Saturday, 22 February 2020

कर्नाटक दौरा भाग ३ :- हंपी

               बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हंपी दौरा, प्रथम त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या शहरापासून १३ किमी अंतरावर असलेले हंपी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आजही हंपीच्या सभोवतालच्या परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास एका क्षणात आपल्याला त्याकाळातील आठवण करून देतो.
हंपीतील प्रसिद्ध दगडी रथ
          काल रात्री हंपीला पोहोचल्यावर पटकन जेवून झोपलो कारण आज मातंगा पर्वतावर सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठायचं होतं. ठरल्याप्रमाणे पहाटे ५ वाजता उठून मातंगा पर्वत चढायला सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासात वर पोहोचलो पण ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही दिसला नाही पण विरुपक्ष मंदिराजवळून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे अप्रतिम दृश्य नजरेस पडले.
हंपी 
           ते दृश्य कॅमेरात टिपून पुन्हा दिवसाच्या नव्या सुरवातीला लागलो पूर्ण दिवस हंपीमध्ये फिरायचा असल्याने दिवसभरासाठी एक सायकल घेतली.
                   
अच्युतराया मंदिर
           मातंगा पर्वताच्या पायथ्याशी असलेले ह्या मंदिराचे निर्माण इ स १५१३ ते १५३९ मध्ये कृष्णदेवरायचा छोटा भाऊ अच्युतरायच्या कारकिर्दीत झाले म्हणून ह्या मंदिरास अच्युतराय मंदिर म्हणून संबोधले जाते मंदिरावरील कोरीवकाम अगदी रेखीव आहे काही ठिकाणची पडझड झाली असली तर हे मंदिर सौंदर्याची एक छाप आपल्यावर सोडून जातेच.
 
अच्युतराया मंदिराचा आवार 
मंदिराचे प्रवेशद्वार

बाजारपेठ
मंदिरावरील कलाकृती
एकशिला नंदी
      अच्युतराया मंदिरातून बाहेर आल्यावर विरुपक्ष मंदिराकडे जाताना वाटेत उजव्या हाताला आपल्या एक दगडात कोरलेला एक नंदी नजरेस पडतो त्यास एकशिला नंदी म्हणून संबोधले जाते.
एकशिला नंदी 
कडेलकालु गणेश
         भारताच्या दक्षिणेकडील भागात अस्तित्वात असलेल्या भगवान गणेशांच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी कडेलकालू गणेश हि एक आहे. हंपीच्या हेमकुटा टेकडीच्या उतारावर कडालेकलु गणेशमूर्ती असलेले हे मंदिर आहे. कडेलकालू गणेश या पुतळ्याची उंची ६.६ मीटर (१५  फूट) असून हि मूर्ती एका विशाल दगडात कोरली गेली आहे. ह्या  गणेशाचे पोट अशा प्रकारे बनवले गेले आहे. म्हणूनच, या मूर्तीला कडालेकलू गणेश असे नाव देण्यात आले आहे. हंपी येथे अस्तित्त्वात असलेल्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे
कडेलकलू गणेश मंडप
कडेलकालु गणेश
सासेवकालू गणेश
         कडेलुकलु गणेशासारखेच अजून एक मूर्ती हंपीच्या दक्षिणेस नजरेस येते त्याच नाव म्हणजे ससेवकालू गणेश. १२ फूट उंचीच्या ह्या मूर्तीचे निर्माण सुद्धा एकाच दगडात करण्यात आले आहे.
             हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान गणेश अन्नावर प्रेम करतात म्हणून ओळखले जातात. एकदा गणेशाने भरपूर भोजन केले, त्यामुळे त्याचे पोट फुटण्याच्या मार्गावर होते. पोट फुटण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय न सापडल्याने गणेशने साप पकडला आणि त्याला पोटास बांधले. गणेशाच्या पोटाभोवती बांधलेल्या सापाच्या अस्तित्वामागील ही पौराणिक घटना आहे, जी मूर्तीवर दिसते.
ससेवकालू गणेश मंडप 
 
