Sunday, 27 August 2017

पावसाळा आणि कर्नाळा जुळून आलेला एक योगायोग (TREK TO KARNALA FORT)

                "जंगलवाट हीच आपली पाऊलवाट" हेच जगण्याचं उद्धिष्ट समजून सुरु असलेला प्रवास ह्यावेळी कर्नाळ्यापाशी येऊन थांबला. खरंतर कुठे जावं हा प्रश्न होता कारण आमचा मित्र सागर आजारी असल्यामुळे मी आणि उर्मिला आम्ही दोघेच जण स्वारीला तयार होतो म्हणून त्याने केलेला आणि उर्मिलाने न केलेला असा एखादा ट्रेक करावा असं ठरलं. जवळपास चा ट्रेक म्हणून कर्नाळ्याची निवड झाली. 

        अखेर रविवार चा दिवस उजडला गाडी घेऊन जायचं ठरल्यामुळे उर्मिला सकाळी  ८.३० च्या सुमारास ट्रेन ने अंबरनाथ ला आली तिथून आमचा प्रवास सुरु झाला. पाऊस असल्याकारणाने तशी ४० कि.मी च्या वेगानेच प्रवास चालू होता. आठवडाभर पाऊस नव्हता म्हणून उर्मिला म्हणत होती "माझी देवाकडे प्रार्थना आहे कि रविवारी थोडातरी पाऊस असावा" पण तिच्या प्रार्थनेत इतकी ताकद असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण प्रवासाच्या सुरुवातीपासून अगदी घरी पोहचेपर्यंत १ सेकंदही पावसाने विश्रांती घेतली नव्हती.


            "जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना" अशी गाणी गात आमचा प्रवास चालू होता. सुमारे ९.३० च्या दरम्यान आम्ही पनवेल पाशी पोहचलो. नाश्ता करण्याच्या उद्देशाने आम्ही पनवेल कडून अलिबाग च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला वाटेवर नाश्ता करण्यासाठी थांबलो पाऊस उसंत घेत नसल्यामुळे वेळ वाया न घालवता पुढे जायचं ठरवलं. समोर कर्नाळा दिसायला लागलाच होता तेवढ्यात समोर एक संकट सुद्धा नजरेस पडलं सुमारे १० कि.मी पुढे अंतरावर एक ट्रकचा अपघात झाला होता त्यामुळे ट्राफिक जॅम होतं.
 
      वर दिसणारा कर्नाळा किल्ला आणि समोरील ट्रॅफिक
 एकदा मनात विचार आला होता कि गाडी इथेच लावून चालत जावं पण मग म्हंटल बाईकच आहे बाजूने वाट काढून जाऊ असं म्हणून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. सुमारे २० मिनिटाच्या प्रवासाला एक तास लावून आम्ही १०.५० च्या सुमारास कर्नाळ्याच्या पायथ्याशी पोचलो.
कर्नाळा पक्षी अभयारण्याचे प्रवेशद्वार
            प्रवेशद्वारापाशी सगळ्या पावत्या फाडून आम्ही आत प्रवेश केला. सुमारे १ किमी पर्यंत पक्षी अभयारण्य असल्यामुळे तिथपर्यंत थोडी गर्दी दिसली पुढे गर्दी विरळ होत गेली. पक्षी अभयारण्य सोडल्यावर आपल्याला लगेचच जंगलात प्रवेश केल्याची जाणीव होते.

