Tuesday, 25 September 2018

गणपती गडद ( GANPATI GADAD)

           लागोपाठ बारावा रविवार जेव्हा मी घरी नव्हतो. पण ह्यावेळी कुठे जायचे ते नक्की नव्हते त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या ट्रेक ग्रुप ला ह्यावेळी सांगून ठेवलेलं की पुढचा रविवार मी नसेन म्हणून त्यांनी पण मी आधी जाऊन आलेल्या ठिकणी जायचं ठरवलं. ते म्हणजे गणपती गडद. पण गणपती गडद म्हटल्यावर मला ही राहावेनासे झाले. ह्यावेळी उर्मिला येणार असल्याने तीने मला सांगितलेलं की तू बोलशील तिथे जाऊ. मग तिला म्हंटलं चल गणपती गडदलाच जाऊ. ठरलं तर मग रविवारी सकाळी ६ वाजता उठून ७ वाजता आम्ही BIKE वरून प्रवासाला सुरुवात केली.
             गणपती गडद म्हणजे डोंगरात कोरलेली लेणी. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे कल्याण-मुरबाड-धसई आणि मग गणपती गडदच गाव म्हणजे सोनावळे. वाटेत मुरबाड आणि धसईच्यामध्ये गोरखगडचे अप्रतिम दृश्य नजरेस पडते. गोरखगड म्हणजे माझा जीव कि प्राण. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला लेणी दिसते तेच गणपती गडद.
 गोरखगड 
            सुमारे दहा वाजताच्या सुमारास आम्ही सोनावले गावात पोहोचलो गाडी गावात लावली आणि सरळ वर चढायला  सुरुवात केली. प्रचंड ऊन असल्याने हालत होणार हे नक्कीच होतं खरं तर गणपती गडद करायचं झाल्यास पाऊस असल्यावरच करावा. तेंव्हाचं निसर्गसौंदर्य काही औरच असतं. पण असो आम्ही सुमारे १० च्या सुमारास चालायला सुरुवात केली गावात गावकऱ्यांची शेती दिसली .
           पुढेच एक ओढा वाहत होता तो पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी हे सगळं कॅमेरात टिपत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.



 
            आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई उन्हामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच थेंब थेंब का ना होईना धबधबा पडत होता त्यात सगळ्यांनी भिजून घेतलं आणि थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.


नाणेघाट 
           समोरचा  निसर्ग शांतपणे अनुभवून आम्ही गडदीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे गडदीमध्ये बऱ्यापैकी शांतता होती. इतक्या वेळ उन्हात चालत असल्याने आता भूकसुद्धा प्रचंड लागली होती त्यामुळे पटापट बॅगेतुन डबे काढून आम्ही पेटपुजेला सुरवात केली. पोटभर जेवून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.
गडदीतला गणपती 
          परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तोच आकाशात काळे ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. आधी वाटलं दोन पाच मिनिटंच हा राहील पण तो जो सुरू झाला तो थेट खाली आल्यावरच थांबला. पण ह्या पावसामुळे मागे वळून बघितल्यावर गणपती गडदचे खरे सौंदर्य नजरेस पडले.
परतीचा प्रवास
      गणपती गडदचे खरे सौंदर्य
              त्याकडे ५ मिनिटं एक टक लावून बघून पुन्हा आपली वाट धरली आणि थेट गावात जाऊन थांबलो. गावात पिवळ्या रंगाची बरीच फुले नजरेस पडली तेव्हा कासची आठवण झाली तेव्हा मनात आलं आता कासला जायला हवं. ठरलं तर मग पुढचं ठिकाण कासच पठार.
 कास पठाराची आठवण 
         एव्हाना ५ वाजले होते गावात उतरून पटापट १ कप चहा घेतला व मी आणि उर्मिला बाकी सगळ्यांचा निरोप घेऊन घरच्या  वाटेला लागलो. वाटेतच बदलापूरच्या प्रसिध्द वडापावचा आस्वाद घेतला आणि साडेसातच्या सुमारास घरी पोचलो.
मुळगावचा प्रसिद्ध वडापाव
गणपती गडदच्या ट्रेक चे काही निवडक फोटो




