Saturday, 22 July 2017

अंधारबन - एक जंगलवाट (Andharban Jungle Trek)

       गेल्या महिन्याभरात एकही रविवार घरी बसलो नव्हतो आणि आराम करायचा विचार मनाला स्पर्श सुद्धा करत नाही. कारण आजूबाजूला असणारा सह्याद्रीचा परिसर. सृष्टीसौंदर्य इतक्या जवळ असतानासुद्धा घरी बसणं हे वेडेपणाचं लक्षण आहे म्हणून पुढचं लक्ष्य घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास चालू केला ध्येय होतं अंधारबन.
           दिवस शनिवारचा होता. पुण्याला जायचं हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही म्हणून ऑफिसवरूनच थेट जायचं ठरवलं आणि ४.२५ ची प्रगती पकडली. मुक्काम होता संदीपा आणि चेतन च्या घरी. खरंतर त्यासाठीच जास्त उत्सुक होतो कारण माझ्यामते मी संदीपा चेतन ह्यांना कधी पाहिलं नव्हतं पण अचानक ग्रुपवर फोटो टाकल्यावर संदीपाचा मेसेज आला मी अजिंक्य ला ओळखते. आपण एकत्र ट्रेक केलेला. तेव्हा मी त्या ट्रेक चे फोटो पाहिल्यावर लक्षात आलं हो आपण भेटलो आहोत. विसरण्यासारखी ही व्यक्तिमत्व नाहीयेत पण तरीही बरेच वर्ष झाल्यामुळे नावानुसार लक्षात नाही राहिली पण चेहऱ्याने नक्कीच ओळखलं असतं. संदीपा चेतन ह्याचा कमी शब्दात परिचय करायचा झाला तर "दुनियादारी सोडून दुनियेच्या दारी जोडीने निघालेली स्वारी". थोडक्यात सांगायचे तर जग फिरायचं स्वप्न उराशी बाळगून निघालेले प्रवासी जोडपं.
                    शनिवारी रात्री सुमारे ९ वाजता आम्ही एकत्र भेटलो रात्र गप्पा मारण्यात आणि दुसऱ्या  दिवशीच्या तयारीत गेली सकाळी ५ वाजता उठायचं होतं म्हणून शेवटी रात्री साडेबारा वाजता झोपलो सकाळी उठलो. ६ वाजता गाडी बरोबर दारात उभी होती. आम्ही सुद्धा सकाळी  तयारीतच होतो त्या गाडीतून च आमचा सहावा हिरो आला. तो म्हणजे विवेक. पुणेकरांकडे विनोदाची खाण असते हे आम्हाला ह्याला भेटल्यावर च कळलं. जास्त वेळ वाया न घालवता आम्ही ६ जण पटकन गाडीच्या दिशेने गेलो एव्हाना ६.३० झाले होते. प्रवास सुमारे २ तसाचा होता म्हणून वाटेतच नाश्ता करून घेतला. सकाळी ट्रॅफिक नसल्याकारणाने आम्ही वेळेतच होतो. ताम्हिणी घाट लागल्यावर उजव्या बाजूस मुळशी धरण त्यावर गर्द झाडीमध्ये लपलेली डोंगराई पहायला मिळाली. गाडीतूनच ती न्याहाळून आम्ही ९ च्या सुमारास अंधारबनाच्या पायथ्याशी पोचलो.
पायथ्याचे गाव पिंप्री
     अंधारबनचं पायथ्याचे गाव पिंप्री. जेवणाची नाश्त्याची आणि गाईडची सोय आगोदरच केल्यामुळे काळजी करण्याची काही गरज नव्हती. गावात गेल्यावर गाईड आमची वाट पाहतच होता. गाईडच नाव तुकाराम त्याच्याकडे जेवणाची सोय असल्याने त्यांनी स्वयंपाक सगळा तयार करून ठेवलेला. आम्ही खाली बऱ्यापैकी फ्रेश झालो आणि ९.३० च्या सुमारास ट्रेक ला सुरवात केली

