Monday, 12 February 2018

मस्जिद और मिनारोंका शहर : चंपानेर

          बच्चनसाहेब बऱ्याच दिवसांपासून म्हणत होते "कभी तो पधारो म्हारे गुजरात मां" म्हणून विचार केला ह्यावेळी गुजरातलाच जावं. गुजरातमध्ये चंपानेर (आम्ही चंपानेर म्हणतो तिकडची माणसे चापानेर म्हणतात)नामक एक शहर आहे. तेथील काही मशिदी व पावागढ ही प्रसिद्ध ठिकाणं.
          सुमारे २ महिने पहिलेपासून आरक्षण केल्यामुळे जागेचा काही प्रश्न नव्हता. आमचा प्रवास सुरु झाला तो रविवारी मध्यरात्री १२.४० च्या डेहराडून एक्सप्रेसने. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. आम्ही सगळे आधी बोरिवलीस्टेशन वर भेटलो. मी, अजय, वीणा, श्रेया , प्राजक्ता आणि अमित. सगळ्यांची तोंडओळख झाली. चांगली मैत्री व्हायला ती सुद्धा पुरेशी होती कारण पुढचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच काढायचा होता.
         झालं तर मग सुमारे साडेबाराच्या सुमारास गाडीत बसून मस्त झोप काढून सकाळी ८ वाजता चंपानेर स्टेशनवर उतरलो. चंपानेर हे स्टेशन निर्जन लोकवस्तीतील रेल्वे स्टेशन. मोजून १० माणसंसुद्धा नसतील स्टेशनवर. वेळ कमी असल्यामुळे उतरल्यावर रिक्षावाल्याची वाट बघेपर्यंत चहा नाश्ता करून घेतला तोपर्यंत रिक्षापण आली दोन रिक्षा सांगून पण रिक्षावाल्याने एकच रिक्षा आणली. मग काय ऍडजस्ट करून आम्ही ६ जण एकाच रिक्षेत बसलो आणि मग त्या रिक्षेची बैलगाडी कधी झाली हे कळलं सुद्धा नाही. फक्त गुजरातचे रस्ते चांगले असल्याकारणाने कोणाला त्रास जाणवला नाही.
        रिक्षात बसून अजयने गुगल मॅप चालू करून आम्हाला आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून दिली. बरीचशी ठिकाणे आम्ही रिक्षातूनच पहिली. ९.२० च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या ठिकणी पोहोचलो ते म्हणजे "शहर की मस्जिद".

      शहर कि मस्जिद (SHEHAR KI MASJID)
         वेळेचा अभाव असल्याने आम्ही ह्या मस्जिदमध्ये झटपट एक कटाक्ष टाकला. १५-१६ व्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या मशिदीमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. ह्या मशिदीत प्रवेश करण्यासाठी एकूण पाच प्रवेशद्वार असून उंचच्या उंच मनोऱ्यांमध्ये मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे.
     आतमध्ये हवा व उत्तम प्रकाश येण्यासाठी दोन्ही बाजूला दोन झरोके आहेत. मशिदीच्या आतमध्ये एकसारख्या असणाऱ्या खूप साऱ्या कमानी व मध्यभागी उत्तम नक्षीकाम असणारे घुमट आहे.


         सुमारे २५ मिनिटांचा वेळ घेऊन आम्ही ९.४५ ला तिथून काढता पाय घेतला व आमचं मुख्य लक्ष्य असणाऱ्या जामा मस्जिदकडे वाटचाल सुरू केली. पाच मिनिटाच्या अंतरावर असलेली ही मस्जिद मुस्लिम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
        जामा मस्जिद (JAMA MASJID)
        जामा मस्जिद हि १५ व्या शतकातली मस्जिद असून 'सुल्तान महमूद बेगदा' यांनी बांधलेल्या सर्वात लक्षणीय स्मारकेंपैकी हे एक आहे. मस्जिदीच्या प्रवेशद्वारातच चहुबाजूने जाळीदार नक्षीकाम असलेले आवार आहे त्यातून डाव्याबाजूस एक प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार हे दोन मिनारच्या  मध्यभागी असून ह्याची उंची सुमारे ३० मीटर आहे.

