Thursday, 16 February 2017

किल्ले "पेठ"ची ग्रेट भेट..!!!

               फेब्रुवारी महिन्यातला दुसरा रविवार जवळचा कोणताही किल्ला करायच्या उद्देशाने पेठच्या किल्ल्यावर शिक्कामोर्तब झालं. १२ फेब्रुवारी सकाळी मी प्रशांत दादा आणि अनिरुद्ध आम्ही सकाळी ५ वाजता गाडीने जाण्यास सुरवात केली अंबरनाथ ते पेठ हे अंतर सुमारे ५५ किमी आहे लवकर चढायचा उद्देशाने आम्ही लवकर निघायला सुरवात केलेली जोपर्यंत शहरात होतो तोपर्यंत थंडीचा काही अंदाज आला नाही पण बदलापूर सोडल्यावर थंडीचा तडाखा जाणवू लागला अक्षरशः ती थंडी नकोशी वाटावी लागली म्हणून आम्ही जवळपास कुठे चहा ची टपरी दिसल्यास गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला पण सकाळी पाच साडेपाच च्या सुमारास कुठे चहा ची टपरी दिसणंही  मुश्किल झालेलं अखेर नेरळ मध्ये प्रवेश केल्यावर एक हॉटेल मिळालं तिथे २ कटिंग पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली अजूनही २६ किमी अंतर कापायचं बाकी होतं ताशी ४० किमी च्या सावध वेगाने ७.३० च्या सुमारास आम्ही आंबिवली गाठलं. वाटेत पेठ च्या मागून येणाऱ्या सूर्यदेवाचे लोभस दर्शन झाले
               सूर्योदयाचे दर्शन
           रेल्वे ने यायचं झाल्यास प्रथम ट्रेन ने कर्जत गाठावे कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात यावं. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. ह्या गावामुळेच ह्या किल्ल्याला "पेठचा  किल्ला" म्हणून संबोधले जाते        गावातून गेलेली ही वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. 
             आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास. सकाळी  ७.४० च्या वेळी आम्ही चालायला सुरुवात केली सुमारे ३१०० फूट उंचीचा असलेला हा गड मुंबई पुण्याच्या मध्यावर असल्याने सगळ्यांनाच खुणावत असतो  आंबिवली गावातुन १०-१५ मिनीट चालत गेल्यावर डांबरी रस्ता संपतो व लाल मातीची वळणावळणाची वाट चालू होते 

               अम्बिवली गावापासून सुमारे १ तासाची  ही वाट आपल्याला  थेट "पेठ" गावात घेऊन जाते तिथून खरी गडावर चढायला सुरुवात होते डांबरी  रास्ता होण्या अगोदरच हा किल्ला पाहून घ्यावा. गावात एका झाडावर कोथळीगडकडे जाण्यासाठीचा छोटासा दिशादर्शक आहे. ह्या दिशादर्शकाच्या उजव्या बाजूने गडाकडे जाण्याचा रस्ता आहे 
पेठ गांव



         
             ती वाट धरून गप्पा मारत मारत आम्ही वाट कापत होतो .थंडीचे दिवस असल्याने झुडपे जास्त नव्हती पण पावसाळ्यात आल्यास नक्कीच गर्द झाडीचा प्रत्यय येईल. उन्हाचा तडाखा वाढायच्या आत आम्ही चढाई करायचे ठरवले सुमारे एक तास चालल्यावर आम्हाला एक पडझड झालेलं प्रवेशद्वार दिसलं तेव्हा कळलं की आता गडास सुरवात झाली आहे. ह्या दरवाज्याकड़े पाहिल्यावर आपल्याला ह्या दुर्लक्षित किल्ल्याचा अंदाज येतो.
पडझड झालेले प्रवेशद्वार
             ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूची वाट आपल्याला गडाची प्रदक्षिणा घडविते व प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा.या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब व आतील दरवाज्यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे. हे दृश्य पाहिल्यावर आपल्या नजरेचे पारणे फटते तिथे सुमारे १० मिनिट विश्रांति घेऊन व काही शिल्प कॅमेरात कैद करून आम्ही वर चढण्यास निघालो.