          अंधारबनची ओळख करून द्यायची झाली तर दिवसाढवळ्यासुद्धा ज्या वनात अंधार असतो तेच हे अंधारबन. घनदाट अशा या जंगलाने पावसाळ्यात हिरवागार गालिचा पांघरला होता व साथीला धबधबे तर होतेच. वाट चांगलीच मळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच होती पण आजकाल वाढत्या पर्यटकांमुळे बरेच रस्ते तयार झाले आहेत आम्हाला तर सुरवातीलाच एक ग्रुप चुकलेल्या वाटेने प्रवास करताना दिसला म्हणूनच आशा जंगलात हरवण्यापेक्षा वेळीच गाईड केलेला केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकची वाट सांगायची झाली तर आपण पुण्यातील पिंप्री गावातून चालायला सुरुवात करतो आणि अंधारबन च्या जंगलातून भिरामार्गे थेट कोकणात उतरतो. रविवारचा दिवस आल्याने गर्दीतर होतीच त्यामुळे आम्ही शांतता शोधत आमचा प्रवास चालू ठेवला होता. वाटेत बरेच सारे धबधबे लागले एक धबधब्यावर बरीच गर्दी होती कारण जवळपास तो वाटेतला त्यातल्या त्यात मोठा धबधबा होता. पण तिथे धमाल करणाऱ्या बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की त्याच धबधब्यावर तिथल्या ग्रामदेवतेच म्हणजेच वाघजाई देवीचं छोटंसं देऊळ होतं. तुकाराम दादांची ग्रामदेवता असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं की वर देवीचं देऊळ आहे पाहायला येणार का?? आमच्या सगळ्यांची पावलं मग देवळाच्या दिशेने वळली. देवीचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला.

      वाघजाई मातेचं छोटेखानी देऊळ 
         वाटेत ३ झरे लागणार हे आम्हाला माहीत होतं आणि हेच ३ कठीण पट्टे आहेत ह्या वाटेतले. तसा पहिला झरा पूर्ण आत्मविश्वसने ओलांडला आणि आता आम्ही खऱ्या अर्थाने अंधारबनाच्या घनदाट जंगलात प्रवेश केला सकाळी ११ वाजता सुद्धा त्या अंधारात चालल्यावर कळलं की ह्याला अंधारबन का म्हणतात. त्या जंगलातली ती शांतता आणि आजूबाजूच्या वाहत्या पाण्याचा सांगीतिक आनंद घेत आम्ही चालत होतो. चेतन आपल्या GO pro ने व्हिडीओ घेत होता
प्रवेश अंधारबनातल्या जंगलाचा

 
      
जंगलमय प्रवास 
        तुकाराम दादांशी गप्पा मारत मारत आम्ही असेच दुसऱ्या झऱ्यापाशी येऊन पोहोचलो आणि हा आमच्या वाटेतला सगळ्यात काठीण पट्टा होता. बरेच ग्रुपचे लोक त्याठिकाणी रोप लावून प्रवाह ओलांडत होते.  आम्ही सुद्धा रोप घेऊन गेलो होतो पण पाऊस जास्त नसल्यामुळे त्याची काही गरज पडली नाही.  पण तो प्रवाह ओलांडताना भीती तेवढीच वाटत होती कारण समोरून वाहत येणाऱ्या पाण्याला कापून वाट ओलांडायची त्यात पाय ठेवण्याच्या दगडांवर तयार झालेले  शेवाळे आणि त्यावरून सरकणारे पाय ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून पाउल पुढे टाकणं त्यामानाने कठीणच होतं.  पण आमच्या गाईडने ह्यात खरचं उत्तम मार्गदर्शकाची भूमिका बजावली त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना प्रवाह ओलांडून दिला आणि इतर लोकांनासुद्धा व्यवस्थित मदत केली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला की नदी ओलांडताना कधीच पाण्याकडे बघायचं नाही. समोर बघायचं कारण वाहतं पाणी आपल्या मनात अजून भीती निर्माण करतं. ह्या मदतीसाठी आणि ह्या बहुमूल्य सल्ल्यासाठी मी खरंच त्यांचा आभारी आहे. आणि त्यांची ओळख आम्हाला जिच्यामुळे झाली ती म्हणजे माझी भाची दिशा. तिचे पण ह्यानिमित्तने मी आभार मानतो. कारण दिशामुळेच आम्हाला तुकाराम दादांसारखा योग्य दिशादर्शक लाभला. आपल्यापैकी कोणाला गाईड चा नंबर हवा असल्यास कंमेंटबॉक्स मध्ये मेसेज करावा. मदत नक्की मिळेल
 अंधारबनातला एकमेव अवघड पट्टा 