 
मुख्य प्रवेशद्वार 


        मशिदीच्या आतमध्ये प्रशस्त वावर असून दोन्ही बाजूला खिडक्या आहेत मशिदीच्या वरील बाजूस उत्तम कलाकुसर असलेले नक्षीकाम असून बाहेरील बाजूस राजस्थानी राजवाड्यासारख्या खिडक्या आहेत.

मशिदीच्या समोरील प्रशस्त वावर
 
   मशिदीवरील नक्षीकाम

   राजस्थानातील राजवाड्याप्रमाणे असणाऱ्या खिडक्या 
         मशिदीच्या बाहेरून उजव्या बाजूस एक विहीर आहे. बारमाही पाणी असणाऱ्या ह्या विहिरीस चारी बाजूस त्रिकोणी आकारात पायऱ्या आहेत.

जामा मस्जिदच्या बाजूला असणारी बारमाही पाण्याची विहीर
             भव्यदिव्य असणाऱ्या ह्या मशिदीतील नक्षीकाम बघून केवळ थक्क व्हायला होते. नाही नाही म्हणता ह्या मशिदीत आमचा एक तास गेला. पण तो एक तास तिथे व्यतीत करणं गरजेचं होते कारण अशी वास्तू पुन्हा पुन्हा पहायला मिळत नाही. 
            १०.४५ ला आम्ही जामा मस्जिद मधून निघून पावागढच्या दिशेने वाटचाल सुरु केली. पावागढला जायला गडाच्या खालून जीप मिळते ती तुम्हाला गडाच्या मध्यावर नेऊन सोडते. तिथून वर जाण्यासाठी रोप वे चा मार्ग आहे. रोपवे ने गडावर जाण्यास ६ मिनिटे लागतात परंतु रोप वे ला रांग किती आहे त्यावर ते अवलंबून आहे. ११.१५ ला नंबर लावून १२.३० ला आमचा नंबर आला. उशीर झाल्यामुळे आम्ही फक्त वरून एक फेरफटका मारून परत खाली आलो आणि परतीच्या दिशेने निघालो.

    उडनखटोला 

पावागढ वरील मंदिर
        एव्हाना एक वाजला होता ३ वाजताची गाडी असल्यामुळे आमच्याकडे २ तासच शिल्लक होते त्यात चाम्पानेर ते बडोदा हा ५७ किमी चा प्रवास. आम्ही पटकन रिक्षेत बसलो आणि बडोदा स्टेशन च्या दिशेने प्रवास चालू केला वाटेत एक हेलिकल विहीर लागली ती बघू कि नको बघू कि नको असा विचार चालू होता पण म्हणलं  परत एवढ्या दूर कधी येऊ म्हणून सगळ्या जणांनी उतरायचं ठरवलं आणि २ मिनिटातच विहिरीच दर्शन घेतल  आणि परत वाटेल लागलो.


      हेलिकल विहीर  (HELICAL STEPWELL)
        आत्तापर्यंत काही खाल्ले नसल्याने भूक तर प्रचंड लागली होती. म्हणून श्रेयाने आणलेल्या इडल्यांवर सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला. ३ ची गाडी असताना आम्ही बरोबर २.५५ ला बडोदा स्टेशन वर पोचलो. सुदैवाने म्हणावं कि दुर्दैवाने ती गाडी ४५ मिनिटे उशीरा होती. पण त्यामुळे घरी पोचायला खूप उशीर झाला. पण एका दिवसात एव्हडं सगळं पाहायचं म्हणजे ओढाताण होणारच. 
         मजा आली कि त्रास झाला हे पाहायचं झाल्यास मजाच दिसणार!!! त्यामुळे ह्यासगळ्या गोड आठवणी घेऊन आम्ही दुपारी ४ ची ट्रेन पकडून घरच्या प्रवासाला सुरुवात केली व रात्री सुमारे १२ च्या सुमारास घर गाठलं.
Back to home...