           भैरोबाच्या गुहेतील कोरीवकाम 
           भैरोबाच्या गुहेपासून पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे, तिच्यात उजव्या बाजूस  खाली एक पाण्याचं टाकं आहे हे बारमाही टाके आहे.  पुढे ५-१० मिनिट चालल्यावर आपल्याला एक तोफ निदर्शनास पड़ते व डाव्या बाजूस पेठचा किल्ला. इतिहासाची साक्ष  देण्यारी ही एकच तोफ गडावर उपलब्ध आहे

गडावर इतिहासाची साक्ष देणारी एकमेव तोफ            
           भैरोबाच्या गुहेतुन वरच्या बाजूस जाण्यासाठी एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत. भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या सुमारे दीड ते दोन फूट इतक्या उंच आणि दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास रोमांचक आहे. ह्या पायऱ्यांकडे पहिल की आपल्याला त्या  काळातल्या करागिरांच्या कौशल्याचा अंदाज येतो. 
गुहेतुन वर जाण्यासाठी उपलब्ध असणारा एकमेव मार्ग 
          भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस शिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष शिल्लक नाहीत. परंतु गडमाथ्यावरून चहू बाजूचा डोंगराळ प्रदेश नजरेस पडतो. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येतो परंतु हे सगळं नजरेस पडण्याआगोदर प्रदूषणाचा दाट थर नजरेस पडतो.

 प्रवेशद्वारावरील शिल्प 
              गडाचा इतिहास पाहता सन १६५६-५७ च्या काळात शिवछत्रपतींनी ढाक दुर्ग व राजमाची सोबत कोथलीगड स्वराज्यात दाखल करून घेतला. पुढे नोव्हेंबर १६८४ पर्यंत हा गड स्वराज्यात होता शिवकाळात कोठलीगडाचा संरक्षक ठाणं व शस्त्रागार म्हणून उपयोग होत असे. पुढे छत्रपती संभाजी राज्यांच्या कारकिर्दीत माणकोजी पंढर्यांनी अब्दुल कादरला व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक म्हणून दुर्गत प्रवेश करवून दिला आणि त्याने गडावरच सैन्य कापून काढलं असा ह्या गडाचा रक्तरंजित इतिहास आहे अशा इतिहासाची साक्ष असलेला हा किल्ला पाहून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो  
            पेठ गावातुन परतत असताना वाटेत आम्हाला चिंचा बोरं विकणारी शाळकरी मुलं दिसली त्यांच्या डोळ्यात पैसे कमावण्याचा उत्साह आणि आनंद दिसत होेता त्यांच्याकडून बोरं घेऊन आणि काही फोटो काढून आम्ही खाली उतरलो असा हा एका दिवसात करता येणारा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी करावा.... पुन्हा भेटूत नवीन गडकिल्ल्यांसोबत नवीन अनुभवांसोबत...... तोपर्यंत 🙏🙏🙏

गडावरील भैरोबाचे देऊळ

Wednesday, 8 February 2017

एक अविस्मरणीय भेट.....

     
        आज मी लिहीत असणारा ब्लॉग हा कोणत्याही गड किल्ल्यांबद्दल नसून ज्या व्यक्तींमुळे माझ्या मध्ये गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली त्यांच्याबद्दल आहे.
         वय वर्ष ७० तरीही आज सुद्धा तोच उत्साह, तोच जोश आणि  तीतकीच जिज्ञासा असलेले निसर्गात रममाण होणारे इतिहासाचे उत्तम अभ्यासक व भटकंती वरील अगणित पुस्तकांचे लेखक  प्रफुल्ल केशवराव घाणेकर सर.
       मला आजही आठवतंय मी चौथीत असताना माहुली गड केला होता आणि तिथुनच खऱ्या अर्थाने भ्रमंती ला सुरवात झालेली आणि  तेव्हा माझ्या सहकाऱ्यांकडून नेहमी ऐकून होतो की भटकंती करायची तर घाणेकर सरांची पुस्तक वाचून... तेव्हा पासून माझ्या मनात एक प्रकारची जिज्ञासा होती की खरंच आहे तरी काय ह्या पुस्तकात !!!
       त्यानंतर मी गड किल्ले सर करण्यासाठी त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचे मार्गदर्शन घेतले व बरेच गड किल्ले सर किल्ले नंतर बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं "साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची" हे पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक वाचून खऱ्या अर्थाने सह्याद्रीची ओढ निर्माण झाली. त्यांची वाक्यरचना, त्यासोबत घडलेले प्रसंग वाचल्यावर आपल्या मनात देखील उत्सुक्तता निर्माण होते. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात त्यांनी किल्ल्यांबद्दलचा व्यक्त केलेला इतिहास वाचल्यांनंतर त्याच गड किल्ल्यावर जाऊन आपल्याला तोच इतिहास डोळसपणे अनुभवता येतो. 
      मध्यंतरी एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांच्याशी भेटण्याचा प्रसंग आला पण वेळ खूप कमी होता पण त्याचा मनमोकळा स्वभावाचा अंदाज त्याच २ मिनिटाच्या भेटीत आलेला. मी त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी त्यांचं पुस्तक पुढे केलं तेव्हा बोलता बोलता त्यांनी त्याच पुस्तकावर त्याचा फोन नंबर दिला व मला आजही आठवतं ते म्हणाले की "पुण्यात कधीही आलास तरी फोन कर नक्की भेटूत" त्यादिवशी तर मी सातव्या आसमानात होतो
      त्यानंतर लवकरच ट्रेक च्या निमित्ताने पुण्याला जायचा प्रसंग आला तेही सिंहगडाच्या रुपात. २०१७ सालातला पहिला ट्रेक किल्ले सिंहगड... सकाळचं लवकर सिंहगड किल्ला सर केला व उतरताना त्यांना फोन केला तेव्हा सुमारे १२.३० वाजले होते त्यामुळे मला शंका होती की आमची भेट होईल की नाही... पण तो दिवस माझा होता. मी फोन केला त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचा सकारात्मक प्रतिसाद ऐकून माझ्या आनंदाचा पारावर नव्हता 
       साधारण दुपारी ३ वाजताच्या सुमारास मी त्यांच्या घरी पोहोचलो त्यांचं लिखाण चालू होत खरं तर पुण्यातील माणसे दुपारी झोपतात असं ऐकून होतो पण हा एक अपवाद होता. मी त्यांना आमच्या भेटीचा प्रसंग सांगितला व आमच्या गप्पा चालू झाल्या मला आधी असं वाटलेलं कि आमचं बोलणं हा प्रश्नोत्तराचा खेळ होईल पण बरोबर त्याउलट झालं आमची भेट हे एक चर्चात्मक सत्र झाले ते त्यांचे अनुभव सांगत होते मी माझे अनुभव सांगत होतो. माझ्यासाठी त्यांची भेट हि कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हती कारण "एकलाव्याने जसं द्रोणाचार्यांची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या शिकलेली तसंच मी त्यांच्या पुस्तकातून च दुर्गभ्रमंती ला सुरुवात केलेली त्यांच्याशी बोलता बोलता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला म्हणजे हरिश्चंद्रगड हा त्यांनी ९ वाटांनी सर केलेला हे मी ऐकून होतो पण त्या ९ वाटा कोणत्या हे ऐकण्याची मला उत्सुकता होती आणि विशेष म्हणजे हा प्रश्न विचारल्यावर माणूस जितक्या वेळात काही विचार करेल त्यापेक्षा कमी वेळात त्यांनी मला ९ च्या ९ वाटा सांगितल्या व सोबत बऱ्याच साऱ्या ऐतिहासिक गोष्टी सुद्धा कानावर आल्या ज्यांचा खडा न खडा उल्लेख हा त्यांच्या पुस्तकातून वेळोवेळी होत असतो म्हणजे त्यांच्या बोलण्यातून सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा अंदाज येतो 
    आज माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये येणारा प्रत्येक इतिहासाचा संदर्भ हि त्यांचीच देणं आहे तसेच माझे ब्लॉग वाचून २-४ पाऊलं जरी गड वाटांकडे वळाली तरी त्याचे संपूर्ण श्रेय हे घाणेकर सरांना जातं
         त्यादिवशी त्यांच्या भेटीने माझ्या ज्ञानात व माझ्या दुर्गभ्रमंतीच्या प्रवासात बरीच भर पडली शेवट वेळ आलेली निरोपाची पण निघता निघता त्यांनी मला त्यांनीच लिहलेलं किल्ले सिंहगड हे पुस्तक भेट म्हणून दिलं
त्यांनी दिलेली हि भेट हीच मी माझ्या आयुष्याची खरी पुंजी समजतो....
धन्यवाद घाणेकर सर
तुमचं प्रेम आणि आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहो🙏🙏🙏