बडवलिंग
         बडवलिंग हि हंपीमधील ही सर्वात मोठी शिवलिंग प्रतिमा आहे. लक्ष्मी नरसिंह पुतळ्याशेजारी शिवलिंग समोर एका खोलीत ठेवलेले आहे. या चिन्हावर बारकाईने पाहिले तर त्यावर तीन डोळे कोरले आहेत  पौराणिक कथेत असे आहे कि  ह्या शिवलिंगाचे निर्मिती एका  गरीब स्रीद्वारे केली असल्याने त्यास बडवलिंग शिवलिंग म्हणून ओळखले जाते. 
बडवलिंग
लक्ष्मी नरसिंह मंदिर
            भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी नरसिंह हा एक आहे हंपीमधील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. नरसिंह सात फणी शेषनागावर बसले आहे. सापांचे डोके त्याच्या डोक्यावर छत्राप्रमाणे कार्य करत आहेत . रागीट आणि उग्र डोळ्यांमुळे ह्यास उग्रनरसिंह म्हणून संबोधले जाते
मूळ मूर्तीमध्ये नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मी देवीची सुद्धा प्रतिमा होती परंतु विजयनगरावर झालेल्या आक्रमणामुळे ह्या मूर्तीचे गंभीर नुकसान झाले आहे. त्याच्या मांडीवर कोरलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचा तोडलेला भागही गहाळ आहे. कदाचित हे लहान तुकडे केले असेल. पण देवीचा हात आजही आपणास निदर्शनास येतो
लक्ष्मी नरसिंह
QUEEN'S Bath
         अच्युतरायाने विजयनगरातील राजघराण्यातील महिलांसाठी क्वीन बाथ नामक वास्तू बनवल्याचे समजते. इंडो-इस्लामिक शैलीमध्ये तयार केलेली, क्वीन्स बाथ एक विस्तृत रचना आहे ही आयताकृती इमारत असून इमारतीच्या चारही बाजूस बाल्कनी आहेत, प्रत्येकाला बाल्कनीला तीन खिडक्या आहेत. तलावाची खोली ६ फूट आहे आणि उतरण्यासाठी दगडांच्या पायर्‍याची सोय आहे.
                सदर तलावाची रचना ही ३० चौरस मीटर असून  तलावापर्यंत पोचण्यासाठी संरचनेसारखा पूल बनविला गेला आहे.  बहुधा राणी साहेब आंघोळ करत असताना लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अशी युक्ती केली असावी. तलावापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याची रचना सुद्धा वेगळ्याप्रकारे करण्यात आली आहे.

QUEEN'S Bath
पुष्करणी
         हंपीतील पुष्करणी म्हणजे पवित्र पाण्याची टाकी असून ती मंदिरांना जोडलेली आहे. हंपीतील बहुतेक मोठ्या मंदिरांमध्ये जवळच पुष्करणी बनविली आहेत. पवित्र टाक्या मंदिरे आणि मंदिरांच्या आसपासच्या लोकांच्या विविध विधी आणि कार्यात्मक बाबींसाठी पुष्करणीचा उपयोग होत असे. पुरातन काळात हंपीच्या लोकांकडून या टाक्या पवित्र जागा मानल्या जात असत. आजही विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी हंपीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पुष्करणींचे मोठे आकर्षण आहे.
पुष्करणी
महानवमी दिब्बा
       महानवमी दिब्बा हि एक विजयी वास्तू आहे. उदगिरीवर विजय मिळाल्यानंतर राजा कृष्णदेवरायांनी ह्या वस्तूची निर्मिती केली होती ह्याची रचना हि हंपीच्या राजवाड्यांमधली सर्वात उंच रचना आहे ह्या वास्तूच्या उंचीमुळे हि प्रसिद्ध आहे. विजयोत्सव साजरा करण्यासाठी ह्या वास्तूचा उपयोग होत असे. ह्या वास्तूच्या चहूबाजूस भिंतीवर विविध शिल्पे अधोरेखित केली आहे ती ह्या विजयाची साक्ष देतात. महानवमी डिब्बा च्या आजूबाजूस हत्ती घोडे बांधण्यासाठी वेगळी जागा अधोरेखित करण्यात आली आहे, बाजूलाच राजा व प्रधान ह्यांच्या गुप्त चर्चेसाठी एक गुप्तखोलीसुद्धा आहे महानवमी डीब्बाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.


हत्तीच्या पायदळी देण्यात येणाऱ्या शिक्षा
महानवमी दिब्बा
हजाररामा मंदिर
           शाही राजवटीच्या मध्यभागी असलेले हजारारामा मंदिर हंपीचे मुख्य आकर्षण आहे. हे स्थान फक्त समारंभांसाठी वापरले जात होते आणि रामायणातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे प्रतिनिधित्व करणार्‍या कलाकृतींसाठी हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित केलेले हे मंदिर हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या भिंती १५ व्या शतकाच्या कलेने सुशोभित आहेत. चार कोरलेल्या ग्रॅनाइट स्तंभ अर्ध-मंडपच्या सौंदर्यात भर घालतात. हजारा रामा मंदिरात भेट देणारे पर्यटक पूर्वीच्या राजांच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या वास्तू व सांस्कृतिक वारशाचा शोध घेऊ शकतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरीवकाम या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.