               हा झरा ओलांडल्यावर आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली पण वेळेचं बंधन असल्याकारणाने परत पुढची वाट धरली. एव्हाना १२ वाजत आले होते खरंतर सरळ वाट असल्यामुळे दम लागण्याचा काही प्रश्न नव्हता. पण पोटपूजेची ओढ लागल्याकारणाने आता मी सुद्धा दादांना विचारलं की अजून जेवायचं ठिकाण यायला किती वेळ लागेल ते म्हणाले एक तासात आपण पोहचू  तसं ऐकून आमची पावलं वेगाने पडायला सुरुवात झाली थोडावेळ चालल्यावर आम्ही जंगलातून बाहेर आलो आणि प्रवेश केला तो म्हणजे रायगडमध्ये.
रायगड जिल्ह्यात प्रवेश करतानाचा तो क्षण   
विस्तीर्ण पठार 
        समोरच एक विस्तीर्ण पठार नजरेस पडलं तिथे बरेच जण जेवणाचा आस्वाद घेत होते. आम्ही सुद्धा तिथेच जेवायचं विचार केला पण तुकाराम दादा म्हणाले थोडं पुढे चला माझं घर आहे. आपण तिकडे जेवायला जाऊ. त्याच ऐकून आम्ही आमची पायपीट चालू ठेवली व त्यानंतर ह्या संपूर्ण वाटेत लागणाऱ्या एकमेव गावात म्हणजेच हिरडे गावात प्रवेश केला. आणि तिथे तुकाराम दादांच सुंदर घर होत. इतक्या उंचीवर अशा भारी ठिकाणी जेवायला मिळेल असा विचार आम्ही स्वप्नातसुद्धा केला नव्हता .
तुकाराम दादांचे टुमदार घर विश्रांतीचे  एकमेव ठिकाण

                  बऱ्याच वेळेनंतर आम्ही तिकडे खऱ्या अर्थाने विश्रांती घेतली आणि झुणका भाकरी डब्यातून बाहेर काढली आणि बरोबर त्याच वेळी बाहेर मुसळधार पावसाला सुरवात झाली आणि आमच्या सगळ्यांच्या मनात एकच विचार आला की तुकाराम दादांचा घरी जेवायला आणायचा निर्णय योग्य होता. इतक्या वेळेनंतर काहीही मिळालं असतं तरी ते छान वाटलं असतं आणि त्यात आमच्याकडे झुणका भाकरी आणि श्रीखंड होते. असं सगळं अन्नग्रहण करून परतीची वाट धरली

झुणका भाकर आणि श्रीखंड  
         आता सगळा उतार होता पण खरी परीक्षा आताच होती कारण पावसामुळे सगळी वाट निसरडी झाली होती. तरीही पावलं जपून टाकत आजूबाजूच्या जंगलातल्या फुलं फळं वनस्पती न्याहाळत व समोरील  निसर्गाचा आनंद घेत एकमेकांना मदतीचा हात देत हळू हळू उतरत होतो.