               गर्दी नसल्यामुळे शांतता अनुभवत आम्ही आमची पायपीट चालू ठेवली. थोडंसं पुढे गेल्यावर वाटेवर  एक झरा दिसला तिथेच थोडसं फ्रेश झालो आणि पुढे चालू लागलो कारण मागून गर्दीचा आवाज येत होता पुढे गेल्यावर जंगलाचा प्रत्यय आलाच कारण बाहेर पाऊस असताना सुद्धा घनदाट झाडीमुळे आमच्यापर्यंत त्याचा मागमूस हि नव्हता.
वाटेवरील झरा
           निसर्गाबाबतच्या गप्पा मारत मारत आम्ही रुळलेल्या वाटेने आमचा प्रवास चालूच ठेवला होता. कर्नाळ्यातील पाऊलवाटेवर दिसणारी महाकाय वृक्ष हिच ह्या जंगलाची शान म्हणावी लागेल कारण ह्याच भव्य दिव्य वृक्षाची दूरदूर खोलवर रुजलेली मुळे व त्याच मुळांनी घट्ट धरून ठेवलेली ती माती ज्यामुळे आजही गडावर जाण्यास हि वाट सुरक्षित आहे.
               ही वाट पार करून आता आम्ही गडाच्या समोर होतो. पाऊस असल्याकारणाने थकवा जाणवला नाही पण समोर दिसणारा सुळका हा आमचं लक्ष वेधून घेत होता.  गो. नि. दांडेकरांच्या "जैत रे जैत" मुळे अधिक प्रसिद्ध झालेला हा लिंगोबाचा डोंगर.  आजूबाजूला असणारी हिरवळ व समोर दिसणारा लिंगोबाचा डोंगर हे अप्रतिम दृश्य कॅमेरात कैद केलं व गडाच्या दिशेने प्रस्थान केले
लिंगोबाचा डोंगर 
         आता काहीसा रस्ता हा सपाटीचा होता त्यामुळे थकायचा काही प्रश्न नव्हता आता आमच्या चालीचा वेगसुद्धा वाढला होता . थोड्याच वेळात पुढील चढण नजरेस आली ती चढण सुरु व्हायच्या अगोदर उजव्या बाजूस देवीची एक घुमटी आहे तेथूनच आपण दुर्गद्वारात  पोहोचतो. तिथेच देवीचे दर्शन घेतले.  समोर विश्रांतीसाठी जागा होती पण बसायची इच्छा नव्हती कारण आता आमचं ध्येय आम्हाला खुणावत होतं. 
देवीचे छोटेखानी देऊळ
             आमच्या वेगाने आम्ही आमच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो आणि आता समोर नजरेस होता तो इतका वेळ आमचं लक्ष वेधून घेत असलेला  लिंगोबाचा डोंगर व डाव्याबाजूस गडाचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्याच थाटात उभे आहे ह्यातून प्रवेश करताना आजही स्वराज्यात प्रवेश करतानाचा अनुभव येतो.

       डाव्या बाजूस प्रवेशद्वार व उजव्या बाजूस असलेला सुळका
       ह्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच गडाच्या इतिहासाची नोंद दिसते. गडाचा इतिहास पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा किल्ला यवनांकडून जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला व ह्या किल्ल्याचे  किल्लेदार म्हणून स्वातंत्रवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा म्हणजेच अनंत रामचंद्र फडकेह्यांची निवड केली 
गडाचा इतिहास
                  प्रवेशद्वारातून थोडं  पुढे गेल्यास डाव्या बाजूस एक वाडा व समोर साधारण  ४० ते ५० मीटर उंच सुळका नजरेस भरतो.  त्याच्या तळाशी असलेले पाण्याचे साठे हे सुमारे १२-१३ व्या शतकात बनवलेले आहे ते आजही आपल्याला  सुस्थितीत पहायला मिळतात . आता पर्यटकांच्या  सुरक्षेसाठी म्हणून तिथे लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

