Thursday, 19 July 2018

एक छोटेखानी किल्ला : किल्ले भिवगड उर्फ भीमगड (Bhivgad Fort)

          पाऊस असताना सुद्धा सलग दोन  रविवार घरी. असं सांगताना पण कसंतरी वाटतंय पण खरंतर पाऊस जास्त असल्यामुळेच घरी होतो. पण घेतलेला तो निर्णयही योग्यच होता. ह्या रविवारी सुद्धा Fifa World cup असल्याने लवकर घरी येऊ असाच एखादा ट्रेक घ्यायचा होता म्हणून मग मागच्या रविवारी जाण्याच्या ठिकाणीच ह्या रविवारी जायचं ठरवलं. ते म्हणजे किल्ले "भिवगड" उर्फ "भीमगड".
किल्ले भिवगड
        सकाळी ७ च्या सुमारास घरातून निघालो ७.२१ ची कर्जत लोकल पकडली. पावसाची ये-जा सुरूच होती. किल्ला छोटेखानी होता हे माहिती असल्याकारणाने आम्ही सुद्धा आरामात होतो. सुमारे आठच्या सुमारास कर्जतला पोचलो. वेळ असल्याकारणाने स्टेशनवरच नाश्ता केला आणि रिक्षा पकडली ९ च्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोचलो. तसं पाहायला गेलं तर गडावर जायला २ वाटा आहेत. त्यातली पहिली वाट वडप गावातून आणि दुसरी वाट गौर कामत गावातून. जवळपास सगळे जण वडप गावातूनच जातात पण आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायची सवयच आहे ना म्हणून आम्ही गौर कामात गावातून जायचं ठरवलं.
            गड छोटा असल्याकारणाने चढाई लगेचच सुरू होते. सुमारे सव्वा नऊच्या सुमारास आम्ही चढायला सुरुवात केली आजूबाजूला अंथरलेला हिरवागार गालिचा समोर धबधब्यांची रांग सुंदर निसर्गरम्य दृश्य. ते कॅमेरात टिपून पुढे जायला निघालो चढण कमी आणि निसर्ग जास्त असा हा ट्रेक.

