Sunday, 7 January 2018

९व्या शतकातील लोणादित्य रामेश्वर मंदिर (LONADITYA RAMESHWAR TEMPLE)

         अंबरनाथला राहत असल्यामुळे आमच्याकडे पुरातन काळातील एक शिवमंदिर आहे हे आम्ही खूप अभिमानाने  सांगत असू पण एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीत वाचल्यावर लक्षात आलं कि शिलाहार राजांनी बांधलेली अनेक शिवमंदिरे ठाणे जिल्ह्यात अवशेष रूपाने आजही उभी आहेत. या मंदिरापैकी सर्वाधिक अवशेष रूपाने आपले अस्तित्व प्रकट करणारे लोनाडचे लोणादित्य महादेवाचे देवालय होय. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या शे-पाउणशे वर्षांपूर्वी ह्या देवालयाची निर्मिती झाली. हे वाचलं आणि कल्याण पासून सुमारे ७ किमी दूर असणाऱ्या ह्या "लोणादित्य रामेश्वर" (LONADITYA RAMESHWAR TEMPLE) मंदिरास भेट देण्यास निघालो.



 मंदिराची मागील बाजू 
            लोनाड  गावातील  तलावाकाठी उभे असलेले हे मंदिर शिलाहार राजांपैकी कोणी आणि कधी बांधले  ह्याचा निश्चित पुरावा नाही पण हे मंदिर खूप पुरातन आहे ह्याचे पुरावे दानपत्रातून व शिलालेखातुन उपलब्ध झाले आहेत. आषाढ वद्य ४, शके १९१९ (इ. स. ९१७) साली शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या  मंदिराला देवाच्या पूजेसाठी "दक्षिणायन दान" म्हणून भादाणे गाव इनाम दिला. अशा आशयाचा ताम्रपट सापडला आहे ह्याचा अर्थ लोनाडचे हे शिवमंदिर सुप्रसिद्ध अंबरनाथच्या देवालयाच्या जे २७ जुलै १०६१ मध्ये बांधले होते याच्या आधी शके ९१९ (इ. स. ९१७) च्याही आधी लोनाडचे मंदिर बांधले गेले हे शिलाहार राजाच्या दानपत्रावरून कळते.
 


 मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिल्प 
          द्वितीय अपरादित्य शिलाहार राजाचा मंत्री व्योमशभु यांनी लोनाडच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि गर्भगृहात आपल्याच नावाने व्योमशम्भू महादेवाचे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी समुद्राला साक्षी ठेवून रामाने ज्या शिवलिंगाची स्थापना करून प्रार्थना केली त्याच आकाररूपाचे शिवलिंग या मंदिरात असल्याने या शिवमंदिराला "श्रीरामेश्वर मंदिर" असेही म्हंटले जाते. मंदिरावरील सुबक मूर्तींचे नमुने बघितल्यावर आज हि अवाक व्हायला होतं.

      शिवलिंग 

            मंदिराच्या मागील बाजूस असलेली कलाकुसर 
            गेली कित्येक वर्षे ऊन वारा पावसात ह्या मंदिराची झीज होऊ लागली आहे. बरेचसे अवषेश ढासळले आहेत. पण ते ढासळून सुद्धा त्यावरील कलाकुसर जशी च्या तशी आहे. इतकी वाताहत होऊनही इतके जुने मंदिर त्याच थाटात उभे आहे. मंदिरावरील कलाकुसरीचे काम बघून कलाकारालाही दाद द्यावीशी वाटते. बऱ्याच लोकांना अजूनही ज्ञात नसल्यामुळे  त्या मंदिराजवळ गर्दी कमी असते.



     पडझड झालेल्या वास्तूंचे काही नमुने
          तिथल्या गावकऱ्यांना मंदिराबद्दल माहिती सांगण्यास कोणी आहे का असे विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले कि इतका जुना माणूस गावात शिल्लक नाही.  त्यामुळे आमच्याकडे ह्या मंदिराविषयी पुरेशी माहिती नाही पण असो आज ते मंदिर ज्या पद्धतीने तेथे उभे आहे ते पाहण्याचे भाग्य असणे हे हि नसे थोडके!!! म्हणून आहे त्यात समाधानी राहून ह्याअतिप्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरच्या वाटेला लागलो.

                           
 MAP LOCATION

1 comment: