कालचा पट्टडकल,आईहोलेचा दौरा झाला आज सकाळी लवकर उठायचं म्हणून काल रात्री सुद्धा लवकर झोपलो ठरल्याप्रमाणे ५ वाजता उठलो पण खिडकीतून बाहेर बघतो तर काय पाऊस. मग पुन्हा झोपलो आणि सकाळी बरोबर साडेसहाला उठलो पटापट तयार झालो आणि ७ च्या सुमारास बाहेर पडलो एव्हाना उजाडलं सुद्धा होतं.
बदामी लेणीवरून दिसणारा बदामी किल्ला,उजव्या बाजूस भूतनाथ मंदिर व अगस्त्य तलाव
आजच्या दिवशी भेट देण्याची ठिकाणं होती ती म्हणजे अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, बदामी लेणी आणि बदामी किल्ला. बदामी लेणीची प्रवेशाची वेळ साडेनऊची असल्या कारणाने सर्वप्रथम अगस्त्य तलावला भेट द्यायला निघालो. अगस्त्य तलाव म्हणजे बदामी किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी जिथे जमा होतं ती जागा. तलावाच्या काठावरच एक देऊळ आहे त्याचं नाव "भूतनाथ मंदिर".
SELFIE WITH MANOHAR KAKA
प्रवासवर्णन पुढीलप्रमाणे
दिनांक : २१.१०.२०१९
१) अगस्त्य तलाव
अगस्त्य तलाव हा बदामी मधील सर्वात सुंदर तलाव आहे. चारी बाजूने डोंगराने वेढलेला हा तलाव पावसाळ्यात पुर्णतः भरलेला असतो अगस्त्य तलावाच्या मागील बाजूस असलेल्या २ धबधब्याना लहान बहीण मोठी बहीण म्हणून संबोधले जाते. अगस्त्य तीर्थ च्या उजव्या बाजूस बदामी किल्ला असून डाव्या बाजूस बदामी लेणी आहेत. समोर भूतनाथ मंदिर असून मधोमध अगस्त्य तीर्थ आहे.
अगस्त्य तलाव
२) भूतनाथ मंदिर
अगस्त्य तलावाला लागूनच असलेल्या मंदिरास "भूतनाथ मंदिर" म्हणून ओळखले जाते. भूतनाथ म्हणजे "आत्मांचा देवता". भूतनाथ मंदिर हे भूतनाथ समूह मधील एक आहे. बलुआ
नामक दगडापासून बनविले गेलेले हे मंदिर भगवान शंकराच्या भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ह्या मंदिरात शंकराच्या भूतनाथ अवतारात पूजा केली जाते. मंदिराचे बांधकाम हे दक्षिण भारतीय द्रविड़ियन आणि उत्तर भारतीय नगर शैली ची आठवण करून देते.
३) बदामी लेणी
चालुक्यांच्या राजवटीत म्हणजेच पाचव्या शतकात बांधली गेलेली ही लेणी सर्व धर्मांना समर्पित केलेली आहे. बदामी लेणी ही त्या काळच्या अपूर्व ज्ञानाचे एक प्रतीक आहे कारण इतक्या मोठ्या डोंगरांना कापून त्यात शिल्पकला करणं ही सामान्य गोष्ट नाही ह्या लेण्यानंतर पूर्ण दक्षिण भारतात ही शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली गेली.
ही एक शैव लेणी असून ह्याची निर्मिती ३ टप्प्यात करण्यात आली आहे. गर्भगृह सभामंडप आणि मुखमंडप.
ह्या लेणीतील प्रसिद्ध असलेले शिल्प म्हणजे प्रवेशाच्या पश्चिमेस असलेली नटराजाची शिल्पकृती.
अठरा हाताची असलेली ही प्रतिकृती कमळाच्या फुलावर उभी आहे. वरील दोन हातात सर्प पकडले आहेत. बाकीच्या हातात डमरू जपमाळ पुष्प त्रिशूल आणि विणा निदर्शनात येते. शिवच्या ह्या नृत्यास गणपती बघत आहेत.
