काही उनाड पर्यटकांमुळे ह्यावेळी संपूर्ण ठाणे जिल्हा पर्यटनासाठी बंद होता मग जायचं कुठे हा मोठा प्रश्न. जवळपासचा पट्टा म्हंटल तर कसारा नाहीतर रायगड. मग सुरुवात झाली तिथले ट्रेक शोधण्याचे. सोनगिरी किल्ल्यावर शिक्का मोर्तब झालंच होतं पण काही कारणास्तव ते रद्द झालं आणि विचारांची गाडी इर्शाळगडावर येऊन थांबली. कर्जत आणि पनवेल स्टेशनच्या मधोमध असणाऱ्या मोरबे धरणाच्या बाजूचा गड म्हणजे इर्शाळगड. मुंबईकडून येणाऱ्या लोकांसाठी इर्शाळगड हा पनवेल वरून जवळ आणि मी अंबरनाथला राहतो म्हणून मला कर्जत वरून.
सकाळी बरोबर ७ वाजता मी घरातून निघालो रस्त्यातल्या खड्ड्यांचे अडथळे पार करत मी सुमारे ९ वाजता गडाच्या पायथ्याचे गाव म्हणजे नंबरची वाडी ह्या गावात जाऊन पोचलो. तिकडून माझे मित्र पाच दहा मिनिटातच पोहोचले. आधी थोडी तोंडओळख केली आणि ट्रेक ला सुरवात केली. गडाच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या गाड्या पहिल्या आणि वरील गर्दीचा अंदाज घेतला. खरंतर हा ट्रेक मी मागील वर्षीच केला होता पण ध्येयापर्यंत पोहचू शकलो नव्हतो म्हणून परत करायच्या उद्देशाने गेलेलो पण ह्यावेळी सुद्धा अपयशी ठरलो. पण असो घरी बसण्यापेक्षा गडावर जाणं हे कधीही योग्य.
मोरबे डॅम
मोरबे डॅमच्या डाव्याबाजूने गडाकडे जाणारी पायवाट नजरेस पडते ती धरून चालायला लागलं की आपण थेट गडावर जाऊन पोहोचतो. नंबरची वाडी ह्या गावातून जाणारी ही वाट लगेचच चढाई ला सुरुवात करते. सुमारे अर्ध्या तासात आम्ही गडाच्या इतक्या उंचाईवर जाऊन पोहोचलो होती की मोरबे डॅम चा संपुर्ण नजारा एक दृष्टीक्षेपात दिसू लागेल तिथे थोडे फार फोटो काढून आम्ही पुढच्या वाटेला लागलो कारण ही तर फक्त सुरुवात होती. डाव्या बाजूला असणारा इर्शाळगड अजून ही धुक्यातच होता. उजव्या बाजूला मोरबे डॅम डाव्या बाजूला धुक्यातला इर्शाळगड आणि मध्यभागी चालू असणारी आमची वाटचाल बऱ्याच साऱ्या गप्पा मारत आम्ही गडाचं पायथ्याचे गाव म्हणजे इर्शाळवाडीत येऊन पोहोचलो.
इर्शाळवाडी
इथून खरा धुक्याचा प्रवास सुरु झाला. इर्शाळवाडी हे छोटंसं गाव. गावात जेमतेम १० ते १२ घर. गडावर जाणाऱ्यांसाठी जेवणाची राहण्याची सोय ह्या गावात होते. ह्या गावातून उजव्याबाजूस जाणारी वाट गडावर जाते. इथून गडावर जाण्यासाठीचा वेळ सुमारे अर्धा तास. इथून पुढचा प्रवास प्रवास म्हणजे पाण्याचा ओढा, रंगीबेरंगी फुलं, घनदाट झाडी. सुमारे 15 20 मिनिट चालल्यावर वाटेच्या उजव्या बाजूस वाघजाई देवीचं एक देऊळ आहे. त्या मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा पुढे निघालो.
वाघजाई देवीचे देऊळ
गडावर प्रचंड गर्दी होती म्हणून वाटचाल पण धीम्या गतीने चालू होती एव्हाना १२ वाजले होते. पण मुळात उशिरा चांढण्यामागचा उद्देश हाच होता की वरची गर्दी थोडी तरी कमी व्हायला हवी पण ती शक्यता मावळलेलीच होती. म्हणून पुन्हा चालण्यास सुरवात केली. उजव्याबाजूची वाट धरून आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो.
१०० मीटर च्या अंतरावरच गडाची मुख्य चढाई लागली तिकडे इतकी गर्दी होती आणि नवखे जास्त असल्याने त्यांनी त्या वाटेची खऱ्या अर्थाने वाट लावून ठेवलेली. आधीच लाल माती त्यात वरून पाऊस आणि ह्यांचे सारकणारे सँडल्स. म्हणजे वाटेची वाट लागणं हे साहजिकच होतं. त्यातूनही वाट काढत आम्ही गडावर जाऊन पोहचलो. गडावर धुकं आणि तुफान वारा ह्यांचा जणू संगम च होता. धुकं इतकं होतं की १० मीटर वरचा माणूस आपला आहे की अजून कोण हे सुद्धा ओळखता येत नव्हतं.
गडावर जाणारी पाऊलवाट
इथपर्यंत पोहोचल्यावर पुढे २ रस्ते लागतात सरळ रस्ता थेट इर्शाळच्या सुळक्यावर जातो आणि डाव्या बाजूचा रस्ता हा गडावरील नेढ्यात जातो. नेढ म्हणजे हवेच्या दबावामुळे डोंगराला पडलेलं भगदाड. खरंतर इथपर्यंत जायचं होतं पण आम्ही जायच्या आदल्या दिवशीच तिकडे दरड कोसळली होती त्यामुळे ती वाट बंद झाली होती. पुन्हा हा ट्रेक करण्यामागचा उद्देश हाच होता की तिथपर्यंत पोहचायचे होते पण पुन्हा निसर्गाने निराश केलं. पण असो इथपर्यंत पोहचणे हे ही नसे थोडके.
इर्शाळगडचा सुळका
ह्याच वातावरणात आम्ही जेवण करायला बसलो. जेवणाला बसणं म्हणजे स्वतःला पण सांभाळा आणि आहे आणलेल्या पदार्थाना पण अशी अवस्था होती कारण वारच तितका होता. पण त्याच परिस्थितीत आम्ही कसे बसे जेवलो आणि परतीच्या वाटेला लागलो. खरंतर उतरताना त्या चिखलाच्या साम्राज्यात जास्त कसरत करावी लागली पण ठरल्याप्रमाणे अर्ध्यातासात आम्ही पुन्हा इर्शालवाडीत येऊन पोहोचलो आणि वर पाहिलं तर आम्हाला जिथे जायचं होतं पण जाऊ शकलो नव्हतो ते ध्येय नजरेस पडलं ते म्हणजे नेढे.
नेढे
तिथेच आम्ही थोडावेळ थांबलो सगळ्यांची यायची वाट पाहिली आणि सोबत सगळ्यांना घेऊन सुमारे ४ च्या सुमारास पुन्हा नंबरच्या वाडीत पोहोचलो. गावातली मुलं खाऊ मागायला लागली होती त्यांना खाऊ देत त्यांचे आनंदी चेहरे बघून गडाचा निरोप घेतला
पुन्हा परत नेढ्यात जाण्याच्या निमित्ताने ह्या गडाची भेट होणार हे नक्की.....