Tuesday, 7 February 2017

वादळवार्यांशी झुंज देणारा "घनगड" निसर्गाची देण असलेला "तैलबैला"

         जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार ठरल्याप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता निघायची वेळ झाली मी अमित, संदेश आणि रोहित लोणावळ्याच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेत आम्ही सुमारे  ८ च्या सुमारास कर्जत ला पोचलो चहा नास्ता करून पुढचा प्रवास चालू झाला १० वाजता घनगडाच्या पायथ्याशी म्हणजेच एकोले गावात जाऊन पोचलो  

        
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती ऐकोले गावातूनच वर जाते. घनगडावर  जाण्यासाठी मुंबईकरानी आणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस.टी. पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ४० कि.मी चे आहे. भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे. भांबुर्डे ते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे. ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी. ही वाट थेट किल्ल्यावर जाते

                        पायथ्यावरून  घनगडाकड़े जाणारी वाट 
                जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा काही ग्रुप वरून खाली उतरताना दिसले तेव्हाच आम्हाला अंदाज आला की ट्रेक सोपा आहे १० वाजल्यामुळे ऊन यायला सुरुवात झाली होती आम्ही गप्पा मारत मारत चालायला सुरवात केली या वाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे.
                             वाटेवर लागणारे गारआईचे  मंदिर 
         या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो सुमारे २० -२५ मिनिटं चालल्यावर समोर एक बुरुज नजरेस पडला तेव्हा कळलं की गडाची सुरवात झाली आज तो बुरुज बरीच प्रमाणात ढासळला आहे बुरुजाला लागून च एक दरवाजा आहे
ढासळलेला  दरवाजा 
 
आजूबाजूच्या  परिसर न्याहाळताना 
              दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक विशाल कातळ नजरेस पडतो  डाव्या बाजूला बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते उजव्या बाजूला असणारा कातळ हि आता खऱ्या अर्थाने विश्रामासाठीची जागा झाली आहे तेथे एक देवीची मूर्ती आहे जर OVERNIGHT STAY करायचं ठरवलं तर ते उत्तम ठिकाण आहे कारण गडावर वास्तव्य कराव असं दुसरं ठिकाण कोणतच नाही
      कातळ कोसळून तयार झालेली विश्रामासाठीची उत्तम जागा 
         त्याच दरवाज्यातून डावीकडे गेल्यास बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते हि वाट थोडीशी खडतर आहे पण आता त्याच वाटेवर शिडी बसवण्यात आल्याने काहीशी सोपी झाली आहे पण शिडी चढून गेल्यावर सुद्धा डाव्या बाजूला जाणारी वाट सुद्धा खडतर आहे पावसाळ्यात ह्या वाटेने जाताना थोडा विचार करावा या वाटेने गेल्यास आपल्याला गडमाथा नजरेस पडतो
बालेकिल्ल्यावर जाणारी वाट
         गडावर पाण्याची एक  दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.


     गडाचा इतिहास : किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.
घनगडाच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारा  तैलबैला
 
आजही वादळ वार्यांशी झुंज  देत सुस्थितीत असलेला बुरुज
 गुहेत असलेली देवीची मूर्ती 
       हा सगळं नजारा कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो घड्याळाकडे पाहिल्यावर कळलं की आत्ताशी १२.३० च झाले आहेत तर आम्ही सगळ्यांनी ठरवून वाटेवर च असणारा तैलबैला सुद्धा करायचा निर्णय घेतला मग आमची स्वारी घनगडावरून तैलबैला कडे निघाली 


      तैलबैला वर चढायला जितका रास्ता कठीण नाहीये  त्यापेक्षा जास्त कठीण तिकडे पोचायला लागणारा रस्ता आहे. घनगडावरून तैलबैला ला जायचं अंतर असेल किमान ६-७ किमी ते पार करायला सुद्धा एक तास लागतो  १.३०च्या सुमारास आम्ही तैलबैला च्या पायथ्याशी होतो सगळ्यांकडेच पाणी संपल्यामुळे आम्ही आधी गावातून पाणी भरून घेतलं व तैलबैला चढायला सुरुवात केली
 
        पायथ्यावरुन  दिसणारा  तैलबैला  
            तैलबैलाची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात त्याला "डाईक" असे म्हणतात. तैलबैला उर्फ "कावडीचा डोंगर" हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत.


