्हा बघू म्हणून सोडून दिलं. बरं फक्त हंपी करण्यापेक्षा वाटेत येणारे बदामी आणि आजूबाजूची काही ठिकाण घ्यायची ठरवली. म्हणून आधी कल्याण ते बदामी एक Reservation काढलं आणि बदामी आणि हंपीचं हॉटेल बुक करून ठेवलं
             १९ ऑक्टोबर शनिवारी रात्री गदग एक्सप्रेस पकडून रविवारी सकाळी बरोबर १० वाजता बदामी स्टेशन ला उतरलो. स्टेशन बाहेरून हॉटेलपर्यंत रिक्षा केली मुद्दाम मी माझं हॉटेल बस स्टेशनच्या समोर घेतलं होतं जेणेकरून हंपी ला जाताना काही त्रास होणार नाही बदामी मध्ये दोन दिवस आणि हंपी मध्ये तीन दिवस असं नियोजन होतं. बदामी मध्ये पाहण्याची ठिकाणं म्हणजे पाहिलं बदामी, दुसरं महाकूट मंदिर तिसरं पट्टाडकल आणि चौथं ऐहोले.
दिनांक :- २०.१०.२०१९
        बदामी मध्ये वास्तव्य असल्यामुळे पहिल्याच दिवशी  महाकूट, पट्टडकल आणि ऐहोले करायचं ठरवलं ज्या रिक्षेने प्रवास केलेला त्यांनाच तयार केलं आणि त्याच रिक्षेने नंतरचा प्रवास सुरू केला.

महाकूट मंदिर : -
                    बदामी च्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशातील "महाकूट मंदिर" हे प्रमुख देवालय आहे. महाकूट हे बदामी जवळील एक छोटंसं आणि शांत असं एक गाव आहे दोन डोंगरांमध्ये असलेलं हे मंदिर शैव आणि शाक्त ह्यांचं धार्मिक स्थळ आहे महाकूट वासियांसाठी हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार अगस्थी मुनींशी झालेल्या युद्धात सहोदर वातापी आणि इल्वल ह्या दोन राक्षसांचा वाढ ह्याच ठिकणी झाला होता.
                 महाकुटेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे मंदिरात अर्धमंडप मुखमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आजही नित्यनियमाने तिथे पूजा होत असते
नंदिकेश्वर महाकूट मंदिर 








                      महकुटेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो ते म्हणजे पट्टडकल. कर्नाटक चे लोक त्याला "पट्टाडकलू" म्हणून संबोधतात पट्टडकल हे ठिकाण बदामी शहरापासून सुमारे १८ किमी दूर आहे पट्टडकल आणि आईहोले ही दोन्ही ठिकाणं एकाच दिवशी करायची झाल्यास बस मिळणं कठीण असल्याकारणानेच रिक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो.
पट्टडकल
               पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह.  पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे
१ ) काडसिद्धेश्वर मंदिर
२) जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
५) विरुपक्ष मंदिर
६) मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
८) चंद्रशेखर मंदिर

१) काडसिद्धेश्वर मंदिर
       कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.
काडसिद्धेश्वर मंदिर
२) जांबूलिंग मंदिर
         जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.
जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
       आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.
गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
       संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
संगमेश्वर मंदिर
 ५) विरुपाक्ष मंदिर
         विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.
विरुपाक्ष मंदिर
६) मल्लिकार्जुन मंदिर
         मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.
मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
            काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.
काशीविश्वेश्वर मंदिर
८) चंद्रशेखर मंदिर
चंद्रशेखर मंदिर       

        सुमारे दोन तास पट्टडकल मध्ये घालवल्यानंतर गाडी ऐहोलेच्या दिशेने वळवली तीनच्या सुमारास ऐहोले मध्ये पोहोचलो पट्टडकल जसं तसंच ऐहोले होतं.  तिथेही बरीच मंदिर, एक विहीर अश्या पुरातन वास्तू. तिथे गेल्यावर सर्वात पाहिले पोहोचलो ते तेथील प्रसिद्ध दुर्ग मंदिरात. दुर्ग मंदिर हे प्रसिद्ध आहे ते त्यावरील शिल्पांसाठी. बराच वेळ असल्याकारणाने दुर्ग मंदिर मनसोक्त न्याहाळण्यास सुरुवात केली. 