३) महाविष्णू लेणी
ह्या लेणीची निर्मिती इसवी सन ५७८ मध्ये झाली आपला मोठा भाऊ कीर्तिवर्म ह्याने १२ वर्ष यशस्वी राज्य केल्याच्या आठवणी मध्ये ह्या लेणी ची निर्मिती झाली बदामी मधील हि सर्वात मोठी लेणी आहे
महाविष्णू लेणी
भगवान विष्णूंचे विविध अवतार
४) जैन लेणी
ह्या लेणी मध्ये २३ तीर्थंकर पार्श्वनाथ ह्यांचे प्रार्थना करतानाचे शिल्प आहे. ज्याच्या डोक्यावर पाच फण्याचा सापाचं शिल्प आहे. दुसरं शिल्प आहे ते म्हणजे बाहुबली. बाहुबली तीर्थंकर नसून त्याग किंवा निर्वाण स्वीकार केलेला श्रेष्ठ मानव आहे. तिसरं शिल्प आहे ते म्हणजे भगवान महावीर. ह्या लेणी मध्ये २४ तीर्थंकर असलेले एक शिल्प आहे.
पार्श्वनाथ
४) बदामी किल्ला
बदामी किल्ला, डोंगराच्या माथ्यावर बदामी लेण्यांसमोर वसलेले एक प्रमुख आकर्षण आहे. हा किल्ला मुख्य शहरापासून दोन किमी अंतरावर आहे. बदामी किल्ला हा भूतनाथ मंदिराच्या पूर्वेकडे आहे. एकेकाळी हे चालुक्य घराण्याच्या राजांचे घर होते. हा किल्ल्यापर्यंत केवळ पायीच पोहोचता येतो. किल्ल्यावर दोन मंदिरे आहे जी पाचव्या शतकात भगवान विष्णूची उपासना करणारे राजा पुलकेसन द्वितीय यांनी बांधली आहेंत.
वरील शिवालय भगवान शिवाला समर्पित आहे तर खालील मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. वरील शिवमंदिराच्या बाह्य भिंतींवर हत्ती आणि सिंह यांसारख्या पौराणिक कोरीव काम दिसून येते. शिवालयाच्या उत्तरेस सोळाव्या शतकातील टिपू सुलतान काळाची तोफ आहे जी १६व्या शतकातील टेहळणी बुरूजाप्रमाणे दिसते. हा किल्ला त्या प्रदेशातील प्रमुख आकर्षणे म्हणून गणला जातो ज्यामध्ये दोन धान्य कोठार , एक खाजगी खोली, चौकाच्या भिंती आणि एक गुप्त भूमिगत कक्ष आहे.
बदामी किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार
दुसरे प्रवेशद्वार
बदामी किल्ल्यावरील बुरुज
बदामी शहर व किल्ल्यावरील तोफ
१५५० सालची तोफ
धान्यकोठार
शिवमंदिर
गणेशमंदिर
छान किती दिसते... फुलपाखरू
एव्हाना ११.३० वाजले होते. अजून जेवण करून हंपीच्या दिशेने प्रवास
करायचा होता. हॉटेलमध्ये जाऊन सर्वप्रथम पोटभर जेवण केलं आणि थेट बस
स्टॅन्ड गाठलं व हंपीच्या प्रवासाला लागलो. एक वाजताच्या सुमारास बदामीतुन प्रस्थान करून सुमारे साडेसहाच्या सुमारास स्वारी हंपी मध्ये दाखल झाली हॉटेल बुक असल्याने सर्वप्रथम बॅग टाकली फ्रेश झालो आणि हंपीच्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.
MANGO TREE RESTAURANT
टीप :-१) बदामी वरून हंपीला जायचं झाल्यास बदामी हंपी थेट बस नसल्याकारणाने बदामी ते इल्कल व इल्कल ते हंपी अशी बस पकडावी.
दिवसाचा खर्च :-
बदामी लेणी प्रवेश फी :- २०/-
जेवण : - ५०/-
बदामी ते इल्कल बस :- ७०/-
इल्कल ते होस्पेट : - ११५/-
होस्पेट ते हंपी : - १५/-
रात्रीचे जेवण :- १५०/-
-------------------------
एकूण :- ४२०/-
बदामीच्या संपूर्ण प्रवासात असलेला माझा एकमेव फोटो व तो काढणारे फोटोग्राफर म्हणजे मनोहर काका त्यामुळे तो माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील.

पुढील प्रवास पुढच्या ब्लॉगमध्ये....
लवकरच येतोय हंपीचे प्रवासवर्णन घेऊन.
Mast
ReplyDeleteअप्रतिम वर्णन
ReplyDelete