गौर कामत गाव 
           काहीही न करता आम्ही १० ते १५ मिनिटात अर्ध्यावर येऊन पोहोचलो. वरून गावातल्या कौलारू घराचं मनमोहक दृश्य नजरेस पडलं. समोर दिसणारे छोटेखानी २ तलाव. बाकी गावचीच घरं. ते सगळं दृश्य नजरेत भरून आम्ही पूढे चालू लागलो सुमारे ५ मिनिट उजव्या बाजूने पुढे गेल्यास गडाचं खरं प्रवेशद्वार नजरेस पडलं तेव्हाच समजलं गडाचा खरा रास्ता हा ह्याच गावातून आहे. 
 गडावर जाणारी वाट 
        गड छोटा असला तरी ह्या वाटेने गेल्यास हा रस्ता चित्तथरारक आहे. त्यात पावसाळा असल्याने वाट निसरडी होती आम्ही एकमेकांना हात देत पुढे आलो. समोर कातळात खोदलेल्या पायऱ्या त्याच्या उजव्या बाजूस एक गुहा आणि डाव्या बाजूने गडावर जाणारी पाऊलवाट. 
            ती चालत चालत पुढे गेलो आणि थेट गडावर पोचलो पाहिले नजरेस पडलं ते गडावरील पाहिलं भुयारी टाके. त्याकडे बघून ते बारमाही पाण्याचं असेल असं वाटलं नाही पण गडावर एकूण ५ पाण्याची टाके आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता कधी भासत नसावी. 
       भुयारी टाके 
      पुढे गेल्यावर थेट आम्ही बालेकिल्ल्यावर जाऊन पोहोचलो. बालेकिल्ल्यावरून गडाच्या चहूबाजूचा निसर्ग दृष्टीक्षेपात पडतो. उजव्या बाजूस वडप आणि गौरकामत गाव,  डाव्याबाजूस ढाकच्या किल्ल्यावरील ओसंडून वाहणारे धबधबे व समोर वडप गावातला प्रसिद्ध धबधबा.
बालेकिल्ला
      गडावरून दिसणारे गावाचे दृश्य 
          बालेकिल्ल्याच्या बाजूला सुद्धा एक पाण्याचे टाके आहे. एकूण ५ टाक्यांपैकी हे एक ह्यात बऱ्यापैकी पाणी साथ होता किंबहुना हि टाकी पावसाळ्यात भरून वाहत असतील. बाजूला गावकऱ्यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज लावायची व्यवस्था केली आहे. 
    बालेकिल्ल्यावरील पाण्याचे टाके 
         गडावरून समोर पाहिलं कि वडप चा धबधबा नजरेस पडतो. ह्या धबधब्याकडे पाहिलं की कोणालाही जायचा मोह आवरत नाही. आम्ही तिकडे जाण्याचा विचार केला पण वरून पाऊस आणि वारा इतका होता की पुढे जाणं शक्य नव्हतं म्हणून तिथेच थांबून जेवणाचा निर्णय घेतला
          गडावरून दिसणारा वडप गावातील धबधबा 
         पण जेवायला योग्य जागा नव्हती म्हणून ती शोधत शोधत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत अजून एक पाण्याचे टाके लागले हेच काय त्या गडाचे अवशेष. गडावरील ५ टाक्यांपैकी हे एक टाके. गौरकामत वरून वडप गावात जाताना लागणारे हे टाके. 
          तिथेच एका ठिकाणी जेवणासाठी जागा शोधली. खरंतर भूक कोणालाच नव्हती कारण इतका छोटा ट्रेक करायची सवयच नाही राहिली आता. पण प्रत्येकाने डब्यात काय काय आणलंय ते पाहण्याच्या उत्सुकतेपोटी जेवण करायचं ठरवलं खरंतर नाश्ता करून 2 तास पण झाले नव्हते पण बॅगा हलक्या करायचाच होत्या म्हणून जेवायला बसलो. बसलो नाही उभ्यानेच जेवलो. कारण गडावर बसण्यायोग्य जागाच नाही. 
 
 
     
आजचा मेनू
                 त्यात भन्नाट हवा. मग उभ्यानेच जेवणाचा आनंद घेतला आणि आता मात्र आम्ही वडप गावातून परतीच्या प्रवासाला लागलो. वडप गावातून भिवगडावर यायचं झाल्यास डाव्या हाताचा रस्ता भिवगडावर आणि उजव्या हाताचा रस्ता ढाक बहिरीकडे जातो.
  भिवगड आणि धाक बहिरी कडे जाणारे दिशादर्शक
       सुमारे १५ ते २० मिनीटातच आम्ही त्या धबधब्यापाशी येऊन पोहोचलो. रविवार असल्याने धबधब्याजवळ जत्रा होती आणि ती गर्दी सुद्धा "रविवरचीच" होती त्यामुळे तिथे न थांबता आम्ही थेट वडप गावातच येऊन थांबलो. पावसाची ये-जा चालूच होती. 
          आमच्या जवळ इतका वेळ होता की एकदा कर्जत स्टेशनपर्यंत चालत जायचा विचार मनात आला पण ते जरा जास्तच झालं असतं म्हणून मग आम्ही गावातून २ रिक्षा केल्या आणि थेट कर्जत स्टेशनला येऊन पोचलो तिथून दीड वाजताची लोकल पकडून अडीच च्या सुमारास घरात. खरंतर वाटलं पण नाही ट्रेक केल्यासारखं पण सुंदर निसर्ग अनुभवण्याची ही योग्य संधी होती.
चालो पुन्हा भेटूत पुढच्या रविवारी.... 

क्यूकि ये प्यास है बडी ......