दुर्ग मंदिर :-
             खरं पाहिलं तर हे दुर्ग मंदिर नसून हे शिव मंदिर आहे पण डोंगराच्या जवळपास असल्याकारणाने त्यास दुर्ग मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराचा आकार बघितला तर तो तो हत्ती च्या पाठीसारखा आहे . मंदिराच्या आत एक गर्भगृह आणि सभामंडप आहे मंदिराच्या खांबावर देवी देवतांची शिल्पे कोरली आहेत मंदिराच्या चहूबाजूस शंकर विष्णू महिषासुर मर्दिनी ची रेखीव शिल्पे आहेत.























 
ऐहोलेतील प्राचीन मंदिर व शिल्प सौंदर्य 
              सुमारे २ तास ऐहोलेमध्ये घालवून पुन्हा बदामीच्या दिशेने रवाना झालो खरंतर बदामीला जाऊन सूर्यास्त पाहायचा विचार होता पण ढगाळ वातावरणामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही पण असो महाकूट मंदिर, पट्टडकल आणि ऐहोले हे सर्व एका दिवसात पहायला मिळणं हे हि नसे थोडके. एकंदरीत काय तर रिक्षा करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता.
           शेवटी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि थेट आठ वाजता बदामी मध्ये जेवायला बाहेर पडलो तिथे सुद्धा एक घरगुती खानावळ शोधून काढली आणि पोटभर जेवलो. जास्त वेळ न काढता जेऊन थेट हॉटेल मध्ये जाऊन झोपलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बदामी ला भेट द्यायची होती. दिवसभराची दगदग आणि कमी झोप ह्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.

दिवस भाराचा खर्च:
रिक्षा (दिवसभर ) : - ८००/-
नाश्ता : - ४०/-
पार्किंग  : - २०/-
दही : - १०/-
पट्टदकल प्रवेश फी : - ४०/-
नारळपाणी - ३०/-
पाणीपुरी: - १०/-
जेवण :-  ५०/-
ऐहोळे प्रवेश फी : - ४०/-
-----------------------------
एकूण :- १०४०/-

पुढील प्रवास पुढच्या भागात.....

टीप : -
१)  बदामी ला जात असाल तर हॉटेल बुक करताना हॉटेल राजसंगम हे बस स्टॅन्ड च्या जवळ असलेले एकमेव चांगलं हॉटेल आहे.
 २) पट्टडकल आणि ऐहोले एका दिवसात करायचं असेल तर रिक्षा किंवा स्वतःची गाडी सोबत असणं गरजेचं आहे रिक्षा ८०० रु घेते.          

Friday, 6 December 2019

पुण्यातील अपरिचित त्रिशुंड गणपती

          पुण्यात गणपतीच्या मंदिरांची काही कमतरता नाही पण त्यातल्या त्यात सगळ्यात जुन्या अशा गणपती मंदिरास भेट देण्याचा प्रसंग आला तो म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर.
         त्रिशुंड गणपती मंदिर हे सोमवर पेठेत वसलेलं १७ व्या शतकातील एक मंदिर आहे. हठयोगी आणि गोसावी पंथीयांचे श्रध्दास्थळ असलेल्या त्रिशुंड मंदिराची उभारणी इंदूरजवळच्या धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी ह्यांनी १७५४ ते १७५७ या काळात केली. त्रिशुंड गणपती मंदिर हे पूर्णपणे काळ्या पाषाणात कोरलेलं आहे.
 त्रिशुंड गणपती मंदिर 
              पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर तळघर असल्या कारणाने वर उचलले गेले आहे समोर एक दगडी अंगण आहे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पध्दतीचे स्तंभ आहेत. स्तंभांवर किर्तीमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. स्तंभांच्या वरच्या भागात कीचक किंवा भारवाहक यक्ष कोरलेले असून यक्षांनी छताचा भाग आपल्या पाठीवर व हातांनी तोलून धरला आहे. यक्षांनी हातात साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा पकडलेल्या आहेत.
 किर्तीमुख स्तंभ व साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा 

  भारवाहक यक्ष 
द्वारपाल

श्रीकृष्ण  
              प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर ब्रिटीश सैनिक कोरलेले असून त्यांनी एकशिंगी गेंड्याला साखळदंडानी बांधलेले आहे. ह्या शिल्पाच्या खाली एकमेकांशी झुंजणारे हत्ती दाखवले आहेत. द्वारशाखेच्या खालती अधिष्ठानावर (जोत्यावर) दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे (लक्ष्मीवर दोन्ही बाजूंनी दोन हत्ती सोंडेत धरलेल्या कलशाने अभिषेक करणारे) शिल्प कोरले आहे. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती कोरली आहे. मूर्तीच्या खालच्या भागात गणेशयंत्र कोरले आहे.
   