ग्रॅनाईट स्तंभावरील कोरीवकाम
रामायण महाभारतातील प्रसंग
पाताळेश्वर शिवमंदीर (Underground shiva mandir)
          पाताळेश्वर शिवमंदीर हे जमिनीपासून खाली असल्याकारणाने ह्यास पाताळेश्वर शिवालय म्हणून संबोधले जाते पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरास आत जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. पाताळेश्वर शिवालयाची निर्मीती ही पहिल्या बुक्कराय ह्यांच्या काळात झाली. मंदिराची रचना ही प्रांगण आणि गर्भगृह अशी करण्यात आली आहे मंदिराच्या गर्भगृहात नंदी व शिवलिंग असून पावसाच्या पाण्यामुळे आतील शिवलिंगाचे दर्शन सुद्धा होत नाही पण बाहेरील नंदीचे मुख दृष्टीक्षेपात पडते.


पाताळेश्वर शिवमंदीर
कमल महल (Lotus mahal)
        महानवमी दिब्याच्या उत्तरेस गेल्यास एक मैदान नजरेस पडते त्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास समोर कमळाच्या आकाराची एक वास्तू दिसते ती म्हणजे "कमल महल" त्यास कमल महल किंवा चित्रांगना महल म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कमल महल ही दुमजली वास्तू असून ह्याचं निर्माण हे इंडो-इस्लामिक पद्धतीने करण्यात आले आहे. महालाच्या उत्तरेस वरच्या मजल्यावर जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे. उन्हाळयात सुद्धा ह्या ठिकाणी थंड हवेचा वावर असे त्या उद्देशानेच कमळ महल चं निर्माण केलं गेलं आहे. थंडीच्या दिवसात हवेपासून बचाव होण्यासाठी म्हणून वरच्या खिडकीस पडदे लावण्याची सोय आजही दिसून येते.

कमल महल
गजशाळा  (ELEPHANT STABLE)
          गजशाळा ही वास्तू त्याकाळी राज्यांच्या हत्तीचे निवासस्थान म्हणून ओळखली जात. गजशाळेच्या ह्या वास्तुत एकूण ११ खोल्या असून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी प्रत्येक खोलीत छोटा दरवाजा आहे, गजशाळेच्या छताचा भाग हा गोलाकार आहे. गजशाळेच्या उत्तरेस असणारी वास्तू ही पहारेकऱ्यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जात.
 गजशाळा  (ELEPHANT STABLE)
Octagonal well
राजतुलाभार (KING'S BALANCE)
          राजतुलाभार  हि हंपीमधील एकमेव वास्तू जी आजही  लोकांना तिच्या इतिहासामुळे आकर्षित करते  ह्या वस्तूचा उपयोग १५ व्या शतकात  नवीन वर्ष , राज्याभिषेक , दसरा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण अशा खास दिवसांसाठी राजांचा तुलाभार करण्यासाठी होत म्हणून ह्यास राजतुलाभार म्हणून संबोधले जाते.
राजतुलाभार
विजया विठ्ठल मंदिर
           हंपीमधील तुंगभद्रा  नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित ह्या विठ्ठल मंदिराची निर्मिती १६ व्या शतकात झाली असून हे मंदिर विष्णूस समर्पित करण्यात आले आहे. विठ्ठल  मंदिर हे दुसऱ्या राज देवरायाच्या कारकिर्दीत  बांधले गेले असून हे मंदिर मूळच्या दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचे प्रतिनिधित्व करते 
            मंदिरावरील सुशोभित खांब व त्यावरील शिल्पांनी आजही पर्यटक प्रभावित होतात. मंदिरात विठ्ठलाची उत्कृष्ट  मूर्ती आहे पण सद्यस्थितीत  फक्त पुजारी येथे प्रवेश करू शकतात लहान गर्भगृह सर्वसामान्यांसाठी खुले आहे ह्या मंदिराच्या सभोवताली असलेला दगडी रथ हे सध्याचे प्रमुख आकर्षण आहे सध्या पन्नास रुपयाच्या भारतीय चलनावर ह्याच दगडी रथाची प्रतिकृती आहे.
 