टीप : - चंपानेर  पूर्ण पाहायचं झाल्यास एक दिवस अगोदर जायला हवं. चांपानेर हे छोटंसं रेल्वे स्टेशन असून इथे प्रत्येक ट्रेन थांबत नाही जवळच स्टेशन वडोदरा आहे. वडोदरापासून चंपानेर ५७ किमी असून चंपानेरला जाण्यास बस मिळते.  पावागढ ला सकाळी गेल्यास बाकी सगळी ठिकाणे वेळेत पाहू शकतो.
 एकदा गर्दीची वेळ चालू झाली कि रोप वे च्या रांगेतच वेळ वाया जातो. पुरेशी माहिती नसल्यामुळे सात कमान सारखी वास्तू आमच्या नजरेतून सुटली. सातकमान पाहायचे झाल्यास पावागढ पर्यंत जायची गरज नाही ते वाटेतच लागते. 

काही राहिलेल्या वास्तूंना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा नक्की चंपानेरला नक्की भेट देऊ. 
तोपर्यंत गुड बाय ....

GOOGLE MAP LOCATION

 
शहर कि मस्जिद

जामा मस्जिद


Saturday, 27 January 2018

दोन मंदिरे एक ईश्वर : गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर (GONDESHWAR & AISHWARYESHWAR TEMPLE)

            गड झाले, विहिरी झाल्या, आता वेध लागले ते  देवळांचे म्हणून ह्या रविवारी प्राचीन मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. थोडीफार शोध मोहीम केल्यावर जवळपासचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. १२ व्या शतकातील दोन मंदिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात आहेत असं समजलं. मी अजय आणि भरत आम्ही तिघांनी योग्य ती माहिती घेऊन रविवारी जाण्याची तयारी केली.
       सकाळी ७.५५ ची कल्याणहुन कसारा लोकल पकडली. साडेनऊच्या सुमारास कसारा गाठले.  कसाऱ्यावरून सिन्नरला जाताना घोटीमार्गे जावे लागते त्यामुळे कसार्याहून घोटीला जाण्यासाठी SHARE जीपने घोटीला गेलो व घोटीहून सिन्नर ला जाण्यासाठी पुन्हा SHARE जीप घेतली. १२ वाजण्याच्या सुमारास सिन्नरला पोहचलो आणि प्रथम गोंदेश्वर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
गोंदेश्वर मंदिर
         सिन्नर बस डेपो पासून २ किमी अंतरावर असलेले हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला "शैवपंचायतन" म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.

         आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर
          गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा  शिल्पे कोरलेली आहेत. काही युद्धाची शिल्पे कोरली आहेत.


         



मंदिरातील काही शिल्पे
        मंदिराच्या चहूबाजूला हत्तीची शिल्प आहेत. मंदिराच्या चहूबाजूला असलेल्या ह्या हत्तीच्या शिल्पातील एका हत्तीच्या सोंडेत एकदा एका चोराला हिरा सापडला म्हणून त्याने लालसेपोटी चहूबाजूला असलेल्या सर्व हत्तीची सोंड नष्ट केली अशी आख्यायिका आहे.

सोंड तुटलेल्या हत्तीचे नमुने  
           मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम अशी शिल्पकला आहे. मंदिराच्या बाहेरील शिल्पातून गोष्टीरूपी इतिहास उलगडला जातो फक्त तितक्या अभ्यासू नजरेने आपण पहिले पाहिजे. मंदिरावर काही कामशिल्पेही आढळतात.