गडावरील पाण्याचा साठा
              काही पाण्याच्या टाक्या ह्या पर्यटकानी बाटल्या कचरा टाकून खराब केल्या आहेत पण त्यातील दोन टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. आजूबाजूचे काही इमारतीचं अवशेष आजही आपलं लक्ष वेधून
घेतात. खरंच मनात विचार येतो कि आजकालच्या इमारती २५ वर्षे टिकल्या तरी आपण नशीब समजतो आणि इतिहासातील गोष्टी वादळ, वारा, पाऊस ह्या सगळ्यांचा मारा सहन करत आजही त्याच दिमाखात उभ्या आहेत.
गडावरील इमारतीचे अवशेष
                थोडं पुढे गेल्यावर कर्नाळ्याची तटबंदी नजरेस पडते व तिथून खाली पाहिल्यास आपल्याला आपल्या उंचीचा अंदाज येतो. तेथे थोडावेळ फोटो काढून आम्ही आमच्या पारतीच्या वाटेला लागलो कारण मागून गर्दी वाढतच होती. ३ वाजले असल्याकारणाने एव्हाना भूक सुद्धा लागली होती गडावरून खाली पाहिल्यावर लक्षात आलं कि सकाळचं ट्राफिक मोकळ झालं आहे ते पाहून आम्ही सुटकेचा निश्वास सोडला
  परतीच्या वाटेवरील एक दृश्य
            वाटेवर एक आडोसा पहिला आणि आमच्याकडे असलेले  खाण्याचे पदार्थ बाहेर काढले व खायला सुरुवात केली. उतरताना वाट निसरडी होती त्यामुळे हळूहळूच चालावं लागणार होतं हे आम्हाला ठाऊक होतं कारण वरुणराजाची कृपादृष्टी आमच्यावर जरा जास्तच होती.
परतीच्या वाटेवर होणारी कसरत
           एकमेकांना हात देत देत आम्ही सुमारे सव्वाचार च्या सुमारास गडाचा पायथा गाठला व सकाळच्या ट्राफिकची भीती मनात ठेवून आम्ही सगळ्यात आधी पनवेल सोडायचा निर्णय घेतला. सुमारे ५ च्या सुमारास आम्ही शिळफाट्याला पोहोचलो आणि आश्चर्य म्हणजे तिथे अजिबात ट्रॅफिक नव्हतं तेव्हा मी उर्मिलाला म्हणालो उर्म्या रस्ता चुकलो  तर नाही ना ग??  तेव्हा ती पण हसली. कारण शिळफाट्याला ट्रॅफिक न लागणं हा सुद्धा एक चमत्कारच आहे.
         आता भूक लागली असल्याकारणाने आणि आम्ही  वेळेतच असल्याने लगेच जवळच प्रसिद्ध असलेल्या कोकणकींग हॉटेल मध्ये जेवायला गेलो. चिंब भिजल्यामुळे माझी अवस्था बघण्यासारखी होतो. मी अक्षरशः कापत होतो. वेटर ने आम्हाला विचारलं काय देऊ??? तेव्हा आम्ही त्याला मस्करीत बोललो जे गरम असेल ते दे. तिथे पोटभर जेवलो.  तरीही बाहेरचा पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. मग सगळं सामान बागेत ठेवलं व थेट उर्मिलाचं घर गाठलं आणि घरी पोचल्या पोचल्या उर्मिलाच्या आईला म्हंटल "पाणी नाही दिल तरी चालेल पण चहा द्या"
       त्यांनी बनवलेला तो चहा म्हणजे स्वर्गसुख होत त्यासाठी काकू तुमचे खूप खूप आभार.
तो चहा घेतला. थोड्या गप्पा मारल्या आणि मी माझ्या घरच्या वाटेला लागलो. अशाप्रकारे हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. उर्मिला तुझ्या  इच्छाशक्तीवरच हा ट्रेक पूर्ण झाला आहे. त्यासाठी तुझे आभार. नेहमी अशीच तयार रहा आणि  सागर  मित्रा लवकर बरा हो.
अजून बरंच काही बाकी आहे!!!.
चला आत्तापुरती विश्रांती घेतो पुन्हा लवकरच भेटूत....
चिंब भिजलेले...  

Friday, 11 August 2017

स्वराज्याचे वैभव किल्ले सुधागड (SUDHAGAD FORT)

         ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजेच FRIENDSHIP DAY. ह्या दिवसाचं औचित्य साधून मी आमची झाशीची राणी उर्मिला आणि आमचा बॉडी बिल्डर सागर आम्ही तिघांनी मिळून गेल्यावर्षीप्रमाणेच कुठेतरी ट्रेक ला जायचं ठरवलं. दोन गाड्या आणि तीन जण  मग आम्ही आजून कोणी येतंय का त्याचा शोध घेऊ लागलो. तेव्हा उर्मिला चा एक मित्र सुमित येण्यासाठी तयार  झाला. दोघांकडेही गाडी असल्यामुळे आम्ही थोडा लांबचा पल्ला गाठायचा विचार केला. बऱ्याच विचारांनंतर एका ठिकाणांवर शिक्कामोर्तब झालं ते म्हणजे किल्ले सुधागड. रायगड जिल्ह्यात असलेला सुधागड मुंबईपासून सुमारे १२५ किमी दूर व अष्टविनायक मधील एक पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीच्या जवळ असलेला हा गड. त्यामुळे LONG DRIVE, देवदर्शन व ट्रेक अशा तिन्ही गोष्टी एकाच दिवशी करण्याची चांगली संधी चालून आली होती.
  किल्ले सुधागड
        अखेर तो दिवस आला. सकाळी ६ वाजता उठून आम्ही निघायची तयारी करू लागलो. पावणे सातच्या दरम्यान आम्ही तिघेही घरातून निघालो. सुमित कळंबोलीवरून येणार असल्यामुळे आम्ही पनवेल मार्गे जायचा निर्णय घेतला. मी उर्मिला, सागर आणि सुमित आम्ही चौघे पहिल्यांदा कळंबोली ला भेटलो. सागर त्याच्या शरीरयष्टीप्रमाणे BULLET घेऊन आला होता. सुमितशी ओळख करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली
         एव्हाना ७.३० वाजले होते. ट्राफिक वाढायच्या आत आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. कळंबोलीवरून पनवेल सोडून आम्ही कर्जत च्या दिशेने प्रवास सुरु केला. मधेच एका टोल नाक्यापाशी पोचल्यावर समजलं कि पुढे एका कंटेनरचा अपघात  झाल्यामुळे पुढील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता आमच्या समोर खरंच मोठा प्रश्न होता कि जायचं कसं?  पण ते म्हणतात ना "लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती" आम्ही लगेचच GOOGLE MAP च्या साहाय्याने पर्यायी मार्ग शोधून काढला. त्यामुळे आमचे जवळपास २०-२५ किलोमीटर वाढत होते पण जायचं तर होतच त्यामुळे तिकडून जायचा निर्णय घेतला.  इथेच आम्हाला ९ वाजले होते अजून जवळपास पुढे ७० किमी चा प्रवास बाकी होता. आता वेळ वाया न घालवता आम्ही नॉन स्टॉप आमचा प्रवास चालू ठेवला.  मध्येच थोडासा पाऊस लागला आम्ही बरोबर १०.३० च्या सुमारास पाली च्या आगोदर नाश्ता करायला विसावा घेतला. तिकडून योग्य रस्ता  विचारून थेट सुधागड चा पायथा गाठायचं ठरवलं. वाटेत बल्लाळेश्वराचे मंदिर लागले. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही आधी दर्शन घेऊन मग गड चढणार होतो पण उशीर झाल्यामुळे येताना दर्शन घ्यायचं ठरवलं. पालीवरून पाच्छापूर गावात जायला सुमारे अर्धा तास लागतो आणि हाच सुधागडचा पायथा.

          पाच्छापूर गावातील भातशेती 
         बरोबर माध्यमाच्या वेळी आम्ही पायथ्याशी पोचलो वेळ वाया न घालवता आवरा आवर करून आम्ही गड चढायला सुरुवात केली. श्रावण महिना असल्यामुळे पावसाचा काही भरवसा नव्हता. त्यात दुपारी बारा वाजताचे   ऊन पण हिम्मत एकवटवून गप्पा मारत मारत आम्ही आमची वाट धरली. समोर सुधागड खुणावतच होता. पाऊलवाटेने जाता-जाता आम्हाला डाव्या हाताला काही ऐतिहासिक अवशेष नजरेस पडले ते पाहून आम्ही पुढे निघालो हळू हळू आम्ही जंगलात प्रवेश करायला सुरवात केली होती.

                 थोडे पुढे गेल्यावर एक भगव्या रंगाची शिडी दिसली. माझ्या मते काही वर्षांपूर्वी ह्या गडाचा हा एक भाग रोमांचकारी असावा.  पण आता शिडी लावून त्यातली सगळी मजाच पुरातत्व खात्याने घालवून टाकली आहे पण असो नवख्या ट्रेकर साठी शिडी हवीच. आजही जुनी शिडी त्याच ठिकाणी आहे. थोडेसे  पुढे गेल्यावर आम्हाला दोन बुरुज नरजेस पडले. उर्मिलाला धीर देण्यासाठी मी म्हंटल ते बघ उर्मिला आला गड. तिच्यात पण अचानक आत्मविश्वास आला. आता चालण्याचा वेग वाढला होता.  पुढे दृष्टीक्षेपात आले ते दोन्ही बाजूला बुरुज व मध्ये जाण्यासाठी असलेली प्रशस्त वाट.
       महादरवाजाकडे जाणारी वाट  
               हि वाट आपल्याला थेट महादरवाज्यात घेऊन जाते. महादरवाजा आला म्हणजेच गडाचा विस्तार चालू झाला होता. वरून  उन्हाचा दाह वाढत असला तरी आता आम्हाला कशाची पर्वा नव्हती पण  पाणी पिऊन पिऊन पाणी संपायची वेळ आली होती. एका दगडातून पाणी पाझरताना दिसलं पण भरायचं कसं हा प्रश्न होता.  तिथे सुमितने डोकं वापरून एका पानाच्या सहाय्याने पाणी भरून घेतलं. व पुढील प्रवासाला लागलो 
 
                थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला सुधागड किल्ला आणि डाव्याबाजूला खाली पाच्छापूर गाव नजरेस पडलं. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही फोटो काढून चालत राहिलो आता चढाईला सुरुवात झाली होती.जंगलवाट चालू होती आजूबाजूला पक्षांची किलबिल कानावर पडत होती. असंख्य फुलपाखरे जंगलातल्या रानफुलांवर, झाडांभोवती सतत भिरभिरत होती आम्ही खऱ्या अर्थाने निसर्गात वावरत होतो.