 
दगडी रथ
विजया विठ्ठल मंदिर
             आजच्या दिवसाचा शेवट हा विजया विठ्ठल मंदिर बघून केला कितीही ठरवलं तरी ह्या वास्तू बघून मन भरत नाही पण वेळ पुढे पुढे जात राहते होणाऱ्या सूर्यास्ताचा विचार करून विजया विठ्ठल मंदिरातून काढता पाय घेतला व परतीच्या मार्गाला लागलो कारण पुढच्या दिवशीचा दौरा हा हंपीच्या दुसऱ्या बाजूस जायचं होता त्यामुळे वेलेतच हॉटेल मध्ये पोहोचलो आणि ठरल्याप्रमाणे मँगो रेस्टॉरंटमध्ये जेऊन त्यादिवसाची सांगता केली. 
दिन का साथी 
 टीप :-
१)  सर्वात पहिले सांगायचं झालं तर सिझन सोडून हंपी केलं तर हंपी बघण्यात एक वेगळी मजा आहे. पावसाळा पावसाळा संपता संपता केल्यास गर्दीसुदधा कमी असते आणि कमी गर्दीतच हंपी बघण्यात मजा आहे.
२) खर्च कमी करायचा असल्यास सायकल हा उत्तम पर्याय आहे १०० रुपयात दिवसभर सायकल मिळते ज्यात तुमची हंपीची सर्व ठिकाणं आरामात बघून होतात व सोबत गाईड घ्यावा.
३) लोटस महाल च तिकीट विजया विठ्ठल मंदिरास चालत त्यामुळे शक्यतो दोन्ही ठिकाण एकाच दिवशी करायचा प्रयत्न करावा.
४) सर्वात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी परतताना शक्यतो सूर्यास्ताच्या आताच परतावं कारण नंतर साधं वाटसरू सुद्धा हंपीच्या वाटेवर दिसत नाही.

दिवसभराचा खर्च :-
सायकल  :- १००/-
चहा नाश्ता :- ३०/-
जेवण :- १५०/-
गाईड :- ३५०/-
प्रवेश फी :- ४०/-
चहा :- २०/-
जेवण :- १५०/-
-----------------------
 एकूण :- ८४०/-

पुन्हा भेटूत हंपीची दुसरी बाजू घेऊन .....

Tuesday, 18 February 2020

कर्नाटक दौरा भाग २ :- बदामी

               कालचा पट्टडकल,आईहोलेचा दौरा झाला आज सकाळी लवकर उठायचं म्हणून काल रात्री सुद्धा लवकर झोपलो ठरल्याप्रमाणे ५ वाजता उठलो पण खिडकीतून बाहेर बघतो तर काय पाऊस. मग पुन्हा झोपलो आणि सकाळी बरोबर साडेसहाला उठलो पटापट तयार झालो आणि ७ च्या सुमारास बाहेर पडलो एव्हाना उजाडलं सुद्धा होतं.
 बदामी लेणीवरून दिसणारा बदामी किल्ला,उजव्या बाजूस भूतनाथ मंदिर व अगस्त्य तलाव       
         