 गडावरील वाऱ्यावर टिपलेला एक भन्नाट व्हिडीओ ....


Monday, 9 July 2018

किल्ले भास्करगड उर्फ बसगड (BASGAD)

          सलग तिसरा रविवार भटकंतीचा. क्या करे कंट्रोल नही होता.... काही केलेतरी घरी बसवत नाही मग काय ह्या रविवारी भटकंतीचे ठिकाण च घेतले किल्ले भास्करगड उर्फ बसगड . किल्ले बसगड म्हणजे हरिहरच्या बाजूचा ट्रेक. जिथे सगळी दुनिया वेड्यासारखी जाते तिथे आम्ही कधीच जात नाही म्हणूनच बसगडला जायचा निर्णय घेतला आणि घेतलेला हा  निर्णय अगदी योग्य होता.
          सकाळी ८ च्या सुमारास कसारा स्टेशन गाठलं. तिथून ठरल्याप्रमाणे जीप घेऊन निरगुडपड्याला जायला सुरवात केली. मधेच फक्त पेट्रोल भरायला आणि नाश्त्यासाठी "बाबा दा ढाबा" वर थांबलो. तिथे चहा पिऊन पुढच्या वाटेला लागलो सुमारे एक तासच पुढे गेलो असुत आणि तिथूनच धुकं सुरू झालं तेव्हाच समजलो आजचा ट्रेक अफलातून असणार आहे. सव्वा दहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आणि चढाईला सुरवात केली. 
           आधी दगडी असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो.  गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये
       किल्ले बसगडकडे जाणारी वाट 
 योग्य वाट दर्शविण्यासाठी केलेले दगडांचे मनोरे 
      दिशादर्शक 
            येणाऱ्या वाटेत बऱ्याच वाटा निघतात.  पण गड डाव्या बाजूला असल्याकारणाने आपण डाव्या बाजूची वाट धरूनच वर चढायचं हे पक्क मनात होतं. त्यादिशेने वाटचाल चालू होती.      
                 अजून ही धुकं अजिबात कमी झालं नव्हतं. एव्हाना आजूबाजूचे दृश्य पाहून जंगलात केलेला प्रवेश हा जाणवायला लागला होता. धुक्यामुळे आपली माणसे आपल्या जवळ येईपर्यंत ती आपल्यासोबत आहेत ह्याचा विश्वास बसत नव्हता म्हणून आमची चाल थोडी धीम्या गतीने चालू होती आणि त्याचा परिणाम आमच्या परतीच्या प्रवासावर होणार ह्याचा आम्हाला अंदाज होता. पण हे निसर्ग सौंदर्य सोडून पुढे जाणे व्यर्थ होते.


 कोब्रा लिली 

ऑर्किड   
    निसर्ग दर्शन 
              पण काय करणार ते म्हणतात ना निसर्गासमोर कोणाचे काही चालत नाही. सुमारे एक तास आम्ही चाललो तरीही धुक्यामुळे नक्की गड कुठे आहे हे कळत नव्हते.  पण एका ठिकाणी २ रस्ते दिसतात म्हणून आम्ही एका ठिकाणी सगळे जण थांबलो आणि समोरून आलेल्या वाऱ्याच्या झुळूकने धुक्याचा पडदा थोडासा बाजूला केला आणि समोर पाहतो तो एक महाकाय डोंगर नजरेस पडला हाच तो बसगड उर्फ भास्करगड . पण जरी समोर दिसत असला तरी त्याची खरी चढाई बाकी होती खरी म्हणण्यापेक्षा "खडतर". कारण आतापर्यंत गडावर जाणारी वाट ही विस्तृत होती खूप ठिकाणी पठार होतं
 किल्ले बसगड 
               पण आता जाणारी वाट ही निमुळती आणि अरुंद होती म्हणून आता आम्ही एका रांगेत जायला सुरुवात केली. डाव्याबाजूला महाकाय पर्वत वरून पडणारे धबधब्याचे तुषार आणि उजव्या बाजूला धुक्याने व्यापलेली खोल दरी स्वर्गसुखाचा आनंद देत होती.
           ह्या क्षणाचा थोडासा आनंद घेत चालतच होतो तोच पुढे एक छोटासा खरतर पॅच लागला. ह्या वाटेवरचा हाच एक खडतर क्षण बाकी सगळीकडे पाऊल वाट आणि बाजूला मन मोहित करणारा निसर्ग. ह्या वातावरणामुळे थकव्याचा अंदाज सुद्धा आला नाही.   
 हीच ती खडतर वाट
          ही खडतर वाटही सगळ्यांनी शिताफीने पार केली फक्त जास्त जण असल्याने थोडा वेळ लागला. सगळेजण सुखरूप पुढे आल्यावर आम्ही पुढे निघालो. साधारण ५ मिनिटाच्या अंतरावरच आम्ही गडाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो जिथून गडाच्या पायऱ्या चालू होतात.

