Tuesday, 7 February 2017

वादळवार्यांशी झुंज देणारा "घनगड" निसर्गाची देण असलेला "तैलबैला"

         जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार ठरल्याप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता निघायची वेळ झाली मी अमित, संदेश आणि रोहित लोणावळ्याच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली थंडीचा आणि धुक्याचा आनंद घेत आम्ही सुमारे  ८ च्या सुमारास कर्जत ला पोचलो चहा नास्ता करून पुढचा प्रवास चालू झाला १० वाजता घनगडाच्या पायथ्याशी म्हणजेच एकोले गावात जाऊन पोचलो  

        
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती ऐकोले गावातूनच वर जाते. घनगडावर  जाण्यासाठी मुंबईकरानी आणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस.टी. पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ४० कि.मी चे आहे. भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे. भांबुर्डे ते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे. ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी. ही वाट थेट किल्ल्यावर जाते

                        पायथ्यावरून  घनगडाकड़े जाणारी वाट 
                जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा काही ग्रुप वरून खाली उतरताना दिसले तेव्हाच आम्हाला अंदाज आला की ट्रेक सोपा आहे १० वाजल्यामुळे ऊन यायला सुरुवात झाली होती आम्ही गप्पा मारत मारत चालायला सुरवात केली या वाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे.
                             वाटेवर लागणारे गारआईचे  मंदिर 
         या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो सुमारे २० -२५ मिनिटं चालल्यावर समोर एक बुरुज नजरेस पडला तेव्हा कळलं की गडाची सुरवात झाली आज तो बुरुज बरीच प्रमाणात ढासळला आहे बुरुजाला लागून च एक दरवाजा आहे
ढासळलेला  दरवाजा 
 
आजूबाजूच्या  परिसर न्याहाळताना 
              दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक विशाल कातळ नजरेस पडतो  डाव्या बाजूला बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते उजव्या बाजूला असणारा कातळ हि आता खऱ्या अर्थाने विश्रामासाठीची जागा झाली आहे तेथे एक देवीची मूर्ती आहे जर OVERNIGHT STAY करायचं ठरवलं तर ते उत्तम ठिकाण आहे कारण गडावर वास्तव्य कराव असं दुसरं ठिकाण कोणतच नाही
      कातळ कोसळून तयार झालेली विश्रामासाठीची उत्तम जागा 
         त्याच दरवाज्यातून डावीकडे गेल्यास बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते हि वाट थोडीशी खडतर आहे पण आता त्याच वाटेवर शिडी बसवण्यात आल्याने काहीशी सोपी झाली आहे पण शिडी चढून गेल्यावर सुद्धा डाव्या बाजूला जाणारी वाट सुद्धा खडतर आहे पावसाळ्यात ह्या वाटेने जाताना थोडा विचार करावा या वाटेने गेल्यास आपल्याला गडमाथा नजरेस पडतो
बालेकिल्ल्यावर जाणारी वाट
         गडावर पाण्याची एक  दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.


     गडाचा इतिहास : किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.
घनगडाच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारा  तैलबैला
 
आजही वादळ वार्यांशी झुंज  देत सुस्थितीत असलेला बुरुज
 गुहेत असलेली देवीची मूर्ती 
       हा सगळं नजारा कॅमेरा मध्ये कैद करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो घड्याळाकडे पाहिल्यावर कळलं की आत्ताशी १२.३० च झाले आहेत तर आम्ही सगळ्यांनी ठरवून वाटेवर च असणारा तैलबैला सुद्धा करायचा निर्णय घेतला मग आमची स्वारी घनगडावरून तैलबैला कडे निघाली 


      तैलबैला वर चढायला जितका रास्ता कठीण नाहीये  त्यापेक्षा जास्त कठीण तिकडे पोचायला लागणारा रस्ता आहे. घनगडावरून तैलबैला ला जायचं अंतर असेल किमान ६-७ किमी ते पार करायला सुद्धा एक तास लागतो  १.३०च्या सुमारास आम्ही तैलबैला च्या पायथ्याशी होतो सगळ्यांकडेच पाणी संपल्यामुळे आम्ही आधी गावातून पाणी भरून घेतलं व तैलबैला चढायला सुरुवात केली
 
        पायथ्यावरुन  दिसणारा  तैलबैला  
            तैलबैलाची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात त्याला "डाईक" असे म्हणतात. तैलबैला उर्फ "कावडीचा डोंगर" हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत.


    गेले  तैलबैला गावातून विशाल भिंतींच्या दिशेने चालत गेल्यावर, उजव्या बाजूच्या पायवाटने आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी रुळलेली वाट तैलबैलाच्या "V " आकाराच्या खिंडीत येऊन पोहोचते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो.
उत्तर - दक्षिण पसरलेली तैलबैलाची भिंत  
              तैलबैलाच्या माचीवर पोचल्यावर जी रुळलेली वाट आपल्याला खिंडीत घेऊन जाते; त्या वाटेवरून चालताना उजव्या बाजूच्या वरच्या अंगाला  पसरलेली भिंत आपल्याला साथ देत असते.
         उजव्या  बाजूला दिसणारी तैलबैलाची  विशाल भिंत 
             सुमारे १५-२० मिनिटं चालल्यावर ही वाट आपल्याला  त्या  V आकाराच्या खिंडीत  जवळ घेऊन जाते उजव्या बाजूला पायऱ्या लागतात ह्या आपल्याला थेट ह्या V आकारात घेऊन जातात  इथे पोहचल्यावर दोन्ही बाजूस  खाली खोल दरी व  वर ऊंचच्या  ऊंच सुळके  आणि आपण बरोबर  मध्यावर असल्याचा प्रत्यय येतो
तैलबैलाच्या मध्यवर जाण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या

          इथे पोहोचल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक गुहा  दिसते  हे ग्रामस्थांच श्रद्धास्थान असून २०१३ मध्ये तेथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. गुहेमध्येच उजव्या बाजूला एक बारामाही पाण्याचं टाकं देखील आहे आणि त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात

  तैलबैलावरील  शिवमंदिर  व  उजव्या बाजूस असणारे  पिण्याच्या पाण्याचे  टाके 
             ह्याच जागेवर उभे राहून खालच्या घनदाट जंगलावर  तैलबैलाची पडलेली  सावली पहिल्यावर  आपल्याला त्याच्या उंचीचा अंदाज येतो निट लक्ष  दिल्यास व आपल्या कल्पनाशक्तिवर जोर दिल्यास भारताच्या नकाशाचे  प्रतिबिम्ब त्यात दिसते.

  तैलबैलाच्या  सावळीतून तैयार झालेले  भारताच्या  नकाशाचे  प्रतिबिंब
         तिथेच थोडा आराम करून आणि फोटोग्राफी करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाची वाट धरली 

      असेच हे मुंबई आणि पुण्यापासून जवळ असणारे व एका दिवसात होणारे २ गड घनगड आणि तैलबैला गिर्यारोहकांच लक्ष नेहमीच वेधून घेतात खरं सांगायचं तर दिवस सत्कारणी लागतो कारण घनगडासारखे ऐतिहासिक वास्तू शिल्लक असणारे व ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं तैलबैला हे एकाचवेळी पाहता येण हा आनंदही काही औरच......

पुन्हा भेटू नवीन किल्ले नवीन अनुभवांसोबत........  

No comments:

Post a Comment