          आजच्या दिवशी भेट देण्याची ठिकाणं होती ती म्हणजे अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, बदामी लेणी आणि बदामी किल्ला. बदामी लेणीची प्रवेशाची वेळ साडेनऊची असल्या कारणाने सर्वप्रथम अगस्त्य तलावला भेट द्यायला निघालो. अगस्त्य तलाव म्हणजे बदामी किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी जिथे जमा होतं ती जागा. तलावाच्या काठावरच एक देऊळ आहे त्याचं नाव "भूतनाथ मंदिर"
                सकाळी गावातील बरीच जण Morning walk साठी म्हणून अगस्त्य तलावापाशी जमले होते. मी सुद्धा सकाळी सात वाजता पोहोचलो होतो. भूतनाथ मंदिर उघडण्याची वेळ माहिती नसल्याने मी जवळचं असलेल्या पायरीवर एक काका बसले होते त्यांना विचारलं की भूतनाथ मंदिर किती वाजता उघडतं तेव्हा ते हातवारे करून मला सांगायला लागले तेव्हा मला कळलं की ते मूकबधिर आहेत. पण तरीही त्यांनी मला त्यांच्या भाषेत बदामीच्या संपूर्ण भागाची ओळख करून दिली त्यावेळी खऱ्या अर्थाने सांगायचं तर माझं मन भरून आलं की "माणसाला बोलायची किती इच्छा असते पण बोलता येत नसतं तरीही त्यांनी माझ्यासाठी घेतले परिश्रम हे खरंच कौतुकास्पद होते. त्यांचं नाव ते मला सांगू शकले नाहीत म्हणून मी त्यांच्या ओळ्खपत्राचा फोटो काढला व नंतर मुंबईत येऊन माझ्या कर्नाटकच्या मित्राला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांचं नाव "मनोहर". मनोहर काका तुमचे खूप खूप आभार.
SELFIE WITH MANOHAR KAKA
प्रवासवर्णन पुढीलप्रमाणे
दिनांक : २१.१०.२०१९
१) अगस्त्य तलाव
         अगस्त्य तलाव हा बदामी मधील सर्वात सुंदर तलाव आहे. चारी बाजूने डोंगराने वेढलेला हा तलाव पावसाळ्यात पुर्णतः भरलेला असतो अगस्त्य तलावाच्या मागील बाजूस असलेल्या २ धबधब्याना लहान बहीण मोठी बहीण म्हणून संबोधले जाते. अगस्त्य तीर्थ च्या उजव्या बाजूस बदामी किल्ला असून डाव्या बाजूस बदामी लेणी आहेत. समोर भूतनाथ मंदिर असून मधोमध अगस्त्य तीर्थ आहे.
अगस्त्य तलाव
२) भूतनाथ मंदिर
               अगस्त्य तलावाला लागूनच असलेल्या मंदिरास "भूतनाथ मंदिर" म्हणून ओळखले जाते. भूतनाथ म्हणजे "आत्मांचा देवता". भूतनाथ मंदिर हे भूतनाथ समूह मधील एक आहे.  बलुआ नामक दगडापासून बनविले गेलेले हे मंदिर भगवान शंकराच्या भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ह्या मंदिरात शंकराच्या भूतनाथ अवतारात पूजा केली जाते.  मंदिराचे बांधकाम हे दक्षिण भारतीय द्रविड़ियन आणि उत्तर भारतीय नगर शैली ची आठवण करून देते.
भूतनाथ मंदिर 
 
दगडावरील देवांच्या मूर्ती

शेषशायी विष्णू
३) बदामी लेणी
               चालुक्यांच्या राजवटीत म्हणजेच पाचव्या शतकात बांधली गेलेली ही लेणी सर्व धर्मांना समर्पित केलेली आहे.  बदामी लेणी ही त्या काळच्या अपूर्व ज्ञानाचे एक प्रतीक आहे कारण इतक्या मोठ्या डोंगरांना कापून त्यात शिल्पकला करणं ही सामान्य गोष्ट नाही ह्या लेण्यानंतर पूर्ण दक्षिण भारतात ही शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली गेली.
बदामी लेणी
i) शैव लेणी
      ही एक शैव लेणी असून ह्याची निर्मिती ३ टप्प्यात करण्यात आली आहे. गर्भगृह सभामंडप आणि मुखमंडप. 
ह्या लेणीतील प्रसिद्ध असलेले शिल्प म्हणजे प्रवेशाच्या पश्चिमेस असलेली नटराजाची शिल्पकृती.
अठरा हाताची असलेली ही प्रतिकृती कमळाच्या फुलावर उभी आहे. वरील दोन हातात सर्प पकडले आहेत. बाकीच्या हातात डमरू जपमाळ पुष्प त्रिशूल आणि विणा निदर्शनात येते. शिवच्या ह्या नृत्यास गणपती बघत आहेत.




नागशिल्प
गजवृषभ शिल्प
२) वैष्णव लेणी
        बदामी लेणीच्या ह्या दुसऱ्या लेणीमध्ये भगवान विष्णूंचे अनेक अवतार शिल्पित करण्यात आले आहेत. हि लेणी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आली आहे
वैष्णव लेणी
लेणींवरील रेखीव शिल्प
 

 
 

३) महाविष्णू लेणी
    ह्या लेणीची निर्मिती इसवी सन ५७८ मध्ये झाली आपला मोठा भाऊ कीर्तिवर्म ह्याने १२ वर्ष यशस्वी राज्य केल्याच्या आठवणी मध्ये ह्या लेणी ची निर्मिती झाली बदामी मधील हि सर्वात मोठी लेणी आहे
महाविष्णू लेणी 