    

   
        विवेक हि आमच्यातली एकमेव अशी व्यक्ती होती जिने काही गोष्टी गंभीरपणे जरी सांगितल्या तरीही आम्हाला त्यात विनोदच दिसायचा पण ह्यात आमची काहीच चूक नव्हती कारण तसं वातावरण आमच्यात त्यानेच जागृत करून ठेवलं होतं.  विवेकच्या मते कुठून ही खाली उतरायला अजून एक दीड तासच लागणार होता. खरंतर आम्हाला माहिती होतं किती वेळ लागू शकतो ते, पण इतर लोक जे विवेकच्या तोंडून हे ऐकायचे ते कदाचित आपली मानसिक तयारी करून ठेवत असतील असं आम्ही गृहीत धरून चालत होतो. अशीच हसवेफसवेगिरी करत आम्ही दुपारी  ४.३० च्या सुमारास भिरा गावात पोचलो.

ध्येय गाठल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 
                 गावात गाडी आमची वाटच पाहत होती.  मी विचार केलेला ८ च्या ट्रेन ने परत येईन पण ताम्हिणी घाटातलं ट्रॅफिक बघितलं आणि ऑफिस मध्ये फोन करून सांगितलं की मी उद्या नाही येऊ शकत पण हा कॉल जरा जास्तच विनोदी झाला.  त्याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही मला तर आत्तापण फक्त चेतनचं हसणच आठवतंय. पण एक गोष्ट नक्की सुट्टी टाकल्यानंतर मी खुश होतो कारण मला संदीपा चेतन सोबत अजून एक दिवस मिळणार होता. त्यामुळेच कि काय घरी पोचण्याची जास्त ओढ लागलेली पण पुण्याचं ट्रॅफिक अक्षरशः अंत पाहत होतं .
     अखेर रात्री १०- १०. ३० च्या सुमारास आम्ही संदीपा चेतन च्या घरी पोचलो. पुण्यातला एक भन्नाट ट्रेक संदीपा चेतन सारख्या व्यक्तीबरोबर करायला मिळाल्यामुळे त्याचा आनंद काही औरच होता. ह्या सगळ्या आठवणी घेऊन दुसऱ्यादिवशी पुन्हा मुंबईच्या वाटेला लागलो.
      हा प्रवास इथेच संपला पण आपण पुन्हा लवकरच भेटूत नव्या ठिकाणासोबत...
 कारण घरी बसणं आपल्या रक्तात नाही!!! 
 ते म्हणतात ना... 
"अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व आणि प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत."

Thursday, 13 July 2017

नाखिंडची खिडकी... (NAKHIND)