    गेले  तैलबैला गावातून विशाल भिंतींच्या दिशेने चालत गेल्यावर, उजव्या बाजूच्या पायवाटने आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी रुळलेली वाट तैलबैलाच्या "V " आकाराच्या खिंडीत येऊन पोहोचते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो.
उत्तर - दक्षिण पसरलेली तैलबैलाची भिंत  
              तैलबैलाच्या माचीवर पोचल्यावर जी रुळलेली वाट आपल्याला खिंडीत घेऊन जाते; त्या वाटेवरून चालताना उजव्या बाजूच्या वरच्या अंगाला  पसरलेली भिंत आपल्याला साथ देत असते.
         उजव्या  बाजूला दिसणारी तैलबैलाची  विशाल भिंत 
             सुमारे १५-२० मिनिटं चालल्यावर ही वाट आपल्याला  त्या  V आकाराच्या खिंडीत  जवळ घेऊन जाते उजव्या बाजूला पायऱ्या लागतात ह्या आपल्याला थेट ह्या V आकारात घेऊन जातात  इथे पोहचल्यावर दोन्ही बाजूस  खाली खोल दरी व  वर ऊंचच्या  ऊंच सुळके  आणि आपण बरोबर  मध्यावर असल्याचा प्रत्यय येतो
तैलबैलाच्या मध्यवर जाण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या

          इथे पोहोचल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक गुहा  दिसते  हे ग्रामस्थांच श्रद्धास्थान असून २०१३ मध्ये तेथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. गुहेमध्येच उजव्या बाजूला एक बारामाही पाण्याचं टाकं देखील आहे आणि त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात

  तैलबैलावरील  शिवमंदिर  व  उजव्या बाजूस असणारे  पिण्याच्या पाण्याचे  टाके 
             ह्याच जागेवर उभे राहून खालच्या घनदाट जंगलावर  तैलबैलाची पडलेली  सावली पहिल्यावर  आपल्याला त्याच्या उंचीचा अंदाज येतो निट लक्ष  दिल्यास व आपल्या कल्पनाशक्तिवर जोर दिल्यास भारताच्या नकाशाचे  प्रतिबिम्ब त्यात दिसते.

  तैलबैलाच्या  सावळीतून तैयार झालेले  भारताच्या  नकाशाचे  प्रतिबिंब
         तिथेच थोडा आराम करून आणि फोटोग्राफी करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाची वाट धरली 

      असेच हे मुंबई आणि पुण्यापासून जवळ असणारे व एका दिवसात होणारे २ गड घनगड आणि तैलबैला गिर्यारोहकांच लक्ष नेहमीच वेधून घेतात खरं सांगायचं तर दिवस सत्कारणी लागतो कारण घनगडासारखे ऐतिहासिक वास्तू शिल्लक असणारे व ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं तैलबैला हे एकाचवेळी पाहता येण हा आनंदही काही औरच......

पुन्हा भेटू नवीन किल्ले नवीन अनुभवांसोबत........  

Friday, 3 February 2017

रोमांचकारी अनुभव देणारा "गोरखगड़"