मंदिराबाहेरील कामशिल्पे 
            १२ व्या शतकात बांधलेल्या ह्या मंदीरातून निघावस वाटत नव्हतं पण तरीही वेळेचा अभाव असल्याकारणाने २ तास ह्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही येथून काढता पाय घेतला. जेवणाची वेळ उलटून गेलेली म्हणून वाटेत मार्केट यार्डात असलेल्या "जय मल्हार" खानावळीकडे आमचे पाय आपोआप वळले तिथल्या स्पेशल "शेवभाजी" वर ताव मारला आणि जवळच असलेल्या ऐश्वर्येश्वर मंदिराकडे वाटचाल चालू केली.


 ऐश्वर्येश्वर मंदिर
            ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अगोदरच आहे पण आजही बरेच लोक ह्या मंदिरापासून अनभिज्ञ आहेत . गोंदेश्वर मंदिरापासून हे मंदिर सुमारे २० मिनिटाच्या अंतरावर असल्याने आम्ही पायीच जायचं ठरवलं. ऐश्वर्येश्वर मंदिर हे द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची कलाकृती असलेले तोरण आजही आपल्याला आकर्षित करते.
प्रवेशद्वारावरील तोरण
       मंदिरात असलेल्या प्रत्त्येक खांबावर उत्तम अशी कलाकुसर आहे. मंदिरात सुबक अशी शिवपिंड आहे. कदाचित रोज कोणीतरी पूजेसाठी येत असावं पण सिन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर इतकं शांत पाहून आश्चर्य वाटलं  
 
 ऐश्वर्येश्वर मंदिरातील शिवपिंड 
          
          मंदिराच्या चहुबाजूने निरीक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसते. त्यावर अनेक प्रकारच्या कमानी आहेत  काही ठिकाणी मंदिराचे उंच उंच कळस नजरेस पडतात


 
  
 मंदिराच्या बाहेरील बाजूची शिल्प 
            आज सुमारे ८ शतकापासून हे मंदिर निसर्गाशी झुंज देत उभेआहे. ह्या मंदिराबद्दल जास्त कोणालाही माहिती नसल्यामुळे इथे कोणीच नसते. त्यामुळे इथे गेल्यावर लगेचच शांततेचा प्रत्यय येतो. 
         हि मंदिरे पाहिल्यावर एकदा मनात विचार आला कि आज जसे आपल्याला  काही  सुचलं कि कागदावर रेखाटतो त्याचप्रमाणे त्याकाळची माणसे असं काही सुचल्यास थेट दगडावरच रेखाटत असावी हि दोन्ही मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आम्हास अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.
           पुन्हा परत कधी आलो तर एकावेळी एका मिंदीराला भेट देऊ असा विचार करून आम्ही परतीच्या वाटेल लागलो. एव्हाना साडेचार वाजले होते त्यामुळे सिन्नर-नाशिक-कसारा असं येणं शक्य नसल्याने आम्ही येताना नाशिकवरून ट्रेनने यायचा निर्णय घेतला जो खरंच योग्य ठरला त्यानिमित्ताने नाशिक करून खरेदी करता आली.

कधी चुकून माकून नाही तर ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी म्हणून तरी मुद्दामच सिन्नर शहराला  भेट द्या....

मंदिराबाहेरील काही अप्रतिम दृश्ये  ... 







GOOGLE LOCATION OF GONDESHWAR TEMPLE

GOOGLE LOCATION OF AISHWARYESHWAR TEMPLE

Sunday, 7 January 2018

९व्या शतकातील लोणादित्य रामेश्वर मंदिर (LONADITYA RAMESHWAR TEMPLE)

