बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून हंपीला जाण्याचा फक्त विचारच चालला होता पण ह्यावेळी दिवाळीच्या निमित्ताने हा दौरा सत्यात उतरवण्याची संधी होती. म्हणून फ़क्त आठ दिवस अगोदर सर्व नियोजन केलं. फक्त एक आठवडाच होता म्हणजे Reservation confirm मिळणं अशक्यच होतं म्हणून जसे मिळतील तशी तिकीट काढली बाकी सगळं तेव्हाचं तेव्हा बघू म्हणून सोडून दिलं. बरं फक्त हंपी करण्यापेक्षा वाटेत येणारे बदामी आणि आजूबाजूची काही ठिकाण घ्यायची ठरवली. म्हणून आधी कल्याण ते बदामी एक Reservation काढलं आणि बदामी आणि हंपीचं हॉटेल बुक करून ठेवलं
१९ ऑक्टोबर शनिवारी रात्री गदग एक्सप्रेस पकडून रविवारी सकाळी बरोबर १० वाजता बदामी स्टेशन ला उतरलो. स्टेशन बाहेरून हॉटेलपर्यंत रिक्षा केली मुद्दाम मी माझं हॉटेल बस स्टेशनच्या समोर घेतलं होतं जेणेकरून हंपी ला जाताना काही त्रास होणार नाही बदामी मध्ये दोन दिवस आणि हंपी मध्ये तीन दिवस असं नियोजन होतं. बदामी मध्ये पाहण्याची ठिकाणं म्हणजे पाहिलं बदामी, दुसरं महाकूट मंदिर तिसरं पट्टाडकल आणि चौथं ऐहोले.
दिनांक :- २०.१०.२०१९
दिनांक :- २०.१०.२०१९
बदामी मध्ये वास्तव्य असल्यामुळे पहिल्याच दिवशी महाकूट, पट्टडकल आणि ऐहोले करायचं ठरवलं ज्या रिक्षेने प्रवास केलेला त्यांनाच तयार केलं आणि त्याच रिक्षेने नंतरचा प्रवास सुरू केला.
महाकूट मंदिर : -
बदामी च्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशातील "महाकूट मंदिर" हे प्रमुख देवालय आहे. महाकूट हे बदामी जवळील एक छोटंसं आणि शांत असं एक गाव आहे दोन डोंगरांमध्ये असलेलं हे मंदिर शैव आणि शाक्त ह्यांचं धार्मिक स्थळ आहे महाकूट वासियांसाठी हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार अगस्थी मुनींशी झालेल्या युद्धात सहोदर वातापी आणि इल्वल ह्या दोन राक्षसांचा वाढ ह्याच ठिकणी झाला होता.
महाकुटेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे मंदिरात अर्धमंडप मुखमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आजही नित्यनियमाने तिथे पूजा होत असते
महकुटेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो ते म्हणजे पट्टडकल. कर्नाटक चे लोक त्याला "पट्टाडकलू" म्हणून संबोधतात पट्टडकल हे ठिकाण बदामी शहरापासून सुमारे १८ किमी दूर आहे पट्टडकल आणि आईहोले ही दोन्ही ठिकाणं एकाच दिवशी करायची झाल्यास बस मिळणं कठीण असल्याकारणानेच रिक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो.
पट्टडकल
पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह. पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे
१ ) काडसिद्धेश्वर मंदिर
२) जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
५) विरुपक्ष मंदिर
६) मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
८) चंद्रशेखर मंदिर
१) काडसिद्धेश्वर मंदिर
कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.
२) जांबूलिंग मंदिर
जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.
जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.
गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
संगमेश्वर मंदिर
५) विरुपाक्ष मंदिर
विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.
६) मल्लिकार्जुन मंदिर
मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.
मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.
८) चंद्रशेखर मंदिर
सुमारे दोन तास पट्टडकल मध्ये घालवल्यानंतर गाडी ऐहोलेच्या दिशेने वळवली तीनच्या सुमारास ऐहोले मध्ये पोहोचलो पट्टडकल जसं तसंच ऐहोले होतं. तिथेही बरीच मंदिर, एक विहीर अश्या पुरातन वास्तू. तिथे गेल्यावर सर्वात पाहिले पोहोचलो ते तेथील प्रसिद्ध दुर्ग मंदिरात. दुर्ग मंदिर हे प्रसिद्ध आहे ते त्यावरील शिल्पांसाठी. बराच वेळ असल्याकारणाने दुर्ग मंदिर मनसोक्त न्याहाळण्यास सुरुवात केली.
दुर्ग मंदिर :-
खरं पाहिलं तर हे दुर्ग मंदिर नसून हे शिव मंदिर आहे पण डोंगराच्या जवळपास असल्याकारणाने त्यास दुर्ग मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराचा आकार बघितला तर तो तो हत्ती च्या पाठीसारखा आहे . मंदिराच्या आत एक गर्भगृह आणि सभामंडप आहे मंदिराच्या खांबावर देवी देवतांची शिल्पे कोरली आहेत मंदिराच्या चहूबाजूस शंकर विष्णू महिषासुर मर्दिनी ची रेखीव शिल्पे आहेत.
ऐहोलेतील प्राचीन मंदिर व शिल्प सौंदर्य
सुमारे २ तास ऐहोलेमध्ये घालवून पुन्हा बदामीच्या दिशेने रवाना झालो खरंतर बदामीला जाऊन सूर्यास्त पाहायचा विचार होता पण ढगाळ वातावरणामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही पण असो महाकूट मंदिर, पट्टडकल आणि ऐहोले हे सर्व एका दिवसात पहायला मिळणं हे हि नसे थोडके. एकंदरीत काय तर रिक्षा करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता.शेवटी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि थेट आठ वाजता बदामी मध्ये जेवायला बाहेर पडलो तिथे सुद्धा एक घरगुती खानावळ शोधून काढली आणि पोटभर जेवलो. जास्त वेळ न काढता जेऊन थेट हॉटेल मध्ये जाऊन झोपलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बदामी ला भेट द्यायची होती. दिवसभराची दगदग आणि कमी झोप ह्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.
दिवस भाराचा खर्च:
रिक्षा (दिवसभर ) : - ८००/-
नाश्ता : - ४०/-
पार्किंग : - २०/-
दही : - १०/-
पट्टदकल प्रवेश फी : - ४०/-
नारळपाणी - ३०/-
पाणीपुरी: - १०/-
जेवण :- ५०/-
ऐहोळे प्रवेश फी : - ४०/-
-----------------------------
एकूण :- १०४०/-
पुढील प्रवास पुढच्या भागात.....
टीप : -
१) बदामी ला जात असाल तर हॉटेल बुक करताना हॉटेल राजसंगम हे बस स्टॅन्ड च्या जवळ असलेले एकमेव चांगलं हॉटेल आहे.
२) पट्टडकल आणि ऐहोले एका दिवसात करायचं असेल तर रिक्षा किंवा स्वतःची गाडी सोबत असणं गरजेचं आहे रिक्षा ८०० रु घेते.
No comments:
Post a Comment