               गेले २ रविवार कुठेही गेलो नसल्याकारणाने घरी बसून असाही कंटाळा आलेला त्यामुळे येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं हा विचार चालू होता आणि जवळचं भेट देण्यासारखं आणि रोमांचकारी ठिकाण म्हणजे "गोरखगड"
मी प्रशांत दादा आणि त्याचा मुलगा अनिरुद्ध असे आम्ही एका बाईक वरून गोरखगड ला जायचं ठरवलं
अखेर तो दिवस आला
                  २६ जानेवारी ची सकाळ घरून सुमारे सकाळी ६ वाजता गोरखगडाच्या दिशेने वाटचाल चालू केली गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे गोरखगड हा कल्याण पासून सुमारे ५५-६० किमी आहे त्यामुळे तिथे पोहचण्यास सुमारे दीड तास लागतो प्रथम आम्ही वाटेत लागणाऱ्या बालाजी मंदिरात जाऊन बालाजी चे दर्शन घेतले व पुढचा प्रवास चालू केला हवेत गारवा असल्याकारणारे गाडी चा वेग तास बेताचा च होता सूर्योदय सुद्धा व्हायचा बाकी असल्यामुळे आम्ही थोड्याच वेळात सूर्योदयाचा आनंद घेतला आणि आपली वाटचाल चालू ठेवली सुमारे एक तासात आम्ही म्हसाजवळ येऊन पोचलो आपली स्वतःची गाडी असेल तर म्हसाच्या चौकात हॉटेल गुरुप्रसाद आहे तिथल्या चहाचा आस्वाद नक्की घ्यावा आम्ही चहा नाश्ता  करून पुढच्या प्रवासाला सुरवात केली २६ जानेवारी असल्याकारणाने आम्हाला वाटेत शाळेची प्रभातफेरी दिसली "भारत माता कि जय" "वंदे मातरम" अश्या घोषणा चालू होत्या तेच पाहत आम्ही ८.३० च्या सुमारास गोरखगडाच्या पायथ्याशी जाऊन पोचलो                                   
           तिथून आम्ही आमच्या खऱ्या प्रवासाला सुरवात केली देहरी गावापासून सुमारे दीड तासात आपण गोरक्षनाथांच्या मंदिरापर्यंत जाऊन पोचतो गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. डाव्या बाजूला आम्हाला गोरखगड चा सुळका खुणावत होता जस जस चालत होतो तसं तसं आम्हाला वरून सुरेख नजारा दिसत होता उजव्या बाजूला साकल माची सिद्धगड आणि डाव्या बाजूला गोरखगड आणि मच्छीन्द्रगड म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आपण सह्याद्रीत फिरत असल्याचा अनुभव हा प्रसंग देत होता  

 
 वाटेवरून खुणावणारा गोरखगड़     
           गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे. एक दीड तासाच्या वाटचाली नंतर आम्ही गोरक्षनाथांच्या समाधी जवळ येऊन पोचलो गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन पुढच्या वाटचालीचा निर्णय घेतला मंदिराच्या डाव्या बाजूने वर जाणारी वाट हि आपल्याला गोरखगडाच्या दरवाजा कडे घेऊन जाते पुढची वाटचाल हि प्रयत्नांची परीक्षा बघणारी वाट होती आम्ही चालण्यास सुरवात केली पहिला रॉक पॅच आला होता थोडस पाणी पिऊन आम्ही पुढे निघायचा निर्णय घेतला समोर दिसलेल्या दरवाज्या कडे पाहिलं की आपल्याला वाटतं आपण पोचलो पण नंतर कळत कि ही तर खरी सुरवात आहे तो एका कातळात कोरलेला दगड पहिला कि तेव्हाच्या कारागिरांचे कसब दिसून येते दरवाज्यातून वर चढून गेल्यावर दोन तीन पाण्याची टाके लागतात. समोरची वाट पुन्हा थोड्याच्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायऱ्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. समोरच असणार ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.
                            गोरक्षनाथ महाराजांचे मंदिर 
   
 पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’ पडले.
       शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. आजही ह्या गडांच्या अतिविशाल कोरलेल्या कातळात तेव्हाचे शिलालेख उपलब्ध आहे
गोरखगडावर जाताना लागणाऱ्या पायऱ्यामध्ये कोरलेला शिलालेख

गोरखगडाच्या गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५०-६० पायऱ्या खोदलेल्या आहेत.  पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते कारण दिवसेंदिवस ह्या पायऱ्या निमुळत्या होत चालल्या आहेत उजव्या बाजूला अतिविशाल कातळ आणि डाव्या बाजूला खोल दरी अश्या परिस्थितीतून आपल्याला वर जायचे असते पण हा आनंद सुद्धा काही औरच.... गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो.


गोरखगडावरून दिसणारा मच्छीन्द्रगड



गोरखगडावर असलेल्या ह्या गुहेत २०-२५ जणांना आरामात राहता येते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास दहेरी मार्गे लागतात
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.



गोरखंगडावरून दिसणारे साकल माची व सिद्धगड

गडमाथ्यावरील शिवमंदिर 
पुन्हा  भेटून नविन  गडासोबत   नविन अनुभवांसोबत . . . . . . . . 
गड़ांवरील माहितीसाठीचा  हा  माझा  पहिला वहीला  प्रयत्न 
तुमच्या प्रतिसादाची  अपेक्षा आहे