         अंबरनाथला राहत असल्यामुळे आमच्याकडे पुरातन काळातील एक शिवमंदिर आहे हे आम्ही खूप अभिमानाने  सांगत असू पण एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीत वाचल्यावर लक्षात आलं कि शिलाहार राजांनी बांधलेली अनेक शिवमंदिरे ठाणे जिल्ह्यात अवशेष रूपाने आजही उभी आहेत. या मंदिरापैकी सर्वाधिक अवशेष रूपाने आपले अस्तित्व प्रकट करणारे लोनाडचे लोणादित्य महादेवाचे देवालय होय. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या शे-पाउणशे वर्षांपूर्वी ह्या देवालयाची निर्मिती झाली. हे वाचलं आणि कल्याण पासून सुमारे ७ किमी दूर असणाऱ्या ह्या "लोणादित्य रामेश्वर" (LONADITYA RAMESHWAR TEMPLE) मंदिरास भेट देण्यास निघालो.



 मंदिराची मागील बाजू 
            लोनाड  गावातील  तलावाकाठी उभे असलेले हे मंदिर शिलाहार राजांपैकी कोणी आणि कधी बांधले  ह्याचा निश्चित पुरावा नाही पण हे मंदिर खूप पुरातन आहे ह्याचे पुरावे दानपत्रातून व शिलालेखातुन उपलब्ध झाले आहेत. आषाढ वद्य ४, शके १९१९ (इ. स. ९१७) साली शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या  मंदिराला देवाच्या पूजेसाठी "दक्षिणायन दान" म्हणून भादाणे गाव इनाम दिला. अशा आशयाचा ताम्रपट सापडला आहे ह्याचा अर्थ लोनाडचे हे शिवमंदिर सुप्रसिद्ध अंबरनाथच्या देवालयाच्या जे २७ जुलै १०६१ मध्ये बांधले होते याच्या आधी शके ९१९ (इ. स. ९१७) च्याही आधी लोनाडचे मंदिर बांधले गेले हे शिलाहार राजाच्या दानपत्रावरून कळते.
 


 मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिल्प 
          द्वितीय अपरादित्य शिलाहार राजाचा मंत्री व्योमशभु यांनी लोनाडच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि गर्भगृहात आपल्याच नावाने व्योमशम्भू महादेवाचे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी समुद्राला साक्षी ठेवून रामाने ज्या शिवलिंगाची स्थापना करून प्रार्थना केली त्याच आकाररूपाचे शिवलिंग या मंदिरात असल्याने या शिवमंदिराला "श्रीरामेश्वर मंदिर" असेही म्हंटले जाते. मंदिरावरील सुबक मूर्तींचे नमुने बघितल्यावर आज हि अवाक व्हायला होतं.

      शिवलिंग 

            मंदिराच्या मागील बाजूस असलेली कलाकुसर 
            गेली कित्येक वर्षे ऊन वारा पावसात ह्या मंदिराची झीज होऊ लागली आहे. बरेचसे अवषेश ढासळले आहेत. पण ते ढासळून सुद्धा त्यावरील कलाकुसर जशी च्या तशी आहे. इतकी वाताहत होऊनही इतके जुने मंदिर त्याच थाटात उभे आहे. मंदिरावरील कलाकुसरीचे काम बघून कलाकारालाही दाद द्यावीशी वाटते. बऱ्याच लोकांना अजूनही ज्ञात नसल्यामुळे  त्या मंदिराजवळ गर्दी कमी असते.



     पडझड झालेल्या वास्तूंचे काही नमुने
          तिथल्या गावकऱ्यांना मंदिराबद्दल माहिती सांगण्यास कोणी आहे का असे विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले कि इतका जुना माणूस गावात शिल्लक नाही.  त्यामुळे आमच्याकडे ह्या मंदिराविषयी पुरेशी माहिती नाही पण असो आज ते मंदिर ज्या पद्धतीने तेथे उभे आहे ते पाहण्याचे भाग्य असणे हे हि नसे थोडके!!! म्हणून आहे त्यात समाधानी राहून ह्याअतिप्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरच्या वाटेला लागलो.

                           
 MAP LOCATION