Friday, 7 September 2018

ताहुली शिखर (TAHULI PEAK)

           इतके वर्ष अंबरनाथमध्ये राहतोय पण कोणाच्याच तोंडून ताहुली म्हणून काय हे ऐकलंच नव्हतं. एकेदिवशी मित्राचा फोन आला अरे अंबरनाथमध्ये ताहुली कुठे आहे ऐकलंय का??? ताहुली म्हणून एक उंचावरची जागा आहे पण गड म्हणाल तर आम्हाला मलंगगडच माहिती होता. मग काय नवीन ठिकाणाला भेट द्यायची म्हणून ताहुली शिखरावर जायचा निर्णय घेतला.

          ताहुलीला जाण्यासाठी कल्याणला उतरून हजीमलंगला जाणारी बस पकडावी लागते. वाटेत कुशिवली गाव लागते बस स्टॉप वरून समोर जाणारी वाटच ताहुलीच्या दिशेने जाते. आधी गावात चौकशी करून आम्ही पुढच्या वाटेला लागलो. सुरुवातीची पूर्ण वाट लालमातीची होती पाऊस असल्याने ती पूर्ण चिखलाची होती. त्यातही वाट काढत आम्ही पुढे निघालो तोच समोर एक धबधबा लागला आणि आमची जाणारी वाटही धबधब्यातून जाणारच होती त्यामुळे सगळ्यांसाठीच एक वेगळ्याप्रकारचे Thrill होते.
              धबधब्यावर थोडं भिजून पुढे निघालो. पाऊस बऱ्यापैकी होता डाव्याबाजूला आम्हाला आमचं ध्येय स्पष्टपणे दिसत होतं. वाटेवर प्रत्येक ठिकाणी योग्य दिशादर्शक असल्याने वाट चुकण्याचा काही संबंधच नव्हता. फक्त जंगलवाट असल्याने जसजसं आतमध्ये प्रवेश करत होतो तसंतसं अंधार वाढत चालला होता. पायथ्यावरून बघितल्यावर घनदाट जंगलाचा अंदाज आलाच होता आणि तोच अनुभव घ्यायला आम्ही जंगलात प्रवेश केला होता.  

जंगलवाट          
               पावसामुळे झाडांना फुटलेली पालवी नवनवीन रंगांची फुले मनाला भुरळ घालत होती. त्यांचे फोटो काढून आम्ही पुढे जात असतानाच एका अश्याजागी येऊन थांबलो जिथून कल्याणचा परिसर स्पष्ट दिसू लागला होता. पण ही खऱ्या अर्थाने फक्त सुरुवातच होती कारण हा ट्रेक इतका साधा नव्हता. समोर दिसणारा "बामण्या" सुळका आम्हाला खुणावत होता. सुरुवातीला ताहुलीच्या उजव्या बाजूला दिसणारा हा सुळका आता आमच्या समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूला हजीमलंगचा डोंगर आणि डाव्या बाजूस ताहुली. ताहुली जरी उजव्या बाजूस असलं तरी अजूनपर्यंत ते आम्हाला दिसत पण नव्हतं. बामण्या सुळक्याच्या समोर उभे राहून काही फोटो काढून पुन्हा डाव्या हाताने आमचा प्रवास सुरु केला.
             थोडंस पुढे गेल्यावर दगडांनी व्यवस्थित रचलेल्या पायऱ्या लागल्या. वाटेत एक महादेवाचं मंदिर लागलं. सध्या त्या मंदिराच्या डागडुजीचं काम चालू होतं म्हणून तिथे असणाऱ्या काही माणसांना विचारलं हा मागे दिसणारा सुळका कोणता??? तेव्हा आम्हाला कळलं तो म्हणजे "बामण्या". तेव्हाच त्यांना विचारलं अजून किती वेळ लागेल तेव्हा ते म्हणाले अजून दीड तास तरी लागेल. एव्हाना बारा वाजलेच होते. पण ट्रेक अर्धवट पण सोडायचा नव्हता मग आपल्या चालीचा वेग वाढवला.
पायऱ्यांची वाट
 