    सर्पिलाकार जिना   
             ह्या सर्पिलाकार पायऱ्यांमुळेच हा किल्ला प्रसिद्ध आहे. पायऱ्याजवळ खूप सारे फोटो काढून पुन्हा पुढची वाट धरली पुढच्या पायऱ्या चालण्यास योग्य नासल्यातरी आजही मजबूत आहेत.पावसामुळे घरंगळत आलेली दगड ह्याच पायऱ्यावर येऊन थांबल्यामुळे आता हा रस्ता चालण्या लायक राहिला नसला तरी वाट काढून जाऊ शकतो. ह्याच पायऱ्या संपल्यावर समोर नजरेस पडतं ते ह्या गडाचे प्रवेशद्वार.  
         बसगडाचे प्रवेशद्वार 
                उंचीने कमी असले तरीही हे प्रवेशद्वार रेखीव आणि देखणे आहे. महाराजांचा मान राखत ह्या प्रवेशद्वारातून वाकुनच प्रवेश करावा लागतो. त्यातून आत गेल्यावर सुमारे सात आठ पायऱ्या चढल्यावर आपणास समोर दिसते ती सरळ चढाई ही चढल्यावर आपण बसगडावर पोहोचतो.
          गडावर आजमितीस काही अवशेष शिल्लक नसले तरी एक बुरुज दोन पाण्याचे टाके आणि एक हनुमानाची मूर्ती अस्तित्वात आहे.गडाचा इतिहास पाहता इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
 आजकल क्या चल रहा है?? FOGG 
           सुमारे दीड वाजायच्या सुमारास आम्ही गडावर पोचलो आणि पोटभर जेवणाचा आनंद घेतला आणि आजूबाजूचा परिसर न्याहालायला सुरुवात केली धुकं इतकं होता की जवळ गेल्याशिवाय काही दिसुच शकत नव्हता म्हणून डाव्याबाजूने वर जायला निघालो वर गेल्यावर तुफान हवा आणि धुकं होत थोडं पुढे गेल्यावर हनुमानाची एक मूर्ती दिसली तिच्या बाजूने घातलेलं प्लास्टिक च कुंपण. आज तीच निवाऱ्याची सोया वाटत होती. तिथून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो

         गडावरील हनुमान मंदिर
             पुन्हा तोच थरार अनुभवत आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत आलो पण पुढे नकळत एक वाट चुकीची धरली गेली आणि आम्ही भरकटलो. पण अजय कडे GPS असल्यामुळे काही वेळच्या आताच आम्ही आमच्या योग्य वाटेला लागलो पण तेव्हा आम्हाला GPS महत्व कळलं करण त्यावेळी जर ते आमच्याकडे नसत तर काय माहीत कदाचित आमचा अजून वेळ तिकडे गेला असता.  कारण आमच्याकडे पर्याय पण नव्हता चारी बाजूला धुकं होत कुठे जायचे ह्याचा काही अंदाज येत नव्हता. योग्य वाटेल लागून आम्ही 5 च्या सुमारास पुन्हा पायथ्याशी लागलो.