            कर्जत कसार्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा असतो ते निसर्गप्रेमींना विचारा तेच सांगू शकतील. कधीही मनात विचार आला तरी उठून निघू शकतो. कारण बदलापूर सोडलं की आपण थेट निसर्गाच्या सानिध्यातच असतो असंच ह्या रविवारी श्रीधर गोपाळे उर्फ गोपु च्या घरी गेलो दिवसभर काय करायचं ह्यावर थोडावेळ चर्चा झाल्यानंतर गाडी काढा आणि "उठा नि पळत सुटा" म्हणून जवळ च्या जवळ कुठे जायचे ह्या विचाराने मी नखिंड ला जाऊ असा बेत केला. ११.३० च्या सुमारास निघालो १२.३० ला वांगणीत नास्ता केला. थोडफार खायला घेतलं आणि पुढे निघालो. कर्जत रोडवरून वांगणी समोरुन उजव्या हाताला वळलो की आपण थेट बेडीसगावात जाऊन पोहोचतो. बेडीसगाव हे नाखिंडचं पायथ्याचे गाव. खरंतर तिथपर्यंत गाडी जाते म्हणून ते पायथ्याचे गाव नाहीतर खरं म्हणायचं झालं तर वाघिणीची वाडी हेच पायथ्याचे गाव आहे कारण नखिंड वर चढायची सुरवात वाघिणीची वाडीपासूनच होते.
नेढ्यातून दिसणारा चंदेरी
       आम्ही सुमारे १२.३० च्या सुमारास बेडीसगावात होतो. गावातल्या एका घरासमोर गाडी लावली आणि थोडीफार विचारपूस करून गडाच्या वाटेला लागलो. १० मिनिटं चालल्यानंतरच एक ओढा लागला. तो पार करून आम्ही चढाईला सुरवात केली खरं तर आम्ही २ वर्षांपूर्वी जेव्हा आलेलो तेव्हा इतका चांगला रस्ता नव्हता. तेव्हा फक्त पाऊलवाट होती आज तो बऱ्यापैकी रस्ता झाला आहे सुमारे ४५ मिनिटं चालल्यानंतर आम्ही वाघिणीच्या वाडीत पोचलो
          पाऊस नसल्यामुळे आम्ही घामाने डबडबलो होतो. गावात पोहोचताच क्षणी पावसाला सुरवात झाली. तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती पुढे जायची वाट ही पूर्ण जंगलाची वाट होती. रस्ता चुकू होऊ नये म्हणून आम्ही त्या खेळणाऱ्या मुलांमध्येच विचारलं कोणी येणार का वरपर्यंत?? खाऊ ला पैसे देतो. तेव्हा त्यातला एक मुलगा तयार झाला पाऊस सुरूच होता पण त्याच्याकडे पावसासाठी काही नव्हतं मग त्याला म्हंटलं तू हा रेनकोट घे माझ्याकडे आहे दुसरा. तसा तोही खुश झाला.
    त्याच्याशी गप्पा मारत मारत आम्ही वर चढायला सुरुवात केली जाताना त्याला वाटेत त्याचा एक मित्र भेटला. त्याला हा म्हणाला चल हा एकटाच आहे. आधी घेऊन गेलेल्या लोकांना गावात सोडून हासुद्धा आमच्याबरोबर यायला तयार झाला.दोघांची नाव विचारली एकाच नाव प्रदीप आणि दुसऱ्याच नाव देविदास. त्याच्याकडून गावची सगळी माहिती विचारून घेतली. २४ घराचं असलेलं हे छोटेखानी गाव. शाळा म्हंटलं तर १ली ते ५ वी त्यापुढच शिक्षण वांगणीत म्हणजे किमान ७-८ किलोमीटर दूर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही त्या गावात वीज नाहीये तरीही ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता
      वाघिणीची वाडी
          गप्पा मारता मारता आम्ही घनदाट जंगलात प्रवेश करत होतो. वाटेत छोटे मोठे धबधबे ओलांडत आम्ही जवळपास अर्ध्यावर येवून पोचलो. त्याचा वेग आणि माझा वेग ह्याची अजिबात तुलना होऊ शकत नाही कारण ते दोघे जण मला त्यांच्या वेगाने ४० मिनिटांमध्ये नेढ्यापाशी घेऊन गेले . मला आठवतंय मी १.५३ वाजता गावातल्या शाळेत होतो आणि २.४० ला नखिंड वर होतो झालेला ट्रेक हा नॉनस्टॉप च होता कारण त्या दोन हिरोंनी मला कुठेच बसायची संधी दिली. 
