Saturday, 27 January 2018

दोन मंदिरे एक ईश्वर : गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर (GONDESHWAR & AISHWARYESHWAR TEMPLE)

            गड झाले, विहिरी झाल्या, आता वेध लागले ते  देवळांचे म्हणून ह्या रविवारी प्राचीन मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. थोडीफार शोध मोहीम केल्यावर जवळपासचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. १२ व्या शतकातील दोन मंदिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात आहेत असं समजलं. मी अजय आणि भरत आम्ही तिघांनी योग्य ती माहिती घेऊन रविवारी जाण्याची तयारी केली.
       सकाळी ७.५५ ची कल्याणहुन कसारा लोकल पकडली. साडेनऊच्या सुमारास कसारा गाठले.  कसाऱ्यावरून सिन्नरला जाताना घोटीमार्गे जावे लागते त्यामुळे कसार्याहून घोटीला जाण्यासाठी SHARE जीपने घोटीला गेलो व घोटीहून सिन्नर ला जाण्यासाठी पुन्हा SHARE जीप घेतली. १२ वाजण्याच्या सुमारास सिन्नरला पोहचलो आणि प्रथम गोंदेश्वर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
गोंदेश्वर मंदिर
         सिन्नर बस डेपो पासून २ किमी अंतरावर असलेले हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला "शैवपंचायतन" म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.

         आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर
          गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा  शिल्पे कोरलेली आहेत. काही युद्धाची शिल्पे कोरली आहेत.


         



मंदिरातील काही शिल्पे
        मंदिराच्या चहूबाजूला हत्तीची शिल्प आहेत. मंदिराच्या चहूबाजूला असलेल्या ह्या हत्तीच्या शिल्पातील एका हत्तीच्या सोंडेत एकदा एका चोराला हिरा सापडला म्हणून त्याने लालसेपोटी चहूबाजूला असलेल्या सर्व हत्तीची सोंड नष्ट केली अशी आख्यायिका आहे.

सोंड तुटलेल्या हत्तीचे नमुने  
           मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम अशी शिल्पकला आहे. मंदिराच्या बाहेरील शिल्पातून गोष्टीरूपी इतिहास उलगडला जातो फक्त तितक्या अभ्यासू नजरेने आपण पहिले पाहिजे. मंदिरावर काही कामशिल्पेही आढळतात.

मंदिराबाहेरील कामशिल्पे 
            १२ व्या शतकात बांधलेल्या ह्या मंदीरातून निघावस वाटत नव्हतं पण तरीही वेळेचा अभाव असल्याकारणाने २ तास ह्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही येथून काढता पाय घेतला. जेवणाची वेळ उलटून गेलेली म्हणून वाटेत मार्केट यार्डात असलेल्या "जय मल्हार" खानावळीकडे आमचे पाय आपोआप वळले तिथल्या स्पेशल "शेवभाजी" वर ताव मारला आणि जवळच असलेल्या ऐश्वर्येश्वर मंदिराकडे वाटचाल चालू केली.


 ऐश्वर्येश्वर मंदिर
            ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अगोदरच आहे पण आजही बरेच लोक ह्या मंदिरापासून अनभिज्ञ आहेत . गोंदेश्वर मंदिरापासून हे मंदिर सुमारे २० मिनिटाच्या अंतरावर असल्याने आम्ही पायीच जायचं ठरवलं. ऐश्वर्येश्वर मंदिर हे द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची कलाकृती असलेले तोरण आजही आपल्याला आकर्षित करते.
प्रवेशद्वारावरील तोरण
       मंदिरात असलेल्या प्रत्त्येक खांबावर उत्तम अशी कलाकुसर आहे. मंदिरात सुबक अशी शिवपिंड आहे. कदाचित रोज कोणीतरी पूजेसाठी येत असावं पण सिन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर इतकं शांत पाहून आश्चर्य वाटलं  
 
 ऐश्वर्येश्वर मंदिरातील शिवपिंड 
          
          मंदिराच्या चहुबाजूने निरीक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसते. त्यावर अनेक प्रकारच्या कमानी आहेत  काही ठिकाणी मंदिराचे उंच उंच कळस नजरेस पडतात


 
  
 मंदिराच्या बाहेरील बाजूची शिल्प 
            आज सुमारे ८ शतकापासून हे मंदिर निसर्गाशी झुंज देत उभेआहे. ह्या मंदिराबद्दल जास्त कोणालाही माहिती नसल्यामुळे इथे कोणीच नसते. त्यामुळे इथे गेल्यावर लगेचच शांततेचा प्रत्यय येतो. 
         हि मंदिरे पाहिल्यावर एकदा मनात विचार आला कि आज जसे आपल्याला  काही  सुचलं कि कागदावर रेखाटतो त्याचप्रमाणे त्याकाळची माणसे असं काही सुचल्यास थेट दगडावरच रेखाटत असावी हि दोन्ही मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आम्हास अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.
           पुन्हा परत कधी आलो तर एकावेळी एका मिंदीराला भेट देऊ असा विचार करून आम्ही परतीच्या वाटेल लागलो. एव्हाना साडेचार वाजले होते त्यामुळे सिन्नर-नाशिक-कसारा असं येणं शक्य नसल्याने आम्ही येताना नाशिकवरून ट्रेनने यायचा निर्णय घेतला जो खरंच योग्य ठरला त्यानिमित्ताने नाशिक करून खरेदी करता आली.

कधी चुकून माकून नाही तर ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी म्हणून तरी मुद्दामच सिन्नर शहराला  भेट द्या....

मंदिराबाहेरील काही अप्रतिम दृश्ये  ... 







GOOGLE LOCATION OF GONDESHWAR TEMPLE

GOOGLE LOCATION OF AISHWARYESHWAR TEMPLE

No comments:

Post a Comment