              एव्हाना आम्हाला कळून चुकलं होता की ६ ची गाडी मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आम्ही आरामात जायचं ठरवलं. पुन्हा एकदा "बाबा दा धाब्या"वर थांबलो. मनसोक्त चहा नाश्ता केला आणि संध्याकाळी  सव्वासातच्या सुमारास पुन्हा कसारा स्टेशनला पोचलो. सव्वाआठची लोकल पकडून साडेनऊ ला घरी.
          त्यांनंतर संपूर्ण आठवड्यात मला कोणीही विचारलं की कुठे गेलेला ह्या रविवारी?? तर माझं उत्तर ठरलेलं  होतं "ढगात"!!!

काही महत्वाच्या गोष्टी 
  1. गडावर जाण्यासाठी जवळचे स्टेशन कसारा. कसाऱ्यावरून निरगुडपाड्यास जाण्यासाठी जीप मिळते. नंबर हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करावा. 
  2. गडावर जाण्यासाठी जरी गाईड लागत नसला तरी दिशादर्शकाकडे लक्ष ठेवून वाटचाल करावी. 
धन्यवाद पुन्हा भेटूतच.....

Thursday, 21 June 2018

पुनःश्च गोरखगड (GORAKHGAD FORT)

            कितने भी तू कर ले सितम, हँस हँस के सहेंगे हम, ये प्यार ना होगा कम.... हे गाणं मला आवर्जून एका ट्रेक साठी वापरावस वाटतं ते म्हणजे "गोरखगड". कारण हा ट्रेक कितीही वेळा करा हा ट्रेक जितका थकवतो, जितका घाम काढतो, जितकी परीक्षा बघतो तितकाच तो आनंद ही देतो. त्यामुळे कितीही वेळा केला तरी ह्या ट्रेक ला नाही म्हणावसं वाटत नाही. हा ट्रेक करायची माझी चौथी वेळ. परंतु प्रत्येकवेळी नवीन कोणालातरी घेऊन जायची संधी मिळते. ह्यावेळी निमित्त होतं कॉलेजच्या मित्रांना घेऊन जायचं नुकतीच गोवा ट्रिप झालेली त्यातून बाहेर येतो ना येतो तोच ऊर्मिलाला रविवारी सुट्टी चालून आलेली. मग आधीच रविवारी सुट्टी त्यात पावसाळा मग काय उठा नि पळत सुटा. बिचाऱ्या सागरला आजारातून सावरू पण देत नाही तोच आम्ही आमचा प्लॅन तयार केला त्याचं म्हणणं होतं लांबचा ट्रेक नको जवळचाच हवा. मग म्हंटल ठीक आहे "गोरखगड" जवळच आहे. "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास". तिकडून आमचा फिटनेस मॅन सुमितसुद्धा म्हणाला मी पण तयार आहे अजून माझे तीन मित्र पण आहे म्हणजे ह्यावेळी ग्रुप मोठाच झाला.

         रविवारी सकाळी ७ ला भेटायचं ठरलं भेटेपर्यंत ८ वाजले तो भाग वेगळा पण काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण घरापासून जवळ असल्यामुळे पोहोचायची काळजी नव्हती. काहीजण नवीन असल्याने तोंडओळख करायच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे "हॉटेल गुरुप्रसाद" मध्ये चहा नाश्त्याचा बेत केला. हेल्मेटमधून तोंड बाहेर निघाल्यावर सगळ्यांचे खरे चेहरे दिसले. मी उर्मिला, सागर, सुमित आधीपासून ओळखत होतो त्यात अजून भर पडलेली आदित्य, राहुल आणि शुभमची. पहिल्या भेटीमध्येच कळलं होतं ह्यांच्याशी एकरूप व्हायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी तसेच झाले. हॉटेल पासून गडाच्या पायथ्यापर्यंत पोहचेपर्यंत आम्ही जवळपास मित्र झालोच होतो. सुमारे साडेदहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी होतो. गाडीला हेल्मेट टांगले आणि सरळ गडाची वाट धरली हॉटेलमध्येच गडाचा विडिओ दाखवल्याने थोडीशी भीती होती पण डर आगे जित है ना??? अश्या विचाराने सगळ्यांनी चालावयास सुरवात केली.