द्वारपाल
 
ब्रिटीश सैनिक व झुंजणारे हत्ती
गजलक्ष्मी 
उजव्या सोंडेचा गणपती 
गणेशयंत्र
मंदिराचा उंबरठा 
         द्वारशाखेच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. ह्या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मकरमुखातून निघालेली महिरप आहे. ह्या महिरपीच्या वर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला एकमेकांचे हात धरून उभी असलेली वानर आहेत. सर्वात वरच्या पट्टीवर विष्णूचे विविध अवतार दाखवले आहेत. ह्याच पट्टीवर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एका साधूने स्वतःच्या हाताने दुसऱ्या साधूला खाली डोके आणि वरती अश्या स्थितीत पकडले आहे असे आगळेवेगळे शिल्प आहे. दर्शनी भागात दोन्ही बाजूंना राजस्थानी शैलीची रिकामी गवाक्षे आहेत. ह्या गवाक्षांच्यावरती पक्षी बसलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सर्वात वरती शेषशायी विष्णूची मूर्ती कोरली आहे.
महिरप
शेषशाही विष्णू 
          सभामंडपातून अंतराळात आल्यानंतर गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान दरवाजे आहेत. गर्भगृहात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याने बाहेर पडल्यानंतर गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर दक्षिणेला असलेल्या देवकोष्ठामध्ये नटराजाची सुबक मूर्ती आहे. पश्चिमेच्या देवकोष्ठामध्ये लिंगोद्भव शिव शिल्प आहे. लिंगोद्भवाची कथा पुराणामध्ये येते. कथेनुसार एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चाललेला असतो. हा वाद चालू असताना भगवान शंकर तिथे प्रकट होतात म्हणतात जो कोणी आदीलिंगाचा उगम आणि अंत शोधेल तोच श्रेष्ठ. त्याप्रमाणे ब्रह्मा हंसाचे रुप आकाशात जातो आणि विष्णू वराहाचे रुप घेऊन पाताळात जातो. परंतु दोघांनाही उगम आणि अंत शोधण्यात यश येत नाही. शेवटी ब्रह्मा आणि विष्णू शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करतात. येथील शिल्पात ब्रह्म हंसरुपात विष्णू वराहरुपात कोरलेले आहेत. शिवलिंगावर नागाचा फणा दाखवलेला आहे. अनेक शैवलेण्यांमध्ये आणि शिवमंदिरामध्ये लिंगोद्भव गोष्ट दाखवलेली असते. पण त्रिशुंडी मंदिरातील लिंगोद्भव शिव वेगळे आहे. उत्तरेच्या देवकोष्ठामध्ये कोणत्या देवतेची मूर्ती आहे हे ओळखता येत नाही. उत्तरेकडील देवकोष्ठ बघून उजव्या बाजूच्या दरवाज्याने आपण पुन्हा अंतराळात येतो.
नटराज
 लिंगोद्भव शिव
         गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून हातामध्ये साखळी पकडलेले जटाधारी साधू आहेत. दरवाज्याच्या वरती शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती बसलेली असून दुसऱ्या मांडीवर बसलेली स्त्री कोण आहे हे सांगता येत नाही. मूर्तीच्या एका बाजूला शंकराचे वाहन नंदी व दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहे. दरवाज्यावर सुबक महिरप कोरलेली आहे. दरवाज्याच्या वरती दोन देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत आणि एक फारशी शिलालेख कोरलेला आहे.गर्भगृहात तीन सोंडा असलेली मयुरारूढ गणेशमूर्ती आहे. ह्याच गणेश मूर्तीच्या बरोबर मागील बाजूस शेषशाही विसनूची एक मूर्ती भिंतीत कोरलेली पाहावयास मिळते वास्तविक महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी हि मूर्ती पाहावयास मिळते.
द्वारपाल 
गर्भगृहातील महिरप 
शिलालेख

त्रिशुंड गणपती
शेषशाही विष्णू  
        मंदिराच्या चहू बाजूस पाहायचे झाल्यास बरीच शिल्प आढळतातत्याची इतिहासाची सांगड घालायची झाल्यास बऱ्याच गोष्टी उलगडू शकतात वरील सर्व माहिती ही पंकज समेळ ह्यांच्या मार्गदर्शनातून उपलब्ध झाली आहे त्याबद्दल त्यांचे आभार🙏
              पुण्यात कधी जाण्याचा प्रसंग आला तर ह्या प्राचीन मंदिरास नक्की भेट द्या.

