Thursday, 16 February 2017

किल्ले "पेठ"ची ग्रेट भेट..!!!

               फेब्रुवारी महिन्यातला दुसरा रविवार जवळचा कोणताही किल्ला करायच्या उद्देशाने पेठच्या किल्ल्यावर शिक्कामोर्तब झालं. १२ फेब्रुवारी सकाळी मी प्रशांत दादा आणि अनिरुद्ध आम्ही सकाळी ५ वाजता गाडीने जाण्यास सुरवात केली अंबरनाथ ते पेठ हे अंतर सुमारे ५५ किमी आहे लवकर चढायचा उद्देशाने आम्ही लवकर निघायला सुरवात केलेली जोपर्यंत शहरात होतो तोपर्यंत थंडीचा काही अंदाज आला नाही पण बदलापूर सोडल्यावर थंडीचा तडाखा जाणवू लागला अक्षरशः ती थंडी नकोशी वाटावी लागली म्हणून आम्ही जवळपास कुठे चहा ची टपरी दिसल्यास गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला पण सकाळी पाच साडेपाच च्या सुमारास कुठे चहा ची टपरी दिसणंही  मुश्किल झालेलं अखेर नेरळ मध्ये प्रवेश केल्यावर एक हॉटेल मिळालं तिथे २ कटिंग पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली अजूनही २६ किमी अंतर कापायचं बाकी होतं ताशी ४० किमी च्या सावध वेगाने ७.३० च्या सुमारास आम्ही आंबिवली गाठलं. वाटेत पेठ च्या मागून येणाऱ्या सूर्यदेवाचे लोभस दर्शन झाले
               सूर्योदयाचे दर्शन
           रेल्वे ने यायचं झाल्यास प्रथम ट्रेन ने कर्जत गाठावे कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात यावं. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. ह्या गावामुळेच ह्या किल्ल्याला "पेठचा  किल्ला" म्हणून संबोधले जाते        गावातून गेलेली ही वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. 
             आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास. सकाळी  ७.४० च्या वेळी आम्ही चालायला सुरुवात केली सुमारे ३१०० फूट उंचीचा असलेला हा गड मुंबई पुण्याच्या मध्यावर असल्याने सगळ्यांनाच खुणावत असतो  आंबिवली गावातुन १०-१५ मिनीट चालत गेल्यावर डांबरी रस्ता संपतो व लाल मातीची वळणावळणाची वाट चालू होते 

               अम्बिवली गावापासून सुमारे १ तासाची  ही वाट आपल्याला  थेट "पेठ" गावात घेऊन जाते तिथून खरी गडावर चढायला सुरुवात होते डांबरी  रास्ता होण्या अगोदरच हा किल्ला पाहून घ्यावा. गावात एका झाडावर कोथळीगडकडे जाण्यासाठीचा छोटासा दिशादर्शक आहे. ह्या दिशादर्शकाच्या उजव्या बाजूने गडाकडे जाण्याचा रस्ता आहे 
पेठ गांव



         
             ती वाट धरून गप्पा मारत मारत आम्ही वाट कापत होतो .थंडीचे दिवस असल्याने झुडपे जास्त नव्हती पण पावसाळ्यात आल्यास नक्कीच गर्द झाडीचा प्रत्यय येईल. उन्हाचा तडाखा वाढायच्या आत आम्ही चढाई करायचे ठरवले सुमारे एक तास चालल्यावर आम्हाला एक पडझड झालेलं प्रवेशद्वार दिसलं तेव्हा कळलं की आता गडास सुरवात झाली आहे. ह्या दरवाज्याकड़े पाहिल्यावर आपल्याला ह्या दुर्लक्षित किल्ल्याचा अंदाज येतो.
पडझड झालेले प्रवेशद्वार
             ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूची वाट आपल्याला गडाची प्रदक्षिणा घडविते व प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा.या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब व आतील दरवाज्यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे. हे दृश्य पाहिल्यावर आपल्या नजरेचे पारणे फटते तिथे सुमारे १० मिनिट विश्रांति घेऊन व काही शिल्प कॅमेरात कैद करून आम्ही वर चढण्यास निघालो.





           भैरोबाच्या गुहेतील कोरीवकाम 
           भैरोबाच्या गुहेपासून पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे, तिच्यात उजव्या बाजूस  खाली एक पाण्याचं टाकं आहे हे बारमाही टाके आहे.  पुढे ५-१० मिनिट चालल्यावर आपल्याला एक तोफ निदर्शनास पड़ते व डाव्या बाजूस पेठचा किल्ला. इतिहासाची साक्ष  देण्यारी ही एकच तोफ गडावर उपलब्ध आहे

गडावर इतिहासाची साक्ष देणारी एकमेव तोफ            
           भैरोबाच्या गुहेतुन वरच्या बाजूस जाण्यासाठी एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत. भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या सुमारे दीड ते दोन फूट इतक्या उंच आणि दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास रोमांचक आहे. ह्या पायऱ्यांकडे पहिल की आपल्याला त्या  काळातल्या करागिरांच्या कौशल्याचा अंदाज येतो. 
गुहेतुन वर जाण्यासाठी उपलब्ध असणारा एकमेव मार्ग 
          भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस शिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष शिल्लक नाहीत. परंतु गडमाथ्यावरून चहू बाजूचा डोंगराळ प्रदेश नजरेस पडतो. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येतो परंतु हे सगळं नजरेस पडण्याआगोदर प्रदूषणाचा दाट थर नजरेस पडतो.

 प्रवेशद्वारावरील शिल्प 
              गडाचा इतिहास पाहता सन १६५६-५७ च्या काळात शिवछत्रपतींनी ढाक दुर्ग व राजमाची सोबत कोथलीगड स्वराज्यात दाखल करून घेतला. पुढे नोव्हेंबर १६८४ पर्यंत हा गड स्वराज्यात होता शिवकाळात कोठलीगडाचा संरक्षक ठाणं व शस्त्रागार म्हणून उपयोग होत असे. पुढे छत्रपती संभाजी राज्यांच्या कारकिर्दीत माणकोजी पंढर्यांनी अब्दुल कादरला व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक म्हणून दुर्गत प्रवेश करवून दिला आणि त्याने गडावरच सैन्य कापून काढलं असा ह्या गडाचा रक्तरंजित इतिहास आहे अशा इतिहासाची साक्ष असलेला हा किल्ला पाहून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो  
            पेठ गावातुन परतत असताना वाटेत आम्हाला चिंचा बोरं विकणारी शाळकरी मुलं दिसली त्यांच्या डोळ्यात पैसे कमावण्याचा उत्साह आणि आनंद दिसत होेता त्यांच्याकडून बोरं घेऊन आणि काही फोटो काढून आम्ही खाली उतरलो असा हा एका दिवसात करता येणारा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी करावा.... पुन्हा भेटूत नवीन गडकिल्ल्यांसोबत नवीन अनुभवांसोबत...... तोपर्यंत 🙏🙏🙏

गडावरील भैरोबाचे देऊळ

No comments:

Post a Comment