        वाटेत लागणारा धबधबा
     घनदाट जंगल
   वाटेत त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यात वेळ कधी गेला काहीच कळलं नाही मी आपला घरची चौकशी शाळेची विचारपूस करून आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवत वर चढत होतो. आणि ती दोघे एकमेकांशी वेगळ्याच भाषेत बोलत होती. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या भाषेत बोलताय तेव्हा त्यातला एक जण बोलला ठाकरी!!! पण त्या दोघांनी त्यांच्या उत्साहानी माझं मन जिंकलेलं होत. 
दोन वाटाडे
         माझ्याकडे माझा एक मोबाइल होता आणि दुसरा गोपुचा कॅमेरा. बऱ्यापैकी फोटो काढल्यावर त्यांना म्हंटलं घ्या आता तुम्ही पण फोटो काढा असं म्हणून दोन्ही कॅमेरे त्यांच्याकडे दिले आणि मी नेढ्यामध्ये समोरच नयनरम्य दृश्य बघत बसलो हे दोघे जण मस्त एकमेकांचे फोटो काढत होते थोड्यावेळात बॅगेतला नाश्ता काढला. ते दोघे पण बिचारे भुकेलेले होते त्या दोघांनी पण मस्त खायला सुरवात केली. मी नेढ्यातून धुक्याआड लपपलेला चंदेरी दिसायची वाट पाहत होतो. खाऊन झाल्यावर पाणी प्यायची वेळ आल्यावर लक्षात आलं चढता चढता पाणी जवळपास संपल्यातच जमा आहे. नाखिंडवर पाण्याचं टाकं नसल्यामुळे मोठा प्रश्न होता पण आमच्या सोबत असलेल्या दोघांनी नामी शक्कल लढवून पाझरत्या पाण्याची धार शोधून काढली व बाटली पूर्ण भरून घेतली.
       पाझरत्या पाण्याने बाटली भरणारा देविदास
         तोपर्यंत धुक्याआड लपलेला चंदेरी पण नेढ्यामधून दिसण्यास सुरवात झाली होती. नेढ्यातून चांदेरीचे मनसोक्त फोटो काढले आणि ढग बाजूला झाल्यामुळे नखिंडवरून वाघिणीच्या वाडीच सुद्धा अप्रतिम दृश्य नजरेस पडलं ते कॅमेरात टिपलं व परतीच्या प्रवासास सुरवात केली.   
 नाखिंडवरून दिसणारी वाघिणीची वाडी
        एव्हाना त्यांची आणि माझी मस्त मैत्री झाली होती. देविदास हा भन्नाट गाणी म्हणत म्हणत खाली उतरत होता अचानक त्याने एक गाणं गायला सुरवात केली आणि त्यात चक्क मोदींचा उल्लेख आला म्हणून मी त्याला ते गाणं परत म्हणायला सांगितलं आणि त्याचे बोल लिहून घेतले म्हंटलं नंतर download करू अशीच मस्ती करत आम्ही ४.२० च्या सुमारास पुन्हा वाघिणीची वाडीत उतरलो. गावातली मुलं तेव्हा कोंबड्या पकडत होती. ती गावातली मजा बघून कधीतरी खरच अशा गावात रहायला यायची इच्छा झाली. 
    गावातली धमाल
     प्रदीप आणि देविदास ला  त्यांचा मोबदला दिला तेव्हा सकाळची क्रिकेट खेळणारी सगळी मुलं तिकडे हजार होती त्त्यांत्यांना सगळ्यांना निरोप देऊन आम्ही आमच्या घरच्या वाटेला लागलो.
हाच तो निरागस आनंद
      पुन्हा आम्ही दोघे गप्पा मारत मारत खाली उतरायला लागलो ५.३० च्या सुमारास बेडीसगावात पोचून ६.३० ला आम्ही घरी होतो असा हा अर्ध्या दिवसाचा का ना होईना पण फ्रेश करणारा ट्रेक होता
अंधेरी राह मे जलनेवाले दो दीप एक है देविदास दुसरा है प्रदीप.....