महादेवाचे मंदिर
            वरती पोहोचल्यावर जवळपास सगळी वाट पठारीच होती. हवामानानेही साथ दिल्याने थकवा काही जाणवत नव्हता. किर्र काळोखाच्या ही वाट अचानक एका जागेवर दुतर्फा झाली चालता चालता वाटेत एका बाजूला मुंग्यांचे भलेमोठे वारूळ लागले. डाव्या बाजूला एक धबधबा नजरेस पडला.  येताना तिकडे जायचा विचार केला कारण आत्ता आधी वर पोहोचणं गरजेचं होतं एव्हाना भूक पण प्रचंड लागली होती. 
चिटीयोंके भी महल होते हैं 
           काही वेळात आम्ही "बामण्या" सुळक्याला मागे टाकत ताहुली शिखराजवळ येऊन पोहोचलो. ताहुली शिखर जवळ दिसल्यामुळे सगळा उत्साह एकत्र करून वर जाणाऱ्या एका पायऱ्यांच्या वाटेवर जाऊन पोहोचलो खरंतर हा टप्पा चढायला जिवावर आलं होतं पण हवामानाच्या साथीने आणि आमच्या प्रयत्नाच्या जीवावर आम्ही ताहुली शिखर गाठलं.
  ताहुली शिखर
           समोर बामण्या सुळका आता खूप छोटासा वाटतं होता. शिखरावर पोहोचताच समोर एक पाण्याचे टाके लागले. आणि त्यापुढे संत गाडगेबाबा धर्मशाळा. ह्या धर्मशाळेत राहण्याचीही सोय होते. पुढे वाटेतच एक शंकराची पिंड दिसते. ढग बाजूला होते तोवर आजूबाजूची सगळी दृश्ये कॅमेरात टिपली आणि जेवायला बसलो.
  पाण्याचे टाके
निसर्गरम्य दृश्य
 
             जिथे जेवायला बसलो तिथेच "पाचपीर " नामक एक धार्मिक स्थळ होतं. त्याचे दर्शन घेतलं आणि पुन्हा निघायच्या उद्देशाने सगळी आवराआवर केली आणि परतीच्या वाटेला लागलो. परतीच्या वाटेला लागताच समोरचा परिसर सगळा धुक्याने व्यापला होता. म्हणून आधीच सगळे फोटो काढले त्याचा फायदा झाला.
पाचपीर 
 परतीच्या वेळचे वातावरण 
         आता उतरताना मात्र थांबून अर्थ नव्हता एव्हाना अडीच वाजले होते. उतरायला सुरुवात केली उतरताना वाटेत बरेच निसर्गरम्य देखावे दृष्टीक्षेपात आले. उशीर झालाच होता पण तरी कितीही घाई करून आम्ही सुमारे साडेपाचच्या सुमारास पुन्हा धबधब्यापाशी येऊन पोहोचलो  बाकी सगळ्यांची वाट पाहेपर्यंत मी आपला पायातली पादत्राणे बाजूला सारून त्या धबधब्यात पाय सोडून बसलो.
निवांत 
            पुन्हा सगळ्यांना एकत्र घेऊन ६ च्या सुमारास आम्ही घरच्या दिशेने रवाना झालो. दुसऱ्यादिवशी सुट्टी असल्याने काही चिंता नव्हती पण हा ट्रेक मात्र थकवणारा होता एवढं नक्की!!!
खरंतर खालून वर पाहिल्यावर आम्ही गाठलेल्या ध्येयावर आम्हालाच विश्वास बसत नव्हता.
पण जे होतं ते खरं होतं.
मला तर असं वाटलं ह्या पर्वातला हा सगळ्यात उत्तम ट्रेक होता. आणि तो झालाही तसाच एक नंबर.
अविश्वसनीय ट्रेक
MOUNTAINS ARE CALLING & I MUST GO...