Location of Temple :

Saturday, 2 November 2019

किल्ले सिंहगड :- आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस

             गेले काही रविवार ट्रेक केले मध्येच कासच्या पठाराला भेट दिली पाऊस कमी होत होता त्यामुळे जवळपास ट्रेक ना विश्रांती देण्याची हीच वेळ होती. पण तेवढ्यात फेसबुकवर लक्ष गेले आणि तेव्हा लक्षात आलं माझे स्नेही श्री गिरीश कुलकर्णी ह्यांनी ह्याच गुरुवारी सिंहगड ११११ वेळा सर केला त्यामुळे मनात विचार आला ह्या रविवारी आपण त्यांच्यासोबत सिंहगडला भेट द्यायला जाऊ.
पुणे दरवाजा
           ठरलं तर मग दरवेळी प्रमाणे शनिवारी कन्याकुमारी एक्सप्रेस पकडून पुणे गाठलं आणि रात्री वस्तीला त्यांच्याच घरी थांबलो कारण सकाळी साडेतीन वाजता उठून सिंहगडचा प्रवास सुरु करायचा होता. ठरल्याप्रमाणे सकाळी साडेतीन वाजता उठून ४ च्या सुमारास घरातून बाहेर पडून सिंहगडचा प्रवास सुरु केला सुमारे ५ वाजता पायथ्याशी पोहोचून चढाईला सुरुवात केली. पहाटे अंधार असल्याने फोटो काही काढता आले नाही पण आजच्या खास दिवशी वरती एक लाईट दिसला नंतर विचारल्यावर लक्षात आलं की पुणे दरवाज्यात नवीन दरवाजा बसविण्यात आला आहे त्याचं आज म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर उदघाटन होतं. त्यामुळे कुठे पोहोचायचं आहे ते आधीच लक्षात आलं होतं.
              बरं सिंहगडाच्या वाटेवर काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या त्या म्हणजे पुणेकारांची सिंहगड विषयीची आत्मियता. सिंहगड हा पोरांपासून थोरांपर्यंत सगळे आवडीने चढायला येतात म्हणजे आमच्या सोबतच असलेला एक मुलगा त्याचं वय जवळपास १० वर्ष असेल आणि दुसरं विरुद्ध उदाहरण म्हणजे वाटेत एक काका भेटले. माझ्यासोबत असलेल्या सरांनी मला सांगितलं हे बघ, ह्यांच वय पंच्याहत्तर वर्ष.  तर ते काका म्हणाले ते जुनं झालं ओ आता "सत्त्याहत्तर". हे पाहून मी खरंच थक्क झालो आणि आता तुम्हालाही कळलं असेल की मी सत्त्याहत्तर  वर्ष्याच्या व्यक्तीस आजोबा न म्हणता काका का म्हणालो ते. कारण जी व्यक्ती वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी सिंहगड चढू शकते ती व्यक्ती माझ्यासाठी तर चिरतरुणच आहे.
              ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे सहसा लोक म्हणतात की मुंबई रात्रीसुद्धा झोपत नाही पण तिकडे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की "अहो मुंबई सोडा पुणे पण रात्री झोपत नाही" कारण आम्ही जेव्हा ५ वाजता चढायला सुरुवात केली तेव्हा काही जण सिंहगड उतरत होती तेव्हा तर मी विचारच करत बसलो की हे सगळे वरती रहायलाच जातात का??? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आम्ही पुणे दरवाज्यापाशी पोहोचलो लखलखत्या प्रकाशात झळाळणाऱ्या पुणे दरवाज्याचा योगायोगाने का ना होईना पण मी साक्षीदार झालो. नुकतंच उजाडल्याने दरवाज्यापाशी गर्दी झालेली म्हणून आधी बाहेरच्या बाजूने सिंहगड न्याहाळला मग पुणे दरवाज्यातून आतील बाजूस प्रवेश करून चहूबाजूने फेरफटका मारला ढगाळ वातावरण असल्याने मोजकेच फोटो काढता आले तरी सकाळचे किमान दोन तास सिंहगडावर व्यतीत करून पुन्हा परतीच्या वाटेने निघालो. साडेआठची बस पकडून पुन्हा गिरीष सरांच्या घरी पोहोचलो.
         
सिंहगडावरील काही फोटो पुढीलप्रमाणे :-

वन मन आर्मी : गिरीष कुलकर्णी सर

सिंहगडावरील सूर्योदय




















सिंहगडचे सर्व सहकारी  
                  ह्याप्रवासात मला लाभलेल्या गिरीष कुलकर्णी सर ,मॅडम आणि सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार आणि गिरीष सरांना पुढील वाटचालीस सह्याद्रीमय शुभेच्छा. लवकरच त्यांच्या सिंहगडाच्या २००० वाऱ्या पूर्ण व्हाव्या आणि तेव्हाही मी त्यांच्या सोबत असावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.