Thursday, 6 July 2017

आली लहर, केला सर इर्षाळगड... (IRSHALGAD)


        प्रत्येक वेळी ठरवलेले प्लॅन यशस्वी होतातच असं नाही असेच काहीसं ह्यावेळी माझ्यासोबत झालं पहाटे ४.३० वाजता गोरखगडचा प्लॅन रद्द झाला रविवार असल्यामुळे पहाटे जास्त विचार न करता गप्प झोपलो आरामात ९ वाजता उठलो सगळी कामं वगैरे करून १०.३० वाजले. आता खरा प्रश्न पडला पुढचा पूर्ण दिवस करायचं काय??? रविवारी सुट्टी असून सुद्धा घरी बसायची सवय नसल्यामुळे सुचत नव्हतं. मग शेवट एक दोन मित्रांना विचारलं कुठे जायचे का? काही काही चे पहिल्यापासून प्लॅन असल्यामुळे ते काहीसं शक्य नव्हतं पण मग आपल्या हक्काच्या  एका मित्राला फोन केला तो म्हणजे पप्पू.
(आमच्या दोघांमधील हा संवाद)
मी - काय करतोयस?
पप्पू- काही नाही
मी - चल
पप्पू - कुठे? (खरंतर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नव्हतं पण मागच्या आठवड्यात सोंडाईवरून इर्षाळगड पहिल्यापासून डोळ्यासमोर एकच दृश्य होतं) 
मी - चल पनवेल ला....
पप्पू - पनवेल ला कुठे?
मी - इर्षाळगड!!!
क्षणाचाही विचार न करता मला तो म्हणाला तू तयार हो मी आलोच.
शेवटी काय म्हणतात ना हाकेला धावून येतो तोच खरा मित्र.
       हे सगळं ठरेपर्यंत ११.०० वाजले होते तो पटापट आवरून बदलापूरवरून ट्रेन पकडून ११.५० ला अंबरनाथ ला हजर झाला मी माझी गाडी घेऊन तयारच होतो आम्ही भेटलो आणि आमचा सफर चालू झाला.
                             इर्षाळगड
           इर्षाळगड कडे जायला पनवेल आणि कर्जत दोन्हीकडून वाट आहे म्हणून जाताना पनवेल वरून जायचं ठरवलं google map चा आधार घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो अर्थानं google map ने किती मदत केली हे आमचं आम्हालाच माहीत. रस्ता सांगायचा झालं तर पनवेल कर्जत मार्गावर मोरबे धरणाकडे जायला एक रस्ता डाव्या हाताला जातो तिथून पुढे गेलं की दोन रस्ते लागतात त्यातला उजव्या बाजूचा रस्ता प्रबळगड आणि डाव्या बाजूच्या रास्ता इर्षाळगड कडे जातो तसा दिशादर्शकही आहे वाटेत. त्या वाटेने आम्ही २ वाजता गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि  गड चढण्यास सुरवात केली
                      गडाकडे जाणारे दिशादर्शक 
          पायथ्याचे गाव नमराची वाडी असं होतं खर तर तिथे पोहचेपर्यंत आम्हाला त्या गावचं नाव पण माहीत नव्हतं उतरल्यावर आम्ही विचारलं. गडाच्या पायथ्यापासूनच गडाच्या चढाईला सुरवात होते समोर दिसणारा इर्षाळगड आम्हाला खुणावत होता १५-२० मिनिटं वर चढल्यावर समोर धुक्यात हरवलेला इर्षाळगड आणि मागे मोरबे धरण असं अप्रतिम दृश्य नजरेस पडलं ते कॅमेरात कैद करून पुढे चालत होतो. 
                  गडावरून दिसणारे मोरबे धरण
         थोडंस चाललो असु आणि अचानक पावसाला सुरवात झाली थोडसं भिजलो पण तिकडून थोडं पुढे गेल्यावर अचानक वस्ती दिसायला लागली आम्ही म्हंटलं कुठलं तरी गाव असावं तिकडे विचारल्यावर कळलं की ह्या गावचं नाव "इर्शालवाडी". सुमारे १५-२० घराचं असलेलं गाव. आत्ता ट्रेकचा मौसम असल्याकरण्याने गावाकर्यांनी इर्शाळवाडी मध्ये एक छोटीशी टपरी सुद्धा सुरू केली आहे. तिकडे जेवणाची सोय जरी नाही झाली तरी चहा नाश्त्याची सोय चांगल्याप्रकारे होऊ शकते सकाळपासून पोटात काही नसल्यामुळे आणि मस्त भिजल्यामुळे आधी तिकडे चहा नाश्ता करायचं ठरवलं.