भगवान विष्णूंचे विविध अवतार



४) जैन लेणी
            ह्या लेणी मध्ये २३ तीर्थंकर पार्श्वनाथ ह्यांचे प्रार्थना करतानाचे शिल्प आहे. ज्याच्या डोक्यावर पाच फण्याचा सापाचं शिल्प आहे. दुसरं शिल्प आहे ते म्हणजे बाहुबली. बाहुबली तीर्थंकर नसून त्याग किंवा निर्वाण स्वीकार केलेला श्रेष्ठ मानव आहे. तिसरं शिल्प आहे ते म्हणजे भगवान महावीर. ह्या लेणी मध्ये २४ तीर्थंकर असलेले एक शिल्प आहे. 
पार्श्वनाथ 


४) बदामी किल्ला                  
        बदामी किल्ला, डोंगराच्या माथ्यावर बदामी लेण्यांसमोर वसलेले एक प्रमुख आकर्षण आहे. हा किल्ला मुख्य शहरापासून दोन किमी अंतरावर आहे. बदामी किल्ला हा भूतनाथ मंदिराच्या पूर्वेकडे आहे. एकेकाळी हे चालुक्य घराण्याच्या राजांचे घर होते. हा किल्ल्यापर्यंत केवळ पायीच पोहोचता येतो. किल्ल्यावर दोन मंदिरे आहे जी पाचव्या शतकात भगवान विष्णूची उपासना करणारे राजा पुलकेसन द्वितीय यांनी बांधली आहेंत.  
       वरील शिवालय भगवान शिवाला समर्पित आहे तर खालील मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. वरील शिवमंदिराच्या बाह्य भिंतींवर हत्ती आणि सिंह यांसारख्या पौराणिक कोरीव काम दिसून येते. शिवालयाच्या उत्तरेस सोळाव्या शतकातील टिपू सुलतान काळाची तोफ आहे जी १६व्या शतकातील टेहळणी बुरूजाप्रमाणे दिसते. हा किल्ला त्या प्रदेशातील प्रमुख आकर्षणे म्हणून गणला जातो ज्यामध्ये दोन धान्य कोठार , एक खाजगी खोली, चौकाच्या भिंती आणि एक गुप्त भूमिगत कक्ष आहे.
बदामी किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार

दुसरे प्रवेशद्वार



बदामी किल्ल्यावरील बुरुज
बदामी शहर व किल्ल्यावरील तोफ
१५५० सालची तोफ 



धान्यकोठार

शिवमंदिर
गणेशमंदिर
               बदामी किल्ल्यावरून एक फेरफटका मारून आता पुन्हा हॉटेल च्या दिशेने निघालो, बदामी किल्ला उतरताना वाटेत असलेल्या फुलझाडांवर बरीच फुलपाखरं नजरेस पडली त्यांना कॅमेरा मध्ये कैद करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो. 




छान किती दिसते... फुलपाखरू 
           एव्हाना ११.३० वाजले होते. अजून जेवण करून हंपीच्या दिशेने प्रवास करायचा होता. हॉटेलमध्ये जाऊन सर्वप्रथम पोटभर जेवण केलं आणि थेट बस स्टॅन्ड गाठलं व हंपीच्या प्रवासाला लागलो. एक वाजताच्या सुमारास बदामीतुन प्रस्थान करून सुमारे साडेसहाच्या सुमारास स्वारी हंपी मध्ये दाखल झाली हॉटेल बुक असल्याने सर्वप्रथम बॅग टाकली फ्रेश झालो आणि हंपीच्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.

 MANGO TREE RESTAURANT
टीप :-
 १) बदामी वरून हंपीला जायचं झाल्यास बदामी हंपी थेट बस नसल्याकारणाने बदामी ते इल्कल व इल्कल ते हंपी अशी बस पकडावी.
 
दिवसाचा खर्च :-
बदामी लेणी प्रवेश फी :- २०/-
जेवण : - ५०/-
बदामी ते इल्कल बस :- ७०/-
इल्कल ते होस्पेट : - ११५/-
होस्पेट ते हंपी : - १५/-
रात्रीचे जेवण :- १५०/-
-------------------------
एकूण     :-      ४२०/-
              बदामीच्या संपूर्ण प्रवासात असलेला माझा एकमेव फोटो व तो काढणारे फोटोग्राफर म्हणजे मनोहर काका त्यामुळे तो माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. 

 पुढील प्रवास पुढच्या ब्लॉगमध्ये.... 
लवकरच येतोय हंपीचे प्रवासवर्णन घेऊन.