 गोरखगड 
        गडाच्या पायथ्याशी एक बस २-३ चारचाकी गाड्या पाहिल्या होत्या त्यामुळे वरच्या गर्दीचा थोडासा अंदाज आला होता पण आम्ही आमची चाल संथच ठेवली कारण जेवढं आरामात जाऊ तितकी गर्दी कमी असेल आणि आम्हाला परतण्याची काही घाई पण नव्हती. गप्पांच्या साथीने आमचा प्रवास चालू होता. पाऊस येण्याची आम्ही वाट बघत होतो कारण दीड तास गाडीवर बसून असं अचानक चालायला सुरुवात केल्यावर घाम येणं साहजिकच होतं. सुमारे १५-२० मिनिटे चालल्यावर गोरखगड समोर उभा ठाकला तेव्हा खरच कोणाला वाटत नव्हतं की आपल्याला त्याच्यावर जायचंय पण मनाशी चंग बांधला होता की जिथपर्यंत पोहचू तिथपर्यंत तर जायचंच पण इतिहास साक्षीदार आहे आजपर्यंत कोणताही ट्रेक अर्ध्यात सोडला नाहीये. गडाला पाठीशी घेऊन २ ४ फोटो काढले व मागून काही लोकांच्या चालीचा अंदाज घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. थोडं वर गेल्यावर गार वारा लागल्यावर उत्साह अजून वाढला.