       वाटेवरील चहा नाश्त्याची सोय व मागे धुक्याआडचा इर्षाळगड
           माझ्या सोबत असलेला माझा मित्र बिचारा भुकेने व्याकुळ झालेला खायला भेटल्यावर जरा जीवात जीव आला. आम्ही तिकडे मस्त चहा आणि पोहे खाऊन आल्यावर आम्हाला धुक्यातून बाहेर आलेला इर्षाळगड आणि त्यामधलं नेढ नजरेस पडलं. आता आमच्या चालण्याचा वेग वाढला होता कारण गावात पोहचेपर्यंतच ३ वाजले होते अजून अर्धी चढाई बाकी होती आम्ही पटापट चालवण्यास सुरवात केली आता चढाई अजून कठीण होती


                       गडाकडे जाणारी वाट
           थोडं पुढे गेल्यावर एक देऊळ लागतं त्या देवळाच्या डाव्या बाजूने गेलं की ती वाट थेट इर्शाळगडावर जाते आम्ही चालत होतो पावसामुळे वाट खूप खराब झाली होती. त्याच वाटेने भन्नाट वारा आणि मुसळधार पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा मारा गालावर सहन करत आम्ही गडावर पोहोचलो. गडावर इतकं धुकं होतं की एक क्षण असा होता की आम्ही दोघे जण एकमेकांना पाहू शकत नव्हतो पावसाळा सोडून इतर वेळी गेलं तर इर्शाळगडावरून प्रबळगड चंदेरी, कर्नाळा व माथेरानचे डोंगर सहज नजरेस पडतात

                                                                   इर्षाळगडाच्या वाटेवरील मंदिर
         गडाविषयी माहिती घ्यायची झाली तर इर्षाळगड हा कर्जत आणि माथेरान च्या मध्यभागी वसलेला एक गड आहे. गडाचा विस्तार मोठा नसला तरी गडावरील इर्शालगडाच्या सुळक्यांमुळे हा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. सुळक्यावर जाण्यासाठी rock climbing शिवाय जाता येत नाही त्यामुळे वर पर्यंत नुसतं जाणं अशक्य आहे त्यामुळे इर्शाळगडाचा सुळका आणि नेढ पहिलं. गडावरून दिसणारं निसर्गाचं अद्भुत रूप कॅमेरात कैद केलं खरं तर कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हतं पण मग ते दृश्य आठवणींच्या कॅमेरात कैद करून परतीची वाट धरली.
                                                             इर्षाळगडावरील सुळका
       तोपर्यंत ४.४५ झाले होते आणि गडावर फक्त आम्ही दोघेच होतो पण स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला कसलीही भीती नव्हती. आम्ही आरामात गप्पा मारत संध्याकाळी ६.०० वाजता पुन्हा गडाचा पायथा गाठला. गावातील छोट्या मुलांना बॅगेतील खाऊ देऊन आम्ही परत घरच्या वाटेला लागलो. बऱ्याच वेळा नंतर गाडीवर बसल्यावर बरं वाटलं पनवेल च्या ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी आम्ही येताना कर्जतचा मार्ग धरला ह्या मार्गावर ट्रॅफिक नाही लागलं पण माथेरानच्या पायथ्याशी आम्हाला पावसाने गाठलं पण अंधार झाल्यामुळे कुठेही न थांबण्याचा निर्णय घेतला आणि चिंब भिजून ८.३० ला घर गाठलं.
अशाप्रकारे हा रविवार अर्धा का ना होईना सत्कारणी लागला...
      काही काम नसताना रविवारी घरी बसणं हा खरंच एक गुन्हा आहे......
काही मस्तीभरे फोटो......


धन्यवाद पप्पू माझ्या हाकेला ओ दिल्याबद्दल.....
पुन्हा भेटूत...........