      
  
          असंच गप्पा मारत मारत आम्ही आता गडावर प्रवेश केला. समोर भव्य पठार नजरेस पडलं ते पाहून असं वाटलं जणू आमच्यासाठी निसर्गाने हिरव्या रंगाचा गालिचा अंथरला  आहे. ते चित्र कॅमेरात घेऊन आता गडावरील वास्तू पाहण्यास सुरुवात केली.

हिरवा गालिचा अंथरलेले सुधागड चे पठार
                 प्रथम नजरेस पडला तो पंत सचिवांचा वाडा. पंत सचिवांचा वाडा हा संपूर्ण लाकडी बांधकामात तयार केलेला आहे आजही  काही लोक तेथे वास्तव्य करतात. गडावर आलेल्या पर्यटकांची जेवणाची रहाण्याची सगळी सोय हि पंत सचिवांच्या वाड्यावरच होते. आम्हाला पोचायला उशीर झाल्यामुळे जेवण संपल होत पण आम्ही त्यांना पोहे बनवण्याची विनंती केली. 

           पंत सचिवांचा वाडा 
           तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन भोराई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. भोराई देवीचं देऊळ आजही त्याच थाटात उभे आहे देवळाबाहेर पुरातन काळातील शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात. 



   भोराईदेवीचे देऊळ 
देवळाबाहेरील पुरातन अवशेष 

       मंदिराच्या डाव्या बाजूला भव्य तलाव नजरेस पडतो व  समोर सरळ चालत गेल्यास समोर तैलबैला आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. इतका सुंदर निसर्ग समोर असताना पार्टीचा विचार मनातसुद्धा येत नाही पण वेळेचे बंधन असल्याकारणाने फक्त फोटोवर समाधान मानून आम्ही परत वाड्याच्या दिशेला लागलो. परतत असताना डाव्या बाजूला एक शंकराचे देऊळ सुस्थितीत पाहायला मिळाले कदाचित त्या देवळाची डागडुजी गावकऱ्यांनी केली असावी 
गडावरील तलाव
सुधागडावरून दिसणारा तैलबैला
          भूक लागल्याकारणाने वाड्यात जाऊन प्रथम पोहे खाल्ले व पारतीच्या प्रवासाला सुरवात केली. एव्हाना सव्वाचार वाजले होते आम्ही आता कसलाच विचार न करता सरळ पायथा गाठायचं ठरवलं कारण अजून  बल्लाळेश्वराच्या देवळात जायचं होत.      
       पाच वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो आणि जमेल तितक्या लवकर मंदिरापाशी पोचायचं ठरवलं सहा वाजता पाली  गणपतीचं दर्शन घेतलं. 
 गणपती बाप्पा मोरया !!!
     उर्मिला आणि सुमित ने ठरवल्याप्रमाणे येताना आम्ही 5 STAR म्हणजेच पंचतारांकित हॉटेल मध्ये गेलो त्यांनी दिलेल्या ह्या मेजवानी साठी उर्मिला आणि सुमित चे खूप खूप आभार. हि TREAT आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पोटभर जेवून आम्ही ९ वाजता खोपोलीतुन घरच्या वाटेला लागलो. उशीर तर झाला होताच पण आरामात प्रवास करत आम्ही रात्री १२ च्या सुमारास घरी पोचलो 
FRIENDSHIP DAY PARTY IN FIVE STAR HOTEL
          वेळ किती लागला ह्याने काहीच फरक पडत नाही वेळेचा सदुपयोग किती केला हे महत्वाचं. आणि माझ्या आयुष्यात फिरण्यापेक्षा आणखी महत्वाचं काय असू शकत??
             FRIENDSHIP DAY इतका अविस्मरणीय असेल असं कधीच वाटलं नव्हतं. ह्यासाठी माझ्या सर्व मित्रांना धन्यवाद तर नक्कीच नाही म्हणणार पण अशीच तयारी दाखवा आपण नेहमी अशा ठिकाणांना भेट देत राहू.
 लवकरच भेटूत तोपर्यंत GOOD BYE.........