वेडात मराठे वीर दौडले...... 
अचानक आलेला चालण्यातला वेग हा हवेमार्फत घेऊन आलेल्या शक्तीचा स्रोतच होता. तेवढ्यातच थोडासा पावसाचा शिडकावा झाला. त्याने आम्ही जरी भिजलो नसलो तरी त्याने आम्हाला धावपळ करायला नक्कीच भाग पाडलं. आता आमच्या डाव्या बाजूला गोरखगड आणि उजव्या बाजूला सिद्धगड होता. समोर एक पठार नजरेस पडलं सगळ्यांनी मिळून तिथे थोडावेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं. त्याच वेळी सगळ्यांनी सामान बागेत टाकलं पण काही काहींच लक्ष फक्त फोटोग्राफी कडे होतं. कारण समोर इतका लाखमोलाचा निसर्ग आणि त्यासमोर आपली दौलत ती काय??? सगळ्यांनी ग्रुपला सोबत घेऊन फोटो काढले. त्याच डोंगरदाऱ्यांमधून धुक्याची झालर फिरत होती.        
         नेत्रदीपक क्षण 
            नुकताच पाऊस झाल्याने बऱ्यापैकी हिरवळीला सुरुवात झालेली. सुमित, उर्मिला, सागर ह्यांनी मन भरून फोटो काढले त्यांचे मॉडेल फक्त बदलत होते कधी राहुल कधी शुभम तर कधी आदित्य. खरंतर समोर इतका हिरवागार निसर्ग. मनसोक्त हवा तिथून उठावस वाटत नव्हतं पण काय करणार "कही पे पहुचने के लिये कही से निकलना बहुत जरुरी होता है" असं म्हणून आम्ही सगळे तिथून निघालो. आता येणारा फक्त 5 मिनिटाचा रस्ताच फक्त समाधानकारक होता. पुढची वाटचाल कठीणच होती. पण अज्ञानात शहाणपण आहे म्हणतात ना तेच खरं त्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात. पुढच्या शिकस्तीचा कोणालाही अंदाज नव्हता म्हणून सगळे आरामात होते.
           त्या ५ मिनिटाच्या चालीनंतर आधी गोरक्षनाथ महाराजांची समाधी आली आणि डाव्याबाजूने सरळ ८० अंशाच्या कोनात वर जाणारी वाट. गडावर जाण्यासाठीचे २ च खडतर टप्पे आणि त्यात मी हा ट्रेक आधी केला असल्याने मलाच ह्याबद्दलची सत्यता माहिती होती पण ह्यांना सगळ्यांना काही सांगू की नको ह्याच विचारात मी होतो. पण न सांगता खूप काही साध्य करता येत होतं म्हणून पहिला टप्पा मोकळा होईपर्यंत आम्ही मध्यावरूनच वरच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. न येऊ शकलेल्या मित्राला म्हणजे ऋषीला विडिओ कॉल चालू झाले. त्यालासुद्धा घरीबसून गडाचं दर्शन दिलं.
 धुक्यात लपलेला सिद्धगड 
          रस्ता मोकळा झाल्यावर आम्ही शेवटी म्यान केलेल्या तलवारी बाहेर काढल्या व चढाईला सुरुवात केली. एकाला पुढे ठेऊन त्यामागे ऊर्मिलाला ठेवलं सुरक्षितरीत्या चढणं सध्या एवढच एक ध्येय होतं. खरं सांगायचं झालं तर काळजी उर्मिलाचीच होती. पण सागर आणि उर्मिलाच्या एकमेकांना चिडवण्यामुळे उर्मिलाने स्वतासाठीची ही लढत प्रतिष्ठेची करून घेतली होती. त्यामुळे घाबरत का ना होईना ती चढली. मी नाही मी नाही म्हणत शुभम सगळ्यात आधी वर जाऊन पोचला होता. त्याच्यामागे मी पोचलो मागून दबक्या पावलाने सुमित आला आणि त्यामागून राहुल आणि आदित्यने आपली बाजी मारली. आणि वरून खाली पाहिल्यावर सगळ्याच्या मनात एकाच प्रश्न होता तो म्हणजे खाली इथूनच उतरायचे आहे का??? आता काय बोलणार??? मी म्हणलं "हो" पण आधी वर जाऊ उतरायचं नंतर बघू.
 गडाच्या प्रवेशद्वाराकडे जाणारी खडतर वाट 
 चढतानाचा उत्साह 
         इतक्या वर गेल्यावर गडाचे अवशेष नजरेस पडले त्याचा आढावा घेतला गोरखगडावर एकूण ४ ते ५ पाण्याची टाके आहेत. त्यातील पिण्याजोगे फक्त एकच ते म्हणजे गुहेच्या बाजूचे जिथे राहायची सोय होऊ शकते आशा ठिकाणचे. 
        एव्हाना आम्ही गुहेपाशी पोचलो होतो मी खालीच सगळ्यांना म्हणलेलं की ज्याना वर पर्यंत यायला जमणार नाही त्यांनी गुहेजवळ थांबलं तरी चालेल पण हिम्मत  हारतील ती आपली गॅंग कसली??? उलट गुहेजवळ पोचल्यावर सगळे एकसुरात म्हणाले "आधी वर जाऊन येऊ मग खाली बसुत!!". मानलं राव गड्यांना. हेच खरे राज्यांचे मावळे!!!. त्यामुळे गुहेजवळून 2 मिनिटातच आम्ही वर जायच्या वाटेवर गेलो आणि समोरच दृश्य बघून सगळेच हडबडले. हाच तो दुसरा आणि शेवटचा टप्पा. सगळ्यांना प्रश्न पडला चढू शकूत का आपण??? कारण वरून येणारी गर्दी आमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करत होती.

        एक मुलगी तर उतरताना मम्मी मम्मी करत रडत उतरली. आम्ही आधी तिच्याकडे पाहिलं आणि मग उर्मिलाकडे पाहिलं म्हंटल उरम्या तुझं असं होता कामा नये!!! तरीही ती संकोचिंत दिसली मग एकच पर्याय होता ते म्हणजे Tattoo च आमिष. तिला म्हंटल तू वर पोच तुला Tattoo देतो. Tattooसाठी उरम्या एव्हरेस्ट पण चढेल तो गोरखगड काय?? त्यावरून पण सागराची चिडवचिडवी चालू झाली .  गडाकडे हात दाखवून सागर म्हणाला "ते बघा उरम्या तुझं Tattoo तिकडे आहे!!!" मग काय झाली ना तयारी.
 चढतानाची सागरची मेहनत आणि मागून फोटोसाठी आतुर झालेली उर्मिला 
          गर्दी कमी झाल्यावर आम्ही पुन्हा त्याच पद्धतीने चढायला सुरुवात केली. शुभम पुढे मी मागे मग उर्मिला, सागर आणि सुमित. मागून हळू हळू वाट काढत आणि स्वतःची वाट लागू न देता आदित्य आणि राहुल वरपर्यंत चढले. सरळ ८० अंशाच्या कोनात असलेली सगळ्यांसाठीची ही अनभिज्ञ चढाई खरच रोमांचकारी ठरली. वर पोहचेपर्यंत दीड वाजले होते.

मोहीम फत्ते  
 गोरखगडावरून दिसणारा मच्छिंद्रगड 
       आम्ही सगळ्यात आधी बॅगा रिकाम्या करायचे ठरवले. सगळ्यांनी सगळे खायचे पदार्थ बाहेर काढले हवे तसे खाल्ले. पोट भरले त्यानंतर चालू झाला फोटोग्राफीचा तास. सगळ्यांनी ह्या सर्वोच शिखरावर मनसोक्त फोटो काढले. भरपूर गप्पा, किस्से झाले. निघावस वाटत नव्हतं पण तरीही चढलोय म्हंटल्यावर उतरावं तर लागणारच ह्या विचारानेच उतरायला सुरुवात केली.
 उतरताना होणारी कसरत 
        एव्हाना पूर्ण गडावर फक्त आम्ही ७ जणच होतो त्यामुळे घाई कसलीच नव्हती. फक्त लक्षपूर्वक उतरण्याची गरज होती तसंच आम्ही एकमेकांना व्यवस्थित सांभाळत खाली उतरलो एव्हाना 3 वाजले होते त्यामुळे आम्ही गुहेत थोडा वेळ विश्रांती आणि शांतता अनुभवण्यासाठी थांबायचं विचार केला आणि आमच्याकडे वेळ ही खूप होता म्हणून आम्ही थांबलो. तिथेच सुमित ने स्वतःचा एक नृत्याविष्कार सादर केला. त्याचे फोटो काढून आता थेट खालच्या वाटेला लागलो.
 ग्रुप फोटो 
         आता मात्र सगळ्यांची चाल संथ झाली होती पण त्याने काही फरक ही पडणार नव्हता कारण वेळ भरपूर, गर्दी अजिबात नाही आणि स्वतःच्या गाड्या त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नव्हती. ५ वाजताच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो.
परतीच्या प्रवासाचे थकलेले चेहरे 
घनदाट जंगलात वसलेले गाव 
        एव्हाना सगळ्यांना कडाडून भूक लागली होती. मग काय आपल्या सगळ्यां मित्रांना बदलापूरच्या प्रसिद्ध मुळगावच्या वडापावची चव चाखायला दिली. मग काय सगळेच खुश. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड.
 मुळगाव चा प्रसिद्ध वडापाव 
       अगदी काहीही माहिती नसताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याबद्दल उर्मिला ,सागर, सुमित, शुभम, राहुल आणि आदित्य तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद... परत लवकरच भेटुत नवीन ठिकाणी त्याच जोशात आणि त्याच उत्साहात.... Good bye.....  
 PICTURE OF THE DAY.....